अलकनंदा पाध्ये

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

अलीकडेच मैत्रिणीबरोबर पालगडला गेले आणि खेडय़ामधल्या कौलारू घराचे अंतरंग बघायला मिळाले. गोंधळेकरांच्या म्हणजे तिच्या माहेरच्या त्या घराची पुनर्बांधणी होण्यापूर्वी आम्हाला ते भव्य घर दाखवण्याचा तिचा आग्रह किती योग्य होता ते प्रत्यक्ष घर बघताक्षणी जाणवले. सुमारे दीड-पावणेदोनशे उन्हाळे-पावसाळे सहन केलेल्या त्या वास्तूत सध्या कुणाचा नियमित वावर नसला तरीही एकेकाळच्या अनेक वस्तू तिथे जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. उपलब्ध सामग्रीचा पुरेपूर वापर करून उभ्या राहिलेल्या त्या घरात वावरताना त्या काळच्या वास्तुविशारदांच्या दूरदृष्टीचाही प्रत्यय ठायी ठायी जाणवत हेता.

एकेकाळी मुलामाणसांनी अक्षरश: गजबजलेल्या त्या दिमाखदार वास्तूची शान अजूनही नजरेत भरण्यासारखी होती. अंगणातून चार पायऱ्या चढून गेल्यावर ओटीवर आपला प्रवेश होतो. गोंधळेकरांकडे कित्येक गावांची खोती होती. त्या खोतकामासाठी तिथे म्हणे एकेकाळी ३-४ मुनीमांची गाद्यांवर बसून समोरच्या बठय़ा डेस्कवर लिखापढीची कामे चालायची. कोपऱ्यात आतून-बाहेरून शेणाने सारवलेली बांबूच्या कामटय़ांची साधारण ४ फुटी पिंपासारखी कणगी आढळली, जिच्यात एकेकाळी तांदूळ ठेवलेले असायचे. गोधनाला सोन्यानाण्यासारखे जपले जायचे म्हणून आजकालच्या चिल्ड्रन रूमसारखी ओटीच्या शेजारी वासरांसाठी खास खोली होती- जिथे थंडीच्या दिवसांत छोटय़ा वासरांच्या अंगाला गोणपाटाने गुंडाळून त्यांची बडदास्त ठेवली जायची. त्या शेणाने सारवलेल्या कौलारू घरात वावरताना कधी ४ पायऱ्या चढण्याचा तर कधी ४ पायऱ्या उतरण्याचा व्यायाम करणे जणू आवश्यकच होते, अशीच संपूर्ण घराची रचना होती. ज्याच्यात नवागत धडपडण्याची शक्यता हमखास.. ज्याचा मी अनुभव घेतलासुद्धा.

ओटीच्या पुढे आत ऐसपस माजघर म्हणजे आजच्या काळातली ड्रॉइंगरूम किंवा हॉल. तिथे बसण्यासाठी शिसवी लाकडाचा लांबरुंद झोपाळा, ज्यावर एखादा माणूस पाय ताणून वामकुक्षीही घेऊ शकेल. त्या काळच्या लोकांना खाली बसण्याचा त्रास नसल्याने बसण्यासाठी खुर्च्या सोफ्यांऐवजी चटया, जाजमांचीच सोय असायची. फार तर एखादी लाकडी खाट किंवा माचा. म्हणजे लाकडी फळ्यांनी बनलेला पलंग. मंगळागौर, सत्यनारायण पूजा किंवा हळदीकुंकू वगैरे कौटुंबिक समारंभ या माजघरात व्हायचे. कारण देवघरात प्रवेश म्हणजे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याइतके कर्मकठीण काम. खरं तर देवघर म्हणजे एक मोठी खोलीच होती. जिथे एका भिंतीशी मोठा शिसवी देव्हारा होता. अत्यंत कडक सोवळ्या-ओवळ्यापायी तिथे ऐरागऱ्याला प्रवेश निषिद्ध होता. समोरच असायची मोठी तिजोरी आणि भलामोठा लाकडी पेटारा, ज्यात चांदीची भांडीकुंडी ठेवली जात. कदाचित त्याच्या सुरक्षेसाठीच सोवळ्याचे कारण सांगून त्या खोलीत प्रवेश नाकारला जात असेल असा मी मनातल्या मनात अंदाज केला.

