18 November 2019

News Flash

वास्तुसंवाद : कल्पनेचा कुंचला स्वप्नरंगी रंगला..

एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून नयनरम्य चित्र साकारते; कुणा शिल्पकाराच्या जादुई हातातून सुंदर शिल्पाकृती जन्माला येते.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

खरंच एखादे उत्तम चित्र साकारते तेव्हा ते केवळ स्वप्निल दुनियेतूनच जन्माला येते का? ते चित्रकाराच्या कल्पनेतून साकारते म्हणजे नक्की काय? कल्पना कशी जन्माला येते? कल्पना आणि संकल्पना यातील फरक काय?.. असे अनेक प्रश्न मनात येतात.

एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून नयनरम्य चित्र साकारते; कुणा शिल्पकाराच्या जादुई हातातून सुंदर शिल्पाकृती जन्माला येते. किंवा कुणी प्रतिभावंत कवी सुंदर परंतु आशयपूर्ण काव्याची निर्मिती करतो. इतकेच काय, पण वस्त्रकला, धातुकला, चर्मकला, सुतारकाम, कुंभारकाम अशा कोणत्याही निर्मितीच्या मागे विचारांचा पाय असतोच असतो. कलेची निर्मिती ही विचारांवर, अर्थातच संकल्पनेवर आधारित असते.

अंतर्गत रचनाशास्त्राचा विचार करताना आपल्याला कला आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा मेळ  घालावा लागतो. ‘वास्तुसंवाद’ या लेखमालेत आत्तापर्यंतच्या लेखांत आपण ‘प्लानिंग आणि डिसायिनग’ या टप्प्याअंतर्गत, उपभोक्त्याच्या गरजेनुसार आणि व्यक्तिमत्त्वानुसार जागेचा पुरेपूर वापर कसा करावा (Space Utilization), त्याचप्रमाणे आवश्यक असलेली सुलभता (Comfort) मिळवण्यासाठी रचनाशास्त्रातील रेषा, द्विमितीय आकार, घनाकार, अवकाश इत्यादी रचनाघटकांचा (Design Elements) आणि  गती, प्रमाण, दृश्य समतोल, इत्यादी रचना मूल्यांचा (design Principles) कशा प्रकारे उपयोग होतो, हे लक्षात घेतले.

तसेच नसíगक आणि कृत्रिम प्रकाशयोजनेचा मुद्देसूद विचार करणे अंतर्गत रचनेसाठी किती महत्त्वाचे आहे, हेदेखील लक्षात घेतले. परंतु जागेनुसार, गरजेनुसार अंतर्गत रचनेचा आराखडा निश्चित करताना त्याच वेळी त्या रचनेसंदर्भातील संकल्पनेचा (Concept) आणि  कलात्मकतेचा (Aesthetics) विचारही करावा लागतो.

प्रत्येक व्यक्तीची आपापल्या घराच्या बाबतीतली काही स्वप्ने असतात. अगदी उद्योजकांचीही आपल्या व्यावसायिक जागेसंदर्भात खूप सारी स्वप्ने असतात. ही स्वप्ने शब्दात मांडणे आणि मग प्रत्यक्षात साकारणे हेच तर अंतर्गत रचनाकाराचे खरे कौशल्य असते. व्यक्तिपरत्वे संकल्पना बदलतात. त्या व्यक्तीची जडणघडण, व्यक्तिमत्त्व विकास, आवड -निवड, कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन यानुसार संकल्पना निर्माण होतात. परंतु प्रत्येक वेळेस जाणिवा व्यक्त होतातच असे नाही. म्हणूनच अंतर्गत रचनाकाराने उपभोक्त्याशी संवाद साधणे महत्त्वाचे असते. संवादातून जाणिवा स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. उपभोक्त्याच्या बोलण्यातून त्याची आवड, जीवनशैली कळत जाते आणि त्यानुसार संकल्पना निश्चित करण्यास मदत होते.

निर्मितीवर काळाची, काळानुसार होणाऱ्या बदलांची प्रतिमा आपल्याला नेहमीच जाणवते. अर्थातच कोणतीही कलाकृती एकतर पारंपरिक असते किंवा आधुनिक जगाला प्रतिबिंबित करते. कधी कधी ती अत्याधुनिक वाटते तर काही वेळेस मात्र या कलाकृती पारंपरिक आणि आधुनिक या दोहोंचा सुंदर मिलाफ होऊन जन्माला येतात. यानुसार, रचनेमागील संकल्पनांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.

१. पारंपरिक संकल्पना (traditional Concept)

३. आधुनिक संकल्पना (Modern Concept)

३. अत्याधुनिक संकल्पना (Ultramodern Concept)

४. संयोग  (Fusion )

प्रथमत: आपण पारंपरिक रचनाशैलीचा विचार करू या.

