खरं तर पाच-सहा वर्षांपूर्वी मला मांजरांची प्रचंड भीती वाटायची. यामागे काहीही कारण नव्हतं, पण तरी भीती वाटायची. म्हणजे मांजर दिसल्यावर मी बेंबीच्या देठापासनं किंचाळायचे. यामुळे मी अनेकदा शूटही बंद पाडलंय. मला याची लाज वाटायची, पण इलाज नसायचा. मग मी एकदा ठरवलं, आपल्याला या एवढय़ाशा प्राण्याची इतकी भीती कशाला वाटते? एक तर याचं पटेल असं कारण सापडायला हवं, नाही तर भीती जायला हवी. त्यासाठी मी मांजर असलेल्या एका मित्राकडे रोज जायला लागले. हळूहळू मांजरांना हात लावायला लागले, मांजराला उचलून घ्यायला लागले.. अशा रीतीने मांजरांची भीती मी डोक्यातून काढली. पण मला कुठे माहिती होती की, भीती तर गेली, पण आता खरीखुरी मांजरं माझ्या डोक्यावर बसणार आहेत!

माझ्या एका मित्राने मला एकदा सहज बोलताना विचारलं, ‘तुला हवंय का मांजर?’ याला मात्र माझा ठाम नकार होता. भीती घालवली म्हणजे काय थेट मांजर घरीच आणून का? पण मित्राकडे चिकाटी होती. तो म्हणाला, ‘तू पाळून तर बघ.’ शेवटी हो-नाही करता गेल्या वर्षी चार ऑगस्टला ‘हुच’ हा बोका माझ्याकडे आला. तेव्हा तो जेमतेम २ महिन्यांचा होता. सुरुवातीला आमचं काही जमेना. आठच दिवसांत मी मित्राला म्हटलं की याला घेऊन जा. आपल्याच्याने नाही होणार हे. माझा मित्र भलता चिकाटीचा होता. तो मला समजावत म्हणाला, ‘अगं अजून थोडी थांब. बघ त्याचं नी तुझं जमतंय का..’ मीही त्याचं ऐकलं. हळूहळू हुचचं नि माझं पटायला लागलं. झालं असं होतं की,  हुच अगदीच लहान होता. त्याला दात वगैरे येत होते. मग तो दिसले ते चावायचा. कधी खेळायचा, कधी चिडायचा. कधीकधी खेळता खेळता मांजरांच्या पाठीला बाक येतो. शेपटी फुलते, मोठ्ठी होते. अशा वेळी ही मांजरं भलती विचित्र दिसतात. पण त्यावेळी घाबरायचं नसतं. मला ते कळायचं नाही. मी त्याला अमुक ते नको करू म्हटलं तरी तो तेच करायचा. मग आमचं गणित बिघडायचं. हुचला एकटं झोपायला अजिबात आवडायचं नाही. मी त्याच्यासाठी छान बास्केट केलं होतं. पण या पठ्ठय़ाला माझ्याच बेडवर येऊन झोपायचं असे. मी एक शक्कल लढवली. माझ्या बेडवर छान गोधडी घातली, त्यावर तो झोपला. तो गाढ झोपलाय कळल्यावर मी त्याला उचलून बास्केटमध्ये ठेवलं. पण हा शेरास सव्वा शेर निघाला. हा थोडय़ा वेळाने उठून परत माझ्याच शेजारी येऊन झोपला. शेवटी मी हार मानली त्याच्यापुढे. आता तर या दोघांपैकी एकजण पोटावर झोपतो, तर दुसरा खांद्यावर डोकं ठेवून बाळासारखा झोपतो. एकूण माझं नी हुचचं आता पटायला लागलं होतं. पण नाटकाचे प्रयोग, शूट, कार्यक्रम यामुळे मी अनेकदा घराबाहेर असायचे. मग हुच एकटा पडायचा. कंटाळायचा. मग त्याला मित्र म्हणून ‘रे’ घरी आला. मला खूप भीती होती, हे दोघं एकमेकांशी नीट जुळवून घेतील ना? पण आमचा हुच नावाचाच हुच आहे. अज्जिब्बात हुच्च मुलगा नाही. त्याने २-३ दिवसांतच रे सोबत दोस्ती केली.