स्वयंपाकघरसुद्धा ऐसपसच. एका कोपऱ्यात जमिनीवर मातीने लिंपलेल्या ३-४ चुली दिसत होत्या. समोरच्या बाजूला एका ओटय़ावर विहिरीवरून आणलेल्या पिण्याच्या पाण्याचे हंडे, कळशा ठेवल्या जात. शेजारीच हात धुण्यासाठी छोटय़ा मोरीजवळच्या दगडाच्या डोणीने (आजकालची बादली) लक्ष वेधून घेतले. एकेकाळी ती डोणी म्हणे फ्रिजचे कामही करायची. थंड राहण्यासाठी किलगडासारखी फळे त्यात ठेवली जात. स्वयंपाकघरात रोजच्या वापराची भांडीकुंडी ठेवण्यासाठीच्या मांडणीशिवाय एक सोवळ्याचे कपाट असायचे- ज्यात वर्षभरासाठीच्या लोणची-मुरांब्याच्या बरण्या दादरा बांधून ठेवल्या जात. हातभर रूंद भिंतींची जाडी असल्यामुळे सर्व खोल्यांतली बरीचशी कपाटे भिंतीतलीच होती. तिथेच हडपा नावाचे वर्षभराचे मीठ साठवण्याचे पिंप प्रथमच पहायला मिळाले. एखाद्या वठलेल्या झाडाचा शेंडा आणि बुंधा सोडून मधले साधारण ४ फुटी खोड कापून ते आतून पोखरून त्याला आतून बाहेरून डांबराचा थर लावलेले पिंप म्हणजे हडपा. ज्यात म्हणे मिठाला पाणी अजिबात सुटत नसे.

गोंधळेकरांच्या अत्यंत सधन घरात गोधनही भरपूर! त्यामुळे दूधदुभत्याचीही त्यावेळी तिथे रेलचेल होती. स्वयंपाकघराला लागून एक खोली फक्त ताकाची. खास ताक घुसळण्यासाठी जमिनीपासून छतापर्यंत रोवलेल्या खांबाला ताकमेढ म्हणतात हे तेव्हा समजले. त्याच्या पुढय़ात भल्यामोठय़ा मडक्यातले दही माणूसभर उंचीच्या माथ्याने (रवीने) अर्थातच दोरीच्या साहाय्याने उभ्याने घुसळताना बाईच्या हाताला होणाऱ्या व्यायामाची कल्पना करा. दुभत्याचे कपाटही त्याच खोलीत. चरवी, कासंडी अशी खास नावे असलेली २-३ भांडीही तिथे पाहायला मिळाली. भरपूर आलेले दूध तापवायची त्या वेळची खास सोय म्हणजे थारळाची रचना. भिंतीतल्या एका कपाटात साधारण २ फुटांवर कढईच्या आकाराचा मध्यम खड्डा करून त्यात गोवऱ्या, भाताची तूस वगैरे पसरून त्यावर छोटासा निखारा ठेवला जाई आणि त्या मंद विस्तवावर मोठय़ा पातेल्यात दूध तापायला ठेवले जाई. ते कपाट म्हणजे थारळ.. ज्याचा पुढचा लाकडी दरवाजा बंद केला जाई आणि मागच्या बाजूस हवेसाठी आणि मांजरांचा त्रास टाळण्यासाठी गजांची साधारण २ फुटी खिडकी होती. संध्याकाळी तापत ठेवलेले दूध उतू न जाता रात्रभर तापून त्यावर सकाळी दिसणाऱ्या खरपूस जाडजूड सायीच्या कल्पनेनेच माझ्या तोंडाला पाणी सुटले. दूधदुभत्याप्रमाणेच गुरांसाठीचे आंबोण, पेंड वगैरे खाद्य ठेण्यासाठीसुद्धा चक्क स्वतंत्र खोली असलेली पाहून हैराण व्हायला झाले.

थारळाच्या शेजारच्या बाळंतिणीच्या अंधाऱ्या खोलीला धूर बाहेर जाण्यासाठी थोडय़ा उंचीवर दोन खिडक्या होत्या. मुलामाणसांच्या त्या घरात तिथल्या सुंभाच्या खाटेवर आणि लाकडी पाळण्यात सतत कुणी ना कुणी बाळ बाळंतिणीचे शेक मालिश चालूच असायचे.

