अनेक कथा-पुराणांतून पार्वतीचं तेजस्वी उग्र रूप,  तिची तपस्या, तिचं देवतापण ठळकपणे सामोरं येतं. पण प्रवाहाखालून एक अंतस्थ प्रवाह वाहत असावा तसं तिचं कुटुंबातील गृहिणी हे घरघुती रूपही जरा पलीकडे नजर रोखली तर दिसतं. आणि त्यातून उलगडत जातं बिनभिंतींचं घरकुल पार्वतीचं! नवरात्रीनिमित्त तिच्या या अनोख्या रूपाविषयी..
बिनभिंतींचं घर! कशी वाटते कल्पना? पण कैलास पर्वतावर आहे असं एक प्रशस्त, विस्तीर्ण घर! ज्याला भिंती नाहीत आणि म्हणूनच दारं-खिडक्याही नाहीत. बसायला, विश्रांतीला आहेत मोठमोठे प्रशस्त काळेभोर पाषाण! पोहायला खळाळत वाहणाऱ्या प्रत्यक्ष नद्या, नहायला धबधबे. लता-वेलींचे पडदे, उंच उंच देवदार वृक्षांची देखणी सजावट, फुलदाणी म्हणून झुलणारे फुलांचे घोसच्या घोस आणि पायाखाली बदलत्या ऋतूंनुसार कधी हिरवळीचा, कधी पांढऱ्याशुभ्र बर्फचुऱ्याचा, तर कधी रंगीबेरंगी फुलांचा गालिचा!
अशा या अनोख्या घरात राहतं एक चौकोनी कुटुंब. शंकर-पार्वती आणि त्यांची दोन लाडकी मुलं गणेश-कार्तिकेय.
कुमारी असताना पानंसुद्धा न खाता तपश्चर्या करणारी अपर्णा, माहेरी आपल्या पतीची मानहानी होताच यज्ञकुंडात उडी घेणारी, बाणासुर लग्नाची मागणी घालत असता मनाने शंकराला वरले आहे म्हणून त्याच्याशी युद्ध करणारी.. अशा अनेक प्रसंगांतून पार्वतीची एकनिष्ठा, दृढनिश्चय, जिद्द, स्वाभिमान असे गुण कळतात. त्यातूनच ‘काली’, ‘दुर्गा’, ‘भवानी’, ‘चण्डिका’ अशी रौद्र, तर ‘अंबा’, ‘अन्नपूर्णा’, गौरी, पार्वती अशी सौम्य ऋजू रूपाची विविधता आपल्या मनीमानसी रुजली आहेत.
अशी ही आदिशक्ती शंकराशी पूर्णत्वाने एकरूप झाली आहे. ही शक्ती म्हणजे त्याचे प्राणतत्त्वच! म्हणूनच म्हणतात, ‘शिव’मधील शक्तीचा निर्देश असलेला ‘इ’ काढून टाकला तर तो ‘शव’ म्हणजे प्राणहीन होतो. अद्वैताच्या संकल्पनेची ही एकरूपता ‘अर्धनारी-नटेश्वर’ या मूर्तीतून दिसते.
स्त्रीने एखाद्या पुरुषी गुणाचा स्वीकार केला की तिचं फार कौतुक होतं, पण तिचे म्हणून जे स्त्रीत्वाचे चिवटपणा, ऋजुता, चिकाटी असे गुण आहेत, त्यात परमोच्चपण दाखवलं तरी ते गृहीतच धरले जातात. त्यामुळे पार्वतीच्या रौद्र रूपाचे दर्शन घडविणाऱ्या अनेक कथा-कहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण या बिनभिंतींच्या घरात वावरणाऱ्या जगतजननीचे फक्त आई म्हणून, शंकराची सहधर्मचारिणी म्हणून, प्रणयिनी, गृहिणी म्हणून असलेले रूपही मोठे मनोहारी आहे. खूप तपश्चर्यासायास करून पार्वतीने ज्या भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली, ते शिव-शक्ती परस्परांवर इतके अनुरक्त आहेत की, केवळ जवळ असण्याने, दिसण्याने त्यांचा शृंगार फुलू लागतो. मग आपला रोजचा परिसर सोडून ते एकांत मिळावा म्हणून कधी गंधमादन पर्वत, कधी अमरनाथ, तर कधी चंदनवनात, तर कधी स्फटिकशुभ्र कैलास पर्वताच्या अनोख्या गुहांमध्ये जातात आणि रममाण होतात. तिथे मानसरोवराहून आणि देवदार वृक्षांमधून येणारा सुगंधित वारा आणि डोळ्यांना सुखवणारा प्रकाश देणाऱ्या काही प्रकाशदायी वनस्पती यांनी त्यांचा प्रणय अधिकच फुलवला. या घराची ही प्रकाशयोजना अगदी खास! सारिपाट खेळणं हा त्यांचा आनंदविषय! पण एकदा ते पैज लावून खेळतात. शंकराची एकेक वस्तू पार्वती जिंकत जाते.
