17 November 2019

News Flash

उद्योगाचे घरी.. : वाहन आणि ऊर्जा क्षेत्रातला आदर्श वस्तुपाठ

१९८८ साली महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या पर्चेस विभागात काम करत असताना आमच्या काही सप्लायर्सनी मला स्वतंत्र व्यवसाय करायची कल्पना सुचवली.

(संग्रहित छायाचित्र)

मनोज अणावकर  

एकीकडे समाजात बेरोजगारी वाढते आहे अशी ओरड ऐकू येते. मात्र कौटुंबिक, सामाजिक किंवा अगदी राजकीय पातळीवरही तरुणांना नोकऱ्याच मिळायला हव्यात असा विरोधाभासी आग्रह धरणारे, स्वयंरोजगारात वाढ व्हायला हवी, अशा मागणीचा म्हणावा तसा रेटा लावताना दिसत नाहीत. लग्नाचा विचार करणाऱ्या उपवर मुलाला नोकरी नसेल, आणि त्याचा स्वत:चा उद्योग किंवा व्यवसाय असेल, तर अशा मुलाला तो ‘सेटल्ड’ आहे, असं मानलं जात नाही. मात्र नोकरी करणारी व्यक्ती ही स्वत:चाच रोजगार मिळवते, तर समोर येणाऱ्या संकटांवर मात करत, अनेक अडचणींना सामोरं जात हिमतीने उद्योग उभा करणारे, विशेषत: पहिल्या पिढीतले उद्योजक हे कौतुकाला पात्र असतात. कारण स्वत:बरोबरच ते इतरांसाठीही रोजगारनिर्मिती करत असतात म्हणून त्यांना कमी लेखलं जाऊ नये. या सदराच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे कोणत्याही देशाच्या विकासात आणि प्रगतीत त्या त्या देशांमधल्या विविध क्षेत्रांतल्या लहान-मोठय़ा उद्योगांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. तेव्हा उद्योजक व्हायची मनीषा बाळगणाऱ्या किंवा नवउद्योजक असलेल्या अशा तरुणांना मार्गदर्शक ठरू शकेल, अशा वाहन आणि ऊर्जा क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या एका कारखान्याच्या उभारणी, अंतर्गत रचना आणि कार्यपद्धतीबाबत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. वाहन आणि ऊर्जा ही दोन्ही क्षेत्रं देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण इतर उद्योगांच्या वाढीत या क्षेत्रांचा सिंहाचा वाटा आहे. कोणत्याही उद्योगासाठी ऊर्जेची जितकी नितांत आवश्यकता असते, तितकीच आवश्यकता ही उत्पादन क्षेत्रात कच्चा माल कारखान्यांपर्यंत आणि कारखान्यात तयार झालेला माल बाजारपेठांपर्यंत पोहोचवणाऱ्या वाहनांचीही असते. केवळ मालवाहू वाहनंच नाहीत, तर प्रवासी वाहतूक करणारी वाहनं किंवा अगदी आजच्या काळात सोयीसाठी विकत घेतल्या जाणाऱ्या आणि वैयक्तिक आर्थिक प्रगतीचा मापदंड समजल्या जाणाऱ्या खाजगी वाहनांचाही त्यात वाटा आहे. औष्णिक, जल आणि अणुऊर्जेबरोबरच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रातली गुंतवणूक २०२२ सालापर्यंत सुमारे ११ लाख कोटी रुपयांवर, तर २०३० सालापर्यंत ‘शेअर्ड मोबिलिटी’ अर्थात, अनेकांकडून एका वाहनाचा भाडेतत्त्वावर वापर करून होणाऱ्या वाहन उद्योगात भारत जगात आघाडीवर असेल. तसंच विजेवर चालणाऱ्या आणि स्वयंचलित वाहनांच्या क्षेत्रात अनेक संधी असतील, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं स्थापन केलेल्या आणि वाणिज्यिक माहिती गोळा करणाऱ्या एका ट्रस्टनं म्हटलं आहे. अशा या महत्त्वाच्या क्षेत्रात नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या ‘स्लाइडवेल मेलिअर’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद जांबोटकर यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून त्यांच्या या कारखान्याबद्दल अधिक जाणून घेऊ या..

या क्षेत्रात कारखाना सुरू करायचा, असं केव्हा आणि कसं ठरवलं?