मागीलदारची कांडणाची पडवी म्हणजे मत्रिणीच्या मते एक वर्कशॉपच होते. तिथे चुला (मोठ्ठी चूल) दिसत होता. ज्याच्यावर अंघोळीसाठी पाणी तापवले जायचे, पण त्या चुल्याचा उपयोग इतरही अनेक गोष्टींसाठी होई. शेतातून आलेले भात (साळ.. तुसासकटचे तांदूळ) रात्रभर मोठय़ा हंडय़ात भिजवले जाई. दुसऱ्या दिवशी उपसून त्यावर आधण पाणी टाकून ते निथळल्यावर वाटी वाटीभर त्या चुल्यावरच्या कढईत भाजून नंतर तिथे बाजूलाच असणाऱ्या उखळात-मुसळाने कुटून नंतर सुपाने पाखडले की पोहे तयार होत.

बहिणाबाईच्या कवितेतले घऽऽरऽऽट (मोठे जाते) पडवीतच पाहायला मिळाले. जमिनीत रोवलेल्या तीन ठोकळ्यांवर मोठय़ा आकाराचे ते जाते ठेवलेले होते. त्याचा व्यास मोठा असल्याने वरच्या भागात अडकवलेला दांडा फिरवायला म्हणे किमान ३-४ बायकांची मदत लागे. थोडक्यात, ताकाप्रमाणेच तिथे जाते फिरवायला उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या घरटमधे सालासकट तांदूळ भरडला जाई. त्यातून बाहेर येई तो करड (न पाखडलेला तांदूळ) जो शिजण्यास कठीण, पण मत्रिणीच्या मते त्याची भाकरी मात्र चविष्ट लागते. तिथेच एक जमिनीत पुरलेला दगडी खल दिसला ज्याला वाहिन म्हणतात. त्यात करड तांदूळ (बिनसडीचा) टाकून मुसळाने कुटून त्याला पॉलीश केले जायचे. या सर्व प्रकारात निघालेल्या तुसांचा अंगणात ढीग रचून त्यावर एक निखारा ठेवला की दुसऱ्या दिवशी ढिगाच्या आत पांढरी शुभ्र राखुंडी, रांगोळी तयार होई. याशिवाय पडवीत उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळची जेवणं लवकर आटपली की गावातल्या बायका पापड लाटायला जमत. एकीकडे पापडासाठीचे पीठ उखळात कुटले जाई आणि एकीकडे कंदिलाच्या प्रकाशात गप्पा मारता मारता तासा दोन तासांत झरझर पापड लाटले जात.

अंगणाच्या एका बाजूला आजवर फक्त ऐकिवात असलेले कोठार प्रत्यक्ष बघताना त्याचेही वेगळेपण जाणवले. शेतावरून आलेले धान्य साठवण्यासाठी लांबरुंद, उंच ऐसपस मात्र दरवाजा नसलेली दगडी खोली म्हणजे कोठार. गरजेनुसार धान्य काढण्यासाठी छतावरची कौलं काढून आत उतरण्याची सोय होती. त्याच्या शेजारीच जळणासाठीचा लाकूडफाटा आणि गुरांच्या अन्नासाठी गवतपेंढय़ासाठी मोठी खोली होती. त्या अवाढव्य घरावरची माडीसुद्धा तेवढीच प्रशस्त होती.

गोंधळेकराच्या किमान ३-४ पिढय़ांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या.. एकेकाळच्या जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या त्या पुराणवास्तूचा निरोप घेताना मत्रिणी प्रमाणेच आमचीही पावले अनामिक उदासीनतेने उंबरठय़ाशी अडखळली.

ओटीच्या पुढे आत ऐसपस माजघर म्हणजे आजच्या काळातली ड्रॉइंगरूम किंवा हॉल. तिथे बसण्यासाठी शिसवी लाकडाचा लांबरुंद झोपाळा, ज्यावर एखादा माणूस पाय ताणून वामकुक्षीही घेऊ शकेल. त्या काळच्या लोकांना खाली बसण्याचा त्रास नसल्याने बसण्यासाठी खुर्च्या सोफ्यांऐवजी चटया, जाजमांचीच सोय असायची.

alaknanda263@yahoo.com