रजनी अशोक देवधर

पादचाऱ्यांसाठी जसे फुटपाथ असतात, अगदी तसाच पुरातन पदपथ तिथल्या नैसर्गिक उंचवटा असलेल्या रचनेचा उचित उपयोग करून तेव्हा बांधण्यात आला. ही चिऱ्यांची पाखाडी ऊर्फ फरसबंदी चालत जाणाऱ्यांसाठी आणि खालचा मातीचा रस्ता तत्कालीन बलगाडी या एकमेव वाहनासाठी. कोकणात सर्वत्र लाल मातीचे रस्ते. भरपूर पाऊस असलेल्या कोकणांत पावसाळ्यात मातीच्या रस्त्याऐवजी या दगडी फरसबंदीवरून ये-जा करणे सुकर होत असे.

Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड

भूपृष्ठाला पडलेल्या लहानमोठय़ा चुण्या म्हणजे पर्वतरांगा, डोंगर, टेकडय़ा आणि छोटे उंचवटे. लाखो वर्षांपूर्वीच्या भूकंप, ज्वालामुखी, खंडाच्या टक्करी अशा नैसर्गिक हालचालींमुळे भूगर्भातील उकळत्या लाव्हारसाच्या निर्माण  झालेल्या या चुण्या भूकवच थंड होताना घट्ट होत कवच पृष्ठावर उंचसखल खडबडीत होत छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा, खळगे, अनेक उंचवटे तयार होतात. असाच लांबलचक पट्टय़ासारखा उंचवटा खुरटय़ा झुडपांनी, जाळ्यांनी शाकारलेला. समुद्र किनाऱ्याजवळचा किनारपट्टीला समांतर असलेला पूर्वेला सखल भागाकडे उतार असलेल्या कोकणात दापोली तालुक्यातल्या प्रसिद्ध मुरुड गावातला. पंधराव्या शतकात एका सिद्ध पुरुषाने येथे समुद्र किनाऱ्याजवळ गाव वसविले. गाव वसवताना अर्थातच प्रतिष्ठापना होते दैवताची. समुद्राकाठच्या मोकळ्या जागी गाव वसविताना दैवत विराजमान करण्यासाठी या लांबलचक पट्टय़ासारख्या उंचवटय़ाजवळची सखल जागा निवडली गेली.  झाडझाडोरा काढून ती मोकळी केली. जमीन सपाट करून तिथे बांधले दुर्गादेवीचे छोटेसे मंदिर. मंदिराच्या बाजूचा तो उंचवटा झाडझाडोरा बेवसाऊ वाढलेला. कोल्हे साळिंदरांसारखे छोटे प्राणी राहत असलेला. तो साफ करून त्या उंचवटय़ावर बांधली गेली घरे.

एका ओळीत शेजारी शेजारी मांडलेल्या घरांचा तो आखीव नेटका पट्टा उंचावरचा तयार झाला. बाकी जागा खाली सखल भागात. या ओळीत बांधलेल्या घरांमागे नारळा पोफळीच्या वाडय़ा, तिवरांचं नैसर्गिक कुंपण आणि मागे अथांग समुद्र. या घरांसमोर या पट्टय़ाला समांतर तशीच एका शेजारी एक ओळीत बांधली आणखी घरे. घरांच्या या दोन ओळींतल्या मोकळ्या सखल जागेत होता मातीचा रस्ता. गावाच्या मध्यभागी मंदिर आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला घरांच्या ओळी अशी नीटनेटकी रचना असलेल्या तत्कालीन मुरुड गावात उंचवटय़ावरच्या घरांसमोर रहदारीसाठी बांधली गेली जांभा दगडाच्या चिऱ्यांची आखीव लांबलचक ओटय़ासारखी फरसबंदी. याला पाखाडी असे म्हणतात. शहरांत वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेला चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी जसे फुटपाथ असतात, अगदी तसाच पुरातन पदपथ तिथल्या नैसर्गिक उंचवटा असलेल्या रचनेचा उचित उपयोग करून तेव्हा बांधण्यात आला. ही चिऱ्यांची पाखाडी ऊर्फ फरसबंदी चालत जाणाऱ्यांसाठी आणि खालचा मातीचा रस्ता तत्कालीन बलगाडी या एकमेव वाहनासाठी. कोकणात सर्वत्र लाल मातीचे रस्ते. भरपूर पाऊस असलेल्या कोकणांत पावसाळ्यात मातीच्या रस्त्याऐवजी या दगडी फरसबंदीवरून ये-जा करणे सुकर होत असे. सहसा कुठे न आढळणारी लांबलचक रस्त्याकडेला रस्त्यापेक्षा उंच नैसर्गिक भूपृष्ठावर बांधलेली जांभा दगडाच्या चिऱ्यांची पाखाडी मुरुडमधले आगळे वैशिष्टय़. या चिरेबंद पाखाडीमध्ये खालच्या रस्त्यावरून घरांपुढच्या अंगणात नेणाऱ्या पायऱ्या आणि त्यावर दिवाळीत घरोघरच्या तेवत्या पणत्यांमुळे या चिऱ्यांना दीपमाळेसारखी शोभा प्राप्त व्हायची. काळाच्या गरजेप्रमाणे रस्ता रुंद करण्यासाठी ही पाखाडी टप्प्याटप्प्याने तोडण्यात आली असली तरी गावातील मंदिराच्या दक्षिणेकडच्या भागाला खालची पाखाडी व उत्तरेकडचा भाग वरची पाखाडी ही नावे कायम राहिली आहे.

