वाढती लोकसंख्या ही भारताच्या विकासातील मोठा अडथळा आहे. या वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात, याविषयीचे विश्लेषण करतानाच दुसऱ्या  बाजूला वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे कसे बकालीकरण होत आहे, यावर टाकलेली नजर.. ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त..
शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची  व त्याच्या क्षेत्राची वाढ. वाढते औद्योगिकीकरण व खेडय़ातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचासुद्धा शहरीकरणामध्ये समावेश होतो. २०११ च्या जनगणनेनुसार ३०.१६ टक्के लोकसंख्या शहरामध्ये राहते. एका पाहणीनुसार २०३० पर्यंत जवळपास २५ कोटी अतिरिक्त लोकसंख्या शहरांमध्ये येणार आहे. असेही दिसून आले आहे, की  शहरीकरण आणि विकास हे बरोबरीनेच चालतात. जी राज्ये झपाटय़ाने विकास करत आहेत  त्यांचाच शहरीकरणाचा वेग अधिक आहे. २०१२-१३ सालच्या पाहणीनुसार महाराष्ट्राच्या शहरीकरणाची टक्केवारी ४५.२ % होती. ती २०३० पर्यंत ५८% होण्याची शक्यता आहे. भारतातील ३ मोठय़ा मेट्रो शहरांची लोकसंख्या जगातील काही देश जसे कॅनडा, मलेशिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा मोठी होईल.
या सर्व वाढत्या लोकसंख्येचा आजच्या  शहरांवर  मोठय़ा प्रमाणात परिणाम होणार आहे.  या सर्व परिणामांचा सूक्ष्मपणे विचार करणे अत्यंत आवश्यक आहे,  कारण शहरीकरण आणि त्याचा वेग यांना थोपवणे आता जवळपास दुरापास्त आहे आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने शहरीकरण आवश्यकसुद्धा आहे.
शहरीकरणाला चांगली बाजूही आहे. देशाचा आíथक विकास हा शहरीकरणावरही अवलंबून असतो. २०३० पर्यंत भारताचे ७०% स्थूल राष्ट्रीय उत्पन्न शहरातून येणार आहे. कारण देशाच्या  उत्पन्नाचा मुख्य स्रोत औद्योगिकीकरण  व सेवा क्षेत्रात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही हेच चित्र दिसतं. विकसित देशातील शहरीकरणाची टक्केवारी ही नेहमीच जास्त असते. अमेरिकेमध्ये शहरीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शहरीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतो. मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर आजूबाजूच्या खेडय़ांचासुद्धा विकास होत असतो.
परंतु विकासाबरोबरच शहरीकरणाची काळी बाजूसुद्धा ठळकपणे दिसून येते. शहरीकरणामुळे शहरातील सोयीसुविधांवर मोठय़ा प्रमाणावर ताण वाढतो व शहरी वातावरणाचा समतोल बिघडतो. काही शहरे वगळता सर्व शहरांमध्ये सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणी पुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था याची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासते. त्या पुरवतानाच स्थानिक संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच वाढीव लोकसंख्येमुळे त्या सोयीसुविधांवर आणखीनच प्रचंड ताण पडणार आहे. या सर्व सुविधांची गरज २०३० पर्यंत कितीतरी पटीने वाढणार आहे. शहरांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे पाणीपुरवठा, ज्याची मागणी २.५ पटीने होणार आहे. आजच शहरातील जमा झालेल्या घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा व व्यवस्था उपलब्ध नाही. २०३० पर्यंत घन कचऱ्यामध्ये ५ पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे. दुसरी समस्या म्हणजे रस्ते आणि वाहतूक. मोठय़ा शहरातील वाहतूक व्यवस्था घाईगर्दीच्या वेळेमध्ये नेहमीच कोलमडते. उदारीकरणामुळे सर्वसामान्यांची क्रयशक्ती मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. आजच गर्दीच्या वेळी रस्त्यांवर वाहनांची रांगच रांग लागते. २०३० पर्यंत खाजगी वाहनांची संख्या जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर आतापासूनच विचार केला नाही तर भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल.
शहरातील बहुतांश लोकसंख्या ही लघू आणि मध्यम उत्पन्न गटातील असते. शहरातील गगनाला भिडणाऱ्या जमिनीच्या दराने तसेच बांधकामाच्या वाढीव खर्चामुळे त्यांना परवडणाऱ्या किमतींमध्ये घरं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना नाइलाजाने झोपडपट्टीचा आसरा घ्यावा लागतो. आज मुंबईतील ६०% जनता झोपडपट्टीमध्ये राहते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची आजची परिस्थिती पाहिली की कुणाही सुजाण नागरिकाची मान लाजेने खाली जाते.  २०३० मध्ये परवडणाऱ्या घरांची मागणी ३.८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे झोपडपट्टय़ांमध्ये वाढ होतच राहणार.
शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावरही मोठय़ा प्रमाणावर होत असतो. शहरीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होत असते. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम होतच असते. त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडतो. समुद्राची पातळी वाढत आहे, डोंगरांचा ऱ्हास होतोय. नुकत्याच झालेल्या उत्तरकाशीतील जलप्रलयालासुद्धा अनियंत्रित बांधकाम जबाबदार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. काँक्रीट, अस्फाल्ट, विटा यासारखे साहित्य उष्णता शोषून घेतात त्यामुळे शहरातील हवा रात्रीसुद्धा गरम असते. शहरातील वेगवेगळ्या घडामोडींमुळे वातावरणात वेगवेगळे विषारी द्रव्य उत्सर्जति केले जातात. जसे कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. त्यामुळेच शहरात श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळत नाही. यात दुचाकी आणि चारचाकी यातून उत्सर्जति होणाऱ्या धुराचा मोठा वाटा आहे. वाढत्या विकासकामामुळे नसíगक नाले, तलाव मोठय़ा प्रमाणावर बुजवले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहेत. शहरातील जमिनीतील भूजलाची पातळी घटली आहे
शहरीकरणामुळे सामाजिक व्यवस्थेवरसुद्धा परिणाम होतो. आता शहरातून एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ नाहीशाच झाल्या आहेत. सर्व जण आत्मकेंद्रित झाले आहेत. ते स्वत:च्या कोशात मग्न असून त्यांची सामाजिक बांधीलकी कमी होत चालली आहे. आता वृद्धाश्रमाची गरज  वाढते आहे. सदनिका संस्कृतीमध्ये शेजारच्या घरात एखाद्यावर  हल्ला होत असेल तरी कोणी धावून जात नाही.
मोठे शहर हे आíथक केंद्र बनल्यामुळे शहरात होणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये निरंतर वाढ होत आहे. तसेच आजच्या घडीला शहराला मोठा धोका दहशतवाद्यांकडून संभवतो. दहशतवाद्यांकडून आतापर्यंत जे हल्ले झाले ते मुंबई, दिल्ली यासारख्या मोठय़ा शहरातच झालेले आहेत. शहराच्या अवाढव्य पसाऱ्यात दहशतवाद्यांचा शिरकाव रोखणे अशक्य आहे. अगदी राजधानी दिल्ली, जिथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे, तिथेसुद्धा दहशतवादी हल्ले होतच आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे ही समस्यासुद्धा अधिकच जटिल होणार आहे.
शहरातील मोकळी जागा वाढवणे अशक्य आहे. त्या उलट वाढत्या लोकसंखेच्या अतिक्रमणामुळे मोकळ्या जागा, मैदाने कमी होत आहेत. त्याचाच विपरीत परिणाम लहान मुलांच्या मन:स्वास्थ्यावर व वाढीवर होत आहे. वाढत्या लोकसंखेमुळे शाळा, महाविद्यालय, दवाखाने यांसारख्या सोयीसुविधांची आत्ताच वानवा भासत आहे. शहरात जागेची कमतरता असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा समावेश करण्यासाठी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहे. त्यामुळे अग्नी सुरक्षा, वाहतूक समस्या, निर्माण होत आहेत.
शहरीकरणामुळे राजकीय दृष्टिकोनावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरात राहणाऱ्या मतदारांची संख्या खेडय़ातील मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त झाल्यामुळे राजकारण्यांना शहर विकासावर जास्त भर द्यावा लगेल.
वाढत्या शहरीकरणामुळे आणखी एका महत्त्वाच्या बाबीवर परिणाम झाला आहे, तो म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. वातावरणातील ध्वनिप्रदूषण, दिवसभराची धावपळ, मोठय़ा प्रमाणावर मनावर होणारा ताण यामुळे शरीर आणि मन:स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. श्वसन विकार, हृदयविकार अशा रोगांमध्ये वाढ दिसून येते. वेगवेगळ्या रोगांचा जसे डेंगू, मलेरिया यांचा प्रादुर्भाव मधून मधून होतच असतो. एकंदरीत यावरील सर्व समस्या आत्ताच निवारणे कठीण झाले आहे तर भविष्यात काय होईल.
शहरीकरणामुळे होणारे संभावित दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वानीच आतापासून विचार करावयास पाहिजे व योग्य त्या उपाययोजना अमलात कशा आणता येतील, हे पाहिले पहिजे. त्यात प्रादेशिक समतोल, मध्यम व छोटय़ा शहरांचा विकास, आíथकदृष्टय़ा सक्षम नवीन शहरांचा विकास यावर अधिक भर दिला पाहिजे. शहरांबाहेरील खेडय़ांचा योग्य प्रमाणात विकास केल्यास गावाकडून शहराकडे येणारा लोंढा कमी होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सोयीस्कर केली पहिजे. ज्यामुळे खाजगी गाडय़ांमधून प्रवास करणारे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर सुरू करतील व त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन, परिणामी पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले शहर ‘स्मार्ट शहर’ करणे काळाची गरज अहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वच क्षेत्रांमध्ये जसे दळणवळण, मूलभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शहर सुरक्षा व शहराचे व्यवस्थापन यामध्ये मोठय़ा प्रमाणावर होऊ शकतो. ज्यामुळे रहिवाशांचे जीवन सुखकर होईल. बांधकामे करताना ऊर्जा बचतीचं तंत्रज्ञान अमलात आणणे आवश्यक आहे, त्यासाठी लीड प्रमाणपत्रे बंधनकारक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होइल. समाजातील प्रत्येक घटकाने त्यातही शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापली जवाबदारी ओळखून योग्य ती पावले टाकली तर शहरीकरणाचे दुष्परिणाम निशितपणे कमी होतील.

खेडी ओस पडताहेत आणि शहरे सुजताहेत
naxalism in india upsc,
UPSC-MPSC : अंतर्गत सुरक्षा : नक्षलवाद
reason behind Hamas attack on Israel
‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?
नक्षलवाद समजून घेण्यासाठी