News Flash

वास्तुसोबती : चिंगी

चिंगी आमच्याकडे नक्की कधी यायला लागली आठवत नाही, पण साधारण ९५ साल असावं. बाहेरून आल्यावर सोसायटीच्या आवारात ऊन खात बसलेली चिंगी दिसली.

| April 18, 2015 01:54 am

चिंगी आमच्याकडे नक्की कधी यायला लागली आठवत नाही, पण साधारण ९५ साल असावं. बाहेरून आल्यावर सोसायटीच्या आवारात ऊन खात बसलेली चिंगी दिसली. पांढरीशुभ्र, शेपटीवर आणि डोक्यावर थोडा करडा-सोनेरी रंग असलेली चिंगी मोठी लोभस दिसत होती. माझ्या अंगभूत मार्जार प्रेमामुळे मी तिच्याशी बोलायला थांबले. मांजरांना अशी कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायची फारशी सवय नसते, त्यामुळे तिने अंग चाटण्याचं महत्त्वाचं काम थांबवलं नाही; पण माझ्या नजरेतलं प्रेम ओळखून ती उठली. पाठ उंच करून पाय ताणून आळस दिला आणि माझ्या मागे-मागे तिसऱ्या मजल्यापर्यंत आली. तिला दाराच्या बाहेरच थांबवून मी तिला बशीतून दूध आणून दिलं. बशी चाटूनपुसून ती शांतपणे निघून गेली. लवकरच आमच्या लक्षात आलं की वाचाळ नव्हतीच मुळी, रँी ६ं२ ं ूं३ ऋ ऋी६ ेी६२.
प्रत्येक वेळी मी बाहेरून आले की, जिथे कुठे असेल तिथून ती धावत यायची आणि माझ्याबरोबर वर येऊन दाराबाहेर दुधाची वाट बघत बसायची. काही दिवसांनी ती आमची मदतनीस गीता आणि इस्त्रीवाला बबलू या दोघांना ओळखायला लागली आणि आता जरा धीर चेपल्यामुळे त्यांच्यासाठी दार उघडल्यावर घरातही यायला लागली. मी समोर असले तर ती शांत बसून राही, कारण दूध मिळायची खात्री; पण हे जर समोर असले तर एकदा म्यांव करून, आत असलेल्या माझं लक्ष वेधून घेई. घरातल्या पुरुषाची तिच्या आगमनाला हरकत नसली तरी तो तिला दूध देत नाही हे एव्हाना तिला कळायला लागलं होतं.
एक-दोनदा तिला दुधात पोळी किंवा बिस्किट कुस्करून द्यायचा मी प्रयत्न केला, पण नुसतं दूध चाटून टाकून तिने निषेध नोंदवला. हळूहळू तिचा धीटपणा वाढत होता आणि आता दूध पिऊन मुकाटपणे निघून न जाता ती हॉलमधल्या भारतीय बैठकीवर आरामात लोळून तिचा स्वच्छतेचा कार्यक्रम उरकू लागली. आता आमच्या दोघांच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्यामुळे मी तिचं नामकरण करून टाकलं. नुसतंच माऊ-माऊ किती दिवस म्हणणार?
 यथावकाश  तिने गच्चीबाहेरच्या लॅण्डिंगवर तिने तीन गोजिरवाणी पिल्लं दिली. मग दुग्धपानाचा कार्यक्रम दाराबाहेरच होऊ लागला. आता एक जिना चढून तिला दूध द्यायचं काम अंगावर आलं, कारण लहानग्यांना सोडून ती हलेना. दुधाची मात्राही वाढवली होती, पण अजूनही तिला दुधात पोळी किंवा बिस्किट चालत नसे.
