News Flash

झाप

शेतकऱ्याचं दुसरं घर म्हणजे झाप (शेतघर). खेडय़ापाडय़ातील शेतकरी किडुकमिडुक सांभाळून वर्षांनुवर्षांचा शेती व्यवसाय करीत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

भगवान मंडलिक

शेतकऱ्याचं दुसरं घर म्हणजे झाप (शेतघर). खेडय़ापाडय़ातील शेतकरी किडुकमिडुक सांभाळून वर्षांनुवर्षांचा शेती व्यवसाय करीत असतो. शेतीमधून जे उत्पन्न मिळते, त्यावर त्याची उर्वरित आठ महिन्याची गुजराण असते. शेती हेच चरितार्थाचे मुख्य साधन असल्याने, आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या शेतीला शेतकरी सांभाळत असतो. शेतीची मशागत करीत असतो. घरापासून दूर असलेल्या या शेतीवर सतत ये-जा करणे स्वत:ला, कुटुंबीयांना त्रासदायक होत असल्याने, हा त्रास वाचविण्यासाठी शेतकरी स्वत:च्या शेताच्या बांधावर, शेताच्या कोपऱ्यावर असलेल्या माळावर झाप बांधतो. तेथेच घराप्रमाणे संसार उभारतो. हा संसार थाटण्यासाठी केलेली जागा म्हणजे झाप (शेतघर). झाप म्हणजे पाच पैशाचा खर्च न करता बांधलेली एक झोपडी. १० ते १५ अनगड दगडी चौकोनी पद्धतीने पाया म्हणून लावल्या जातात. त्यात मातीची भर टाकून तो पाया भक्कम केला जातो. या मातीवर मुरूम टाकून माती सतत उखडणार नाही, यासाठी पाण्याने हा पाच ते सहा फुटाचा भुई भाग भुरण्याने (जमीन चोपण्याचे साधन) चोपून समतल केला जातो. चोपलेला भाग शेणाने सारवून सुस्थितीत करतो. अशा प्रकारे झोपडीचा पाया व भुई तयार केली जाते.

जंगलातून पाच ते सहा फुटाच्या पाच डेल्या (बेचकी असलेले लाकूड) शेतकरी आणतो. या डेल्या जोत्याच्या चारही बाजूंना पुरून मध्ये दोन बाजूना पावसाचे पाणी सरसर निघून जावे अशा पद्धतीने डेल्या पुरल्या जातात. या डेल्यांवर पाच ते सहा फुटाचे जमिनीपासून दोन ते तीन फुटावर राहतील अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छतावर वासे बांधले जातात. मध्यभागी एक आधार डेली असते. हे वासे जंगलातील पळस वेलेच्या किंवा एखाद्या झाडाच्या साली चेचून त्यापासून दोऱ्या तयार करून त्यापासून बांधले जातात. भक्कम असलेल्या या दोऱ्या उन-पावसात कधी कुजत नाही. अशा प्रकारे छताचा भाग बांधला जातो. या छतावर टाकण्यासाठी सागाच्या पसरट पानांच्या एकमेकांत गुंफण करून गोलाकार छत्र्या टाकल्या जातात. छताच्या दोन्ही बाजूला बसतील एवढय़ा छत्र्या शेतकरी तयार करतो. त्या छतावर पसरून टाकतो. या छत्र्यांच्या मधून पावसाचा एक थेंब किंवा उन्हाची तिरिप झोपडीत येणार नाही अशा पद्धतीने त्याची कौलाप्रमाणे छतावर रचना केली जाते. छतावर टाकलेली सागाची पाने काही दिवसांनी वाळतात म्हणून, त्या पानांवर आवरण म्हणून पेंढय़ापासून तयार केलेले त्रिकोणी आकाराचे माचरोंडे (गवताच्या पेंढय़ा) टाकले जातात. माचरोंडे नसतील तर शेकार नावाचे गवत झोपडीच्या छतावर पसरून आच्छादन केले जाते. झोपडीच्या चारही बाजूने जंगलातून आणलेल्या साग, ऐन झाडाच्या झाडांच्या पेठय़ा (काठय़ा) चारही बाजूच्या खांबांना वेलींनी भक्कम बांधल्या जातात. उभ्या-आडव्या पद्धतीने या पेठय़ा बांधल्या जातात. आडोसा म्हणून झोपडीत जंगली प्राणी, सरपटणारा प्राणी येऊ नये म्हणून पेठय़ांचे कूड तयार केले जातात. ते शेण किंवा पांढऱ्या मातीने सारवून बंदिस्त केले जातात. हवा खेळती राहावी म्हणून झोपडीच्या मावळत्या आणि उगवत्या (सूर्योदय, सूर्यास्त) बाजूला लहान झरोके (खिडकी) ठेवले जातात. झोपडीच्या एका बाजूला ये-जा करण्यासाठी दार ठेवले जाते. हे दार पेठय़ांच्या कुडाचे असते. दरवाजाची एक बाजू डेल्यांना भक्कम बांधली जाते. एक बाजू उघडण्यासाठी मोकळी ठेवली जाते. दरवाजाला कुलूप नसते. एका बाजूला वेलेची दोरी किंवा काथ्याची दोरीने दरवाजा कायमचा जोडला जातो. दुसरी बाजू उघडझाप करण्यासाठी मोकळी ठेवली जाते. झोपडीत जाताना दोरी सोडायची आणि दरवाजा उघडून आत जायचे आणि बाहेर पडताना पुन्हा दरवाजा बंद केल्यावर दोरी बांधून घ्यायची.

