05 July 2020

News Flash

कलात्मक घर

आजुबाजूला लहानसा बगीचा होताच. तिला झाडाफुलांची भरपूर आवड. वेगवेगळ्या भाज्या-फळं-फुलं बागेत लावलेली.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

prachi333@hotmail.com

माझी आई चित्रकार आणि शिल्पकार. तिच्या पिढीतल्या क्वचितच कोणी स्त्रिया चित्रकला आणि शिल्पकला यांचं शिक्षण घेत असत. या दोन्ही कलांना लागणारं साहित्य अतिशय महागडं असतं. मुळातच पूर्वीच्या अनेक मध्यमवर्गीय लोकांची गोष्ट- अत्यंत गरिबीतून कष्टाने-शिक्षणाने वर आले- अशी होती. आईची गोष्टदेखील त्याहून वेगळी नव्हती. त्यामुळे जे काही शिकू, त्यातून अर्थार्जन फार महत्त्वाचं होतं. आधीच वेगळी वाट निवडली, तरी नंतर मात्र कलासक्ती बाजूला ठेवून नोकरीच्या घाण्याला जुंपून घेणं तिच्यासाठी फारच गरजेचं होतं. ती चित्रकला शिक्षिका होती. कलेसाठी कामाव्यतिरिक्त हवा तितका वेळ देता आला नाही तरी चित्रकला, शिल्पकला शिक्षणाने तिचं आयुष्य पूर्ण व्यापून टाकलेलं होतं. अगदी घरातली रचना काय असावी, कशी असावी इथपासून ते कपडय़ांच्या रंगसंगतीपर्यंत तिच्यातली चित्रकला डोकावत असे. त्यात आईच्या घराण्यात अनेकांना सुतारकाम उत्तम येत असे. तेही तिच्यात उतरलं होतं. चित्रकला, शिल्पकला शिकताना ती धातुकाम शिकली, वुड काìव्हगदेखील शिकली. आमचं घर सुरुवातीला अगदीच जंगलसदृश जागेत असल्याने, तिने गवंडीकाम वगैरेदेखील करून झालं होतं. आमच्या घराचं तारेचं कंपाऊंडदेखील मी आणि आईनेच मोठाले खड्डे टिकावाने खणून सिमेंटचा खडी-वाळूसोबतचा माल कालवून मोठाले अँगल्स त्यात रोवून घातलं होतं. नंतरची तारदेखील घरीच ओढून बसवली होती सर्व अँगल्समध्ये. त्यामुळे तयार असं स्वप्नातलं घर मिळालं आणि नंतर तिथे सुखाचा मुक्काम झाला, असं तिच्याबाबत झालं नाही. अगदी साधं बंगलेवजा घर तिने विकत घेतलं आणि तेच घर तिची प्रयोगशाळादेखील बनलं. जसे पैसे जमतील, जसा वेळ मिळेल, जशी गरज असेल, तसं ते वाढत, खुलत गेलं. त्यात भपकेबाजपणा, उगाच खर्चीक असा कोणताही बडेजाव नाही. असेल त्यात नीटनेटकेपणा आणि आहे त्यात थोडीशी रचना बदलून आकर्षकता. घरातली रचना दर तीन-चार महिन्यांनी बदलली जाई.

