* आमच्या वडिलांचे १९५० साली घेतलेले एक राहते घर शहराच्या मध्यभागी आहे. सध्या ते जीर्ण अवस्थेत आहे. माझी आई व लहानभाऊ अद्यापही तिथे राहत आहेत. गेल्या वर्षी आमच्या वडिलांचे निधन झाले. आम्ही सर्व मिळून ४ भाऊ व ५ बहिणी असा आमचा मोठा परिवार आहे. माझे ३ भाऊ व ५ बहिणी लग्न झाल्यापासून स्वतंत्र राहत आहेत. आता सदर घर आमच्या आईच्या नावाने करावयाचे आहे, त्यासाठी काय करावे लागेल?
– बाळासाहेब वारूडकर, नाशिक.
* आपल्या प्रश्नाचे अगदी काटेकोर शब्दात उत्तर सांगायचे तर आपण वारस दाखला काढणे आवश्यक आहे. हा वारस दाखला कोर्टामधून घ्यावा लागेल. त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर ती केस उभी राहील त्यावेळी सर्व बहीणभावांचे साक्षीपुरावे होतील, त्यावेळी आपल्या कुटुंबीयांना न्यायालयात जावे लागेल. ही पद्धत जरा किचकट आणि अवघड आहे. तरीसुद्धा एक वर्षांपर्यंत आपणाला वारस दाखला (सक्सेशन सर्टिफिकेट) मिळू शकेल. त्यानंतर आपणाला सदर घर आईच्या नावे करता येईल.
दुसरा मार्ग म्हणजे आमच्या मृत वडिलांना आम्ही १० जण (आई, बहीण भावंडे वगैरे सर्व धरून) वारस आहोत. अन्य कोणी वारस नाही, असे प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे लागेल ते नोटरी करावे लागेल. त्यानंतर आईचे एक हमीपत्र (इंडेम्निटी बाँड) रु. २०० च्या मुद्रांकावर बनवून ते नोटरी करून द्यावे लागेल. सोबत एक कव्हरिंग लेटर बनवून द्यावे लागेल. जर संबंधित अशा कोणी या हस्तांतरणाला हरकत घेतली तर माझ्या नावावर केलेले घर पुन्हा जुन्या नावावर करायला माझी हरकत नाही अशा अर्थाचे ते हमीपत्र असेल. अशा तऱ्हेनेदेखील सदर घर आईच्या नावावर करता येईल. मात्र ते संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केले पाहिजे. त्यांनी ते अमान्य केल्यास वारस प्रमाणपत्र  (सक्सेशन सर्टिफिकेट) काढणेच इष्ट ठरेल.

* मी माझ्या मेव्हण्याचे कुलमुखत्यारपत्र घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभेला हजर राहिलो. परंतु कुलमुखत्यारपत्र हे महाराष्ट्र को-ऑप. हाऊसिंग संस्थेच्या कायद्यानुसार स्वीकार्य नसल्यामुळे सभेला हजर राहूनही मला चर्चेत भाग घेता आला नाही. याबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत याचा खुलासा करावा.
– विनोद ए. म्हापणकर, नवीन पनवेल.
* संस्थेच्या सल्लागारांनी आपणाला परवानगी नाकारली ती कायद्याला धरून होती. कारण कुलमुखत्यार म्हणून बैठकीत भाग घेण्याची तरतूद कायद्यामध्ये कुठेही नाही. आपणाला इतर सभांमध्ये भाग घेण्यासाठी प्रॉक्सी नेमता येतो. तशी तरतूददेखील कायद्यात नाही. आपणाला जर संस्थेच्या बैठकीत कामकाजामध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण त्या संस्थेचे असोसिएटस मेंबर व्हावे. त्यासाठी मूळ मालकाची संमती घेऊन विहीत नमुन्यातील सहयोगी सदस्यासाठी अर्ज करावा. त्यासाठी आवश्यक ते शुल्क संस्थेत जमा करावे. त्यानंतर आपले नाव सहयोगी सदस्य म्हणून भागप्रमाणपत्रावर दाखल करावे लागेल. आपण एकदा का सहयोगी सदस्य झालात की आपल्याला संस्थेच्या बैठकीत कामकाजातही भाग घेता येईल अथवा संस्थेचे पदाधिकारीदेखील होता येईल. मात्र मूळ सदस्याचा आपणाला पाठिंबा असेपर्यंतच या सर्व गोष्टी करता येतील.

* गृहनिर्माण संस्थेने मला एक पार्किंग दिले आहे. आमच्या संस्थेमध्ये एक सदनिका एक पार्किंग, अशा पद्धतीने पार्किंगच्या जागा वितरित केल्या आहेत. आमच्याच संस्थेतील एक सदस्य आपली दुसरी गाडी माझ्या पार्किंग लॉटमध्ये जबरदस्तीने घुसवून उभी करतात. ही गोष्ट मी सेक्रेटरींच्या कानावर घातली. परंतु तरीसुद्धा तो सदस्य त्या ठिकाणाहून गाडी हलवण्यास तयार नाही. याबाबत आपण मार्गदर्शन करावे.
– मधुकर चिटणीस, दादर (प.) मुंबई.
* खरे तर आपली समस्या ही फौजदारी प्रकारातील आहे. आपण संस्थेच्या सेक्रेटरीला ही गोष्ट सांगितलीत हे योग्यच झाले. आपण त्यांना आणखी एक विनंती करा की संस्थेमार्फत दादागिरीने आपल्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करणाऱ्या सदस्याला संस्थेमार्फत असे न करण्याबद्दल पत्र देण्यास सांगा व त्याची पोचपावती घ्या. यानंतरही तो सदस्य ऐकत नसेल तर सरळ या पत्राची प्रत तसेच आपणाला जे पार्किंग अॅलाट केले आहे त्यासंबंधी अॅलाटमेंट लेटर दिले आहे ते जोडून या सदस्याविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करा. त्यानेही त्या सदस्याने आपली दादागिरी चालू ठेवलीच तर मात्र त्याच्याविरुद्ध कोर्टात जाणेच योग्य ठरेल.