चित्र-शिल्पकारांच्या स्टुडिओद्वारे तेथील सोयी, वैशिष्टय़े यांचे वर्णन करताना त्या स्टुडिओचे इतर पैलू, आपत्ती, त्यांचे अंतरंगही काही प्रमाणात वाचकांसमोर आणता आले.
माणसांनी निर्माण केलेल्या वास्तूंची भूमिका त्यांच्या जीवनात महत्त्वाची असते. विविध विद्या, कलांचे अध्ययन, सादरीकरण घडते तेही प्रामुख्याने वास्तूंच्या अनुषंगाने! चित्रकार-शिल्पकारांचे स्टुडिओ लहान-मोठे कसेही असले तरी ती त्यांची गरज असते. तेथे काही मूलभूत सोयी असाव्या लागतात. त्यांच्या कामांच्या पद्धतीप्रमाणे तेथील त्यांचे जीवन-व्यवहार असतात. लेखनाद्वारे चित्रकार- शिल्पकारांच्या स्टुडिओंच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडी-स्थिती वाचकांसमोर आणवी असाही हेतू त्यामागे होता. गेली तीस-पस्तीस वर्षे कलेच्या क्षेत्रात वावरताना, आपल्या समाजात इतर कलांच्या तुलनेत चित्र-शिल्पकलेला गौण स्थान असल्याचे जाणवते. पाश्चात्त्य देशांप्रमाणे कलेची अभिरुची निर्माण होण्यास व तिचे संवर्धन, प्रसार होण्यास आवश्यक असणारी संग्रहालये, आर्ट गॅलरीज्, गं्रथ-लेखन पुरेसे उपलब्ध नाही. कलेच्या सर्वागीण विकासासाठी विविध प्रकारच्या लेखनाची, दस्तऐवजीकरणाचे महत्त्व असणाऱ्या लेखनाची आवश्यकता आहे.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टची, १९७९ च्या बॅचची मी विद्यार्थिनी. त्या वास्तूत शिकत असताना तेथील आमची प्रॅक्टिकल्स व थिअरी यांतून कलेच्या व्यापकतेचे दर्शन मला घडले. त्या विविध दृक् जाणिवांनी व माध्यमांच्या आविष्कारांनी मला थक्क केले. जे. जे. स्कूलच्या वास्तूत कलावंतांच्या आणि कलाप्रेमींच्या अनेक पिढय़ा घडल्या आणि त्यांनी कलेचा इतिहास घडविला. महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या कलेचा इतिहास निर्माण होण्यात त्या वास्तूचे व तेथील विद्यार्थ्यांचे मोठेच योगदान आहे. साहजिकच माझ्या ‘स्टुडिओ’ मालिकेचा पहिला लेख ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे स्टुडिओ’ हा होता.
चित्र-शिल्पकारांच्या स्टुडिओद्वारे तेथील सोयी, वैशिष्टय़े यांचे वर्णन करताना त्या स्टुडिओचे इतर पैलू, आपत्ती, त्यांचे अंतरंगही काही प्रमाणात वाचकांसमोर आणता आले. वयोवृद्ध माधव सातवळेकरांच्या स्टुडिओला मुंबईच्या २६ जुलैच्या प्रलयाचा फटका बसला, आयुष्यभर केलेल्या निर्मितीची एका रात्रीत वाताहत झाली. पण काही कालावधीतच उर्वरित चित्रांच्या रीटचिंग करण्याच्या कामास त्यांनी सुरुवात केली. ती क्रियाशीलता, सकारात्मकता मार्गदर्शन करणारी आहे.
शिल्पकार दिनकर थोपटे यांचे पुत्र शिल्पकार अविनाश, यांचे तरुण वयात निधन झाले. नाशिकस्थित शिल्पकार मदन गर्गे यांचे बासष्टाव्या वर्षी अपघाती निधन झाले. परंतु कामाच्या प्रती असलेली त्यांची निष्ठा, तळमळ, आज स्टुडिओच्या त्यांच्या कलाकार कुटुंबीयांना प्रेरणा देत आहे. इतरांनाही स्फूर्ती देत आहे. आज नावाजलेल्या व प्रस्थापित झालेल्या बहुतेक चित्रकारांची सुरुवातीची वाटचाल अत्यंत कठीण व कष्टप्रद होती. परंतु या मंडळींच्यात कलात्मक गुणांबेरोबर त्यांच्या कलेचा ध्यास आहे, जिद्द व चिवटपणा, परिश्रम आहेत. हे नवोदित चित्रकारांनी जाणले पाहिजे.
विलास शिंदे व जिनसुक हे दाम्पत्य, मांडण शिल्पात जागतिक पातळीवर पोहोचलेले सुनील गावडे, अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट करणारे रवी मंडलिक, कोलाज करणारे योगेश रावळ या कोणाकडेही सुरुवातीला राहायलादेखील पुरेशी जागा नव्हती. पण आज राहण्यास व स्टुडिओस स्वतंत्र जागा आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करीत कलेत व लौकिक अर्थानेही पुढे जात आहेत. चित्रकार शिल्पकार डिझी कुलकर्णी १९९२ मध्ये वयाच्या एकाहत्ताराव्या वर्षी गेले. त्यांच्या पत्नीचा फोन आला.
 ‘तुझे स्टुडिओ लेख वाचले. आवडले. वेगळी माहिती मिळत आहे. खूप बरे वाटते. डिझींच्यावेळी कुठले गं वेगळे स्टुडिओ! आयुष्यभर त्यांनी गॅरेजवजा जागेत काम केले. तोच त्यांचा स्टुडिओ.’’ अपुऱ्या सोयीसुविधांत समर्पित वृत्तीने काम करणारी ती पिढी होती. शिल्पा गुप्ता, देवदत्त पाडेकर ही तरुण कलाकार मंडळी परदेश वाऱ्या करणारी! त्यांच्या स्टुडिओ निमित्ते परदेशातील काही स्टुडिओज तेथील वातावरण, कलाक्षेत्रातील सध्याची विविधता यांची झलक देता आली. कोल्हापूरचे चित्रपटमहर्षी बाबूराव पेंटरांच्या ‘स्टुडिओ’ लेखात त्या स्टुडिओचे असलेले सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या जतनीकरणाचा विचार मांडला होता. चित्रपट बॅनर्स व पिक्चर पोस्टर्स करणारे डी. आर. भोसले त्यांच्या काळात प्रसिद्ध होते. ते बाबूराव पेंटरांना गुरुस्थानी मानीत. भोसले यांचे पुत्र विनोद आमचे जे.जे.मधील स्नेही. तो लेख वाचून म्हणाले, ‘‘असे काम तेथे झाले तर त्याची उत्तम फोटोग्राफी मी मोबदला न घेता करून देईन..!’’  या क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रियांमुळे या सदराचा हेतू साध्य झाल्याचे जाणवले.    
(समाप्त)