06 April 2020

News Flash

पेशवेकालीन वज्रेश्वरी मंदिर

वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अरुण मळेकर

वज्रेश्वरी माता मंदिराबरोबर गरम पाण्याच्या कुंडांव्यतिरिक्त स्वामी नित्यानंदांचे अनुयायी स्वामी मुक्तानंद यांचा गुरुदेव आश्रम म्हणजे योग प्रशिक्षण, अध्ययन केंद्र आणि त्याच्या रमणीय परिसराचे स्थळदर्शन म्हणजे सामाजिक पर्यटनाचे दिशादर्शक केंद्र आहे. म्हणूनच वज्रेश्वरी स्थळदर्शनात तीर्थाटनाबरोबर पर्यटनाचाही लाभ घेता येतो.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्याला हजारो वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिकप्रमाणे धार्मिक अधिष्ठानाची वैभवशाली पार्श्वभूमी आहे. वनवैभवासह सागरसान्निध्याच्या ठाणे जिल्ह्यला जे वैभव लाभलेय त्यात धार्मिक पार्श्वभूमीच्या मंदिर वास्तूंचाही सहभाग खूप मोठा आहे. त्या मंदिर वास्तूंना अजोड अशा शिल्पाकृतींबरोबर अनेक सत्ताधीशांच्या काळातील त्या शिल्पांवर त्यांची शैलीही पाहावयास मिळते.

अंबरनाथचे एक हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शिव मंदिर, ठाण्याचे कोपिनेश्वर मंदिर आणि पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील तुंगारेश्वर शिव मंदिर दर्शनातून याचा प्रत्यय येतोच. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या शहाडच्या विठ्ठल मंदिराची शिल्पाकृतीही वाखाणण्यासारखी आहे.

मुंबई-ठाण्यापासून तास-दिड तासाच्या अंतरावरील वज्रेश्वरी माता मंदिर तसे सर्वपरिचित असून अनेक ज्ञाती, परिवारांचे ते श्रद्धास्थानासह कुलदैवतही आहे. त्यामुळेच या स्थानाला महाराष्ट्रातील पावित्र्यासह धार्मिक स्थळांत विशेष स्थान आहे..

वज्रेश्वरी म्हणजे माता पार्वती देवीचे स्वरूप. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात पेशव्यांच्या काळात सरदार चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यावर सर्व शक्तिनिशी जी यशस्वी युद्धमोहीम झाली त्याची पार्श्वभूमी या मंदिर वास्तूमागे आहे. इ. स. १७३९ मध्ये सरदार चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत शौर्यासह कल्पकतेने मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांना पराभूत केले.

‘‘माझी वसई परिक्षेत्राची नियोजित मोहीम यशस्वी झाल्यावर आई वज्रेश्वरी मी तुझे मंदिर उभारीन,’’ असा नवस सरदार चिमाजी अप्पांनी केला होता. त्याला यश आल्याने किल्लास्वरूप ही मंदिर वास्तू उभारली गेली.

वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. इतर प्राचीन मंदिरांप्रमाणे वज्रेश्वरी माता मंदिरालाही आख्यायिका, दंतकथेचे कोंदण आहेच. त्यानुसार, प्रारंभीच्या काळात वज्रेश्वरी मातेचे वास्तव्य आताच्या मंदिर वास्तूच्या नजीकच्या ‘वडवली’ गावात होते. कालांतराने ‘वडवली’ हे नाव मागे पडून वज्रेश्वरी हे नाव अखेर जनमानसात रूढ झाले.

वज्रेश्वरी मंदिर वास्तू किल्ल्याप्रमाणे उंचावर असल्याने दगडी पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जावे लागते. मूळ मंदिराचे बांधकाम भक्कम दगडाचे आहे. आपण अवाक्यातील पायऱ्या चढून मंदिर वास्तूत प्रवेश करताना मंदिर वास्तूत प्रवेश करताना मंदिर वास्तूला शोभेल असा सभामंडप, गाभारा, प्रमुख गाभारा असे तीन टप्पे लागतात. या तिघांचेही बांधकाम दगडाचे आहे.

या दगडी वास्तूवर सुशोभीकरणासाठी रंगरंगोटी केली जात असे; परंतु पुरातत्त्व खात्याच्या आदेशानुसार रंग देण्याला प्रतिबंध केल्यावर मूळ मंदिर वास्तूच्या शिल्पाकृतीचा बाज कायम राहिल्याने त्याच्या पुरातन बांधकामाची कल्पना येते. मंदिर वास्तूची रचना किल्लासदृश असल्याने त्याच्या पुरातन- पारंपरिक वास्तुरचनेनुसार मंदिर प्रवेशद्वारीच्या नगारखान्याची इमारत मूळ बांधकामाच्या शैलीशी सुसंगत अशी आहे. पेशवेकालीन या मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदी आणि बुरुजांमुळे मंदिराकडे मार्गस्थ होताना आपण एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहोत, असाही भास होतो.

या मंदिरातील वज्रेश्वरी देवीच्या हाती खड्ग आणि गदा आहे. तसेच वज्रेश्वरी देवीच्या आकर्षक मूर्तीच्या एका बाजूस रेणुका माता आणि दुसऱ्या बाजूस कालिका माता यांच्याही चित्ताकर्षक मूर्ती दर्शकांचे लक्ष वेधून घेतात. प्रमुख गाभाऱ्यात भाविकांना योग्य प्रकारे दर्शन घडावे अशाच प्रकारे देवीची स्थापना केली असून, त्यासाठी दर्शकांना आगमन-निर्गमनाची सोय आहे.

मंदिर परिसरातील गणेशपुरी अकलोली, दातीवली येथील गरम पाण्याची कुंडे म्हणजे श्रद्धावान भाविकांबरोबर ते पर्यटक तसेच रुग्णांचेही आकर्षण आहे. कुंडातील गंधकयुक्त गरम पाण्याच्या सतत वाहत्या झऱ्यांमुळे त्वचारोगासाठी तो एक इलाज आहे असे मानले जाते.

वज्रेश्वरीला वर्षभर भाविकांचा ओघ असतोच; परंतु वार्षिक उत्सवातील चैत्रातील यात्रा जेव्हा भरते, तेव्हा या उत्सवाचा महोत्सव अनुभवता येतो. नवरात्र उत्सवाची सांगता होताना दसऱ्याची पालखी शोभायात्रा हे येथील खास आकर्षण आहे. या उत्सवाचे औचित्य साधत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आमंत्रित करून समाजप्रबोधन कार्याचा वसाही मंदिर व्यवस्थापनाने जपला आहे.

वज्रेश्वरी माता मंदिराबरोबर उपरोक्त गरम पाण्याची कुंडे याव्यतिरिक्त स्वामी नित्यानंदांचे अनुयायी स्वामी मुक्तानंद यांचा गुरुदेव आश्रम म्हणजे योग प्रशिक्षण अध्ययन केंद्र आणि त्याचा रमणीय परिसर स्थळदर्शन म्हणजे सामाजिक पर्यटनाचे दिशादर्शक केंद्र आहे. म्हणूनच वज्रेश्वरी स्थळदर्शनात तीर्थाटनाबरोबर पर्यटनाचाही लाभ घेता येतो..

arun.malekar10@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2019 12:13 am

Web Title: vajreshwari temple of peshwa abn 97
Next Stories
1 गृहनिर्माण संस्थांना जीएसटी लागू नाही
2 सदनिका : सातबारा प्रस्तावित नियम
3 कचरा-खतातून फुलणाऱ्या झाडांची गोष्ट!
Just Now!
X