‘‘भोळ्या शंकराचा त्येंच्या खेळाच्या छंदामंदी
गिरिजा नारीनं त्येचा जिंकून नेला नंदी’’
नंदीबरोबरच त्याचा चंद्र, सर्प, व्याघ्रचर्मही गेल्यावर शंकर रुसून घोर वनात निघून जातात. मग अत्यंत देखण्या भिल्लिणीचे रूप धारण करून पार्वती नृत्य करून चतुराईने त्याला पुन्हा आपलंसं करते, पण हा रुसण्याचा मक्ता फक्त शंकराचा नाही. पार्वतीही रुसते, क्रोधित होते. इतर देव त्यांच्या समस्या सांगून त्यांच्या प्रणयात व्यत्यय आणतात, त्यामुळे तिला मीलनसुख मिळत नाही. पोटी संतती नाही, त्यामुळे ती व्यथित होते आणि मग शंकर आर्जव करू लागतात, ‘‘प्रिये पार्वती, तू माझे सौभाग्य आहेस. अजाणता माझ्याकडून अपराध झाला तर त्यात माझा दोष काय?’’ अशी परोपरीनं मनधरणी करतात. प्रणयामुळे विस्कटलेला तिचा साज-शृंगार ते परत नीट करू लागतात. तिचे मोकळे केस प्राजक्ताच्या फुलांच्या गजऱ्याने गुंफतात, काजळ रेखून कस्तुरी चंदनाचा गालावर लेप लावतात. कानात कर्णफुलं, गळ्यात मोत्यांची माळ घालतात आणि तिच्यासमोर दर्पण धरतात. इतकं केल्यावर पार्वती खुशालते. असे त्यांचे रुसवेफुगवे आणि प्रेम!    
अनेकदा शंकराच्या साधेभोळेपणामुळे तो असुरांना वर देतो आणि त्या वराने असुर उन्मुक्त होतात. अशा वेळी जगदंबा पुढे सरसावते. त्यांचा नाश करते. प्रत्येक ठिकाणी दोघांचं अभिन्नत्व, प्रेम, बरोबरीचं नातं छान फुलताना दिसतं. त्यात केवळ समर्पण नसून वादविवाद, स्वतंत्र विचार, व्यक्तिमत्त्व दिसतं. पार्वतीच्या महेश्वरी या रूपात शंकर, ‘‘हे विश्व तू तुझ्या आधिपत्याखाली ठेव,’’ असे सांगतात. इथे दोघांनीही आपला अहं विलीन करून टाकल्याचे दिसते. एका लोकगीतात शंकराने ज्या शेतकऱ्यावर कृपा केली तो समृद्धी येताच शंकराला ‘जोगडय़ा’ म्हणून मारायला उठतो तेव्हा पार्वती रागाने बेभान होते.
‘‘पार्वतीला आला राग। बनली शिपाई सरदार।।
नंदीचा तो करून घोडा। चाबूक ओढले दोन-चार।।’’
असं वर्णन येतं. तिला इतरांचा अपार कळवळाही येतो. दोघे नेहमी एकत्रच आकाशात     संचार करीत असतात. आकाश म्हणजे अंगण असेल, तर पृथ्वी त्यांचं परसदार! अशा वेळी तिथे एखादी दु:खीकष्टी बाई दिसली की, दोघेही तिचे दु:ख नाहीसे करायला धावतात. असे फिरायला जाणारे जोडपे हेही त्यांचेच एक वैशिष्टय़!