या दोघांच्या नावांचीही गंमत आहे. टॉम हॅकची एक फिल्म आहे, त्यात त्याच्याकडे अपघाताने हुच नावाचा एक कुत्रा येतो. तो कुत्रा मला फार आवडला होता. त्यामुळे माझ्या पहिल्या बोक्याचं नाव हुच ठरलं. दुसरा रे हा जिंजर कलर कॅट आहे. त्याला मला सत्यजित रे यांच्या एखाद्या डिटेक्टिव्हचं नाव द्यायचं होतं, कारण मांजरं भलती चौकस असतात. जिकडे तिकडे त्यांचं लक्ष असतं. पण सत्यजित रे यांच्या कुठल्याच डिटेक्टिव्हचं नाव याला फिट बसेना. मग याच्या केसांवर सूर्यकिरण छान चमकतात, त्यामुळे मग सूर्यकिरण म्हणजे रे आणि सत्यजित रे मधला रे असा बादरायणसंबंध जोडून मी याचं बारसं केलं रे म्हणून.

माझे दोन्ही बोके भारतीय प्रजातीचेच आहेत. त्यामुळे ते बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. मी घरात असले नसले तरी यांना फारसा फरक पडत नाही. पण माझं नसणं मात्र नक्की जाणवतं. त्यामुळेच कधीकधी मी दोन दिवसांनी परत आल्यावर हुच त्याची नाराजी मला दाखवून देतो. त्याला आधी खायचंच नसतं. मग मी खूप विनवण्या केल्यानंतर साहेब खातात. जणू त्यांना दाखवायचं असतं, आम्हाला असं एकटं सोडून तू बरोबर केलं नाहीस. असंच आमचा रे एकदा हरवला होता. मी आणि काही मित्रमंडळी घरी येत होतो. तेव्हा ते आधी घरात गेले, मी मागून गेले. त्यांच्या हातून दार उघडं राहिलं आणि रे जगाचा शोध घ्यायला बाहेर पडला. इकडे मला त्याची काहीच कल्पना नव्हती. मी आल्या आल्या कॅटफूड काढलं आणि दोघांच्या डिशमध्ये भरलं. हुच तर समोरच होता, पण रे कुठे दिसेना. घरभर शोधलं, तरी नाही. माझे मित्र पार पाचव्या मजल्यापासून शोधून आले तरी सापडला नाही. मी हवालदिल झाले. मी स्वत:च वर जाऊन शोधायचं ठरवलं. वर पाहिलं तर गच्चीजवळच्या जिन्यात अडगळीत रे लपून बसलेला. त्याला पाहून मला इतकं हायसं वाटलं की, काय सांगू!

घर जरी माझं असलं तरी ते या दोघांचं जास्त आहे. त्यामुळे माझ्या घरातल्या काही जागा या दोघांच्या आवडीच्या आहेत. उदा. फ्रीजवर चढून बसायला यांना फार आवडतं. माझ्या घरातला एक चौरंग हुचचा एकदम लाडका आहे. त्यावर बसलेल्या माणसाला तो हलके हलके ढुशी देऊन उठवतो. माझ्या घरातली बिन बॅग हे रे महाराजांचं सिंहासन आहे. तो तिथे बसतो नाही तर तिथे बसलेल्या माणसाच्या अंगावर बसतो. त्यामुळे या दोघांना न आवडणाऱ्या जागांवर मी आपली स्वत:ला कसं तरी अ‍ॅडजेस्ट करून घेते. या दोघांमुळे मला माझे केस कधीच मोकळे सोडता येत नाहीत. एक तर त्यांना ते खेळणं वाटतं, नाही तर साप वगैरे काहीतरी वाटतो. त्यामुळे ते केस चावतात आणि त्यावर चढायला बघतात. हल्ली तरी त्यांना सवय झाली आहे, पण पूर्वी तर मला कंपल्सरी अंबाडाच बांधावा लागायचा.

