सोप्रानोच्या आवाजाने ग्लास फुटू शकतो असे म्हणतात. आपण तर बुवा कधी बघितला नाही. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा आवाज हा पृथ्वीतलावरील सगळ्यात मोठ्ठा नैसर्गिक आवाज असतो असेही म्हणतात. तोही आपण कधी ऐकला नाही. परंतु मानवनिर्मित अति कर्कश आवाज मात्र आपण शहरवासी रोजच्या रोज अनुभवतो. आपल्या चहू बाजूंनी, इमारतींच्या बांधकामाचे आवाज आपल्या कानावर सतत आदळतच असतात. त्यात परत ऑफिसला जाताना मेट्रोच्या कामाचे, घरी येताना रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे, संध्याकाळ झाली की मिरवणुकींचे व रात्र होता होताच डीजेंचे छाती दडपवणारे, काहीही सुचू न देणारे आवाज आपला पिच्छा सोडत नाहीत. पण या सगळ्यांचा बादशाह म्हणजे पुनर्विकासाचा आवाज! कारण तो आपल्या अगदी निकट, दीर्घकालीन व टाळता न येणारा असतो.

आमच्या शेजारच्या इमारतीच्या पुनर्विकासामुळे होणाऱ्या हवा व ध्वनिप्रदूषणाने आम्ही इतके कंटाळलो होतो, की आमच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी आम्हाला घर-बदल करायची वेळ आली तेव्हा आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु कसले आणि काय, भाड्याच्या घरात आमचे बस्तान हलवल्याबरोब्बर तिथेही समोरच्या व शेजारच्या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला, त्यामुळे परत तेच, डेसिबलची तमा न बाळगणारे आवाज – विसंगत, कर्णकटू, बदसूर व अतिमोठे.

mahareras parking regulations maharera new order and parking
पार्किंग आणि महारेराचा नवीन आदेश…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Loksatta vasturang Society Conveyance developer Ownership of the building Management
सोसायटी कन्व्हेयन्सची गरजच नाही… एक खोटा प्रचार
Loksatta editorial on Chief Economic Advisor Dr V Anantha Nageswaran talk about financial market and finance 3 0 summit
अग्रलेख: बुडबुडा बुडवे बहुतां…
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Loksatta editorial Opposition protest against maharashtra government over shivaji maharaj status collapse in rajkot Sindhudurg
अग्रलेख: जोडे, खेटरे, पायताण, वहाणा, चप्पल इ.

पुनर्विकासाच्या ध्वनी-निर्मितीला सुरुवात होते माती-परीक्षणापासून. संबंध दिवस डिझेल जनरेटरचा व त्यावर चालणाऱ्या मशीनचा डोके उठवणारा गड-गड-गड-गड आवाज तुम्हाला खिडक्या जरासुद्धा उघडू देत नाही. पाठोपाठ येतात ट्रकमधून उतरवून खणखणाटी आवाज करत खाली टाकले जाणारे लोखंडी अँगल व पत्रे. प्लॉटची सीमा बंदिस्त करणारे हे २० फूट उंच पत्रे, जोरदार ठाकठूक करत लावले जातात. मग सुरू होतो आवाजाचा चढता आलेख. एकूणएक सदस्यांनी घरे व इमारत खाली केली, की प्रचंड धूळ उडवत आणि गोंगाट करत, एक्सकेव्हेटर्स आणि लोडर्स कामाला लागतात इमारत पाडण्याच्या. ३०-४० वर्षं वस्तीस असणाऱ्या घरांच्या काँक्रीटच्या स्लॅब व भिंती शांतपणे कशा काय पाडल्या जातील? त्यांच्या दु:खाच्या ध्वनी लहरी इतरत्र पसरणारच. पाडलेल्या इमारतीचा भलामोठा ढीग घेऊन जाणारे खटारे, पुढले बरेच दिवस साइटवर ये-जा करतच राहतात. सर्व प्लॉट मलबामुक्त, जमीनदोस्त झाला की कमेन्समेंट सर्टिफिकेट येइपर्यंत त्याला १-२ महिने जरा उसंत मिळते. आता प्रवेश होतो या आवाजवृंदाच्या मेरुमणीचा- चाळीसेक फूट उंच पाइल ड्रिलिंग रिगचा.

