News Flash

सुनियोजित पनवेल

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील विकसनशील भूखंडांची संख्या घटू लागल्याने आता बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष पनवेल व आसपासच्या परिसराकडे लागले आहे.

| September 27, 2014 01:01 am

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील विकसनशील भूखंडांची संख्या घटू लागल्याने आता बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष पनवेल व आसपासच्या परिसराकडे लागले आहे. मुंबईपासून ५० किमी अंतरावर असणाऱ्या पनवेल परिसरात महाराष्ट्र शहर विकास महामंडळाने जमीन विकसित करण्यास सुरुवात केली आहे.
भविष्यात पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बांधकाम व्यावसायिक व व्यापाऱ्यांना पनवेल परिसरात व्यवसाय वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी अत्यंत माफक दरात अत्याधुनिक शहरविकास करण्याचीही परवानगी देण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय भूसंपादन निधीकडून सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत पनवेल आणि परिसरातील सुमारे २५०० एकरहून अधिक जमीन विकसित करण्यात आली आहे.
बहुतांश विकासकांनी प्रामुख्याने पनवेल परिसराकडे लक्ष केंद्रित केले आहे. पनवेलजवळ प्रस्तावित असणारे विमानतळ, आशियातील अत्याधुनिक रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले रेल्वेस्थानक आणि उरण-दोणागिरी परिसरात येऊ घातलेले रिलायन्सचे विशेष आर्थिक क्षेत्र यांमुळे हा परिसर वेगाने विकसित होत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकापासून ७ किमीवर असलेल्या २५० एकर जागेवर वसाहत विकास प्रकल्पाच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. सिडकोने पनवेल भागात नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या भागात अडचणी येणार नाहीत, त्यामुळेच या भागात जमीन खरेदी करण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल जास्त आहे. प्रकल्पात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी जबाबदारी ही संबंधित विकासकावर असल्याने मोठय़ा जागा खरेदी करून अधिक फ्लॅट्सची निर्मिती करण्याच्या विचारात बांधकाम व्यावसायिक असून त्यामुळे त्यांना बांधकामाचाही खर्च कमी लागतो, असे विकासकांकडून सांगण्यात येत आहे.
ईस्टर्न फ्री वे, सहार एलिव्हेटेड रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड याप्रमाणेच आता सायन-पनवेल मार्गावरील वाहतूकही सुसाट आहे. हा राज्य महामार्ग दहापदरी झाल्यामुळे सायनपासून पनवेल अध्र्या तासात गाठणे शक्य आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सहा मार्गिकांवर सिग्नलच्या अडथळ्याविना प्रवास करता येईल. या मार्गावर पाच फ्लायओव्हर असून त्यापैकी तीन कामोठे येथे, तर उर्वरित दोन तळोजा व सीएमएलआर येथे आहेत; तर पादचाऱ्यांसाठी १३ ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. शिलवणे आणि वाशीगाव येथील तीन भुयारी मार्ग बाइकसाठी आहेत. या मार्गावर सहा फूट ओव्हर ब्रिजही बांधण्यात आले असून बससाठी ४४ थांबे देण्यात आले आहेत. या महामार्गामुळे सायन ते पनवेल हा प्रवास खूपच सुकर होणार आहे. पूर्वी सायनवरून पनवेल गाठण्यासाठी सायन, वाशी, कामोठे, वाशी, बीएआरसी जंक्शन तसेच पुढल्या मार्गात आणखी सुमारे २० सिग्नल्सवर वाहनचालकांना थांबावे लागे. परिणामी, प्रवासासाठी किमान दीड तास लागत होता. आता हा प्रवास ३० मिनिटांत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:01 am

Web Title: well planned panvel
टॅग : Cidco
Next Stories
1 भिंत : भरभक्कम सांस्कृतिक आधार
2 वास्तुप्रतिसाद : वाडासंस्कृतीची ओळख
3 वाडा वस्ती
Just Now!
X