पण ही मांजरं घरात आल्यावर माझ्यात खूप बदल झालेत. माझे मित्र गमतीने म्हणतात, ‘मांजरं आल्यावर तू माणसासारखं वागायला लागलीस.’ सुरुवातीला मी या दोघांवर खूप ओरडायचे. कारण आम्हाला एकमेकांची भाषा कळायची नाही. मग मी सांगेन त्याच्या उलट ते करायचे. माझी फार चिडचिड व्हायची. त्यात मी शीघ्रकोपी. पण हळूहळू मला कळलं की, ही मांजरं त्यांच्या निसर्गदत्त स्वभावाप्रमाणे वागणार. त्यांना माझी भाषा कळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ओरडून उपयोग होणार नाही. मुळात त्यांना कोणतेही आवाज आपल्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त येतात. म्हणजे साध्या टाळीचा आवाज त्यांच्यासाठी सुतळी बॉम्बसारखा असतो. मी ओरडल्यावर, फटका दिल्यावर ती घाबरतात. लपून बसतात. हे योग्य नाही. ते आपल्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करतात, पण आपण ओरडल्यावर ते गोंधळतात. त्याचा त्यांना ताण येतो. नैराश्य येतं. ते खाणं-पिणं थांबवतात. मग मी स्वत:मध्ये ठरवून बदल केले. मी पूर्वीपेक्षा जास्त सहनशील झाले. त्यांची मालकीण नव्हे तर मैत्रीण झाले. आता मात्र आम्हा तिघांची छान गट्टी जमली आहे. ते मला माझी स्पेस देतात. तशी स्वत:चीही राखतात. उगाच सारखं जवळ घेतलेलं, लाड केलेले त्यांना आवडत नाही. पण मस्ती मात्र प्रचंड करायची असते त्यांना. मी जे करत असेन त्यात मधे मधे यायचं असतं. मी कपाट आवरायला काढलं की हे येऊन कपडय़ांच्या घडय़ांवर बसणार. नुकतंच मी घर बदललं तेव्हा आवराआवरी करताना यांच्या लुडबुडीमुळे माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने हाताने करून दिलेला एक मग फुटला. पण मी आता इतकी सहनशील झाले होते की, मला रागच आला नाही; वाईट जरूर वाटलं. मी काचा उचलल्या आणि कामाला लागले. आता माझ्या घरचेही म्हणायला लागलेत की मांजरांमुळे तुझा राग कमी झाला गं! मला याचा आनंदच आहे. कारण माझ्या या दोन छोटय़ा दोस्तांनी मला दिलेली ही सर्वात छान भेट आहे!

या दोघांच्या नावांचीही गंमत आहे. टॉम हॅकची एक फिल्म आहे, त्यात त्याच्याकडे अपघाताने हुच नावाचा एक कुत्रा येतो. तो कुत्रा मला फार आवडला होता. त्यामुळे माझ्या पहिल्या बोक्याचं नाव ‘हुच’ ठरलं. दुसरा ‘रे’ हा जिंजर कलर कॅट आहे. त्याला मला सत्यजित रे यांच्या एखाद्या डिटेक्टिव्हचं नाव द्यायचं होतं, कारण मांजरं भलती चौकस असतात. जिकडे तिकडे त्यांचं लक्ष असतं. पण सत्यजित रे यांच्या कुठल्याच डिटेक्टिव्हचं नाव याला फिट बसेना. मग याच्या केसांवर सूर्यकिरण छान चमकतात, त्यामुळे मग सूर्यकिरण म्हणजे रे आणि सत्यजित रे मधला रे असा बादरायणसंबंध जोडून मी याचं बारसं केलं, रे म्हणून..

– नेहा जोशी

शब्दांकन – स्वाती केतकर-पंडित

swati.pandit@expressindia.com