प्रतीक हेमंत धानमेर
घर आणि पर्यावरण यांचं अतूट नातं सांगणारं सदर..
आजही भारतात अनेक गावांमध्ये सामूहिक सहकार्याने घरे बांधण्याची पद्धत अस्तित्वात आहे. यामध्ये गावातील एखाद्या व्यक्तीने घर बांधण्यास सुरुवात केली की गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती त्या घरासाठी हातभार लावते. घर बांधून पूर्ण झाल्यावर घरमालक गावातील इतर व्यक्तींच्या घरासाठी हातभार लावण्यास बांधील राहतो.
आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांनी एकदा पाच-सहा फउउ इमारतींचे फोटो दाखवले आणि विचारले- ‘‘सांगा, या इमारती कुठे आहेत?’’ त्या सर्व फोटोतील इमारती साधारण रहिवासी संकुलातील सामान्य इमारती असल्याने कोणालाच ते ओळखता आले नाही. मग त्यांनी चिऱ्याच्या दगडांत बांधलेले एक घर दाखवले आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. सर्वानी लगेच उत्तर दिले ‘कोकण’! मग त्यांनी पांढऱ्या मातीची घरे दाखवली. उत्तर- ‘मराठवाडा, विदर्भ’. मग आसाममधील बांबूची घरे; तेसुद्धा ओळखणं कठीण नव्हतं. जवळजवळ सर्वच घरे कोणत्या भागातील असतील ते सर्वानी सहज ओळखले. यावर प्राध्यापकांनी अंतर्मुख करणारा एक प्रश्न विचारला- ‘आर्किटेक्टने बांधलेल्या फउउ इमारती कोणत्या भागातील आहेत हे तुम्हाला ओळखता नाही आले, पण गावातील तिथल्या नैसर्गिक सामुग्री वापरून बांधलेली जवळजवळ सर्वच घरे तुम्हाला ओळखता आली. मग आपण आर्किटेक्ट या घरांची अगदी मूलभूत ओळख पुसून तर टाकत नाही ना?’’
त्या वेळी कदाचित विद्यार्थी असल्याने किंवा प्रॅक्टिस करत नसल्याने या प्रश्नांची खोली उमगली नाही. पण आर्किटेक्चरच्या व्यवसायामुळे भारतभर भ्रमंतीचा योग आला आणि विनाभिंतीच्या शाळांची कवाडं धडाधड उघडली. आणि त्या वेळी प्राध्यापकांनी विचारलेल्या या प्रश्नाचे गांभीर्य समजले.
निसर्ग हा सर्वसमावेशक असला तरी त्याने प्रत्येक सजीव-निर्जीवाला स्वत:ची अशी ठाम ओळख दिली आहे. ही ओळख सभोवतालच्या निसर्गाशी नाळ जोडून असते. अनेक नैसर्गिक परिसंस्थांच्या क्लिष्ट रचनेतून त्यांचा उगम झालेला असतो. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या ‘संस्कृती’ याच क्लिष्ट रचनांचा एक भाग आहेत. माणूस शेती करू लागल्यावर त्याच्या जीवनात स्थर्य आले आणि यातूनच कायमस्वरूपी निवाऱ्याची गरज निर्माण झाली. माणूस समाजशील प्राणी झाला. अर्थशास्त्राच्या उगमाने माणूस अजून मोठय़ा समूहात राहू लागला आणि नगरे निर्माण झाली. या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीत अनेक संस्कृतींचा जन्म झाला. माणसाच्या राहणीमानावर या संस्कृतींचा पगडा असे; किंबहुना अजूनही आहे. प्रत्येक संस्कृतीवर तिथल्या स्थानिक भूगोलाचा आणि वातावरणाचा प्रभाव असतो. माणसाची घरे बनवण्याची कलासुद्धा याच संस्कृतीबरोबर विकसित होत गेली.
