वित्रुविअसने लिहिलंय ‘कला विकून खूप पसा मिळविण्याची मला कधीच हाव नव्हती. मी आज जरी फारसा माहीत नसलो तरी माझी पुस्तके येणाऱ्या पिढय़ांना माझी ओळख करून देतील.’ सॉक्रेटिस, प्लुटो, अ‍ॅरिस्टॉटल यांसारख्या थोर पूर्वजांनी आपले विचार, काम लिखित स्वरूपात आणले म्हणून नंतर येणाऱ्या पिढय़ांना मार्गदर्शक ठरले याबद्दल तो कृतज्ञ आहे. त्यापासूनच त्याला प्रेरणा मिळाली हे तो नम्रतेने विशद करतो. त्याला विश्वास आहे की, विद्वान हा कुठल्याही देशात परका नसतो, जीवाभावाचे नातेवाईक व मित्र दुरावले तरीही माणूस एकाकी नसतो आणि नशिबाच्या फेऱ्यांना समर्थपणे तोंड देतो. थोडक्यात.

‘स्वगृहे पूज्यते मूर्ख:, स्वग्रामे पूज्यते प्रभू

स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते’चा तत्कालीन समर्थक.

त्यामुळे औपचारिक व व्यावसायिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्याशिवाय कोणीही बांधकाम अभियंता म्हणून काम करू नये हे त्याचे प्रामाणिक मत. आजच्या काळातही असे  शिक्षण न घेता बांधकामे करणारे अनेक कारागीर व ठेकेदार आहेत. त्या काळात तर औपचारिक शिक्षण दुर्मीळ व बहुतांशी उच्चभ्रू वर्गासाठीच उपलब्ध होते. अर्थात शिक्षण न घेता बांधकाम करणारे अनेक. तसेच स्वत:ची घरे स्वत: बांधणारेही होते. वित्रुविअस त्यांचे कौतुक करताना लिहितो- ‘शेवटी पैसे वायाच घालवायचे तर दुसऱ्या कोणी आपले पैसे वायफळ खर्च करण्यापेक्षा स्वत:च उधळलेले काय वाईट.’ त्याचं बरोबर दुसऱ्या अभियंत्याचे आराखडे वा कल्पना चोरून उपयोगात आणलेल्या अभियंत्याला कडक शासन व्हावे अशी त्याची अपेक्षा आहे. बघा म्हणजे, वाङ्मय वा कल्पना चौर्याला किती जुना वारसा आहे. तोही जागतिक स्तरावर.

निसर्गाप्रमाणे घरांची मांडणी/आराखडा बदलला पाहिजे हे त्यात आहे. सूर्य जिथे डोक्यावर येतो तिथले घर आणि सूर्य ज्या देशात दुरून दर्शन देतो (उदाहरण भारत आणी नॉर्वे) अशा ठिकाणच्या बांधकामातील, छतापासून खिडक्या दरवाजापर्यंतचे  फरक त्याने वर्णन केले आहेत. पाण्यात बुडवलेले वल्हे सरळ असून वाकडे असल्याचा भास होतो तसेच भास इमारत वेगवेगळ्या दिशेने बघताना होतात, हे तो सांगतो. त्यामुळे अनेक बाजूंनी इमारत कशी दिसेल हे आधी समजून घ्या मगच बांधकाम सुरू करा, हे तो सांगतो. धनाढय़ व उच्च पदस्तांची घरे व वकील वा पुढाऱ्यांच्या घरात काय वेगळेपण असावे हे त्यात आहे. शेतकऱ्याचे घर (तुमच्या डोळ्यापुढे येईल ते फार्म हाऊस नाही) बांधताना जनावरे बांधण्यास व धान्य साठविण्यास कशा पद्धतीने रचना करावी हे वर्णन तो करतो.

समाजाच्या अगदी खालच्या थरातला, ज्याला विटा व दगडाचे बांधकाम परवडत नाही, त्यांच्यासाठी तो साध्या मातीचे घर, लवचीक वेलींचा वापर करून, मजबूत व वारा वादळाशी तोंड देणारे कसे बनेल ही माहिती देतो. अडोबे प्रकारचे हे तंत्रज्ञान आजही भारतभर आपण वापरतो. रूडकी येथील केंद्रीय भवन अनुसंधान संस्थेने अडोबे बांधकाम तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास, तीव्र भूकंप सहन करू शकते हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

ग्रीक लोकांची घरे त्या काळात बहुतांशी पुरुषकेंद्रित असत. त्यांची रचना इटालियन घरांपेक्षा पॅसेज, मधली मोकळी जागा (कोर्टयार्ड), इ. बाबींमध्ये कशी वेगळी असेल हे त्यात दिले आहे. तळमजल्याची भिंत वरच्या मजल्याच्या भिंतीपेक्षा जाड असावी. खिडकीवरची बीम (लिन्टेल) मध्यभागी वाकेल असे वाटल्यास त्याला आधार कसा द्यावा हे त्यात आहे. हे शक्य नसल्यास कमानीचा वापर करावा हे तो सांगतो. सलग वीटकामास ताकद हवी असल्यास वीटकाम करतानाच ठरावीक अंतरावर मजबुतीकरण (काऊंटरफोर्ट) करावे हे तो बजावतो. एकसंध बांधकामाचे अनेक फायदे त्याने विशद केले आहेत.