सुरतच्या सरदार वल्लभभाई कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमधून १९७९ साली मेकॅनिकल इंजिनीअिरगची पदवी घेऊन पुन्हा नाशिकला परतल्यानंतर पाच-सहा वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला. १९८८ साली महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या पर्चेस विभागात काम करत असताना आमच्या काही सप्लायर्सनी मला स्वतंत्र व्यवसाय करायची कल्पना सुचवली. त्यानंतर माझे एक मित्र संदीप लेले यांच्यासोबत मशिनिंगचा व्यवसाय करण्यासाठी एक लेथ मशीन आणि एक मिलिंग मशीन भाडय़ाने विकत घेतलं. नाशिकलाच अंबडमध्ये एक शेड भाडय़ाने घेतली आणि एका मशीन ऑपरेटरला या कामासाठी नेमून व्यवसाय सुरू केला. साधारणपणे तीन वर्ष अशा प्रकारे काम करून व्यवसाय कसा करावा याविषयी अंदाज आल्यानंतर महिद्र कंपनीच्या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ व्यवसायात शिरायचं ठरवलं. सुरुवातीला घरच्यांचा काहीसा विरोध होता. मात्र, माझे सासरे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मग आई-वडील आणि पत्नी नीता हिचाही पाठिंबा मिळाला. नंतर वाहनांच्या स्लायिडग खिडक्या तयार करायची संधी दिसू लागली. तेव्हा मग भागीदारीतल्या या व्यवसायातून बाहेर पडून वाहनांच्या खिडक्यांचा हा नवा व्यवसाय करायचं ठरवलं. महिद्र कंपनीशी असलेल्या नात्यामुळे मला त्यांच्याचकडून महिद्र कंपनीच्या बोलेरो तसंच इतर गाडय़ांसाठी स्लायिडग खिडक्या तयार करायची ऑर्डर मिळाली. माझ्या स्वतंत्रपणे सुरू केलेल्या कंपनीचं नाव त्यामुळेच ‘स्लाइडवेल’ असं ठेवलं. ही प्रोप्रायटरीशीप कन्सर्न होती. त्यानंतर १९९५ मध्ये बोलेरो, पजेरोसारख्या गाडय़ांसाठी फूटरेस्टची आवश्यकता होती. त्यामुळे त्याच्या उत्पादनाला सुरुवात केली. पुढे २००० साली हर्क्युलस या नावाने सायकली तयार करणाऱ्या मुरुगप्पा ग्रुपने नाशिकमध्ये प्लँट सुरू करायचं ठरवलं. त्यांना सायकलींच्या फ्रेम्स तयार करून हव्या होत्या. त्यांचे एक अधिकारी हे महिद्र कंपनीच्या एका अधिकाऱ्याचे मित्र होते. त्या महिद्रच्या अधिकाऱ्याने माझं नाव त्यांना सुचवलं आणि एका नव्या उत्पादनाला सुरुवात झाली. त्यासाठी नवी प्रोप्रायटरी सुरू करून आणखी एक फॅक्टरी उभी केली. मात्र या कंपनीत सुरुवातीचा काही काळ तोटा सहन करावा लागला. तशातच काही काळ कामगारांच्या समस्यांनाही सामोरं जावं लागलं. यानिमित्ताने कामगार कायद्यांचा अभ्यास केला. तशातच बऱ्याचदा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॉस्टिंगसारख्या वित्तीय बाबींबद्दल तपशीलवार माहिती नसते. त्यामुळे व्यवसायातल्या तोटय़ावर मात करण्यासाठी कॉस्ट अकाऊंटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सायकल तयार करणाऱ्या मूळ कंपनीला प्रायिझगमध्ये बदल करायची विनंती केली. त्यामुळे माझ्या कंपनीची बॅलन्सशीट सुधारता आली आणि कंपनीची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. मग मिहद्राने पुण्यात चाकण इथं प्लँट सुरू करायचा ठरवल्यानंतर त्या प्लँटसाठी पुण्यात खिडक्या आणि इतर भाग तयार करण्यासाठी माझ्या कंपनीचं चाकणमध्ये आणखी एक युनिट सुरू केलं. नंतर अशीच एकदा वायर्ड पॅनेल्स तयार करायची संधी क्रॉप्टन ग्रीव्हज कंपनीकडून आली. त्या संधीचाही स्वीकार केला आणि ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकलं. आज या पॅनेल्ससोबतच स्वीच गिअर्स तसंच इतर उत्पादनं आम्ही तयार करतो. या कंपनीच्या विस्ताराच्या वेळी मला बँकेनं कर्ज देताना कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करायची अट घातली आणि त्यातूनच आजची स्लाइडवेल मेलिअर ही कंपनी अस्तित्वात आली. आज ऑटोमोबाइल क्षेत्रात महिद्र अ‍ॅण्ड महिद्रसोबतच, महिद्र नविस्टर, इंटरनॅशनल कार्स अ‍ॅण्ड मोटर्स अशा इतर कंपन्यांना, तर ऊर्जा क्षेत्रात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, सिमेन्स, एबीबी, क्रॉप्टन ग्रीव्हज अशा नामांकित कंपन्यांना आम्ही आमची उत्पादनं पुरवतो. सध्या कंपनीच्या कारभारात माझी पत्नी नीता जांबोटकर हिची जशी संचालक म्हणून मदत होत आहे, तशीच मला पुढल्या पिढीचीही साथ मिळत आहे. माझी मुलगी वल्लरी प्रधान आणि जावई अंबर प्रधान यांचीही मला मोलाची साथ लाभते आहे.

