प्रल्हाद मोहन मोहिते

पहाटे जाग आली आणि जाणवले की कुठून तरी मधुर असा आवाज ऐकू येतोय. कानोसा घेतला तर तो ओळखीचा आवाज आहे हे जाणवले. कालच त्या पक्ष्याचे दर्शन अगदी फुटांच्या अंतरावरून झाले होते आणि कित्येक मिनिटे त्याला यथेच्छ न्याहाळून झाले होते. परंतु काल स्वारी अत्यंत शांत आणि अबोल होती. इतकी की, या पक्ष्याला बहुतेक बोलता येत नसावे असे वाटले होते. त्याच पक्ष्याचा हा अगदी खर्जातला आवाज. जणू एखाद्या शास्त्रीय गायकाने उच्च स्वरात पल्लेदार ताना मारल्यानंतर, एकदम खालच्या पट्टीत येऊन खर्जातला आवाज काढावा अगदी तसाच आपल्या आगमनाची आपल्या रसिकांना हळुवारपणे जाणीव करून देणारा. लगबगीने अंथरूण दूर सारून उठलो आणि खिडकीत उभा राहून त्याला निरखायला लागलो. तो होता ‘रॅकेट टेल ड्राइंगो’ अंगावर गडद निळ्या रंगाची झाक असलेल्या पंखांचा, डोक्यावर छोटासा तुरा आणि वैशिष्टय़पूर्ण असलेली त्याची शेपटी फारच आकर्षक होती.

आम्ही चार मित्र दरवर्षीप्रमाणे मालवणच्या टूरवर होतो. आमचा आता अगदी परिपाठच झाला होता. दरवर्षी जानेवारी महिन्यात गुलाबी थंडी अनुभवत, प्रिय मित्रांच्या सहवासात आणि संजीव कांबळीच्या बंगलेवजा घरात त्याच्या दिलदारपणाचा आणि अगत्यशीलतेचा आनंद घेत चार ते पाच दिवस आनंदात घालवायचे. हे चार-पाच दिवस या धकाधकीच्या आयुष्यात मनाला पुढील वर्षभर उत्साहित ठेवायला पुरेसे होतात.

संजूच्या मालवणपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या कोळंब येथील बंगलेवजा प्रशस्त घरातील दुसऱ्या दिवसाची पहाट पक्ष्यांच्या कूजनाने सुरू झाली. संजूचे घर दोन मजली आहे. दुसरा मजला पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. दुसऱ्या मजल्यावरील बेडरूमला त्याने आधुनिक खिडक्या बसवलेल्या आहेत व त्यांना अल्युमिनियमची स्लायिडगची काचेची तावदाने लावली आहेत. ही काचेची तावदाने वैशिष्टय़पूर्ण आहेत. या काचेतून आतल्या माणसाला बाहेरचे दिसते; परंतु बाहेरच्याला आतले अजिबात दिसत नाही. उलट त्याला आरशासारखी स्वत:ची प्रतिमा दिसते. या खिडकीच्या पलीकडे प्रचंड मोठी आमराई आहे व मनुष्य वस्ती तशी विरळच असल्याने अनेक पक्षी या खिडकीबाहेर हजेरी लावतात. या खिडकीच्या बाहेरील ग्रिलवर बसून आपली आरशातील प्रतिमा न्याहाळतात. अनेक पक्ष्यांना आपल्या सारखाच पक्षी इथे कसा काय आला आहे आणि आपल्या सारखीच कशी काय हालचाल करू शकतो याचा संभ्रम पडतो. या संभ्रमातून त्यांच्या मोहक अदा आपल्या दृष्टीस पडतात. हे विलोभनीय दृश्य आपल्यापासून फक्त एक फुटाच्या अंतरावर घडत असते.

संजूच्या घराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याने बंगल्याच्या चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचे प्रक्षेपण थेट मुंबईतसुद्धा वायफायद्वारे पाहता येते. त्या कॅमेऱ्यांनी टिपलेल्या प्रतिमा त्याच्या बंगल्यातल्या दिवाणखाण्यात असलेल्या टीव्हीच्या पडद्यावर स्पष्ट दिसतात. म्हणजे आपल्याला वरच्या मजल्यावरील खोलीच्या बाहेर पक्षी आला की नाही याची प्रतीक्षा करावी लागत नाही. इतर कामे करत असताना जर का थोडे लक्ष टीव्हीच्या पडद्यावर ठेवले, तरी पक्षी आल्याची वर्दी मिळते आणि अशी वर्दी मिळाल्यावर पटकन जाऊन वरच्या मजल्या वरील खिडकीच्या समोर उभे राहिलात तर एका फुटावरून तुम्ही त्या पक्ष्यांचे यथेच्छ  निरीक्षण करू शकता.