नगररचनेत पादचाऱ्यांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याच्या कडेला वेगळी सडक राखणे, फरसबंदी म्हणजेच पदपथ (फुटपाथ) बांधणे या पद्धतीची मुळे ४००० वर्षांपूर्वीपासूनची. ग्रीकांनी रोममधल्या कोरिन्थ गावात पदपथ बांधले होते. पदपथ ही संकल्पना पादचाऱ्यांना चालण्यास सोयीचे आणि सुरक्षित व्हावे यासाठी आली. इमारतींच्या तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी राखून ठेवलेला पदपथ ऊर्फ सडक नगररचनेत आवश्यक असलेला भाग ज्या योगे वाहनांच्या वाहतुकीत होणारा पादचाऱ्यांचा अडथळा दूर होतो, तसेच पादचाऱ्यांची सुरक्षा राखली जाऊन अपघातांचे प्रमाण कमी होते. लंडनमध्ये सतराव्या शतकात तत्कालीन वाहने- चाकाच्या लाकडी गाडय़ा, घोडागाडय़ा, बग्गी, सायकली यांच्या रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधणे ही पद्धत रूढ झाली. आपल्याकडे अनेक शहरांत रस्त्यावर ट्राफिक जॅम झाल्यावर फुटपाथवर बाइक आणि सायकलस्वार जसे येतात तसेच, मध्ययुगात अरुंद रस्त्यावर जागेच्या अभावी पादचाऱ्यांच्या या पथावर तत्कालीन लाकडी चारचाकी गाडय़ांचे अतिक्रमण होऊ लागल्याने पदपथ आणि मुख्य रस्ता वेगळे करण्याची गरज भासू लागली. पदपथ मुख्य रस्त्यापासून वेगळा बांधला नसल्यास वाहनांच्या अतिक्रमणाला अटकाव करण्यासाठी रस्ता व पदपथ यामधील सीमारेषेवर मजबूत आखूड खांब रोवण्याची अवलंबिली गेलेली ही आद्य पद्धत अजूनही काही ठिकाणी दिसून येते. काही वेळा या खांबांना जोडणारी साखळी लावतात. असे खांब रोवण्याअगोदर मोठे दगड रचले जात असत. पदपथ व रस्ता यामध्ये वाहने व पादचारी यांचे एकमेकांच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी लंडनमध्ये नियम केले गेले काही ठिकाणी पदपथ मुख्य रस्त्यापासून वेगळा दिसण्यासाठी आणि सुशोभित करण्यासाठी दगडांची नक्षी साकारली जाते. प्राचीन काळात आशियामधील युफ्रेटिस व टायग्रिस नद्यांच्या मधील सुपीक मेसोपोटेमिया प्रदेशात फरसबंदीवर दगडांनी नक्षी काम करण्याची कला विकसित झाली व तेथून ती रोम, ग्रीसमध्ये गेली. नदीपात्रात आढळणाऱ्या गुळगुळीत चपटय़ा गोलाकार दगडांचा वापर तेव्हा फरसबंदीसाठी केला जात असे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथावर वाहनांचे अतिक्रमण होऊ नये यासाठी वाहने धावत असलेल्या गर्दीच्या शहरांत रस्त्याकडेला असलेले पथ फेरीवाल्या विक्रेत्यांना रोजीरोटीसाठी मार्ग देणारे, भुकेलेल्यांना खाऊ घालणारे.. सदोदित गजबजलेले. काही वेगळे- तीन दगडांची चूल मांडणारे, पत्त्यांचा डाव मांडणारे, जुगारी, मद्यपींमुळे झिंगलेले, बेघरांना आसरा देणारे, निद्राधीन बेघरांना चिरडून मद्यधुंद धनदांडग्या बेमुर्वतखोरांना मोकाट सोडणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेची लक्तरे टांगणारे, तर काही शांत, निवांत. निटनेटके हिरवळ आणि दगडांनी सुशोभित केलेले काही झाडांची सावली देणारे, तर काही ठिकाणी चालण्यासाठी रस्ता, सावलीसाठी झाडे, बसायला बाके, व्यायामाची साधने, लहान मुलांना घसरगुंडी, झोपाळा अशी खेळणी असणाऱ्या छानशा उद्यानासारखे. वेगवेगळ्या देशांतील, विभागांतील वेगवेगळे दिसणारे पदपथ म्हणजे जणू आरसा.. जनांचे, समाजाचे, व्यवस्थेचे चित्र दाखविणारा.

deodharrajani@gmail.com