25 April 2019

News Flash

वस्तू आणि वास्तू : प्रवासी बॅगा आणि सामानाचे नियोजन

प्रवासी बॅग हलकीही असावी लागते आणि भक्कमसुद्धा! जराशा वजनाने तिचे बेल्ट तुटून, चेन खराब होऊन चालत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

आजकाल अनेक व्हॉट्स-अ‍ॅप  व्हिडीओज्मध्ये प्रवासाला लागणारे सामान कशा कशा कल्पना लढवून कुठे कुठे भरून ठेवायचे याच्या टिप्स फॉरवर्ड होत इकडून तिकडे फिरत असतात. पैसे कशा कशात लपवून ठेवलेले असतात. कपडय़ांना गोल-गोल घडय़ा घालून बॅगेत कसे भरायचे, हे ते दाखवत असतात. कोणी साबणाला ड्रिल करून त्यात पैशाची नोट ठेवतात. कोणी साबण आडवा कापून त्यात एखादी चावी लपवून ठेवतात. टूथपेस्टमध्ये आणखीन पेस्ट भरताना कोणी दिसत असतात, तर कोणी क्लिप्सचे विविध उपयोग सांगत असतात. हे सगळे सामान शेवटी कशात तरी बसणार असते. कुठेतरी गच्च भरले जाणार असते. वेडेवाकडे हलत, आदळत, आपटत प्रवासात पुढे जाणार असते. त्यामुळेच, प्रवासात सांडणारे खाद्यपदार्थ फारच काळजीपूर्वक सोबत ठेवावे लागतात. कमीतकमी पॅकिंग करून जास्तीतजास्त सामान जसेच्या तसे राहील याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही अगदी कडक इस्त्री करून कपडे तयार ठेवाल, पण प्रवासी बॅगेत ते सर्व एकत्र गोळा झाले तर कापडाची सगळीच इस्त्री मोडून गेलेली असते. हा अनेकांचा अनुभव असेल. इस्त्रीपण खराब नको व्हायला आणि मोठाल्या केसेसमध्ये कपडे न भरता साध्याशाच बॅगेत ते नेता आले तर असं वाटत असतं. फॉरवर्ड होत आलेल्या व्हिडीओज्मध्ये दाखवतात तितकं सोपं नसतं प्रत्यक्ष बॅग भरणं!

प्रवासी बॅग हलकीही असावी लागते आणि भक्कमसुद्धा! जराशा वजनाने तिचे बेल्ट तुटून, चेन खराब होऊन चालत नाही. ती पाठीवर न्यायची आहे की ओढत न्यायची आहे, की दोन्ही सोयी एकाच बॅगेत असाव्यात? असे अनेक प्रश्न असतात. बॅग लेदरची, कापडाची असावी की बॉक्स टाइप? नेमकी किती मोठी बॅग घ्यावी सोबत हे काही कळत नसतं. अनेकदा त्यावर इतका विचारही केला जात नाही. बॅगेत बॅग, बॅगेत पाउच असेही बरेच सामान भरायचे असते. तितके पाउच वाढतात. पाउच वाढले की सामान वेगवेगळे राहते खरे, पण ते कोंबता येण्याची जागा कमी होत जाते. मग आपली नेमकी गरज काय आहे, ते नीट माहीत असायला लागते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कॉर्ड्स सामानात ओढल्या गेल्या तर खराब व्हायची शक्यता असते. त्यांचा गुंतादेखील खूपच होतो. त्यावर पाणी किंवा इतर खाद्यपदार्थ सांडून चालत नाही. ते प्रवासात फार गरमदेखील व्हायला नको असतात. अशा वेळी या वस्तू- सेल, कॉड्स, पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क, कॅमेरा वगैरे एका पाउचमध्ये नीट ठेवता येतात. कॉड्स बांधून ठेवायला रबर किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्या सॉफ्ट तारा गुंडाळता येतात. आपण ज्या पाउचमध्ये हे सर्व सामान वेगळं करून ठेवणार आहोत, त्या पाउचची स्वच्छता करून घ्यायची. त्याच्या चेन आणि हँडल्स नीट आहेत ना, ते कुठे उसवले असेल तर शिवून घ्यायचे. त्यातून लोंबणारे धागेदोरे नीट कापून घ्यायचे.

वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व लहान-मोठय़ा गोष्टींसाठी एक वेगळा पाउच ठेवता येतो. त्यात दात घासायला ब्रश, पेस्ट, कंगवा, पावडर, मॉइश्चरायझर क्रीम्स, इतर क्रीम्स, छोटी कुलपं आणि त्यांच्या चाव्या, बॅग बांधायला लागणारी चेन, पेपर सोप, हेअर ऑइल, एखादे छोटे अत्तर किंवा परफ्युम, शिलाई किट, एखादी छोटी टॉर्च, नेहमीच्या लागणाऱ्या टॅब्लेट्स, वगैरे नीट झिप लॉकमध्ये पॅक करून असे सगळे वेगवेगळे आयटम्स एकत्रच ठेवता येतात. हे सगळे झिप लॉक बॅग्समध्ये किंवा लहानशा कापडी बटव्यामध्ये विभागून एकत्रच ठेवायचे. त्यामुळे हवी ती गोष्ट चटकन मिळते आणि एकाच मध्यम आकाराच्या पाउचमध्ये सगळ्या गोष्टी हाताशी मिळतात. पाउचची संख्या वाढत जात नाही.

असे सगळे लहानमोठे सामान शेवटी एका मोठय़ा बॅगमध्ये जात असते. आपण पर्स किंवा हँडबॅगदेखील घेणार असू तर वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणाऱ्या पाउचमधल्या एकदोन झिप लॉक बॅग्ज वरचेवर काढून घेता येतात. म्हणजे जड बॅग दुसरीकडे राहू शकते आणि हाताशी सगळ्या वस्तूही मिळतात. हँडबॅग अशी निवडावी की तिची गरज नसेल तर तीसुद्धा अधूनमधून एकाच मोठय़ा बॅक सॅकमध्ये, बॅगमध्ये ठेवून देता येईल. म्हणजे सतत खांद्यावर एखादी बॅग वेगळी बाळगायची गरज नाही. ती हाताने अंगाशी दाबून फिरायची गरज नाही. आपलं डोकंही सामानाचे किती डाग झालेत, सगळे आले का.. असे गुंतवून ठेवायची गरज नाही. लहान प्रवासासाठी तर असे प्लॅनिंग फारच सुटसुटीत होऊन जाते.

मुख्य म्हणजे, कोणत्याही प्रवासानंतर परत आले की बॅगा नीट तपासून, पूर्ण रिकाम्या करून, जमलं तर उन्हात वाळवून घ्याव्यात. दरवेळी धुवायची गरज नाही. ओल्या फडक्याने पुसून नीट ऊन दाखवून त्या कागद-कापडात गुंडाळून ठेवून द्याव्यात. म्हणजे पुढच्या प्रवासाला बॅग जशीच्या तशी उचलता येते आणि वापरता येते. तिच्यात आधीच्या प्रवासाचे अवशेष आणि पुरावे मोक्षाची वाट पाहत खितपत पडून राहत नाहीत. बॅगांच्या चेनला मेण लावून ठेवावे. बाहेर आलेले धागेदोरे कापून घ्यावे. बेल्टचे जॉइन्ट्स तपासून दोन टाके त्यांना आधीच घालून ठेवावेत. उसवलेले भागही वेळीच शिवून टाकावेत. असे केल्याने बॅगा नव्याच्या नव्या राहतात आणि टिकतातही भरपूर. चाकांच्या बॅगाही नीट तपासून ठेवाव्यात. ऑइलिंग करावे जॉइन्ट्सला. त्यात काही कचरा अडकला असेल तर काढून टाकावा. बॅग सामानासकट ओढताना, उचलताना हाताला कुठे टोचते का, ते तपासून घ्यावे. पाठीला लावायच्या बॅगांची नेमकी लांबी ठरवून तसे सेटिंग करून ठेवावे. बॅगा आपण कुठेही खाली ठेवत असतो, तर त्यांचे तळ दर प्रवासानंतर नीट स्वच्छ करावेत. रिकाम्या बॅगा माळ्यावर टाकताना त्यांचा आकार बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्यांच्यावर इतर वस्तू कोंबून ठेवू नयेत. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करून घरात आहेत त्याच बॅगा आधी नीट जपता येतात आणि ऐनवेळी चटकन वापरता येतात.

prachi333@hotmail.com

First Published on December 1, 2018 2:02 am

Web Title: traveling bag and baggage planning