27 February 2021

News Flash

निसर्गलिपी : फुलली बाग

इवल्या ग्लासातही बाग फुलवण्याचं तंत्र शिकताना मोठय़ा गच्चीवर काय काय लावता येईल यावरही बोलू.

(संग्रहित छायाचित्र)

मैत्रेयी केळकर

mythreye.kjkelkar@gmail.com

हे एक झाड आहे याचे माझे नाते

वाऱ्याची एक झुळुक दोघांवरून जाते..

शांताबाईंच्या लेखणीतून उमललेले हे सहज साधे शब्द अगदी हृदयात जाऊन उतरतात. आपलं आणि सृष्टीचं नातंही असंच आहे. अनामिक, अकृत्रिम, मोकळढाकळं, खळाळणाऱ्या झऱ्यासारखं वाहतं. यामुळेच आपण जरी नुसती या नात्याला साद घातली तरी ते जिवंत होतं, फुलतं, मोहरतं.

बागकाम, झाडं, फुलं याविषयी सदर लेखन करायचं ठरल्यावर याच नात्याला साद घालत वाचकांना या चिरंतन खजिन्याचं दार अलगद उघडून द्यायचं अस नक्की केलं. एखादी वनस्पती वाढवणं खरं तर नाजूक काम, पण तितकाचं आनंद देणारंही. वनस्पती आणि आपला हा स्नेहबंध जपताना, जोपासताना त्यातील जिव्हाळ्याचे पदर, अनवट प्रयोग, सहजसाध्य उपाय यांची चर्चा करताना, आपल्याला सहज आढळणाऱ्या, परसबागेतल्या सदाफुलीपासून ते राजकमळापर्यंत सगळ्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. इवल्या ग्लासातही बाग फुलवण्याचं तंत्र शिकताना मोठय़ा गच्चीवर काय काय लावता येईल यावरही बोलू.

स्वयंपाकघरातल्या बागेपासून ते हंडीतल्या बागेपर्यंतचा हा आपला प्रवास रंजक असेल. बाग म्हटली की माती आलीच. या मातीवर तर बोललंच पाहिजे. माती विकत आणणं हे तसं सोपं काम, पण माती तयार करता आली तर? फार सोयीचं होईल नाही का? घरच्या घरी माती तयार करता आली की श्रम आणि पैसे दोन्ही गोष्टींची बचत. शिवाय कुंडीचं वजनही कमी होणार. घरच्या ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट करता आलं तर ‘सोने पे सुहागा’च! या सगळ्या सोप्या पद्धती आपण खत आणि मातीवरल्या लेखातून समजून घेणार आहोत.

औषधी वनस्पती, स्वयंपाकघरातला बगीचा, इवल्या कुंडीतली बाग, तळ्यातली बाग यावर लेखन होईलच. पण या जोडीला कोकोडेमा, बोन्साय, टेरारियम, हायड्रॉपोनिक्स अशा बागकामात वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतीही जाणून घेऊ. साधं रोप जरी लावायचं तरी माती, कुंडी, खत असा सगळा सरंजाम लागतो. मग कुंडी मातीची की प्लास्टिकची, माती शेणखतमिश्रित की कंपोस्टमिश्रित असे प्रश्न उभे राहतात. जवळच्या नर्सरीत जावं तर अगदी थोडके पर्याय उपलब्ध असतात. कुंडय़ांमध्ये ही फारशी विविधता नसतेच, कधी कधी हवं ते रोप वेळेवर मिळत नाही. अशा वेळी उद्यान प्रदर्शनांना हजेरी लावणं हा उत्तम पर्याय असतो.

दरवर्षी अगदी नेमानं अशी प्रदर्शनं भरत असतात. त्यात अनेक उपयुक्त रोपं, औषधी वनस्पती, विविध आकाराच्या कुंडय़ा, खतं, कीटकनाशकं, कीडनाशकं, फळभाज्यांची, पालेभाज्यांची रोपं, बागकाम साहित्य, एवढचं नाही तर उद्यान कलेवरील पुस्तकंही विक्रीला असतात. या प्रदर्शनांतून फिरणं, नेमक्या आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी निवडणं आणि विविध कल्पनांना मनात साठवून पुढल्या वेळी तसेच प्रयोग करणं हीसुद्धा एक कला आहे.

आपण या प्रदर्शनात असणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती तर घेऊच, पण त्यातील वैविध्याचा कसा उपयोग करता येईल हेही पाहू.

अर्थात ही सगळी माहिती घेताना त्यात रूक्षपणा मुळीच नसेल. अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना सहज कळेल अशा रीतीने ते मांडलेलं असेल. झाड वाढवणं हा एक परिपूर्ण आनंद आहे, यात निर्जीवपणा किंवा कृत्रिमतेला जागा नाही. या आपल्या मित्रांशी आपण थेट संवाद साधू शकतो. त्यांच्या समस्या त्यांच्याकडूनच समजावून घेऊ शकतो, त्यांच्याशी तादात्म्य साधताना सृष्टीशी नकळत जोडले जाऊ शकतो. मग ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी पारायणाला बसायची गरज उरत नाही. दासबोधातले समास सहजी आकळायला लागतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा अभंग न राहता ते जगणं होतं. वनस्पतींना असलेल्या भावना, संवेदना यांच्याशी जोडून घेत आपलं आयुष्य त्यांच्या संगतीत हिरव्या आनंदाने भरून घेणं, खऱ्या अर्थी हिरवा आनंद वाटणं हाच तर खरा या साऱ्या लेखनप्रपंचाचा उद्देश.

मग भेटू पुढच्या लेखांत नवीन नवीन अनुभव घेण्यासाठी आणि अर्थातच नवीन प्रयोग करण्यासाठी…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:22 am

Web Title: vasturang article on gardening abn 97
Next Stories
1 बदलापूरची विकासाकडे वाटचाल
2 झाप
3 मंतरलेली वास्तू 
Just Now!
X