आजही भारतात अनेक गावांमध्ये सामूहिक सहकार्याने घरे बांधण्याची पद्धत अस्तित्वात आहे. यामध्ये गावातील एखाद्या व्यक्तीने घर बांधण्यास सुरुवात केली की गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती त्या घरासाठी हातभार लावते. घर बांधून पूर्ण झाल्यावर घरमालक गावातील इतर व्यक्तींच्या घरासाठी हातभार लावण्यास बांधील राहतो. या रचनेमध्ये सामाजिक बांधिलकी कोणत्याही लिखित नियामाशिवाय इमानेइतबारे जपली जाते. घरांमध्ये आर्थिक विषमता दिसून येत नाही. गावाची रचना परस्पर सहकार्यातून आकार घेते. घरासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक स्रोतांचा वापर जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक केला जातो, कारण त्यावर सर्व समाजाचा समान हक्क असतो. एक साधी सामाजिक रचना कित्येक पातळीवर संवेदनशील आहे हे आपल्याला या उदाहरणातून जाणवते. एकदा अशाच एका प्रवासात मेळघाटमधील सेमाडोहा या आदिवासी गावात जाण्याचा योग आला. या गावातील सर्व घरे योजनाबद्ध शहर नियोजनाचा- अर्थात टाऊन प्लॅनिंगचा उत्तम नमुना आहेत. सलग एका रांगेत बांधलेली आणि सलग व्हरांडा असलेल्या घरांच्या रचनेमुळे गावात चुकून वाघ घुसला तर तो सहज दिसतो आणि मग आरोळी ठोकली जाते ‘‘वाघ आला रे आला!’’ सर्व घरांचे दरवाजे बंद. संध्याकाळी सर्व गाव व्हरांडय़ात बसलेला असतो. अगदी जत्रा लागल्यासारखा. या गावात एक पद्धत आहे. दर दिवाळीला संपूर्ण गाव एकत्र येऊन गावातील घरांना एकच रंग लावतात. उच्च-नीच, जातीयता, लहानमोठा हा भेद पुसून टाकण्याचा हा किती सोपा मार्ग! आणि या गावात जर कोणी काही गुन्हा केला असेल किंवा चोरी केली असेल तर फक्त त्या एका घराला रंग न लावता ते घर वेगळे पाडले जाते. बापरे! गावातील गुन्हे कमी करण्याची ही केवढी सोपी आणि सुंदर पद्धत. केवळ घराच्या रंगाचा किती मोठा प्रभाव! एक वास्तुविशारद म्हणून आपण या सांस्कृतिक रचनेची खोली कधीच समजू शकलो नसतो.
गावांमध्ये आजही घर बांधणे हा उत्सव आहे. आमच्या आदिवासी गावात घर बांधताना सर्वप्रथम अगदी मध्यावर देवाचा खांब गाडतात. हा खांब घराचे आयुष्य ठरवतो, कारण कोणत्याही foundation शिवाय तो लाकडी खांब जमिनीत गाडला जातो. खांबाचा खालचा बुंधा जसाच्या तसा ठेवला जातो. अर्थात जमिनीखाली असल्याने त्याला वाळवी लागणे स्वाभाविक आहे. पण आदिवासी ती वाळवी मारत नाहीत, तर त्या खांबाला सडू दिले जाते. घर हे निसर्गचक्राचा एक भाग आहे आणि काही काळाने ते निसर्गात पुन्हा विलीन झाले पाहिजे हा त्यांचा विचार. त्यांचा वाघोबा देवसुद्धा लाकडीच, निसर्गात पुन्हा विलीन होणारा. गरज नसताना सिमेंटचा भडिमार करून कायमस्वरूपी घराची आसक्ती बाळगणाऱ्या, पुढारलेल्या आपणा सर्वाना या सांस्कृतिक रचनेचे पावित्र्य कधी समजेल तरी का?
आजही, जेव्हा गावात एखादे मातीचे घर बांधून पूर्ण होते आणि त्यावर शेवटचा मातीचा गिलावा केला जातो, तेव्हा उरलेली माती एकमेकांच्या अंगावर उडवून आनंद साजरा केला जातो. ही धुळवड खेळून झाल्यावर सर्व एकत्र नदीवर किंवा पाणवठय़ावर अंघोळीला जातात. सिमेंटच्या घरांमुळे ही आनंद साजरा करण्याची पद्धत कायमस्वरूपी बंदच होत चालली आहे. आजही आदिवासी जेव्हा स्वत:च्या मालकीतील झाडे कापून घर बनवतो तेव्हा त्याच वर्षी पावसाळ्यात आपल्या मुलासाठी झाडे लावतो, जेणेकरून २० वर्षांनी त्याचा मुलगा ती झाडे वापरून स्वत:ला हवे तसे घर बंधू शकेल. ‘वारसा’ म्हणजे हेच नाही का? घर आणि संस्कृतीची ही गुंफण मी तरी आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात शिकलो नाही.
ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा मातीने ब्रह्माकडे एक वरदान मागितले- ‘‘जेव्हा जेव्हा मला पाण्याचा स्पर्श होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा जिवंत व्हायला हवी.’’ आपल्या पूर्वजांनी पूर्वापार मातीच्या या वरदानाचा आदर करून घरे बांधली, मातीला जिवंत ठेवले. मग आपला आताचा सुशिक्षित पुढारलेला समाज मातीला ‘शाप’ देऊन का मारतो आहे? उत्तर मिळाले तर मलाही सांगा.
मातीचे प्लास्टर करताना एकमेकांच्या अंगाला माती लावून काम साजरे करायची पद्धत
n pratik@designjatra.org