गौरी प्रधान

अपघात हा अपघात असतो असे म्हणतात, त्याला कोणताही जर- तर थांबवू शकत नाही, पण म्हणून आपण काही निष्काळजीपणे राहत नाही ना? अपघात घडूच नये म्हणून वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवर शक्य तितकी काळजी आपण घेतच असतो. तरीही बरेचदा असे आढळून येते की सुरक्षेचा विचार करताना सामूहिक अपघातांचा आणि त्यासाठी योजल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा विचार जितका गांभीर्याने केला जातो त्या तुलनेत वैयक्तिक अपघात आणि योजल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात बरीच उदासीनता दिसून येते. बरेच वेळा तर अपघाताची तीव्रताच मुळी त्यात किती जीवितहानी होते व त्याची काय वारंवारिता आहे यावर ठरते. म्हणूनच हल्ली इमारतीच्या सुरक्षेचा विचार करण्याची वेळ आली की सर्वप्रथम आपल्या डोळय़ासमोर येते ती अग्निसुरक्षा, अर्थात त्यात वावगे असे काहीच नाही, कारण मानवी जीवन हे बहुमूल्य आहे.

काही अपघातांत मात्र एकाच वेळी सामूहिक मृत्यू होत नाहीत, पण अशा अपघातांना एक वारंवारिता असते, त्यात जास्त किंवा घाऊक प्रमाणात जीवितहानी होत नसल्याने तसेच त्यांची वारंवारिता त्यामानाने कमी असल्याने त्याकडे कधी तरी किंचित दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

अशा प्रकारच्या अपघातांमध्ये उंच इमारतींच्या खिडकीतून मुले पडून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक जाणवते. गूगल सर्च इंजिनमध्ये याविषयी अधिक माहिती घेता  हऌड ने देखील लहान मुलांच्या उंच इमारतीतून पडण्याविषयी भाष्य केलेले दिसते, तर युएईमध्ये तर गेल्या दहा वर्षांत तीस बालके उंच इमारतीच्या खिडकीतून पडून मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. शारजा सरकारने तर उंच इमारतीच्या खिडक्यांना कशा प्रकारची सुरक्षा असावी याविषयी काही नियमावलीदेखील प्रसिद्ध केल्याचे बातम्या वाचून समजते. अमेरिकेत वर्षांला बारा मुले खिडकीतून पडल्याने मृत्युमुखी पडतात तर चार हजार मुलांवर वर्षभरात उपचार केले जातात. अमेरिकेतील एका चाचणीनुसार, लहान वयात मृत्यू येण्याच्या  काही महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे उंचावरून खाली पडून मृत्यू येणे हे आहे.

भारताबाबत अशी स्टॅटिस्टिकल माहिती वाचायला मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ भारतात असे अपघात होत नाहीत असा नक्कीच नाही. उलटपक्षी शारजासारख्या लहानशा ठिकाणची अपघातांची वारंवारिता तपासून त्याचा भारताशी संबंध लावायचा म्हटला तर ती संख्या किती असेल याचा आपण फक्त विचारच करू शकतो. गूगलवर माहिती काढता उत्तर प्रदेश येथे घडलेल्या काही घटना वगळता फार याविषयी बातम्या वाचायला मिळत नाहीत, यावरून आपल्याकडे या विषयाकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन लक्षात येतो.

गेल्या वर्षी तसेच चालू वर्षी ठाण्यात दोन नावाजलेल्या इमारतींमध्ये लहान मुले खिडकीच्या कठडय़ावरून पडून मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, पण याव्यतिरिक्त अशा घटना घडतच नसाव्यात? की त्यांच्या बातम्या होत नसाव्यात? गेल्या काही वर्षांतील नवीन बांधकामे पाहिल्यास इमारतीच्या बा सौंदर्यात बाधा येऊ नये याकरिता खिडक्यांना संपूर्ण ग्रिल न देता त्याऐवजी फक्त चार फुटांपर्यंत रेलिंग दिले जाते. बरेच वेळा रहिवाशांची संपूर्ण ग्रिलची मागणी असतानाही निरनिराळय़ा नियमांकडे बोट दाखवून त्यांना परवानगी नाकारली जाते.

बऱ्याच वास्तुविशारदांच्या मते, तर चार फूट उंच ग्रिल ही सरकारमान्य असल्याने त्यावर जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. काहींच्या मते, खिडकीला संपूर्ण ग्रिल असल्यास खराब होतो. तर काहींचे मत थोडे पटण्यासारखे, त्यांचे म्हणणे इमारतीला जेव्हा आग लागते तेव्हा जर खिडक्यांना संपूर्ण ग्रिल असेल तर बचावकार्यात अडथळा निर्माण होतो. यातील शेवटचे कारण फक्त खरेच विचारयोग्य वाटते; पण एका प्रकारच्या सुरक्षेचा विचार करताना दुसऱ्या प्रकारच्या अपघातांना आमंत्रण देणे हेदेखील शहाणपणाचे नव्हे. म्हणूनच दोन्ही प्रकारचे अपघात कसे टाळता येतील याचा विचार करून आपण खिडक्यांच्या ग्रिल डिझाईन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

टफन ग्लास हा एक उत्तम पर्याय यासाठी वापरला जाऊ शकतो. जसे की, जमिनीपासून चार फुटांपर्यंत टफन काचेचा कठडा व त्यावर लोखंडी ग्रिल, जेणेकरून अपघातांच्या परिस्थितीत टफन काच तोडून सहज जीव वाचवता येतील व एरवी लहान मुले कठडय़ावर चढून खाली पडण्याची शक्यतादेखील राहणार नाही. दुसरा पर्याय म्हणजे खाली चार फुटांपर्यंत लोखंडी ग्रिल आणि त्यावरील भागात invisible ग्रिल, जी नाजूक तरीही भक्कम अशा स्टीलच्या तारांच्या स्वरूपात उपलब्ध होते. यात खिडकीला सुरक्षा तर मिळतेच, पण त्याचसोबत खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यातदेखील अडथळा निर्माण होत नाही. आता जेव्हा टफन काच किंवा invisible ग्रिल या पर्यायांचा आपण विचार करतो तेव्हा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडेदेखील ती काच फोडण्यासाठी लागणारे हत्यार किंवा  invisible ग्रिल असल्यास ती तोडण्यासाठी विशिष्ट कात्री असणेदेखील गरजेचे आहे. याव्यतिरिक्त घराच्या बाल्कनीमध्येच उंच ठिकाणी तशी हत्यारे ठेवण्याची व्यवस्था असल्यास आपल्याला जास्त वारंवारिता असणाऱ्या तसेच तुरळक तरीही घडणाऱ्या अपघातांची संख्या नगण्य अपघातांवर सहज आणता येईल.

सामूहिक अपघातात जीव गमावणाऱ्या माणसांच्या जीवनाइतकेच व्यक्तिगत अपघातात जीव गमावणाऱ्यांचे मानवी जीवन महत्त्वाचे असते, कारण शेवटी मृत्युमुखी पडणारा प्रत्येक जीव त्याच्या कुटुंबासाठी लाख मोलाचाच असतो ना?