तळमजल्याची खास करून किचन किंवा स्टोअरची फरशी खचणे हा बऱ्याचदा येणारा अनुभव. वित्रुविअसने सातव्या पुस्तकातील एक पूर्ण प्रकरण हे सगळं कसं टाळावे यावर लिहिले आहे. चुना मळताना घ्यावयाची दक्षता दुर्लक्षित केल्यास, नवीन बांधकामास नको त्या ठिकाणी तडे जाऊन वास्तू विद्रूप होईल हे बजावतो. जिप्सम कुठे व कसा वापरावा हे सांगताना, त्यामुळे  कमानी बोजड व वजनदार होऊन धोकादायक होतात त्यापेक्षा संगमरवर भुकटी वापरली तर तोच परिणाम साधता येतो. कमानीसाठी लाकूड जरुरी असल्यास ते ज्युनिपर, सायप्रस, ऑलिव्ह, इ वापरावे, ओक वापरू नये- ते पाणी पिऊन वाकडे होते किंवा त्याला तडे जातात.

रसायनांचा वापर करून रंग बनविण्याचे तंत्र फारसे प्रचलित (की अस्तित्वात) नसल्याने, रंग त्याकाळी अत्यंत महाग असत. त्यामुळे बांधकामाला लागणारा रंग हा मालकाने आणून द्यावा अशी अट करारात नेहमी असे. आज घरासोबत फíनचर फ्री अशा जाहिराती असतात, त्याकाळी घर घेतल्यास, फुकट रंगवून मिळेल अशी प्रलोभने कदाचित दाखवत असतील. पाऱ्याचा बांधकामात वापर होतोच, पण जरीचे वस्त्र जून झाल्यावर त्यातून सोने मिळवताना पारा कसा उपयोगी येतो हे त्यात आहे. काळा रंग कोळशापासून मिळतो हे सर्वमान्य, पण एका विशिष्ट पाइन झाडाच्या कोळशापासून चमकदार काळा रंग तयार होतो हे तो सांगतो. लाकूड पॉलिश करण्यासाठी लागणारे वॉíनश, पांढरे शिसे आणि विनेगर वापरून कसे तयार करावे, ही माहिती त्यात आहे. आज वॉíनश म्हणून आपण इथील/मिथील अल्कोहोल वापरतो. (कमी दरात सहज उपलब्ध म्हणून मिथील अल्कोहोलची देशी दारूत भेसळ केली जाते आणि अनेक जीव बळी जातात)

बांधकामाचा अत्यंत महत्त्वाचा घटक पाणी. एक पुस्तक त्याने पाण्यावर लिहिले आहे. चिकण मातीत पाणी लवकर मिळेल; पण अपुरे आणि मचूळ असेल, बारीक वाळूत जास्त खोलीवर पण अपुरे व पुरेसे गोड नसेल, जाड वाळूतील(ग्रावेल) पाणी भरपूर व गोड असेल. सर्वात वरचा क्रमांक अर्थात डोंगरातील झऱ्याचा. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते ती वर जाऊन ढग तयार होतात आणि त्यांना डोंगराचा अडथळा आल्यावर पाऊस पडतो ही शास्त्रीय माहिती दोन हजार वर्षांपूर्वी तो देतो.

गरम पाण्याचे झरे कुठल्या खडकातून वर येतात, आणि कुठले धातू, अधातू त्यात मिसळतात यावर त्या पाण्याचे गुणधर्म ठरतात हे त्यात आहे. गंधक पाण्यात असेल तर सांधेदुखी व त्वचा रोगाला, अल्युमिनिअम मिसळेले असेल तर अर्धागवायू व स्ट्रोकसाठी तर डांबराचा अंश  गरम पाण्यात असेल, तर शरीरांतर्गत रोगावर गुणकारी असते ही माहिती तो देतो.

अर्थात नेहमीच्या गार पाण्यात वरील धातू, झाडांचा पालापाचोळा, इ. मिसळत असल्यास त्याने पाण्याच्या गुणधर्मात आणि चवीत  काय फरक पडतो हेही त्यात आहे. उदाहरण म्हणून आग्नेय युरोपमधील थ्रम्स येथील एका तळ्याचे पाणी पिणे तर सोडा, नुसत्या अंघोळ केल्याने  माणसे मेल्याची तो माहिती पुरवतो. इटलीतील वेलीअनमधील झऱ्याचे पाणी आम्लधर्मी असते त्याने मुतखडा फुटण्यास मदत होते. पाणी वाहून नेणारे पाईप शक्यतो खापरी (मातीचे)असावेत. शिशाचे पाइप वापरणे आरोग्यास धोकादायक असते हे तो बजावतो.

