घर, कार्यालये, रुग्णालये, मॉल्स व सार्वजनिक इमारतींमध्ये वापरली जाणारी वातानुकूलन यंत्रणा (Air Conditioners) ही आज अत्यावश्यक सुविधा बनली आहे. मात्र योग्य देखभाल, योग्य विद्युत रचना आणि सुरक्षित वापर न केल्यास हीच सुविधा गंभीर आगधोका निर्माण करू शकते. हा लेख वातानुकूलन यंत्रणांमधील विद्युत व यांत्रिक दोषांमुळे होणाऱ्या आगीच्या धोक्यांवर प्रकाश टाकतो.
वातानुकूलन (Air Conditioners) हे घर, कार्यालये, रुग्णालये, मॉल्स व सार्वजनिक इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे विद्युत उपकरण आहे. उष्ण हवामानात आवश्यक आराम देणारी ही यंत्रणा बिघडल्यास गंभीर अग्निधोका निर्माण करू शकते. यामुळे होणाऱ्या अनेक आगी या एकाच कारणामुळे न होता विद्युत ओव्हरलोडिंग, मोटरमधील बिघाड, यांत्रिक झीज, अपुरी देखभाल आणि असुरक्षित वापर या अनेक कारणांमुळे घडतात.
वातानुकूलकांशी संबंधित एक सामान्य विद्युत समस्या म्हणजे वायर (wires) ची झीज. मशीनसाठी टाकलेल्या वायर अनेकदा यंत्राच्या धारदार कडांवर, खिडकीच्या फ्रेमवर किंवा हलणाऱ्या भागांवर सतत घासल्या जातात. कालांतराने यामुळे इन्सुलेशन खराब होते. अशा खराब इन्सुलेशनमुळे ठिणगी (sparking) आणि शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते, विशेषतः जेव्हा यंत्र विद्युत भारावर (on electric load) चालू असते. अनेक वेळा याला विद्युत पूरवठा देण्यासाठी एक्स्टेंशन कॉर्ड वापरले जातात. जर हे कॉर्ड आवश्यक विद्युत प्रवाह (current) वाहून नेण्याच्या क्षमतेचे नसतील, तर ते गरम होतात, इन्सुलेशन फेल होते आणि शॉर्ट सर्किट व आग लागण्याचा धोका निर्माण होतो.
वातानुकूलन यंत्रणेमध्ये ब्लोअर चालवण्यासाठी मोटर असते. अनेकदा योग्य देखभाल न झाल्यामुळे मोटर बेअरिंग झिजतात, असमतोल (misalign) होतात किंवा योग्य प्रकारे लुब्रिकेट केलेले नसतात. त्यामुळे घर्षण वाढते आणि मोटर अतितप्त होते किंवा जळून जाण्याची शक्यता निर्माण होते. काही प्रसंगी ब्लोअर किंवा फॅन डगमगणे (wobbling) किंवा असंतुलनामुळे असामान्य कंपन निर्माण होतात. या कंपनांमुळे घर्षण वाढून ठिणगी (sparking) निर्माण होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात हे यांत्रिक दोष लक्षात येत नाहीत, पण हळूहळू ते वाढून आग लागण्याचा धोका निर्माण करतात.
जर वातानुकूलकांची नियमित साफसफाई केली नाही तर सुकलेली पाने, धूळ किंवा कचरा यांसारखी ज्वलनशील सामग्री यंत्राच्या आत साचते. ही सामग्री मोटरभोवती साचल्यास मोटरची उष्णता बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि मोटर तप्त (hot) होते. काही वेळा मोटर किंवा ब्लोअरमध्ये अडकलेला कचरा घर्षण वाढवतो आणि तापमान आणखी वाढते. अशा स्थितीत जर ज्वलनशील सामग्री गरम भागांशी किंवा ठिणगीशी (sparking) संपर्कात आली तर आग लागण्याची शक्यता असते. तसेच बाहेरील युनिटजवळ कोरडे कागद, कार्डबोर्ड किंवा कापड ठेवले असल्यास, यंत्रातून निघालेली अगदी लहान ठिणगीसुद्धा आग भडकवू शकते.
