अक्षय्य तृतीयेदिवशी केलेले चांगले कार्य, दान आणि प्रयत्न यामुळे आयुष्यभर आपल्याला सुख, समृद्धी आणि कीर्ती मिळते. आपल्या घराला अक्षय आनंद देणारा, सुखसमृद्धीचं दान पदरात टाकणारा, आपल्या सुखद घटनांचा साक्षीदार असणारा असा हा सण…
हिंदू परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. आपल्या घराला सुख, समाधान आणि ऐश्वर्याचं दान अक्षय्य लाभावं यासाठी रखरखत्या उन्हाळ्यात अंत:करणाला थंडावा देणारा हा सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या घरासाठी या दिवशी प्रत्येकाच्या मनात ‘न क्षय: न भय: न क्षती इति अक्षय:’ हीच भावना असते.
अक्षय्य तृतीयेसंदर्भातल्या पौराणिक कथेनुसार हा दिवस माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी आपल्या घरी अन्नपूर्णा मातेची आराधना केल्यास अन्नपूर्णा प्रसन्न होऊन आयुष्यभर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते असे मानले जाते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला ्त्रिरया अन्नपूर्णा मातेची आवर्जून पूजा करताना दिसतात. आपल्या घरात धनसंपत्तीचा ओघ अखंड येत राहावा व घराचं ऐश्वर्य टिकून राहावं यासाठी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी आवर्जून घरात साखरपुडा, लग्न, उपनयन, वास्तुशांत अशी शुभकार्ये ठेवली जातात. त्याचप्रमाणे एखाद्या नवीन व्यवसायाचा किंवा नवीन प्रकल्पाचा श्रीगणेशा या दिवशी केला जातो, जेणेकरून त्या व्यवसायात किंवा प्रकल्पात आपल्याला अक्षय्य यश मिळेल हीच सदिच्छा प्रत्येकाच्या
मनात असते. नवीन घर, दागदागिने, वाहने यांची खरेदी जाणीवपूर्वक या दिवशी लोक करताना दिसतात. त्यामागे उद्देश हाच असतो की असे प्रसंग आपल्या घरात वारंवार घडत राहोत व आपले घर आनंदाच्या हिंदोळ्यात झुलत राहो…
आपल्या कृषी संस्कृतीतही हा सण महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील प्रथम पीक घेण्यासाठी, शेत तयार करण्यासाठी बळीराजा या दिवसापासून नांगरट सुरू करून शेतीच्या कामाचा श्रीगणेशा करतो व हा सण आनंदाने साजरा करतो. या दिवशी दान देणे सुखदायी मानले जाते. त्यामुळे लोक वस्तू, अन्न, बी-बियाणे इत्यादींचे दान करून पुण्य पदरात पाडून घेतात. या दिवशी आपल्या घरच्या पूर्वजांचे स्मरण करण्याची प्रथा असल्याने लोक पारंपरिक पद्धतीने आपल्या पितरांचे पूजन करून त्यांच्या स्मृतींनादेखील उजाळा देतात.
महाराष्ट्रात अक्षय्य तृतीयेपासून खर्या अर्थाने आंबे खायला सुरुवात केली जाते. त्यामुळे बहुतांश घरांत आमरस, पुरणपोळी असा गोडधोड स्वयंपाक बनवून घरात गोडवा निर्माण केला जातो. विदर्भ व खानदेशात अक्षय्य तृतीया ‘अखातीज’ किंवा ‘आखाजी’ या नावाने साजरा होतो. दिवाळीसारखा हा सण मोठ्या उत्साहाने तिथे घरोघरी साजरा केला जातो. लोक या दिवशी पाण्याची घागर भरून त्यावर छोटे मातीचे भांडे ठेवतात व त्यावर खरबूज, सांजोर्या, आंबे ठेवतात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते. आधी पितरांना पाण्याचा घट दिला जातो. मग घरात नवीन माठ खरेदी करून आणला जातो. ्त्रिरया पाटावर रांगोळी काढून त्यावर या घटाची पूजा करतात. या पूजेला ‘घागर भरणे’ असेही म्हटले जाते. घरातले लोक या दिवशी घरातल्या उंबरठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतात. एकेका पूर्वजांची नावे घेऊन त्यांना आमंत्रण दिले जाते व चुलीवर पितरांना घास अर्पण केला जातो.
या सणाची माहेरवाशिणी आतुरतेने वाट पाहत असतात. आईवडील लेकीचे कोडकौतुक करण्यासाठी तिला प्रेमाने माहेरी बोलावतात. आलेल्या गौराईची सगळी हौसमौज पुरवली जाते. तिच्या आनंदासाठी झाडाला पाळणे बांधले जातात. घरोघरी पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी, कुरडया, पापड, भजी असा साग्रसंगीत बेत आखला जातो. संसाराच्या रहाडगाड्यात अडकलेल्या माहेरवाशिणीला विसाव्याचे, मौजमजेचे चार क्षण देणारा हा सण आवडीचा असतो. नाशिक व पालघर जिल्ह्यातील आदिवासी अक्षय्य तृतीया हा सण ‘आखाती गौराई’ म्हणून साजरा करतात. सणाच्या नऊ दिवस आधी बांबूच्या लहान टोपलीत शेण व माती मिसळून त्यात नागली, वरी, भात, उडीद, तूर, कुळीद, मका इत्यादी सात प्रकारचे धान्य पेरतात. यालाच ‘आखाती गौराई’ म्हणतात. अक्षय्य तृतीयेला या गौराईची आदिवासी लोक मनोभावे पूजा करतात.
या दिवशी घरात खास गव्हाच्या पिठाचे गोड वडे, कडधान्याची भाजी बनवली जाते. गावात तरुण-तरुणी पारंपरिक तारपा नृत्य करतात, गाणी गातात व उत्साहाने हा सण साजरा करतात.
धनं विद्या भवेत् तेज:, अक्षय तृतीया सुखदायिका। सदा समृद्धिं प्राप्नोति, अक्षय तृतीया सुखदायिका।।
म्हणजेच अक्षय्य तृतीया हा असा शुभ दिवस आहे की या दिवशी केलेले चांगले कार्य, दान आणि प्रयत्न यामुळे आयुष्यभर आपल्याला सुख, समृद्धी आणि कीर्ती मिळते. तर असा आपल्या घराला अक्षय आनंद देणारा, सुखसमृद्धीचं दान पदरात टाकणारा, आपल्या सुखद घटनांचा साक्षीदार असणारा हा सण दरवर्षी लोक उत्साहाने साजरा करतात. म्हणूनच बहिणाबाई चौधरी म्हणतात-
आखाजीचा आखाजीचा मोलाचा सन देखा जी असा हा मोलाचा सण घरोघरी उत्साहाने साजरा होवो हीच सदिच्छा!
mukatkar@gmail.com
