scorecardresearch

निवारा : जैविक विविधतेला आसरा देणारी घरे

महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यात वावरणारा वारली आदिवासी समाज.

निवारा : जैविक विविधतेला आसरा देणारी घरे
(संग्रहित छायाचित्र)

शार्दूल पाटील

घर आणि पर्यावरण यांचं अतूट नातं सांगणारं सदर..

आदिवासी समाजाचे पारंपरिक घर बंधणे, त्याची डागडुजी करणे हे तेथील जीवसृष्टीचा ऱ्हास करीत नाही, उलट त्यास फायदेशीर असते. बऱ्याच वेळी या घराला आर्थिक मोल काहीच नसते, पण त्याचे पर्यावरणाशी असलेले संयत नाते अमूल्य असते.

महाराष्ट्रातील ठाणे</span>, पालघर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यात वावरणारा वारली आदिवासी समाज. आज या समाजाने आपली परंपरा, संस्कृती आणि जीवनशैली लोककलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर चच्रेस आणली आहे. घनदाट जंगलात उत्कर्षति होणारी आदिवासी संस्कृती आणि परिसराच्या जैवविविधतेशी सुसंवाद मांडणारा वारली माणूस हा स्थानिक निसर्गचक्राचा एक अतूट अंश आहे. आदिवासी समाजाची ‘धन्वंतरी’ (म्हणजेच जीवसृष्टी) वर प्रगाढ आस्था आहे. मानवी हस्तक्षेप होऊ न देता पिढय़ान् पिढय़ा त्यांनी जोपासलेल्या वनराया ही त्यांची श्रद्धा. रानातील वनस्पतींपासून तयार केले जाणारे अत्यंत साधे, परंतु अत्यंत पोषक असे व्यंजन तसेच या समाजाच्या वनलग्नाच्या पद्धती आणि असे नैसर्गिक जीवनशैलीचे कित्येक पलू हा समाज गेली अनेक वर्षे जगासमोर उलगडत आहे. त्यातील एक पलू म्हणजे– ‘आदिवासी समाजात बांधले जाणारे घर’. वारली आदिवासी लोककलेत काढले जाणारे घर हे वन बी.एच.के किंवा टू बी.एच.के अशा संकुचित विचारसरणीच्या पलीकडे जाणारे आहे. या चित्रात घराच्या चार भिंतींबरोबर काढले जाते त्या घराचे जैवविविधतेने नटलेले आवार, त्या घरात राहणारी जनावरे व प्राणी, गावाच्या जवळून वाहणारा नितळ ओढा, तसेच जंगल आणि त्यात वसणारे आदिवासी संस्कृतीचे राखणदार, म्हणजेच ‘वाघोबा’, जंगलातील शेती आणि या सगळ्यांचा आनंद लुटणाऱ्या घरमालकाचे कुटुंब. या घरांचे जीवसृष्टीशी असणारे नाते हे त्या घराच्या प्रत्येक घटकातून दिसून येते. उदाहरणार्थ, आदिवासी घरात असणाऱ्या कुडाच्या भिंती, बांबू, कारवी अथवा कोणत्याही ताण घेण्यास समर्थ अशा गवताच्या किंवा झुडपाच्या काडय़ा घट्ट विणून, त्यावर माती आणि शेणाचा गिलावा करून या भिंती बनविल्या जातात. उष्ण व दमट वातावरणात बनवल्या जाणाऱ्या या भिंती जास्तीत जास्त दोन इंच रुंदीच्या असतात. बारीक आणि सच्छिद्र असल्याने या भिंती घरातला दमटपणा आणि तापमान नियंत्रित ठेवतात. त्यामुळे घरात आरामदायी वातावरण निर्माण करायला पंखा नको की एसी नको. वीज उत्पादनासाठी कोळसा जाळून जीवसृष्टीचा ऱ्हास करणाऱ्या आपल्या ‘आधुनिक’ संस्कृतीला ऊर्जा बचतीचे असे अनेक सहज सोपे पर्यायही आदिवासी संस्कृती कित्येत शतके देत आली आहे. जीवसृष्टीतल्या घटकांप्रमाणेच काही काळाने ही भिंत कुजते. निसर्गात उद्भवणाऱ्या सगळ्याच गोष्टी या नाशिवंत असून, त्यांचे या पृथ्वीवरचे कार्य संपले की त्या निसर्गात विलीन होतात. या विचारांचा आदिवासी समाज, आपल्या देवाच्या, म्हणजेच वाघोबाच्या मूर्तीलासुद्धा एका ठरावीक काळानंतर निसर्गाला अíपत करून त्या जागी नवीन मूर्तीची स्थापना करतो. अगदी तसेच, आपल्या घराच्या भिंती कुजल्या की त्या काढायच्या आणि जंगलात जाऊन निसर्गाला परत द्यायच्या. त्या भिंतींचे उत्तम खत होते, त्याला लागलेले शेण आणि माती जंगलातील रोपांचे पोषण करते. काही काळाने हीच रोपे पुन्हा हा आदिवासी समाज आपल्या भिंती बांधायला वापरतो. भिंतीला लागणारा खर्च म्हणजे जंगलात जाऊन कारवी किंवा बांबू आणून तो विणायला जाणारा वेळ. आर्थिक खर्च काहीच नाही. असे घर बांधायला लागणारे ‘लाकूड, झुडपे आणि माती’ पुढच्या पिढीला सहज उपलब्ध व्हावे म्हणून आदिवासी जंगल राखतो. आदिवासी समाजाचे पारंपरिक घर बंधणे, त्याची डागडुजी करणे हे तेथील जीवसृष्टीचा ऱ्हास करीत नाही, उलट त्यास फायदेशीर असते. बऱ्याच वेळी या घराला आर्थिक मोल काहीच नसते, पण त्याचे पर्यावरणाशी असलेले संयत नाते अमूल्य असते. हे घर मनुष्यालाच नाही, तर जीवसृष्टीतल्या अनेक घटकांना आसरा देते. शेतकामात सवंगडी असणारी गुरे, उंदीर नियंत्रित ठेवणारे सर्प व मांजरी, दररोज नवीन भाजी मिळावी इतकी फळझाडे व रानभाज्या, घराची सतर्क ‘सिक्युरिटी’ म्हणजेच कुत्रा, मच्छर नियंत्रित ठेवणारे कोळी आणि पाली, घराच्या छपरात लपून निरनिराळ्या गाण्यांनी मन हलके करणारी पाखरे असे अनेक जीव जनावर आदिवासींचे कुटुंबीय. ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामय:’ या प्राचीन भारतीय शिकवणुकीचे जिवंत उदाहरण म्हणजे हे ‘घर’.