नदीनाला जवळपास नसेल तर पाण्यासाठी विहीर (शेकडो फूट खोल, जमिनीची चाळणी करणाऱ्या बोअरचा शोध अजून लागायचा होता.) खोदणे क्रमप्राप्त. कुठे विहीर खोदली तर पाणी लागू शकते याचे आडाखे तो देतो. खोल विहीर खोदताना, आतील वायूची  काळजी न घेतल्याने कामगार दगावले आहेत हे तो बजावतो. शासनाने पुरेशी सुरक्षा न घेतल्याने (बिहार) खाणीत ३७२ लोक मरण पावले होते. साल १९७५. आज ४३ वर्षांनी खोल खाणीतच काय साध्या ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये काळजी न घेतल्याने विषारी वायूने सफाई कामगार मरतात.

घराचा जिना आखताना पायथागोरसचा सिद्धांत कसा उपयोगात येतो हे त्याने सोदाहरण सांगितले आहे. आठवून पहा, आपण रोज चढत उतरत असलेल्या जिन्याची पहिली किंवा शेवटची पायरी बऱ्याचदा चुकलेली असते. आपल्या पायाला जाणवतं. पण दररोजची घाई. जाऊ द्या.

घराच्या बाल्कनीचा कठडा, पाणी उपसण्याचा पंप, यासारख्या छोटय़ाशा, पण दररोजच्या वापरात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींची तपशीलवार माहिती दिली आहे. अग्नीचा शोध हा मानव समुदाय करून समाज म्हणून एकत्र येण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला हे त्याचे निरीक्षण. मुंबईत काही वर्षांपूर्वी एका बहुचíचत अधिकाऱ्याची अतिक्रमण हटाव मोहीम खूप गाजली होती. त्या कारवाईत जाड साखळदंडाला भरीव लोखंडी गोल बांधलेला असे. तो गोल क्रेनद्वारे आपटून मजलेच्या मजले अत्यंत कमी वेळात जमीनदोस्त केले जात. जिंकलेल्या शत्रू राष्ट्रातील महत्त्वाच्या इमारती या पद्धतीने पाडल्या जात हे वित्रुविअस सांगतो. एक छोटासा फरक नोंदवून ठेवतो- त्या काळात क्रेन सोडाच, साध्या यंत्राचा शोधही लागायचा होता.

युद्धजन्य परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीत तात्पुरत्या, पण कमी कालावधीत होणाऱ्या बांधकामांची गरज लागते. सीमेवरील बंकर, नाल्यावर काढता घालता येणारे पूल; यांची बहुतांशी सुरक्षादलांना जास्त जरूर असते व त्यामुळे त्यांना त्यात प्रावीण्यही आलेले असते (उदा: अगदी आता एलफिन्स्टन रोड स्टेशनवर लष्कराने बांधलेला पादचारी पूल). तर अशी ही बांधकामे, स्थानिक व सहज उपलब्ध साहित्य वापरून कशी करावी हे सांगितले आहे. कुठल्याही पुस्तकात सर्व ठिकाणच्या बांधकामांचे प्रत्येक बारीकसारीक तपशील देणे केवळ अशक्य आहे, त्यामुळे या पुस्तकातील तत्त्वे वापरून परिस्थितीनुसार संरचनेत (डिझाइन) बदल करावेत हेही तो बजावतो.

तत्कालीन ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूची ग्रीसमध्ये चार घोडय़ांच्या रथात मिरवणूक काढली जाई. तसेच त्यांना तहहयात मानधन दिले जात असे. वित्रुविअस लिहितो, ‘असाच किंबहुना जास्त मानसन्मान लेखकाला मिळायला हवा, कारण लेखकाचे ज्ञान अथवा कला सर्वकालीन आणि दाहीदिशात उपयोगी ठरते. पण इक्बालचा शेर आहे ..

‘हजारो साल नíगस अपनी बेनूरी पे रोती है

बडी मुश्कीलसे होता है चमनमें दीदार पदा’’

त्याप्रमाणे १४०० वष्रे अज्ञातवासात काढल्यावर त्याला चाहता मिळाला. त्याचं मनापासून कौतुक करणारा, त्याच्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन अजरामर कलाकृती घडवणारा. त्याचं नाव लिओनाडरे दा विन्ची. असा एक जरी चाहता मिळणे परम भाग्याचे.

कालातीत किंवा अक्षर साहित्य म्हणता येईल अशा दर्जाचं लिखाण त्याने केलंय. साहित्य, खेळ, कला व ज्ञान यांना निष्ठुर काळाच्या मर्यादा आणि भौगोलिक सीमेची क्षुद्र कुंपणे कधीच असणार नाहीत हे त्रिकाल बाधित सत्य. तरीही या वित्रुविअसचं नाव अय्यर, कुलकर्णी, सिंग किंवा बॅनर्जी असं भारतीय असतं तर जास्त छान वाटलं असतं. हो की नाही?

डॉ. अभय खानदेशे

khandeshe.abhay@gmail.com