आजुबाजूला लहानसा बगीचा होताच. तिला झाडाफुलांची भरपूर आवड. वेगवेगळ्या भाज्या-फळं-फुलं बागेत लावलेली. गौरी-गणपतीत लागणाऱ्या सोळा भाज्या आमच्या बागेतच अनेकदा तयार असत. जरबेराच्या विविध शेड्स, दोन प्रकारच्या अबोली, जास्वंदी, कर्दळी आणि गुलाबाच्या विविध शेड्स, जाई, जुई, मोगरावर्गीय तमाम फुलझाडं, निशिगंध, ट्रम्पेट फ्लॉवर्स, गोकर्णाच्या शेड्स, काही शोची झाडं-फुलं, ऑफिस टाइमची आकर्षक फुलं अशी सगळी फुलांची उधळण बागेत रोज होत असे. कमळाचे कंद लावायचे म्हणून आधी चक्क हौदच बांधला बागेत. त्याचेही विविध रंग वेगवेगळ्या काळात न्याहाळता आले. याच हौदात डास होऊ नयेत म्हणून गप्पी मासे सोडले. त्यांची छान फिश थेरपी पाय सोडून बसलं की घरीच मिळू लागली. बाहेर मिळणारे बुके फारच महाग असतात. त्यात वापरली जाणारी बरीचशी पानं-फुलं तर बागेतच असत. वेगळ्याही काही पानाफुलांचे डेकोरेशन्स आईनेच तयार केले होते. दररोज घरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पानाफुलांच्या रचना मांडून ठेवायची हौस तिने निवृत्त झाल्यावर पुरवली. एरवीसुद्धा अगदी जाता-येता सहजच एखाद्या फ्लॉवरपॉटमध्ये एखादी छानशी रचना करून ती घराबाहेर पडायची. जेणेकरून थकून घरी आल्यावर अगदी घरभर सुगंध पसरला असेल. ती रचना पाहून बरं वाटे. आईला एखादी पुष्परचना करताना बघणं, हेसुद्धा फार छान असे. परंतु ‘हे तर काय किती सोपं आहे,’ असं म्हणून आम्ही ते करायला गेलो की ते तितकं सोपं नाहीये, हे समजायचं. पॉटरीचीदेखील तिला जाण असल्याने वेगवेगळ्या आकार-प्रकारांचे अनेक पॉट्स घरात असत. त्यासाठी महागडं काही घ्यावं विकत असा हट्टदेखील नसे. बागेतून जी ड्रेनेज लाइन गेली होती, ती काढायची वेळ आल्यावर तिने ते सिमेंटचे जुने पाइप जपून ठेवले. हॅक सॉ ब्लेडने ते पाइप कापून त्यांच्या लहान-मोठय़ा कुंडय़ा तयार केल्या, खालून मातीत रोवून. त्यात अनेक कॅक्ट्सवर्गीय झाडं-झुडपं आनंदाने वर्षांनुवर्ष नांदली. एकेकाळी अंगणात इतके कॅक्ट्स जमा झाले की बागेत पडलेले बांधकामाचे उरलेले दगड लावून एक डोंगर तयार केला आणि त्याच्या आजुबाजूने सर्व तुटक्या ड्रेनेज पाइप्समधून आकर्षक असं कॅक्टस हाऊसच तिने माझ्याकडून बनवून घेतलं. मग त्या सर्व पाइप्सला एक थीम ठरवून गेरूचा रंग दिला. कधी घराला रंग देताना उरलेले विविध रंग तिथे जिरवले, तर कधी त्यांचीही आकर्षक रचना केली. घराला रंग देणं हेसुद्धा घरीच होत असे, अगदी रंगारी देतात, तसं फिनिश!

पूजेला लागणारी पानं, फळं, फुलं अनेकदा बागेतच मिळून जात. अगदी बेलाच्या झाडापासून सर्व झाडे होती/ काही आजही आहेत. बेलाचं झाड अंगणात असणं म्हणजे निसर्गानेच स्वत:हून आपल्या अंगणात लावून ठेवलेली मंद सुवासिक उदबत्ती. त्याचा दरवळ वाऱ्याच्या झुळुकेने घरात येतो, खासकरून उन्हाळ्यात. विविध झाडांना फळं कशी लागतात, कधी लागतात, त्यांच्यावर कोणते पक्षी-प्राणी येतात, ते अगदी घराच्या अंगणातच शिकायला मिळालं. आवळाष्टमीला आवळ्याच्या झाडाखाली आईची आई जेवण बनवायची. आजीनेही बगिच्यात तिचा असा कोपरा तयार केला होता. बागेची आवड आहे, तर आणली महागडी रोपं असाही प्रकार नाही. पावसाळ्यात ज्यांच्या बागेत आपल्याला आवडतं असं काही दिसतंय, त्यांच्याशी थेट ओळख काढून चक्क रोपे, कंद, काडय़ा मागून आणायच्या, असा खाक्या! साधी राहणी, स्वत:च्या पायावर सर्वार्थानं उभं असणं, इच्छा न मारता सहजच साधून होणारी काटकसर याचा वस्तुपाठच तिच्याकडून वेळोवेळी शिकायला मिळत असे. इतकं की गवंडीकामापासून ते सुतारापर्यंत आणि माळ्यापासून ते शिंप्यापर्यंत आणि अगदी केससुद्धा घरच्याघरीच कापणाऱ्या कलेपर्यंत अनेक कलाकौशल्यांचं बाळकडू घरातच मिळालं. बागेची, शेतीची आवड इतकी की आईने चक्क एक गायच विकत घेतली! काही दिवस गायीचे करण्यात गेले.

