26 November 2020

News Flash

निसर्गरम्य आणि ऐसपैस

नेरळ, कर्जत, खोपोली, पाली, खर्डी, खालापूर, पेणमध्ये विकासकांची मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक

हर्षद कशाळकर, सागर नरेकर

गेल्या काही महिन्यांपासून जग ज्या करोना विषाणूच्या विळख्यात अडकले आहे, त्या विळख्यात इतर अनेक गोष्टींसह सर्वसामान्य व्यक्ती निसर्गरम्य आणि ऐसपैस मोकळीक हरवून बसला आहे. ती ऐसपैस मोकळीक अनुभवण्यासाठी सर्वसामान्य धडपडतो आहे. हीच निसर्गरम्य ऐसपैस मोकळीक मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे रायगडमधील नेरळ, कर्जत, पाली, खोपोलीचा परिसर. एके काळी सेकंड होम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यातील घरांना आता फर्स्ट होम म्हणून प्राधान्याने पाहिले जाते आहे.

मुंबई, नवी मुंबईची क्षमता संपल्याने चाकरमान्यांनी आपला मोर्चा चौथी मुंबई म्हणून ओळख मिळवू पाहणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर आणि शहापूर तालुक्याकडे वळवला होता. मात्र या शहरांच्या विस्तारण्याच्या मर्यादाही आता समोर येऊ लागल्याने निसर्गरम्य आणि पर्यावरणीय संपन्न नेरळ, कर्जत आणि खोपोली चाकरमान्यांच्या पसंतीस उतरत आहेत. लोकल रेल्वे सेवेवर खोपोलीच्या मार्गाने बदलापूरनंतर सर्वाधिक विकसित होणारे शहर म्हणजे नेरळ, कर्जत आणि खोपोली. एकीकडे माथेरानचा पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील आणि तितकाच मनोहारी परिसर, कर्जत, नेरळशेजारून वाहनाऱ्या उल्हास नदीचे विस्तीर्ण पात्र आणि विलोभनीय हिरवळ गेल्या काही वर्षांत मुंबईसह राज्यातील पर्यटकांना खुणावत होती. त्यानंतर माथेरान, कर्जत आणि खोपोलीच्या परिसरात नव्याने उभ्या राहिलेल्या पर्यटन केंद्रांना भेटी देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र पर्याटनासोबतच गेल्या काही वर्षांत सेकंड होम म्हणून या शहरांकडे पाहिले जात होते. करोनाच्या संकटात ही निवड आता फर्स्ट होमपर्यंत पोहोचली आहे.

नेरळ, कर्जत आणि खोपोली ही शहरे आता रेल्वे, रस्ते अशा दोन्ही मार्गानी मुंबई आणि पुण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहेत. नवी मुंबईचे विमानतळ या दळणवळणाच्या साधनांमध्ये सर्वाधिक फायद्याचे ठरणार आहे. यापूर्वी कर्जत स्थानकातून पुणे प्रवास सोपा झाल्याने चाकरमानी पुण्यापर्यंत ये-जा करत आहेत. आता येथून जाणारा कर्जत-मुरबाड रस्ता आणि प्रस्तावित असलेला भीमाशंकर मार्ग थेट अहमदनगरशी जोडण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग लवकरच दुहेरी होणार आहे. त्यामुळे याचा फायदा नेरळ, कर्जत आणि खोपोली येथील रहिवाशांसाठी होणार आहे. जेएनपीटी-वडोदरा, खोपोली-जव्हार महामार्गही दळणवळणात मोलाची भूमिका बजावणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कक्षा आता रायगड जिल्ह्याच्या दिशेने रुंदावत आहेत. एमएमआरडीएने २०२० ते २०३६ या कालावधीसाठी प्रस्तावित विकास आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १ हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा या क्षेत्रात समावेश आहे. या आराखडय़ात पुढील २० वर्षांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात पायाभूत सुविधांचा विकास या परिसरात मोठय़ा प्रमाणात होणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी पोर्ट, नवी मुंबई सेझ, दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर, दिघी पोर्ट, रेवस पोर्ट यांसारखे देशीविदेशी गुंतवणूक असणारे महाकाय प्रकल्प रायगड जिल्ह्यात विकसित होत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतांश महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. विस्तारित उपनगरीय रेल्वे सेवा आता रोहापर्यंत सुरू झाली आहे. रोहा ते वीर या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात ही रेल्वे सेवा महाडपर्यंत विस्तारित होणार आहे. कर्जत पनवेल या रेल्वे मार्गाच्याा विस्तारणाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. अलिबागलाही रेल्वे सेवेनी जोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

विरार अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू होत आहे. शिवडी न्हावा शेवा सागरी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावर रोरो जलवाहतुक सुरू झाली आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या पायाभूत सुविधांच्या या विकासामुळे मुंबईशी असलेली रायगड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम आणि जलद होणार आहे.

नवी मुंबई विमानतळापासून २५ किलोमीटरचा परिसर हा नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात कर्जत, खालापूर, पेण आणि उरण तालुक्यांचा समावेश आहे. सिडकोच्या माध्यामातून हा परिसर विकसित केला जाणार आहे. यासाठी २७० गावांतील ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर २३ स्मार्ट सिटी प्रकल्प उभारण्याची तयारी सिडकोने केली आहे. त्यामुळे आगामी रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळे कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबाग परिसरात अनेक मोठय़ा रिअल इस्टेट कंपन्यांनी वीकेण्ड होम्स, सेकण्ड होम्स, वन बिएचके फ्लॅट्स, स्टुडिओ अपार्टमेंट आणि बंगलो स्कीम्स उभारण्यास सुरुवात केली आहे. कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबागमधील मोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. यात मोठय़ा टाउनशिप्सचाही समावेश आहे.प्रदूषणमुक्त श्वास, पर्यावरणीय संपन्नता, उज्ज्वल भविष्याची शाश्वती, महानगरांशी नजीकता, पर्यटन केंद्र, ऐसपैस मोकळीक आणि खिशाला परवडणारे गृहप्रकल्प अशा गोष्टींमुळे येथे गृहप्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक वाढते आहे. विशेष म्हणजे सेकंड होम नव्हे तर फर्स्ट होमसाठीच आता चाकरमानी या शहरांकडे पाहू लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 12:15 am

Web Title: vasturang article large investment of developers in neral karjat khopoli pali khardi khalapur pen abn 97
Next Stories
1 पीएमएवाय मुदतवाढ पथ्यावर
2 निसर्गलिपी : खते आणि रोपांची काळजी
3 प्रकाशविश्व : लिव्हिंग रूम व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब
Just Now!
X