भारतात प्राचीन काळापासून वास्तुशास्त्राची संकल्पना होती का, असल्यास काय होती, कोणकोणत्या गोष्टींचा विचार त्यात झाला होता, यांचा वेध घेणारे पाक्षिक सदर.
वास्तुशास्त्राची ‘‘इमारतींचे रेखाटन आणि बांधण्याची कला म्हणजे वास्तुशास्त्र,’’ अशी शब्दकोशात व्याख्या आहे. कुठलीही वास्तू उभी करताना तेथील भूमी, वातावरण, संस्कृती, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या गोष्टी विचारात न घेतल्यास काय होते याचे आधुनिक काळातील उदाहरण म्हणजे काचेच्या इमारती!
या इमारतींविषयी नुकत्याच तयार झालेल्या अहवालात थंड प्रदेशात योग्य असणाऱ्या या इमारती भारतात मात्र योग्य नाहीत, असे मत तज्ज्ञांनी स्पष्टपणे मांडले आहे. युरोप, कॅनडा यांसारख्या थंड देशात बांधलेल्या या इमारतींमुळे तिथल्या तापमानात वाढ होते. पण त्याच इमारती भारतासारख्या देशात पूर्णपणे वेगळा परिणाम देतील. कारण भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. स्वाभाविकपणे या इमारतींमुळे खूप मोठी उष्णता आत खेचली जाते. या इमारतींच्या आतील हवामान नियंत्रणात ठेवण्यासाठी भरमसाट वीज खर्च होते. याशिवाय या इमारतींच्या सभोवतालचे वातावरण इतर ठिकाणापेक्षा फार जास्त असते, असे अहवालात म्हटले आहे.
इमारतींच्या बांधणीवर बरेचदा राजकीय परिस्थीतीचाही परिणाम होत असतो. उदाहरण द्यायचे तर शिवाजीचे देता येईल. शिवाजीने देखरेखीच्या दृष्टीने जाण्यायेण्याच्या महत्त्वाच्या मार्गावर काही छोटय़ा गढय़ा उभ्या केल्या. काही ठिकाणी गरज संपल्यावर पाडून टाकता येतील अशा मातीच्या अगदी कच्च्या गढय़ा उभारल्या. शिवाजीच्या वास्तुशास्त्रात आपण या सगळ्याचा विस्तृतपणे विचार करणार आहोत. या पाश्र्वभूमीवर भारतात प्राचीन काळापासून वास्तुशास्त्राची संकल्पना होती का, असल्यास काय होती, कोणकोणत्या गोष्टींचा विचार त्यात झाला होता हा इतिहास समजून घेणे मोठे रंजक ठरेल.
संस्कृतमध्ये इमारती बांधण्याच्या या कलेला ‘स्थापत्यशास्त्र’ किंवा ‘वास्तुशास्त्र’ असे म्हणतात. स्थापत्य हा शब्द ‘स्था’- ‘तिष्ठ्’ या संस्कृत क्रियापदावरून किंवा धातुवरून आला आहे. यावरून जी रचना एका जागी उभी आहे ते स्थापत्य. वास्तुशास्त्रात ‘वस्’ म्हणजे राहणे हे क्रियापद आहे. आपल्या परंपरेत वास्तू ही मानवाबरोबर देव, गुरं आणि वनस्पतींचेही राहण्याचे ठिकाण आहे.