नोकरी सांभाळून इतके उद्योग तिला जमेनासे झाले. तरीही तिच्या परीने तिचं काही ना काही घरात सुरूच असायचं. त्यात पर्यावरणभान जपायला तिला आवडायचं. रांगोळी आणि त्याचे रंग म्हणजे पर्यावरण ऱ्हासच, त्यात रासायनिक रंग. हे तिला समजावून सांगितल्यावर तिने कागद-कापडाचे काही पॅटर्न तयार केले आणि ते मांडून रांगोळीची हौस भागवली. कधी दारात ऑइलपेंटने छोटेसे हत्ती, मोर, छोटय़ा गोड रांगोळ्या कायमस्वरूपी पेन्टच करून टाकल्या. त्यातही कुठेही बटबटीतपणा नाही. आमचं घर माझ्या पुढाकाराने शून्य कचरा घर झालं. त्यात आईने सर्वतोपरी मदत केली. बागेतच तीन-चार प्रकारचे खत प्रकल्प सुरू केले. घरात पुरुषांसाठी एक वॉटरलेस युरिनल मी बसवलं. आई अगदी आवर्जून ते तपासायची. कॅन भरली की काही काळ इन्क्युबेट करून त्याचे डायल्युशन्स आमच्याच बागेत लिक्विड फर्टलिायझर म्हणून झाडाफुलांना वापरले जाऊ लागले. मूत्रावर वाढलेली, टवटवीत झालेली फुलं देवाला कशी वाहायची, असे प्रश्न आईला कधीही पडले नाहीत. उलट, ते संजीवन मिळाल्याने त्यांचा आकार-पोत किती सुधारला, हे तीच मला सांगायची. बागेत आणि घरात वेगवेगळे झोके असायची देखील भरपूर हौस आम्ही भागवली. सर्व प्रकारचे झोके वापरून झाले. तीन-चार झोके आजही आहेत. घरात उरलेल्या लाकडातून, डब्यांमधून पक्ष्यांसाठी घरटी देखील आम्ही

घरीच बनवली. त्यात पाल ते खार ते मुंगूस अशी सर्व निसर्गमित्र भेट देऊन जातात. विविध पक्ष्यांच्या अनेक पिढय़ा तिथे आजही सुखाने नांदत आहेत.

आई आज नाही, तिने घडवलेली बाग मात्र तशीच आहे. तिचं घर तसंच आहे. त्यात तिची चित्रं-शिल्प आहेत. बागेत साप-नागांपासून वेगवेगळे जीव अधूनमधून भेट देतात. दूरवर मोरांची केकावलीसुद्धा अगदी रोज ऐकू येते. बेलफळं अंगणभर पडलेली असतात. आपापल्या जोरावर वाढणारी, टिकणारी झाडंही तशीच आहेत. पानाफुलांच्या रचनासुद्धा आईची आठवण करून देतात. या सर्व निसर्गातच आता ती दरवेळी नव्याने भेटत राहते. दरवेळी तिची वेगळीच बाजू आकळते, समृद्ध करते. कष्टाच्या कलाकौशल्यांमध्ये रमलेल्या माणसाला स्वत:ला रमवायला फार कुठले बाहेरचे टेकू लागत नाहीत. कलाकौशल्यांमध्ये आपलं आपणच रमावं, ‘मोर हवा तर आपणच मोर व्हावं’, हे सर्व प्रत्यक्ष तिच्या जगण्यातूनच आमच्यातही रुजून गेलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 12:49 am

Web Title: vasturang artistic home abn 97
Next Stories
1 भवानीशंकर मंदिर अतिप्राचीन मंदिरात पुरातन दुर्मीळ वस्तूंची जपणूक
2 आनंददायी ‘स्वप्नपूर्ती’
3 निसर्गलिपी : माझी निर्सगसंपत्ती
Just Now!
X