हेही वाचा >>> सोसायटी कन्व्हेयन्सची गरजच नाही… एक खोटा प्रचार

महानगरात इमारती दाटीवाटीने उभ्या असतात. नवीन इमारतीच्या पायासाठी खोल खड्डा खणत असताना त्याच्या कडा ढासळू नयेत व शेजारील इमारतीला धोका पोहोचू नये म्हणून, प्लॉटच्या सीमेलगत, जमिनीत काँक्रीटच्या खांबांची भिंत बांधतात. या एकमेकांच्या शेजारी ओळीने उभारलेल्या खांबांना शीट पाइल्स म्हणतात. या पाइल्ससाठी दीड- दोन फूट रुंद, पण वीस-तीस फूट खोल खड्डा करण्याचं काम हे पाइल ड्रिलिंग रिग करते. जमिनीत ड्रिल करणारे ऑगर, खड्ड्यातून बाहेर येऊन त्याला चिकटलेली माती जेव्हा झटकते तेव्हा त्याचा कानठळ्या बसवणारा, काळजात घण घातल्यासारखा आवाज लांब लांबपर्यंत ऐकायला येतो. हल्ली उड्डाणपुलांना दोन्ही बाजूने ध्वनी रोखणारे तावदान बसवलेले असतात. आसपासच्या रहिवाशांना सततच्या वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून, पण या ड्रिलिंग रिग्ससाठी अशी काही सोय नाही व इतक्या वर्षांत त्याचा माती झटकण्याचा भीषण आवाज कमी करण्यावर काही संशोधनही नाही. याउपर सिमेंट मिक्सरचा, स्लॅब भरताना व्हायब्रेटरचा, सामान वर-खाली नेताना खडखडणाऱ्या लिफ्टचा, फिटिंग करणाऱ्या ड्रिलचा, दगड कापणाऱ्या कटरचा व त्यांना गुळगुळीत करणाऱ्या टम्बल पॉलीशरचा… असे अगणित क्लेशदायक आवाज आपल्या कर्णपटलाचा वेध घेत राहतात. मधुर संगीताने गाई जास्त दूध देतात, झाडे फुलून येतात व माणसांचे रोगही बरे होतात असे म्हणतात. हे जर खरे असेल तर या उलट, अशा कर्कश आवाजांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होणार नाहीत का? ८५ डेसिबलच्या वरचा आवाज, २ तासांत माणसाला बहिरेपणाकडे नेऊ शकतो. रक्तदाब, हृदयाचे ठोके, स्मरणशक्ती व आकलनशक्तीवर परिणाम करू शकतो. पण हे गंभीरपणे घेतले जात नाही. त्यात साइटवर काम करणाऱ्या कामगारांचे हाल तर कमालीचे वाईट. त्यांना कोण विचारतो? नवीन घरे आणि सुखसोयी मिळवण्याच्या शर्यतीत या बाबींकडे सरसकट दुर्लक्ष होत आहे.

नागरिक, धोरणकर्ते, बांधकाम साधने व वाहनांचे उत्पादक, विकासक, माध्यमे, अशा सर्वांनीच या समस्येवर, ध्वनिप्रदूषणावर, अति तातडीने काम करणे आवश्यक. काही लगेच करता येण्यासारखे उपाय आहेत.

● सर्वांत पहिले पाऊल म्हणजे नागरिकांनी दबावगट बनविणे. बांधकामे व आवाजी कामाच्या वेळांसाठी नियम असतात, पण नागरिकांना ते नीटसे ठाऊक नसतात. त्यांची माहिती करून घेऊन, दबाव गटामार्फत, नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास भाग पाडता येऊ शकते. स्थानिक संस्था आपल्या संकेतस्थळांवर ही माहिती व मदत ध्वनी क्रमांक देऊन नागरिकांना बळ देऊ शकतात. प्रत्येकाने आपल्या विकास करारात नियम पालनाची अट घालून, आपल्या PMC कडून त्याचे पालन करवून घेतले पाहिजे.

● चुकीच्या कार्य पद्धतीमुळेही ध्वनिप्रदूषण होते. उदाहरणार्थ, लोखंडी सळ्या ट्रकमधून उतरवताना, एकदा ट्रक मधेच, मग तिथून खाली जमिनीवर आणि शेवटी साइटवर, अशा तीनदा उंचावरून खाली टाकल्या जातात. ट्रकमध्ये सळ्यांचा तडाखा शोषून घेणारी रचना व त्या हाताळण्याची पद्धत बदलून हे ध्वनिप्रदूषण सहज कमी होऊ शकते. ध्वनी व इतर प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक संस्थांनी, बांधकामातील सर्व प्रक्रियांची मानक कार्यपद्धती विकसित करून अमलात आणली पाहिजे.

● वाहनांच्या वायुप्रदूषणावर जशा मर्यादा आहेत (PUC), तशा मर्यादा, बांधकामाची उपकरणे, वाहने व साधनांच्या ध्वनिप्रदूषणावर आणल्या पाहिजेत. उत्पादकांनी संशोधनावर भर देऊन याला हातभार लावला पाहिजे.

● ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा मते मागायला येणाऱ्या पक्ष्यांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करावा लागेल, इतका त्याचा विविध मार्गांनी पाठपुरावा करायला पाहिजे.

● आणि हो, खर्चीक असले तरी आपापल्या घरी, एखाद दुसऱ्या खोलीला तरी आवाजाला अभेद्या अशा दुहेरी तावदाने असलेल्या काचेच्या खिडक्या बसवून, AC लावून घेणे बेहत्तर. खरे तर अशा खिडक्यांचा समावेश, नवीन इमारतीत विकासकाकडून अपेक्षित असलेल्या, अनिवार्य सोयींच्या यादीत झाला पाहिजे.

आपल्या संस्कृतीत ध्वनी लहरींना अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे व त्यावर खूप बारीक काम व गहन विचार झालेला आहे. संगीतातील श्रुती किंवा नाद-ब्रह्मची संकल्पना, ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा दर्जेदार व उच्च प्रतीच्या अनुभवासाठी आपल्या कानांची संवेदनशीलता जपायलाच हवी. नाही का?

(नगर नियोजन तज्ज्ञ व वास्तुविशारद) ●

preetipetheinamdar@gmail.com