शेताच्या बांधापासून ते झापाच्या दरवाजापर्यंत येईपर्यंतचा रस्ता गवत कापलेला मळवाटेचा असल्याने, लाल गालीचा झोपडीच्या बाहेर आहे असे लांबून वाटते. दूरवरून गवत, झुडपाने वेढलेला झाप जवळ गेले की एक टुमदार घर वाटते. या झोपडीत शेतकरी मातीची चूल ठेवतो. घरात जेवणापासून ते झोपण्यापर्यंत जेवढे आवश्यक सामान लागते. त्या साहित्यामधील एक एक वस्तू झोपडीत आणून ठेवतो. चहा, तांदूळ, तिखट, मीठ, मसाला असा सगळ्या प्रकारचा किरणा. झोपण्यासाठी पोत्यापासून तयार केलेली पथाडी. काथ्याच्या दोऱ्यांनी विणलेली बाज, घरचा पाळीव कुत्रा असेल तर त्याला बसण्यासाठी एक कोपरा, घरून आणलेली वस्तू टांगून ठेवण्यासाठी वाशांना चुका ठोकलेल्या असतात. जेणेकरून पिशवीमधील वस्तूला मुंगी लागू नये हा उद्देश. झोपडीतील मुख्य वस्तू म्हणजे लोखंडी घमेले. या घमेल्यात कचरा गोळा करणे किंवा रात्रीच्या वेळेत झोपडीत शेणी-गोवऱ्या टाकून धूर करणे. शेतावर काम करताना प्रत्येक वेळी घरीच जावे लागू नये. किंवा कुटुंब प्रमुख महिलेला शेत ते घर पुन्हा पुन्हा ये-जा करू लागू नये हा झापाचा मुख्य उद्देश असतो. सकाळच्या वेळेत शेतात काम करताना चहाची तलफ आली की लगेच झोपडीत जाऊन चहा टाकला जातो. चहाचे कप कमी पडले की पळसाच्या पानाचे द्रोण करून त्यामधून चहा दिला जातो.