करोनाच्या काळात वातानुकूलकांशी संबंधित धोके विशेषत्वाने दिसून आले. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असल्याने अनेक तात्पुरती उपचार केंद्रे सुरू करण्यात आली. या ठिकाणी वातानुकूलक २४x७ चालू ठेवण्यात आले, परंतु योग्य देखभाल किंवा पर्यायी (redundant) यंत्रणा उपलब्ध नव्हती. मधूनमधून चालवण्यासाठी डिझाइन केलेली यंत्रे सतत चालू ठेवल्यामुळे ओव्हरलोडिंग झाले आणि यांत्रिक झीज वेगाने वाढली. विद्यमान रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेड व अतीरीक्त वैद्यकीय उपकरणे बसवण्यात आल्यामुळे उष्णतेचा भार वाढला आणि एसी यंत्रणा त्यांच्या डिझाइन क्षमतेपेक्षा जास्त वापरल्या गेल्या.
ऑपरेशन थिएटर, आयसीयू व प्रयोगशाळा यांसारख्या संवेदनशील विभागांमध्ये वातानुकूलन यंत्रणा सतत चालू ठेवणे आवश्यक असते. अनेक ठिकाणी स्टँडबाय किंवा पर्यायी यंत्रणा नसते आणि कामाच्या ताणामुळे नियमित देखभाल दुर्लक्षित केली जाते. अशा परिस्थितीत यंत्रे निकामी होणे किंवा हळूहळू विद्युत व यांत्रिक दोष निर्माण होणे अपरिहार्य ठरते. त्याच वेळी, वैद्यकीय उपकरणे, तात्पुरते एसी आणि सहाय्यक प्रणाली वाढल्यामुळे विद्युत वापर, असलेल्या केबलवर मोठ्या प्रमाणात वाढतो. मुख्य विद्युत लाईन, स्विचगिअर किंवा केबलिंग यांची क्षमता वाढली नाही. परिणामी केबल्स ओव्हरलोड होणे, गरम होणे आणि ठिणगी (sparking) पडणे व आग लागण्याचा धोका निर्माण होतो.
रुग्णांजवळ मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलिंडर वापरण्यात येतो आणि अनेक ठिकाणी योग्य हवा बाहेरजाणारी प्रणाली (arrangement) नसते. बंद खोल्यांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने आग अधिक तीव्र स्वरूप घेते. ऑक्सिजन-समृद्ध वातावरणात अगदी लहान ठिणगीसुद्धा झपाट्याने आणि अनियंत्रित आग निर्माण करू शकते. याशिवाय निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे वातावरण अधिक ज्वलनशील झाले.
अग्निधोका कमी करण्यासाठी वातानुकूलन यंत्रणांची देखभाल उत्पादकांच्या सूचनांनुसार काटेकोरपणे करणे अत्यावश्यक आहे. नियमित साफसफाई, वायर (wires) तपासणी, झिजलेल्या घटकांची वेळेवर बदल, योग्य लोड आणि यंत्रांना पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. एसी यंत्रणा त्यांच्या डिझाइन मर्यादेपेक्षा जास्त वेळ सतत चालवू नयेत. एक्स्टेंशन कॉर्ड किंवा तात्पुरत्या विद्युत जोडण्या टाळाव्यात. महत्त्वाच्या ठिकाणी पर्यायी यंत्रणा उपलब्ध असणे आणि नियोजित देखभालीसाठी यंत्रे वेळोवेळी बंद ठेवणे अत्यावश्यक आहे.
वातानुकूलक ही उच्च विद्युत भार व यांत्रिक प्रणाली असलेली उपकरणे आहेत. दुर्लक्ष, ओव्हरलोड आणि अपुरी देखभाल यामुळे ही यंत्रे शांतपणे पण अत्यंत धोकादायक अग्निधोका निर्माण करू शकतात.
पुढील लेखात आपण वेल्डिंग (Welding) कामांमधून निर्माण होणारे अग्निधोके आणि आवश्यक सुरक्षितता उपाय यावर सविस्तर चर्चा करू.
वीज आणि यंत्रसामग्री चुका माफ करीत नाहीत, त्यामुळे सतर्क राहणे हेच उत्तम.
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)
ajitnkulkarni@yahoo.com
