पुण्याला जाणे-येणे तसे तर नेहमीचेच, पण मागच्या एका खेपेत शनिवारवाडय़ाला भेट देण्याचा योग आला. तिथे गेल्या गेल्या सर्वप्रथम नजरेत भरले ते याचे भव्य प्रवेशद्वार. तो अजस्र आणि भक्कम दरवाजा पाहून मनच दडपले. इंग्रजीत एक म्हण आहे ‘First Impression is the last one’ अर्थात प्रथमदर्शनी मनावर जी छाप उमटते ती शेवटपर्यंत राहते. हा दरवाजा पाहून या म्हणीची अक्षरश: प्रचीती आली. इतिहासाची साक्ष देत उभा असणारा हा दरवाजा पाहताक्षणी शनिवारवाडय़ाच्या भक्कमपणाची आणि भव्यतेची कल्पना येते.

असेच काहीसे प्रत्येक घराच्या दरवाजाच्या बाबत असते नाही! दरवाजा फ्लॅटचा असो वा बंगल्याचा, त्याच्या बाह्य़ रूपावरूनच आतील घराची कल्पना केली जाऊ शकते. म्हणूनच इंटेरिअर डिझायनिंगमध्येदेखील दरवाजा आणि दरवाजाबाहेरील जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Army man surprised his mother after returning from duty
VIDEO: आईचं काळीज! भारतीय जवानानं अचानक घरी येत दिलं सरप्राइज; माय-लेकाची भेट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Viral Video Kurta set made entirely from a sack bag Watch Man Unique style Stich This Different Outfit form Scratch
VIDEO: चक्क गोणीपासून बनवला कुर्ता-पायजमा; पट्ठ्याचे ‘हे’ स्कील पाहून व्हाल थक्क
woman commit fraud of rupees 2 lakhs marathi news, woman fraud 2 lakh kalyan marathi news
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेकडून दोन लाखांचा अपहार
tharala tar mag new promo and latest updates
ठरलं तर मग : महिपतला अटक, तर प्रताप मागणार अर्जुनची माफी! मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

घराचा मुख्य दरवाजा डिझाइन करताना सौंदर्यदृष्टी तर महत्त्वाचीच, पण घराची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची. पूर्वीच्या काळी साग, शिसव अशा भक्कम लाकडांचा वापर करून दरवाजे बनवले जात. हे दरवाजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर सरस असत, पण त्याचसोबत सुरेख कोरीव काम तसेच तांब्या-पितळेच्या फिरक्यांचा वापर करीत त्यांना देखणेपणाही बहाल केला जाई. आजही दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणावर जुन्या वास्तूंमध्ये असे दरवाजे पाहायला मिळतात.

आजच्या काळातही भरीव लाकडाचे दरवाजे काही प्रमाणात बनवले जातात, परंतु त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाची आणि त्याहून जास्त कारागिरीची किंमत पाहता असे दरवाजे बनवून घेण्याचे प्रमाण अगदी नगण्य झाले आहे. परंतु एक गोष्ट जेव्हा लोप पावत जाते तेव्हा दुसरीकडे त्याच्याच पर्यायांचा उदय होत असतो. याच न्यायाला अनुसरून लाकडी दरवाजांनाही पर्याय म्हणून ब्लॉकबोर्डचे दरवाजे वापरले जाऊ लागले.

अर्थात, या ब्लॉकबोर्ड दरवाजाना त्यांच्या अशा मर्यादादेखील आहेत. उदा. ब्लॉकबोर्ड दरवाजांवर कोरीव काम नाही होऊ शकत; परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मात्र हाही दरवाजा भक्कम. मात्र ब्लॉकबोर्डचा दरवाजा निवडताना तो पाइनच्या लाकडांपासून बनवलेला आहे आणि त्याचबरोबर त्यातील ब्लॉकदेखील एकमेकांजवळ घट्ट बसवलेले आहेत याची खात्री करूनच घ्यावा. मुख्य दरवाजासाठी ३५ मी.मी. किंवा ४० मी.मी. जाडीचा ब्लॉकबोर्ड उत्तम. यावर लॅमिनेट किंवा विनिअर लावून बाहेरून त्याचे सौंदर्य खुलविले जाते.

मुख्य दरवाजाचे डिझाइन करताना त्याचे सौंदर्य आणि भक्कमपणा जितका महत्त्वाचा तितकीच महत्त्वाची त्याच्या डिझाइनमागील संकल्पना. दरवाजा कोणत्या घराचा आहे- बंगल्याचा, फ्लॅटचा की सर्वसाधारण बैठय़ा घराचा; शिवाय घराच्या आतील भागातील इंटेरिअर कसे आहे याचा साकल्याने विचार करूनच या दरवाजाच्या डिझाइनची संकल्पना निश्चित करायला हवी. घराचे इंटेरिअर जर कॉन्टेम्पररी किंवा मॉडर्न प्रकारात मोडत असेल तर दरवाजा फार नक्षीकाम असणारा चालणार नाही. त्याचप्रमाणे ज्या घराचे इंटेरिअर पारंपरिकतेकडे झुकते तिथे दरवाजाही त्याला साजेसाच हवा.

