अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण. या दिवशी शुभ कार्य करताना कोणत्याही मुहूर्ताची गरज लागत नाही. शिवाय या दिवशी ज्या कोणत्याही गोष्टींची आपण खरेदी करतो तिचा कधीच क्षय होत नाही, असा समज यामागे असल्यामुळे अनेक घरात, कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या खरेदीसाठी या दिवसाची निवड केली जाते.
शिवाय या दिवसाला पौराणिक महत्त्वदेखील आहे. मराठी लग्न पद्धतीमध्ये पुजल्या जाणार्या अन्नपूर्णा देवीचा जन्मदेखील याच दिवशीचा म्हणून अनेक ठिकाणी या निमित्ताने अन्नदान केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या धान्याचे वाटप केले जाते अथवा गरजूंना पोटभर जेवण खाऊ घालण्यात येते. तर भागीरथी देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी अवतरली, अशीदेखील
मान्यता आहे.
या सणाच्या निमित्ताने नवीन घर, गाडी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारण आपण जे काही खरेदी करतो त्याचा र्हास न होता ते कायम आपल्याजवळ टिकून राहते, हा समज इतका खोल रुजलेला आहे की, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले असतानादेखील बहुसंख्य लोक आपल्या ऐपतीप्रमाणे, छोटीशी का होईना पण सोनं किंवा चांदीची खरेदी हमखास करतातच.
आपण आपल्या आयुष्यात ऐहिक सुखांना नेहमीच महत्त्व देत आलो आहोत. पण यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपण जर निसर्गाची किंवा पर्यावरणाची पूजा केली तर ती फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त असेल. तर कशी करू शकतो आपण पर्यावरणपूरक अक्षय्य तृतीया यासाठी काही छोट्या टिप्स-
हा सण वैशाख महिन्यात येत असल्यामुळे, या दिवसांत उन्हाचा जबरदस्त तडाखा असतो. त्यामुळे नवीन माठाची खरेदी या निमिताने केली जाते. किंबहुना उन्हाळ्यातील माठाचे पाणी पिण्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते. अनेक भागात पितरांच्या शांतीसाठी लहान मोठापासून मोठ्या माठांचे दान केले जाते. मूळात माठ हे तयार होतात मातीपासून म्हणजेच निसर्गापासून. तेव्हा सेंद्रिय मातीचा वापर करून तयार केलेले माठ घेण्यावर भर असावा. या दिवशी पूजेसाठी मातीच्या दिव्यांचा वापर करावा.
तुमच्या घरामधील कुंड्यांची माती या निमित्ताने बदलावी. फक्त घरातच नाही तर सभोवतालच्या परिसरात अथवा जिथे जिथे झाडांना नव्या मातीची गरज आहे, अशा झाडांना योग्य अशी सेंद्रिय माती आवर्जून टाकावी. अथवा झाडांना सेंद्रिय खत द्यावे. वरवर जरी ही छोटीशी कृती वाटत असली तरी तिच्यापासून झाडांना मिळणारे लाभ हे कैक पटीने महत्त्वाचे आहेत.
शक्य झाल्यास नवीन झाडांची खरेदी करा किंवा एखादे झाड दत्तक घेऊन त्याची जोपासना करा. अथवा झाडांचे दान करा. जेणेकरून जागोजागी निसर्ग बहरायला मदत होईल. बाल्कनीत, गच्चीवर अथवा रस्त्याच्या कडेला मातीच्या छोट्या भांड्यात पक्ष्यांसाठी व प्राण्यांसाठी पाणी भरून ठेवावे. एखादा तहानलेला जीव थोडेसे पाणी पिऊन जरी तृप्त झाला तरी त्यातून मिळणारे समाधान हे मनास आनंद देणारे असते.
या निमित्ताने पर्यावरणपूरक अशा वस्तूंचे दान करा, जसे- मातीची भांडी, सातू, बडीशोप, कलिंगड, ताडगोळे असे उन्हाचा दाह कमी करणार्या गोष्टी द्याव्यात.
या दिवशी घरासाठी सजावट करताना नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करावा. प्लास्टिक किंवा कृत्रिम स्वरूपाच्या वस्तू टाळाव्यात. झाडांची पाने अवतीभवती फुलणारी फुले यांच्या वापरातून सजावट करण्याला भर द्यावा. सण संपल्यावर सुकलेली फुले-पाने कचर्यात फेकून न देता त्यापासून खत निर्मितीवर भर द्यावा. घरच्या कचर्यापासून खत निर्मिती या संकल्पनेचा वापर प्रत्येक घरात रुजला तर बाहेर दिसणार्या कचर्याची समस्या कमी होण्यास बरीच मदत होऊ शकेल.
पूजेच्या निमित्ताने धूप-उदबत्ती लावताना त्या सेंद्रिय घटकांपासून बनल्या असतील अथवा गोवर्यांपासून बनल्या असतील अशा गोष्टींचा वापर करावा. त्या त्या ऋतूत येणारे सण हे प्रामुख्याने आपल्याच म्हणजेच मानवी शरीराची काळजी घेण्यासाठी आलेले असतात. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून त्या त्या गोष्टी त्या त्या ऋतूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच सणाच्या निमित्ताने फक्त सोन्या-चांदीच्या मागे न लागता सोन्यापेक्षाही भरभरून देणार्या निसर्गावर प्रेम करायला शिकलो तर खर्या अर्थाने ते अक्षय दानाचा उत्सव ठरेल.
suchup@gmail.com