तुमच्या कंपनीत कोणते कोणते विविध विभाग आहेत आणि त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यानुसार जागेची रचना आणि व्यवस्थापन कसं केलं आहे?

आमच्या कंपनीत कॉर्पोरेट एचआर, फायनान्स, स्टट्रेजिक सोस्रेस, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी आणि ऑपरेशन्स असे एकूण सहा विभाग आहेत. एचआरचे काम फक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या सुट्टय़ा आणि कामाचे नियम यापुरतंच मर्यादित नाही, तर प्रत्येक कर्मचाऱ्यापाशी त्याचं काम पूर्ण कार्यक्षमतेनं होण्यासाठी कोणती कौशल्यं आहेत, ती पुरेशी आहेत की नाहीत, जर नसतील तर त्या कर्मचाऱ्याला कौशल्यपूर्णता येण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे, ते शोधून काढून त्यानुसार वर्षभराचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं, यासारख्या जबाबदाऱ्याही एचआर विभागाला पार पाडाव्या लागतात. या प्रशिक्षणासाठी आमच्याकडे कंपनीच्या ऑफिसच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर ट्रेनिंग हॉल आहे. (छायाचित्र १) त्याच्या शेजारीच कर्मचाऱ्यांसाठी एक आणि कामगारांसाठी एक असे दोन डायिनग हॉल आहेत. (छायाचित्र २) तिथून आत ऑफिस एरिआत प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच उजव्या बाजूला एक कॉन्फरन्स रूम आहे. त्याच्या पुढे तसंच संपूर्ण डाव्या बाजूला कर्मचाऱ्यांसाठी क्युबिकल्स आहेत. (छायाचित्र ३) त्यात मोबिलिटी म्हणजे ऑटोमोबाइल युनिटचे याआधी सांगितलेल्या वेगवेगळ्या विभागांचे कर्मचारी बसतात. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल घेताना व्हेंडर्सची निवड स्ट्रॅटेजिकली कशी करायची वगैरे विषयांबाबतची धोरणं ठरवायचं काम हा विभाग करतो. उत्पादनांच्या तसंच एकूणच मार्केटिंगची जबाबदारी हा विभाग सांभाळतो. नवनवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया याबाबतची माहिती गोळा करणं किंवा थ्री डायमेन्शनल मॉडेलिंग करणं, आमच्या ग्राहकांना दाखवण्यासाठी सँपल्स तयार करणं, फॅब्रिकेशन करणं यासारख्या गोष्टींची जबाबदारी ही टेक्नॉलॉजी विभागाची आहे, तर प्रत्यक्ष उत्पादन हे ऑपरेशन्स विभागाच्या अखत्यारित येतं. हे सगळं सुविहित चालण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या फायनान्स विभाग पार पाडतो. हे सगळे एकमेकांशी जोडले गेले असल्यामुळे या विभागातल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था पहिल्या मजल्यावरच्या क्युबिकल्समध्ये केली आहे. मात्र, मोबिलिटी आणि पॉवर सेक्टर हे दोन विभाग स्वतंत्रपणे काम करत असल्यामुळे पॉवर युनिटच्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था पहिल्या मजल्यावरच पण स्वतंत्रपणे शेजारच्या भागात केली आहे. आम्हाला कच्चा माल पुरवणारे सप्लायर्सचे प्रतिनिधी आले तर त्यांना भेटण्यासाठी वर पहिल्या मजल्यावर यायची गरज नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन मीटिंगरूम्सची व्यवस्था खाली तळ मजल्यावर वेटिंग एरिआच्या शेजारी रिसेप्शन काऊंटरसमोर केली आहे. कंपनीच्या ऑफिसच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला दोन स्वतंत्र भागांमध्ये मोबिलिटी आणि पॉवर क्षेत्रातली उत्पादनं तयार करणारे प्लँट्स आहेत. (छायाचित्र ४)  तुम्ही तुमच्या कर्मचारी आणि कामगारांसाठी कोणते सोशल इव्हेंट्स करता? दिवाळी आणि दसऱ्यादरम्यान आम्ही गेटटूगेदर करतो. त्याला आम्ही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही बोलावतो. त्यामुळे त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात. त्यांच्या घरच्यांच्या सर्वाशी ओळखी होतात. त्यातून सर्वामध्ये एक चांगला भावनिक बंध तयार व्हायला मदत होते. २२ डिसेंबरला आम्ही कंपनीचा स्थापना दिवस साजरा करतो. त्याही वेळी विविध कार्यक्रम आयोजित करतो. याशिवाय मानसिकदृष्टय़ा दिव्यांग असलेल्या मुली आणि महिलांसाठी निवासी व्यवस्था असलेल्या घरकुल परिवार संस्थेला आम्ही मदत करतो. त्यांना लागणाऱ्या रोजच्या भाज्या आणि इतर वस्तू विकत आणून द्यायचं काम आमच्या कंपनीतर्फे केलं जातं. त्याकरिता आमच्या कर्मचाऱ्यांचे आम्ही चार चार जणांचे गट तयार केले आहेत. ते हे काम करतात. त्यांना कधी कधी त्यांच्या घरच्यांचीही या कामात मदत मिळते. यामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाण्याबरोबरच समाजातल्या घटकांसाठी काही तरी केल्याचं समाधान हे केवळ कंपनीलाच मिळत नाही, तर अशा चांगल्या कार्यात सहभागी होत असल्याचं समाधान कर्मचाऱ्यांनाही मिळतं.