बऱ्याच वेळेला आपण पक्षी पाहायला पक्षी अभयारण्यात जातो. तिथे एक तर उडताना किंवा उंच झाडावर बसलेला पक्षी आपल्याला पाहता येतो आणि तेसुद्धा अथक धावपळ केल्यानंतर. परंतु इथे आपल्याला एका जागेवर आरामात बसून एका फुटावरून पक्षाच्या मनमोहक हालचाली, त्याच्या नजरेतील भाव, त्याच्या शरीरावरचे डोळ्याचे पारणे फेडणारे रंग, त्याच्या  शरीराची आकर्षक ठेवण डोळ्यात साठवता येते. कारण आपण बंदिस्त असतो आणि हा पक्षी मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात, त्याच्या नैसर्गिक अवस्थेमध्ये असतो. हे  संजूच्या घराचे वैशिष्टय़ मला मोहवून टाकते. इथेच मी सुतार, कोतवाल, बुलबुल, मोठय़ा चोचीचा हॉर्नबिल, अनेक प्रकारचे राघू, मना, सोनेरी पंखांचा भारद्वाज.. अनुभवले हो अक्षरश: अनुभवले.

रानावनात हिंडताना किंवा शेतात तलावाशेजारी फिरताना आपल्याला अनेक प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात. त्यातील अनेक आवाज अगदी मोहवून टाकतात; परंतु आपल्याला कळत नाही की हा आवाज कोणाचा, कुठून आवाज येतो आहे. बऱ्याच वेळेला आपण आवाज जिकडून येतो तिकडे शोधण्याचा प्रयत्न करतो; परंतु आपल्याला त्या आवाजाच्या मालकाचा पत्ताच सापडत नाही. असे का होते, कारण काही पक्ष्यांना देवाने एक देणगी दिलेली असते- ती म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या विरुद्ध दिशेने आवाज घुमवत काढणे.

सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेऊन दिवाणखान्यात आलो तर टीव्हीच्या पडद्यावर एका पक्ष्याची प्रतिमा उमटलेली होती. तसाच तडक वरच्या मजल्यावरील खोलीत गेलो तर ग्रिलवर बसलेला एक पक्षी माझ्याकडेच पाहत होता. हा पक्षी चिमणीपेक्षा जरा मोठा आणि राखाडी व हिरव्या रंगाचे बेमालूम मिश्रण असलेला होता. प्रथमदर्शनी तो मोहक वाटला नाही. राखाडी रंगाची मातकट झाक असल्याने असेल, तसेच शरीरानेही जरासा ढब्बूसा वाटला. त्याचे यथेच्छ निरीक्षण करत असताना कानाला पर्वणी वाटावी असा आवाज त्याने काढला.  काय तो आवाज आणि जाणवले की, हा आवाज ऐकलाय, सतत ऐकलाय! कुठे बरं? शांत, कातरवेळी आमच्या गावच्या शेतातल्या तळ्याशेजारी, की त्या टेकडीवरच्या रमणीय छोटय़ाशा मंदिराच्या परिसरात. अनेक वेळा हा आवाज ऐकलाय. आता माझ्यापासून अगदी फुटांच्या अंतरावर माझ्याकडे बघत तो तोंडातून नव्हे तर चोचीच्या आणि मानेच्या मधल्या भागातून आवाज काढत होता. मी भान हरपून पाहत होतो. तो होता कॉपरस्मिथ बाब्रेट म्हणजे आपला तांबट पक्षी. आता कधीही आणि कुठेही त्याचा विशिष्ट आवाज ऐकला की आपल्या आजूबाजूला तांबट वावरतोय याची जाणीव होते.

या सर्व पक्षीनिरीक्षणात सर्वात जास्त आनंद दिला तो हॉर्नबिल याने. दिवाणखान्यातल्या टीव्हीचा पडदा पूर्ण व्यापून टाकणारा असा कुठलासा पक्षी अवतीर्ण झाला आहे हे दिसल्याबरोबर वरच्या खोलीत मी धाव घेतली तर काय, हॉर्नबिल पक्ष्याची जोडगोळीच हजर होती. पिवळ्या गडद रंगाची महाकाय बाकदार चोच ही त्याच्या एकंदरीतच सौंदर्यात भर टाकत होती.

आतापर्यंत संजूचे घर म्हणजे आम्हा मुंबईत राहणाऱ्या मित्रांसाठी चार-पाच दिवस मित्रांच्या सान्निध्यात आराम करण्याचे एक ठिकाण होते. परंतु त्याने केलेल्या या नूतनीकरणानंतर विविध पक्ष्यांच्या होणाऱ्या या दर्शनामुळे त्यात एक अलौकिक भर पडली आहे. यामुळेच की काय, आम्हा सर्व मित्रांचे जानेवारी महिन्याकडे अधीरतेने लक्ष लागून राहिलेले असते.

pramoh26@yahoo.com