News Flash

कुंडीतील भाजी लागवड

कुंडीत लावण्यायोग्य काही फुलझाडे व शोभेच्या झाडांबद्दल माहिती घेतली आहे.

आतापर्यंतच्या लेखांतून आपण कुंडीत लावण्यायोग्य काही फुलझाडे व शोभेच्या झाडांबद्दल माहिती घेतली आहे. या झाडांबरोबरच कुंडीत अनेक प्रकारच्या भाज्यादेखील लावता येऊ  शकतात. त्याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊ या.

कुंडीमध्ये भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची, वेलवर्गीय भाज्या (काकडी, कारले, दोडके, इत्यादी) तसेच माठ, पालक यासारख्या पालेभाज्या अशा अनेक प्रकारच्या भाज्या लावता येऊ  शकतात. भाज्या लावण्यासाठी जागेची योग्य निवड करणे गरजेचे असते. सर्व प्रकारच्या भाज्यांना कडक सूर्यप्रकाशाची गरज असते. ज्या ठिकाणी दिवसाचे किमान ३ ते ४ तास कडक सूर्यप्रकाश मिळू शकेल अशा ठिकाणी भाज्यांच्या कुंडय़ा ठेवाव्यात.

कुंडय़ांची निवड : सर्वसामान्यपणे भाज्यांसाठी मध्यम ते मोठय़ा आकाराच्या कुंडय़ा किंवा ट्रफ (Trough) (आयत आकाराची कुंडी) ची निवड करावी. भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची / भोपळी मिरची, यासारख्या झुडूपवर्गीय भाज्या कुंडीत लावाव्यात. त्याचबरोबर कोबी व नवलकोल देखील कुंडीत लावता येतात. पालेभाज्या तसेच वेलवर्गीय भाज्यांची लागवड शक्यतो ट्रफमध्ये करावी. ट्रफमध्ये पालेभाजीचे बियाणे ओळीत पेरता येते. हे बियाणे ओळीत पेरायला जमले नाही तर संपूर्ण कुंडीत पसरूनही पेरता येते. एकदा पेरल्यानंतर त्याची उगवण बघून बी कमी पडले आहे की जास्त ते आपल्याला स्वानुभवावरूनच शिकता येते आणि पुढील पेरणीचे नियोजनदेखील करता येते. याशिवाय पसरट आकाराच्या कुंडीतही पालेभाजीची लागवड करता येते. वेलवर्गीय भाज्यांना वाढण्यासाठी ट्रफच्या आडव्या आकाराचा फायदा होतो. तसेच या वेलींना द्यावा लागणाराआधारही ट्रफमध्ये नीट लावता येतो.

कुंडय़ांची निवड केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या भाज्या आपल्याला लावायच्या आहेत त्याची यादी तयार करून घ्यावी व त्याचे बियाणे आणावे. वांगी, टोमॅटो, मिरची यासारख्या झुडूपवर्गीय भाज्यांच्या बाबतीत प्रत्येक कुंडीत योग्य अंतरावर दोन रोपे लावावीत. अशा झुडूपवर्गीय भाज्यांची रोपे आधी तयार करावी लागतात. एका कुंडीत किंवा ट्रफमध्ये बियाणे पेरून रोपे तयार करावीत. रोपांच्या वाढीप्रमाणे १५ ते २० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड दुसऱ्या कुंडीत करावी. पुनर्लागवड करताना रोपाला इजा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी. कोबीचे एकच रोप कुंडीत लावावे. भेंडीचे बी कुंडीत पेरता येते. त्याची रोपे तयार करून पुनर्लागवड करायची आवश्यकता नसते.

पालेभाज्यांचे बियाणे ओळीत पेरावे. पालकचे बी थोडे मोठे असते, पण माठाचे बी खूप बारीक असते. त्यामुळे माठाचे बी पेरताना एका जागी जास्त पडण्याची शक्यता असते. तसेच हे बी काळपट रंगाचे असल्यामुळे मातीत पेरलेले बी पटकन नीट दिसतही नाही. त्यामुळे पेरणी करताना लक्षपूर्वक करावी. नाहीतर माठाची रोपे खूप दाटीवाटीने उगवण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या रोपांना वाढायला पुरेशी जागा मिळत नाही व त्यांची वाढ नीट होत नाही. पालकचे बी थोडे खोल तर माठाचे बी अगदी थोडेसे खोल किंवा वर वरच पेरावे. जास्त खोल पेरले गेलेले बी उगवण्याची शक्यता कमी असते.

कुंडी किंवा ट्रफ भरताना मातीत कोकोपिट व सेंद्रिय खत भरपूर प्रमाणात वापरावे. बी पेरल्यानंतर उगवण होईपर्यंत थोडे कमी पाणी घालावे. उगवण झाल्यानंतर मातीतील ओलावा बघून पाणी घालावे. टोमॅटोची रोपे थोडी वाढल्यानंतर त्यांना आधार द्यावा लागतो. कारण ही झाडे आपल्या वजनाने वाकताना दिसतात. कुंडीत एखादी काठी खोचून रोपाला सुती दोऱ्याच्या साहाय्याने काठीबरोबर सैलसर गाठ मारून बांधून घ्यावे. त्याचप्रमाणे कधी कधी मिरचीच्या रोपांना ती लहान असताना आधार द्यावा लागतो.

वेलवर्गीय भाज्यांना चार काठय़ा लावून या काठय़ांना आडव्या काठय़ा बांधाव्यात. तसेच उभ्या-आडव्या दोऱ्या बांधून घ्याव्यात, जेणेकरून वेल सरळ वाढल्यानंतर या उभ्या- आडव्या दोऱ्यांवर नीट पसरू शकतील. या वेलांसाठीच्या मुख्य चार काठय़ांची उंची किमान ३ ते ४ फूट असावी. कारण या वेलांना लागणारी फळे (म्हणजेच काकडी, कारले, इत्यादी) ही खाली लटकतात. ट्रफच्या आकारानुसार ट्रफमध्ये वेलाची एक किंवा दोन रोपे योग्य अंतरावर लावावीत.

पालेभाज्या तसेच टोमॅटो-वांगी मिरची यासारख्या झुडूपवर्गीय भाज्या वर्षभर लावता येऊ  शकतात. पण वेलवर्गीय भाज्या पावसाळ्यात जास्त चांगल्या वाढतात. सर्व भाज्यांचे पीक हे साधारणपणे १.५ ते २.५ महिन्यांचे असते. पालेभाजी मात्र पानांची वाढ बघून काढता येते.

अशा प्रकारे जर आपल्या घरातील एखाद्या ठिकाणी कडक सूर्यप्रकाश येत असेल तर आपण थोडय़ा प्रमाणात का होईना, पण स्वत:साठी काहीतरी प्रकारची भाजी पिकवू शकतो. कदाचित पालेभाज्यांचा पानांचा आकार / उंची कमी असू शकेल किंवा वेलींवरील फळांचा व इतर फळभाज्यांच्या फळांचा आकार लहान असेल, पण पेरणीपासून काढणीपर्यंतची ही संपूर्ण प्रक्रियाच आपल्याला एक वेगळा आनंद व समाधान देऊन जाते.

जिल्पा निजसुरे

jilpa@krishivarada.in

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2017 1:54 am

Web Title: vegetable farming in house
Next Stories
1 दादरायण अर्थात जिनेपुराण
2 बडोद्यातला गणेशोत्सव
3 रेरा आणि कर्ज
Just Now!
X