सुचित्रा साठे

अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं, कमी न होणारं. सृजनाचा, निर्मितीचा सोहळा या दृष्य जगात घरोघरी निरंतर चालू रहावा म्हणून तर त्याला परंपरेचं, सणांचं कोंदण आणि म्हणून आजचा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त. 

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी’.. माणिक स्वरांच्या लडी उलगडत जातात आणि चैत्र थाटामाटात पाऊल टाकतो. त्याच्या स्वागतासाठी घराघरांतून गुढय़ा बाहेर डोकावतात. अतिशय आनंदात मराठी नवीन वर्षांचा आरंभ होतो. चैत्र शुद्ध तृतीयेला घरात गौरीच्या आगमनाची तयारी सुरू होते. देव्हाऱ्यात सगळय़ा देवांच्या बरोबर बसणाऱ्या अन्नपूर्णेसाठी खास स्वतंत्र आसनव्यवस्था होते. चांदीच्या कमळात रेशमी गादीवर किंवा डोलाऱ्यात ती विराजमान होते. गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंत चैत्रांगणाच्या देखण्या रांगोळीने देवघराचा कोपरा खुलून दिसतो. वाढता उन्हाळा लक्षात घेऊन तिच्यासमोर चांदीचे छोटेसे पाण्याचे तांब्या भांडे ठेवले जाते. हा ‘भाव’ महत्त्वाचा. दुसऱ्या भांडय़ावर कैरी ठेवली जाते. निसर्ग जणू घरात डोकावतो. आंब्याची डाळ व थंडगार केशर वेलचीयुक्त पन्ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. माहेरवाशीण आणि ‘दोन जिवांची’ म्हणून चैत्रगौरीचे महिनाभर लाड केले जातात. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्यतृतीयेपर्यंत तिचा मुक्काम असतो. त्याच सुमारास शाळा, परीक्षा आटोपल्यामुळे पोरीबाळीही लेकरांना घेऊन विश्रांतीला हजर होतात. पाहुणेही डोकावतात. घराचे ‘गोकुळ’ होते.

चैत्रगौरीच्या आगमनाप्रीत्यर्थ महिन्याभरात सोयीने वासंतिक हळदीकुंकू करण्याची प्रथा आहे. पायऱ्यापायऱ्यांची आरास मांडली जाते. गौरीला डोलाऱ्यात बसवून झोका दिला जातो. तिला सर्जनशील पृथ्वीचे प्रतीक मानले जाते. झोका आकाशाच्या म्हणजे सूर्याच्या दिशेने झेपावतो. म्हणजे पृथ्वी व सूर्य या दोघांमधील अंतर कमी होते. मिलनाच्या घडीची ती प्रतीक्षा असते. या काळात प्रत्यक्षातही सूर्य पृथ्वीच्या खूप जवळ येतो म्हणे. वर्षां ऋतूत होणाऱ्या नवनिर्मितीची ही पूर्वतयारी. प्रतीकात्मकरीत्या हा ‘निर्मितीच्या शक्तीचा’ उत्सव असतो. हळदीकुंकू म्हणजे तर धमालच असते. वाळलेले हरभरे दोन दिवस पाण्यात बसून टुम्म फुगतात. रंगीबेरंगी चित्र, नकली फळं, फराळाचे पदार्थ, अर्ध्या कलिंगडाची, टरबूजाची कमळं अखोली नारळाला कुंची घालून झालेलं बाळ.. असे सगळे पायऱ्यांवर विसावतात. भरजरी शालूचा पडदा, आरसा आणि मोगरा, चाफा अशी सुवासिक फुले वेगळाच माहोल निर्माण करतात. नट्टापट्टा करून गृहलक्ष्मी, लेकीसुना तयार होतात. येणाऱ्या बायकांना डाळ, पन्हं देऊन त्यांची हरभऱ्याने ओटी भरली जाते. बाळगोपाळांची मस्ती आणि हास्याची कारंजी उडत राहतात.

नेमका गारांचा पाऊस पडतो. या गारेच्या स्पर्शाने चैत्रगौरीला गार केलं जातं. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षय्यतृतीया येते आणि निरोपाची घटिका येऊन थांबते. काय करू किती करू असं गृहलक्ष्मीला झालेलं असतं. सोनसळी उन्हाच्या रंगासारख्या आंब्याने अधूनमधून पानांत हजेरी लावलेली असते. म्हणून शेवयाच्या खिरीचा बेत ठरतो. तिच्याकडे दोन हातांवर घोळवत असलेल्या खास शेवया असतात. त्या हात लांब लांब करत बारीक केलेल्या असतात. जणू त्या तुटू नयेत, अक्षय्य रहाव्यात हाच हेतू असतो. ही गोष्ट मनात धरून या दिवशी खिरीचं प्रयोजन असेल का! एकीकडे दूध आटवत ठेवून ती तुपावर शेवया गुलाबी रंगावर परतून घेते. आणि अलगद, गठ्ठा होणार नाही अशा बेताने दुधात सोडते. हळूहळू बाळसं धरत त्या दुधात पोहू लागतात. केशर, वेलची आणि किसमिसाने सजावट पूर्ण होते. त्या खिरीचं रूप डोळय़ांना सुखावून जातं. नैवेद्यासाठी पुरण असतं. आकंठ भोजन करून चैत्रगौर जड पावलाने सासरी जाते. चैत्र कोवळय़ा पालवीने नटलेला असतो तर वैशाख पिवळाजर्द पेल्टाफोरम, बोगनवेल लाल केशरी गुलमोहराने रंगून गेलेला असतो. या गडदरंगी सुगंधी सजावटीने खुललेली चैत्रगौर ‘निघाले आज तिकडच्या घरी’ म्हणत अक्षय्य सुखात नाहून घरी परतते. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं, कमी न होणारं. सृजनाचा, निर्मितीचा सोहळा या दृष्य जगात घरोघरी निरंतर चालू रहावा म्हणून तर त्याला परंपरेचं, सणांचं कोंदण आणि म्हणून आजचा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त.