भारतीय वास्तुशास्त्र हे शिल्पशास्त्रांतर्गत येते. ‘शिल्पौ समाधौ’-कोणतीही वस्तू अथवा कृती जी माणसाला आनंद देते, असा शिल्प या शब्दाचा अर्थ होतो. या आनंद देणाऱ्या शिल्पशास्त्राचे
१. कृषीशास्त्र, २. जलशास्त्र, ३. खनिजशास्त्र, ४. नौकाशास्त्र, ५. रथशास्त्र, ६. विमानशास्त्र, ७. वास्तुशास्त्र किंवा वेश्मशास्त्र, ८. नगररचनाशास्त्र, ९. प्राकारशास्त्र अर्थात सुरक्षाशास्त्र, १०. यंत्रशास्त्र असे विभाग पडतात. यातील वास्तुशास्त्रात-
१.     लाकूड काम – जहाज निर्मिती, घराचा लाकडी सांगाडा
२.     दगड काम – प्रासाद, मंडप, किल्ले, तटबंदीची शहरं
३.     लोहार काम –  आयुधं, नांगर
४.     सुवर्णकारी- दागिने, सोन्याचे पत्रे, नाणी, मूर्ती
५.     चित्रकारी – लाकूड, पाषाण, भांडी, तोरण आणि िभतींवरील चित्रे यांचा समावेश होतो.
भारतीय वास्तुशास्त्राचा इतिहास वेदकाळाच्याही आधी सिंधु संस्कृतीपासून सुरू होतो. सिंधु संस्कृतीची नगररचना, सांडपाण्याची व्यवस्था, भव्य स्नानगृह, विहिरी, लोथलचे  या वास्तू आजही चांगल्या स्थितीत डोळ्यासमोर उभ्या आहेत.
वेद आणि वास्तू
संस्कृत साहित्याचे ढोबळमानाने आर्ष आणि अभिजात असे प्रकार होतात. आर्ष म्हणजे ऋषींच्या उत्स्फुर्त काव्य रचना होत. यात वाल्मिकी विरचित रामायण व व्यास विरचित महाभारताचा अंतर्भाव होतो. अभिजात म्हणजे या ऋषींना आदर्श ठेवून प्रतिभेला शास्त्राभ्यासाची आणि निपुणतेची जोड देवून रचलेले काव्य असे भाग पडतात.  संस्कृत साहित्यात वास्तूंचे उल्लेख सर्वत्र येत असले तरी या शास्त्राचा साहित्यातील सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदात येतो. ऋग्वेदाच्या सातव्या मंडलातील  मंत्रानुसार प्रत्येक वास्तूत ‘वास्तोष्पती’ नावाची देवता निवास करत असते आणि नवीन वास्तूच्या निर्मितीच्या वेळी या देवतेला आवाहन केले जाते. याच मंडलात सहस्रद्वारं असणाऱ्या वरुणाच्या प्रासादाचं वर्णन आहे. ऋग्वेद हा यज्ञीय कर्मकांडाशी संबंधित वेद आहे. त्यामुळे त्यात प्रामुख्याने यज्ञातील देवतांची स्तुती आहे. पण अथर्ववेद हा दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे त्यात कृषी, आयुर्वेद, धनुर्वेद या विषयांच्या बरोबरीने वास्तुशास्त्राचाही विचार केला आहे. शिल्पशास्त्र हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो. अथर्ववेदात वास्तोष्पतीबरोबर अश्विनीकुमारांनाही घराच्या रक्षणकर्त्यां देवतांचे स्थान दिले आहे. रुद्र हा क्षेत्रपती आहे. तर इंद्राचा उल्लेख आदि-स्थपति  म्हणजे सर्वात पहिला इंजिनीयर असा आहे.  शुक्ल यजुर्वेदात स्मशान बांधणीचा उल्लेख सापडतो तर कृष्ण यजुर्वेदात नक्षीदार खांबांची वर्णनं येतात.
आर्षकाव्यांतील वास्तू
रामायण आणि महाभारत ही प्राचीन आर्षकाव्यं. रामायणात अयोध्या, लंका, कििष्कधा या भव्य नगरींची रचना, त्यातील उन्नत प्रासाद, नगराची संरक्षण व्यवस्था असे वास्तुशास्त्राशी संबंधित अनेक विषय आले आहेत. कैकयीला रागावण्यासाठी क्रोधागार होते. महाभारतात हस्तिनापूर या मायावी नगरीचे, पांडवांना जाळून मारण्यासाठी उभारलेल्या लाक्षागृहासारख्या कपटगृहाचे वर्णन सर्वज्ञात आहे.