वास्तुकलेचा इतिहास बघितला तर मुघल वास्तुकला, रोमन वास्तुकला, जैन वास्तुकला या त्या त्या प्रदेशानुसार, संस्कृतीनुसार विशिष्ट पद्धतीच्या कलात्मकतेचे दर्शन घडवतात. भारत देशात हिंदू वास्तुकला बघायला मिळते, परंतु त्यातही प्रांतानुसार कितीतरी वैविध्य जाणवते. ज्या प्रकारच्या वास्तुशैलीचा विचार इमारतरचना करताना केला जातो, साहजिकच त्या त्या शैलीनुसार अंतर्गत रचनेला जोड दिली जाते.

उदाहरणार्थ, मुघल वास्तुकलेत फुले आणि वेलबुट्टय़ांचा प्रामुख्याने वापर केला जातो, त्याच प्रकारे तेथील अंतर्गत रचना करताना फíनचर डिझाइन केले जाते. संगमरवरमधील नक्षीकाम (Inlay Work) ही त्यातही खासियत. इमारतीच्या बाहेरील आणि आतील भागातही हे काम उठून दिसते.

मराठेशाहीच्या काळातील किंवा पेशवे काळातील अगदी दिंडी दरवाज्यापासून ते संदुकीपर्यंतच नाही, तर अगदी दौत-लेखणी आणि अडकित्त्यापर्यंतच्या वस्तू त्यांची स्वत:ची आगळीवेगळी शैली प्रस्थापित करतात.

सध्याच्या काळात अंतर्गत रचना करताना या पारंपरिक शैलींचा प्रभाव असलेली रचना आणि सजावट केली जाते. बरेचदा उपाहारगृहांच्या सजावटीसाठी राजस्थानी शैलीचा वापर केलेला आढळतो. बठक व्यवस्था, कोनाडय़ांची आणि सज्जांची रचना, रंगसंगती या सगळ्यामध्ये त्या त्या शैलीचे स्वत:चे असे वेगळेपण हे विशिष्ट रचनात्मक आकाराने किंवा घटकाने लक्षात येते.

मुघल आणि ख्रिस्ती आक्रमणांचा जसा आपल्या देशाच्या भोगौलिकतेवर परिणाम झाला, तसाच संस्कृतीवरही झाला. साहजिकच आधुनिक वास्तुशैलीचा उदय झाला. काळानुसार आणि तांत्रिक प्रगतीनुसार आपले राहणीमान बदलले, पद्धती बदलल्या. पुराणकाळापासून पेशवेकाळापर्यंत चालत आलेली आपली पाटावर बसून जेवण्याची पद्धत गेली आणि आता डायिनग टेबल ही आधुनिक संस्कृतीचा भाग आणि माणसाची गरज बनली आहे. त्याचप्रमाणे पूर्वीचे बठे ओटे जाऊन उभे ओटे आले. आधुनिक शैलीचा प्रभाव म्हणून की काय, आता  इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचा विचार न करता  स्वयंपाकघराची रचना करणेच चुकीचे ठरेल.

अत्याधुनिक शैलीनुसार तर ओपन किचन हाही पर्याय आता खूप जणांना मान्य होतो. वॉशरूम्समधील ड्राय आणि वेट एरिया वेगळा डिझाइन केला जातो. फíनचरमध्येदेखील मॉडय़ुलर फíनचर किंवा फिटिंग्ज्मधील विविधता यामुळे कमी जागेतही खूप साऱ्या सोयी करता येतात.

कलात्मकतेचा विचार करताना अत्याधुनिक शैलीत साधर्म्य (Symmetry) जरी नसले तरीही एक ताल (Rhythm ) मात्र नक्की असतो. आकारांचा आणि रंगांचा वेगळेपणा जाणवू शकतो.

संयोग (Fusion ) या संकल्पनेनुसार पारंपरिक आणि आधुनिक शैलीची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ही जुन्या नव्याची सांगड घालताना रचनेचा त्रिमितीय तोल (Three – Dimensional  Balance) साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. तरच त्या कलाकृतीला एक अस्तित्व प्राप्त होते.

अशा प्रकारे अंतर्गत रचनेच्या निरनिराळ्या संकल्पना काळानुसार बदलत गेल्या, तरी उत्तरोत्तर नव-निर्मितीची आस मानवाला प्रगतीकडे नेवो आणि सुंदरतेची पूजा अखंड चालू राहो..

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

First Published on May 25, 2019 1:44 am

Web Title: vastu savaand article by seema puranik