मुख्य दरवाजाच्या डिझाइनचा विचार हा फक्त त्यासाठी कोणते लाकूड अथवा ब्लॉकबोर्ड वापरला आहे, लॅमिनेट वापरलेय की विनियर इथपर्यंतच मर्यादित नसतो. दरवाजाच्या आजूबाजूला असणाऱ्या भिंती, दरवाजाची चौकट, समोरील मोकळा पॅसेज या साऱ्यांचा मिळून मुख्य दरवाजा तयार होतो.

मुख्य दरवाजाचे रूप हे नेहमीच दणकटपणाचा आव आणणारे असले पाहिजे आणि यात मदत होते ती दरवाजाच्या चौकटीची. मुख्य दरवाजाची चौकट ही होल्डफास्टच्या साहाय्याने भिंतींमध्ये कायमस्वरूपी बसविलेली असणे हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग. लाकडी चौकटींमध्ये सर्वात जास्त पसंती ही सागच्या चौकटीस दिली जाते. चौकटीचे सौंदर्य खुलविण्यासाठी त्यावर पुन्हा एकदा लाकडी मोल्डिंग लावता येते, याला कव्हर मोल्डिंग असेदेखील म्हणतात. हे कव्हर मोल्डिंग दरवाजाच्या सौंदर्यात भर तर घालतेच, त्याचसोबत दरवाजाची चौकट आणि बाजूला असणारी भिंत यामध्ये असणाऱ्या तडय़ाला साधण्याचीही कला शिताफीने पार पाडते. मोल्डिंगप्रमाणेच दरवाजाचे हँडल, बिजागरं, नॉकर आदी गोष्टीही दरवाजाचे सौंदर्य आणि उपयुक्तता वाढविण्याच्या दुहेरी भूमिका पार पाडत असतात. मुख्य दरवाजासाठी हँडल निवडताना ते मोठे आणि दणकट डिझाइनचे असण्याकडे लक्ष द्यावे. धातूच्या म्हणजे पितळेच्या वगैरे हँडलला बाजारात याचकरिता जास्त मागणी असल्याचे दिसते, पण लाकडाचा वापर करूनही सुरेख हँडल बनवले जाऊ शकतात. नॉकर म्हणजे पूर्वी जेव्हा दरवाजांना बेल नसत त्या काळात दार वाजविण्यासाठी बसवलेली धातूची कडी. आजच्या काळात तिचा वापर फक्त दाराची शोभा वाढविण्यासाठी केला जातो. बिजागऱ्यांमध्येदेखील सर्वसाधारण बिजागऱ्या या दरवाजा व चौकटीच्या खाचेत लपवल्या जातात. पण बाहेरच्या गाठीच्या बिजागऱ्यादेखील मिळतात, ज्यांना जोडून नक्षीकाम केलेले धातूचे पान येते. यांचा उपयोग करून फार नक्षीकाम किंवा कोरीव काम न करताही दरवाजाला पारंपरिकतेचा स्पर्श आपण देऊ शकतो.

दरवाजाच्या आजूबाजूला असणाऱ्या भिंतीदेखील दरवाजाला उठावदारपणा देण्याचे काम करतात. या भिंतींना आपण आपल्या आवडीप्रमाणे प्लायवूडचे पॅनेलिंग करून वरून हवे ते फिनिश देऊ शकतो किंवा टेक्श्चर पेंट वापरूनही त्या भिंतींमध्ये वेगळेपण आणता येईल. आता यावर आपल्या नावाची पाटी लागली की झाले. नावाच्या पाटय़ांमध्येदेखील डिझाइनला बराच वाव असतो. एखाद्या कलाकाराकडून बनवून घेतलेली कॅलिग्राफीची पाटी नक्की दाद मिळवून जाईल.

फ्लॅट सिस्टीममध्ये दरवाजाच्या बाहेरील फ्लोरिंग बरेचदा नाही बदलता येत, पण जिथे हे शक्य आहे तिथे मात्र एखादा छानसा फ्लोअर पॅटर्न देऊन आपल्या घराचे वेगळेपण जपले तर मुख्य दरवाजाच्या सौंदर्यात काकणभर वाढच होईल. दरवाजाच्या बाहेरील पॅसेज किती लांब-रुंद आहे यावर ठरेल बाहेर झाडांच्या कुंडय़ा ठेवता येतील का? इंटेरिअरसाठीच वापरली जाणारी शोभेची काही झाडे दरवाजासमोर ठेवल्यास बाहेरून येणाऱ्यांच्या डोळ्यांना सुखद गारवा मिळेल. एका मजल्यावर जर एक किंवा दोनच फ्लॅट असतील तर पॅसेजमध्ये छान एखादे कॉन्सोल ठेवून त्यावर डिझायनर फ्रेम किंवा अगदी डिझायनर आरसा लावूनही आपल्या घराचे प्रवेशद्वार आपण प्रसन्न बनवू शकतो. याशिवाय दरवाजावर एखादा डिझायनर लॅम्प लावायलाही विसरू नये.

वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी जर योग्य प्रकारे जुळून आल्या तर आपल्या घराचे प्रवेशद्वार येणाऱ्या पाहुण्यांच्या मनावर कायमचा ठसा नक्की उमटवेल.

 

– गौरी प्रधान (इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com