हे झाप गावागावांमध्ये व्यक्तींच्या नावे प्रसिद्ध असतात. बाळू नामा वरकुटे नावाची व्यक्ती शेती रक्षणासाठी झापावरच राहत असेल तर ते झाप त्या व्यक्तीच्या नावाने प्रसिद्ध असतात. बाळू नामाचा झाप. तुका बाळूचा झाप. दामा महादूचा झाप. शेतकरी झापावर राहून भातशेती, माळरानावर भेंडी, नागली, वांगी, कारली, काकडी, गवार अशी पिके घेतो. झापावर पूर्ण वेळ राहिल्याने शेतीची दिवसभर मशागत करता येते. जून-जुलैमध्ये भातपेरणी, लावणीचा हंगाम सुरू झाला की शेतकरी पूर्ण वेळ शेतीवर राबत असतो. गावातील घरात येऊन वेळ घालविणे शक्य नसते. त्यामुळे झापावर राहून तेथेच जेवणखाण आणि रात्रीचा मुक्काम शेतकरी करतो. झापाच्या बाहेर कोपऱ्यावर दगडी शिळा ठेवून त्यावर उघडय़ावर अंघोळ करण्यासाठी सोय असते. शेतावरील काम उरकले की त्याचे कुटुंबीय घराकडे परतते. मुसळधार पाऊस पडत असला तरी झापातून पावसाचा एक थेंब आत येत नाही. रात्रीच्या वेळेत चुलीवर एका टोपात भात, कोरडय़ा मासळीचा रस्सा शिजवला जातो. बुक्कीने कांदा फोडून गरमगरम भोजन घेतले की घोंगडीचा आसरा घेत आणि बाजूला घमेल्यामध्ये शेकटी पेटून त्या उबेने शेतकरी कधी निद्रा घेतो हे त्याला कळत नाही. गणपती गेले की त्यानंतर भात कापणीचा हंगाम सुरू होतो. त्यावेळीही शेतकरी भात कापणी, त्याचे जनावरांपासून रक्षण करण्याचे काम शेतकरी करतो. मुसळधार पाऊस पडत असला की गावातून शेतावर जाणे अवघड असते. तेच झापावर वास्तव्य असले की सर्व प्रकारची कामे एकाच जागी करता येतात. मुसळधार पाऊस पडत असला की आजूबाजूच्या तलावांमधून मासे शेतामधून वाहत येतात. त्याला वळघण म्हणतात. हे मासे चवदार असतात. हे मासे पकडण्यासाठी शेतकऱ्याने पऱ्ह्यच्या (शेताच्या एका बाजूने पाणी वाहून जाण्यासाठी असलेली मोकळी जागा) बाजूला मासे पकडण्यासाठी किवटी (मचाण) बांधलेली असते. या मचाणाच्या एका बोगद्यात पाणी वाहत असलेल्या बाजूला बांबूने तयार केलेली गोलाकार जाळी अडकविली जाते. मुसळधार पाऊस सुरू असला की संध्याकाळच्या वेळेत शेतकरी या मचाणाला जाळी बांधून ठेवतो. शेतात वाहून जात असलेले मासे रात्रभर या बांबूच्या जाळीत अडकतात. अशा प्रकारे दोन ते तीन महिने मासे पकडून ठेवायचे. त्यामध्ये मीठ, मसाला भरून ते वाळवून उर्वरित महिने तिन्ही त्रिकाळ भोजनाच्यावेळी तोंडी लावणे म्हणून खायाचे. पूर्वीच्या काळात बहुतांशी शेतकऱ्यांचे झापावरच कायमचे वास्तव्य असायचे. अगदी घरातील कोणा व्यक्तीचे शुभमुहूर्त होणार असेल. कोणी व्यक्ती मरण पावली असेल तरच झापावरची व्यक्ती गावात दिसायची. झापावर कायमस्वरूपी वास्तव्य केल्याने शेतीची बाराही महिने मशागत व्हायची आणि शेतीत उत्तम भात व इतर पीक येऊन येईल त्या पिकांमध्ये शेतकरी सुखी-समाधानी असायचा.

असा हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला झाप- जुनी झाप सांभाळणारी आजोबा मंडळी जशी वैकुंठवासी होत चालली आहेत, तसतशी झाप संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे.

bhagwan.mandlik@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:15 am

Web Title: vasturang article on farm house abn 97
Next Stories
1 मंतरलेली वास्तू 
2 नागरी जमीन कमाल धारणा कलम २० अंतर्गत नव्या सवलती 
3 वास्तु-मार्गदर्शन
Just Now!
X