पार्वती तितकीच जिज्ञासूही आहे. हिमालयाकडे नलराजाची कथा, चंद्रांगद आदी राजांचे इतिहास, पार्थिव पूजेचे विधी आणि महत्त्व हे ती विचारून घेते. ‘योगज्ञाना’सारखा अवघड विषय शिकण्यासाठी शंकरच तिचे गुरू झाले आहेत. दोघेही सर्वापासून दूर समुद्राच्या मध्यभागी जातात.
‘‘क्षीरसिंधू परिसरी। शक्तीच्या कर्णकुहरी।
नेणो कैं श्री त्रिपुरारी। सांगितले जें।।
आणि ती ज्ञान ग्रहण करते. तिची ही ज्ञानलालसा, वेगवेगळ्या विषयांची आवड लोकगीतांमधूनही व्यक्त होते.
‘‘शंकरासी पुसे पार्वती। देवा, मेघ कोठे असती।।
कोण कैसे वर्तती। तें मजप्रती सांगिजे।।’’
पती-पत्नी नात्याच्या सर्व रंगच्छटा, अनेकानेक लोभसवाणे पैलू, त्यांचा शृंगार, खेळकरपणा, एकमेकांबद्दलचा आदरभाव, काव्य-शास्त्र विनोदात रमणं, आपल्या सहजीवनातून फुलत जाणं, समृद्ध होत जाणं अतीव सुंदर आहे.
तिचे ‘आई’ हे रूपसुद्धा अगदी मानवी वाटतं. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून ती व्रत करते, वसा घेते. पुत्रजन्मानंतर खूप आनंदित होते, पण गणेश आपल्याला पुढे त्रासदायक ठरेल म्हणून अनेक असुर विविध उपायांनी त्याला तो लहान असतानाच मारायचा प्रयत्न करतात. आणि जगत्जननी पार्वती एखाद्या सर्वसामान्य संसारी आईसारखी गौतम ऋषींना साकडे घालते. ‘‘काय करू हो इथेसुद्धा हे दैत्य बाल गणेशाला त्रास देतात, काही उपाय तरी सांगा,’’ असं विनवते आणि त्यांनी सांगितलेली व्रते मुलांच्या सौख्यासाठी करते. मुलं विजयी होताच त्यांच्या पराक्रमाचे तिला इतके कौतुक वाटते की, तिला आनंदाने रडूच येतं.
त्यांची दोन्ही मुलं त्या प्रशस्त अंगणात चेंडू-चेंडू खेळतात, तर कधी वाळूची वा बर्फाची शिवलिंगं. इतर पशू-पक्षी मानवाकृती बनवतात. कधी शंकराचे गण नृत्य करतात, त्याचा आनंद हे कुटुंब मनापासून घेते.
पण कधी ही दोघं मुलं खटय़ाळपणाने भांडतात, वाक्चातुर्याने एकमेकांवर कुरघोडी करतात.
‘‘शुंडेसी धरूनियां खाले। पाडू काय या वेळे।।
माते याचे नासिक विशाल आगळे। का हो ऐसे केलें तुवां।।’’
मग गणेश, ‘‘बघ ना गं आई, हा माझी सोंड विती-वितीने मोजतोय,’’ असे म्हणतो, तर कार्तिकेय ‘‘आई, याने आधी माझे १२ डोळे आणि ६ मुखे मोजली आणि मग मला चिडवलं,’’ असे म्हणतो.
मोठय़ा पाषाण खंडावर बसून शंकर-पार्वती कौतुकाने, तृप्त नजरेने हे भांडण बघत असतात. मग शंकरही गणेशाची बाजू घेऊन मिस्कीलपणे पार्वतीची चेष्टा करतात.
‘‘काय म्हणतो हा गजवदन। ऐसा का प्रसवलीस नंदन।।’’
‘‘यावरी अपर्णा सुहास्य वदन। प्रति उत्तर देतसे।।
म्हणे हा तुम्हासारिखा झाला नंदन। तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण।।
ऐकोनि हासला त्रिनयन। पुत्र पाहोनी सुखावे।।’’
पार्वतीही शंकराला असा रेशमी चिमटा काढते.
घराला भिंती असोत वा नसोत, घर बनतं त्यातल्या माणसांनी, त्यांच्यातल्या परस्पर प्रेमभावांनी. असं हे संसारचित्र तर घराघरांत आढळणारं. हे सुरेख पूर्ण कुटुंबचित्र बघायला भिंतीला कान लावायला नकोत की खिडकीला डोळे लावायला नकोत.   
vasturang@expessindia.com