कंपनीच्या ऑफिसमध्ये रंगांची निवड आणि दिव्याचं व्यवस्थापन कसं केलं?

याची संपूर्ण जबाबदारी आर्किटेक्ट असलेली माझी मुलगी वल्लरी प्रधान हिनं उचलली होती. स्लाइडवेल मेलियर या कंपनीच्या ऑफिसची जाणवलेली वैशिष्टय़ं कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सिक्युरिटी केबिनच्या पुढेच असलेल्या औदुंबराच्या झाडाखालचं श्रीगणेशाचं मंदिर आणि त्यातली श्रीगणेशाची मनोहारी मूर्ती लक्ष वेधून घेतानाच मन शांत करते. या मंदिराकडून पुढे कंपनीच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी जाताना दोन्ही बाजूंना असलेल्या बागेतली हिरवाई डोळ्यांना सुखावते.

नोकरीच्या संधीची वाट पाहात बसण्याऐवजी आपल्यासाठी आणि इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कशा करायच्या याचा ही कंपनी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. अडचणी सर्वानाच येतात. पण खंबीरपणे त्यातून मार्ग काढून पुढे जायचा प्रयत्न केला, तर आपली आणि आपल्याबरोबर आपल्यावर रोजगारासाठी अवलंबून असलेल्या इतरांचीही प्रगती साधली जाते. हे जर उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांनी किंवा नव उद्योजकांनी लक्षात ठेवलं, तर विविध उद्योगांच्या वाढीमुळे देशाचीही उन्नती व्हायला मदतच होईल.

इंटिरिअर डिझाइनर

anaokarm@yahoo.co.in

First Published on June 22, 2019 1:21 am

Web Title: vehicles and energy fields slidewell meilleur abn 97