पुराणांतील वास्तुशास्त्र
संस्कृत साहित्यात समाजजीवन अभिव्यक्त करणाऱ्या पुराणांचे स्थान महत्त्वाचे असल्याने त्यातही समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे अनेक विषय आहेत. स्वाभाविकच वास्तुशास्त्र हाही विषय चíचला आहे. मत्स्यपुराणांतील आठ अध्यायांपकी एका अध्यायात प्राचीन वास्तुरचनाकारांची जंत्री, दुसऱ्या एका अध्यायात खांब, इमारत बांधणीसाठी लागणारे साहित्य, तीन अध्यायांत मूर्तीनिर्मिती तर इतर दोन अध्यायांत यज्ञवेदी कशी निर्माण करावी असे अनेक विषय सांगितले आहेत. गरुडपुराणांतील चार अध्यायांत निवासी, लष्करी आणि धार्मिक अशा तीन प्रकारच्या इमारतींची विस्तृत चर्चा आहे.  स्कंदपुराणातील तीन अध्यायांपकी एकात नगररचना आणि उरलेल्या दोन अध्यायांत सुवर्ण सभागृह, रथनिर्मिती असे विषय आहेत. याशिवाय एका ठिकाणी राजकन्येच्या विवाहासाठीच्या खास पटांगणाची चर्चा आहे. अग्निपुराणांत सोळा अध्यायांपकी तीन अध्याय स्थापत्यशास्त्र व उरलेले सोळा अध्याय शिल्पाशी संबंधित आहेत. नारदपुराण आणि ब्रह्मांडपुराण यांत प्रत्येकी एक अध्याय येतो. यापकी नारदपुराणात पाण्याशी संबंधित व मंदिरांच्या बांधकामाची चर्चा आहे तर ब्रह्मांडपुराणांत हिमालय व िवध्य पर्वतावरील मंदिरांचे उल्लेख आहेत. भविष्यपुराणाचे चार अध्याय वास्तू या विषयावरील आहेत. आणि त्यात उल्लेखिलेले इमारतींचे प्रकार व इतर संदर्भ मत्स्यपुराण आणि वराहमिहिराच्या बृहत्संहितेतील बावीस प्रकारच्या इमारतींबरोबर जुळतात.
आगम ग्रंथ
पुराणांप्रमाणेच आगम ग्रंथही वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रासकट विविध विषयांना वाहिलेले आहेत. कामिकागमातील पंच्चाहत्तर अध्यायांपकी साठ अध्याय वास्तू याच विषयावरील आहेत. विषयाचा प्रारंभ जमिनीची निवड, जमीन तयार करणे, इमारत बांधणीसाठी स्थाननिश्चिती, मापन पद्धती, ब्ल्यू िपट्र, इमारतींचे बावीस प्रकार, याबरोबर नागररचना, वेसररचना आणि द्राविडरचना अशा वेगवेगळ्या रचनांची चर्चा आढळते.
सुप्रभेदागमात श्रीकर, चंद्रकांत, सुमुख्य, प्रियदर्शन आणि शुभंकर अशा पाच प्रकारच्या खांबांचे वर्णन आहे. अर्थात असे वर्णन इतरत्रही आढळते.  
शिल्पशास्त्राच्या धर्तीवर यातसुद्धा जमिनीची निवड आणि इमारत बांधणीसाठी ती तयार करणं, जागेची निवड, असे विषय येतात.
बौद्ध साहित्य
बुद्धाच्या विनयपिटकातील महावग्ग, चुलवग्ग येथे वास्तूविषयक संदर्भ येतात. विनयपिटकांत भगवान बुद्ध भिक्षूंना विहार, अर्धयोग (बंगला), प्रासाद (अनेक मजली इमारती), हम्र्य (गच्ची आणि गच्ची असलेला राजवाडा असे दोन अर्थ आहेत) आणि गुहा अशा पाच प्रकारच्या वास्तूंत राहण्याची परवानगी देतात.