पिल्लांचं पुढे काय झालं, किती जगली, कुठे गेली, काही कळलं नाही. चिंगी पूर्ववत आमच्याकडे यायला सुरुवात झाली. एकदा हॉलमध्ये दुधाची वाट बघत बसली असताना तिला आतल्या बेडरूमच्या खिडकीच्या ग्रिलमधून बाहेर पडायला धडपडणारं कबुतर दिसलं आणि अक्षरश: आमच्या डोळ्याचं पातं लवतं न लवतं तिने धावत जाऊन त्या कबुतरावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून पॅसेजमध्ये रक्त सांडत बाहेर निघून गेली. आम्ही बघतच राहिलो. आम्ही तिला अगदी शांत आणि बावळट समजत होतो, पण आपण वाघाच्या वंशातले आहोत, हे तिने सिद्ध केलं. पण यानंतर मी तिला घरात घेणं मात्र बंद केलं. तिचं दुग्धपान दाराबाहेरच उरकलं जाऊ लागलं.
इतक्या वर्षांत तिने कधी म्यांव करून दार उघडायला लावलं नव्हतं; पण एकदा रात्री ९-१० च्या सुमारास दाराबाहेरून तिचं म्यांव म्यांव ऐकू आलं. कदाचित जास्त भुकेली असावी असं वाटून मी दार उघडलं तर समोर चिंगी आणि तिने पकडून आणलेला एक उंदीर. मी घाबरून दार लावून घेतलं. उंदीर मारून इथे कशाला आली? कुठेही बसून खायचा होता. माझ्या या प्रश्रांवर यांचं उत्तर मात्र फारच मासलेवाईक होतं. हे म्हणाले, ‘‘तू इतकी र्वष तिला दूध देत आहेस, आज तिला तुझ्यासाठी काही तरी करायची संधी मिळाली. ती दुसरं काय करणार? तिला वाटलं असणार आपण पराक्रम करून मारलेला उंदीरच या बाईला नजर करावा. आपण शाकाहारी आहोत, हे तिला काय माहीत? आणि एरवी कोणी तरी येऊन बेल वाजवेल म्हणून दार उघडण्याची वाट पाहणारी चिंगी आजच का बरं म्यांव म्यांव करत होती?’’ मी हे ऐकून थक्कच झाले आणि खरं की काय, असा वेडा विचारही मनात येऊन गेला.
पण त्यानंतर मात्र तिचं येणं कमी झालं. मी काळजीत पडले. तिला मिळत असेल ना खायला? पण यांचं म्हणणं, ‘‘तू सारखी मुंबईबाहेर भटकतेस तेव्हा ती जगतच असते नं?’’ खरं होतं, पण मला मात्र चैन पडत नव्हतं. काही दिवसांनी ती खाली दिसली, अशक्त, खंगलेली आणि शेपटीजवळ जखम झालेली. मला अगदी भरून आलं. याच चिंगीला मी सोसायटीच्या आवारात कुत्र्याशी दोन हात करतानाही बघितलं होतं. माझ्या हाकेला तिने प्रतिसाद दिला नाही. कदाचित स्वत:चं आजारपण तिला माझ्यावर लादायचं नसावं. ती हळूहळू पावलं टाकत दृष्टिआड झाली आणि दोन दिवसांनी गीताने खबर आणली- चिंगी मेली. ते २००५ साल होतं. म्हणजे तिचं वय साधारण ११-१२ असणार. वय झालं होतं तिचं म्हणून मी मनाचं समाधान करून घेतलं; पण त्यानंतर मात्र इतकी जवळीक कुठल्याही मांजराशी साधली नाही. तिच्यासारखं दिसणारं एखादं मांजर दिसलं की, हे तिचं वंशज असेल का असं वाटून जातं आणि मी मोबाइलवर त्याचा फोटो काढून समाधान मानून घेते. vasturang@expessindia.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:54 am

Web Title: wastusobati chingi
Next Stories
1 अग्निसुरक्षा रामभरोसे
2 शब्दमहाल : पापाचा वाडा आणि वारूळ लागलेली मंदिरं
3 वास्तुदर्पण : बैठक व्यवस्था कधी अशी.. कधी तशी..
Just Now!
X