News Flash

वास्तुमार्गदर्शन

कित्येक वेळा ७/१२ वरील इतर हक्कामधील बोजा उतरलेला असूनदेखील त्या ठिकाणी तो दाखला जातो. ही गोष्ट काही वेळा संबंधित तलाठय़ांकडून जाणिवपूर्वक वा निष्काळजीपणामुळे होते.

| September 27, 2014 01:07 am

* ७/१२ वरील काही हक्कांचे निराकरण करण्याचे राहून जाते का? तसे असल्यास काय करावे?
-हिमांशू खोत
* कित्येक वेळा ७/१२ वरील इतर हक्कामधील बोजा उतरलेला असूनदेखील त्या ठिकाणी तो दाखला जातो. ही गोष्ट काही वेळा संबंधित तलाठय़ांकडून जाणिवपूर्वक वा निष्काळजीपणामुळे होते. त्यात दुरुस्ती करता येते. संबंधित तलाठय़ाला बोजा उतरवण्याची कागदपत्रे देऊन त्याला फेरफार घालण्यास सांगावा व तो मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावा.
* ७/१२ वरील जमीन विकत घेणारा इसम आपला प्लॉट विकू शकतो का?
-हिमांशू खोत
* आपला काहीतरी गोंधळ झाला आहे. एन ए प्लॉटचा ७/१२, शेतजमिनीचा ७/१२ यांत खूप फरक आहे. एन ए प्लॉट पाडताना अनेक गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. त्यामुळे असा प्लॉट विकायला काहीच अडचण येऊ नये. आपण तज्ज्ञ व्यक्तीकडून याबाबतची अधिक माहिती व फरक जाणून घ्यावा.
* मी रहात असलेल्या इमारतीमधील रहिवाशांची कोणतीही संस्था (को.ऑप. हा. सो./अपार्टमेंट इ.) स्थापन झालेली नाही. अशा वेळी वरून पाणी गळत असेल तर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कुणाची असते?
-मधुकर राजनकर, नागपूर.
*  एखाद्या इमारतीमधील रहिवाशांची कोणतीही संस्था स्थापन झालेली नसेल तेव्हा त्या इमारतीचा सर्व कारभार हा बिल्डर अथवा विकासक पहात असतो. त्यामुळे सदर गळती बंद  करण्याचे काम हे बिल्डर अथवा विकासक यांचे असते.
*  माझ्या एका जवळच्या नातेवाईकाने एका गृहनिर्माण संस्थेत रिसेलमध्ये सदनिका घेतली. सदर सदनिका घेताना रितसर संस्थेची परवानगी घेऊनच व्यवहार पूर्ण केला. त्यानंतर उपविधीप्रमाणे सर्व फॉर्म भरून संस्थेकडे भागप्रमाणपत्र (मूळप्रतीत) भाग हस्तांतरणासाठी सादर केले. त्यावर संस्थेकडून काहीही लेखी उत्तर नाही. व भागप्रमाण पत्रदेखील हस्तांतरीत करून देत नाहीत. त्याच्याकडे सदर कागदपत्र संस्थेकडे दिल्याची पोचपावती देखील आहे. दरम्यानच्या काळात त्याने चौकशी केली असता संस्थेचे सेक्रेटरी बदलले असून नवीन सेक्रेटरी काहीही प्रतिसाद देत नाहीत. आपण मार्गदर्शन करावे.
-दत्ताराम पाटील, बदलापूर.
* आपण लिहिलेली माहिती जर खरी असेल तर त्या केसमध्ये काही अर्थच नाही. खरे तर संस्थेने भागप्रमाणपत्र हस्तांतरीत करण्यास काहीच अडचण नाही. निव्वळ सेक्रेटरी काम करत नाही एवढीच गोष्ट त्यामधून स्पष्ट होते. या विरोधात सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती लावून मा. उपनिबंधक सहकार खाते यांच्याकडे तक्रार करा. वेळप्रसंगी उपनिबंधक स्वत: देखील भागप्रमाणपत्र हस्तांतरीत करून देऊ शकतो. या कामी संबंधित फेडरेशनची मदत घ्यावी.
* गृहनिर्माण संस्थेकडे एखाद्या गोष्टीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मागवले, तसे त्यांना पत्र देखील दिले; तरीसुद्धा त्याचे त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. अथवा त्याबाबत कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ते देखील कळवले नाही. आमच्याकडे आम्ही पाठवलेल्या पत्राची पोच देखील आहे. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे?
– शर्मिला जोशी, बोरिवली.
*  आपण कशा करता ना हरकत प्रमाणपत्र मागवले आहे याचा खुलासा आपल्या पत्रामधून होत नाही. तरीसुद्धा सर्वसाधारणपणे एखाद्या लेखी पत्राने आपण एखादे ना हरकत प्रमाणपत्र मागवले असेल व त्याची पोचपावती असेल, तर खरे म्हणजे गृहनिर्माण संस्थेने त्याचे उत्तर तरी द्यायला पाहिजे. अथवा न देण्याचे कारण तरी कळवले पाहिजे. यापैकी काहीही झाले नाही व पत्र पोचल्यावर १५ दिवस उलटून गेले असतील तर संस्थेने ओसी दिली आहे असे गृहीत धरले जाते. याबाबत आपण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
पत्रव्यवहाराचा पत्ताद्वारा- घैसास अ‍ॅण्ड असोसिएटस, ठाणे (प.) ४०० ६०१.
वास्तुमार्गदर्शन फोन – ०२२-२५४१६३३६, २५४०१८१३, २५४००६५९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:07 am

Web Title: vaastu guidance 2
Next Stories
1 नवीन गृहनिर्माण कायदा :मसुदा आणि अपेक्षा
2 येथे सहकाराचाच उद्धार!
3 विस्तारतं बदलापूर
Just Now!
X