आज शहरी माणूस ज्या प्रकारच्या वास्तुरचनेत आपले वास्तव्य करत आहे, ते घर हे याच्या उलट कार्य करताना दिसून येते. सिमेंट, स्टील, केमिकल पेंट अशा अनेक रसायनाच्या वापरामुळे बांधकाम व्यवसाय जागतिक प्रदूषणाला कारणीभूत ठरतो आहे. ही घरे त्या त्या परिसराच्या हवामानाशी अनुकूल नसल्याने त्यात आरामदायी परिस्थिती निर्माण करण्यासाठी अपार ऊर्जेची गरज भासते. जगभरातून ‘सुंदर’ व ‘फिनिश्ड’ असे मटेरियल आपण आपल्या घरात वापरतो. ते मटेरियल आपल्यापर्यंत पोहोचण्याकरिता लागलेली ऊर्जा एकीकडे, पण ते मटेरियल जिथून येते तेथील जीवसृष्टीचा, तेथील समाजाचा होणारा विनाश वेगळा. अवतीभवती असलेली जीवसृष्टीचा विनाश करून बनवलेल्या या इमारती जैवविविधतेचे संतुलन भंग करतात. संपूर्ण जीवसृष्टीला आसरा न मिळाल्याने, त्यातील एखाद्या घटकाचा भडिमार होऊ लागतो (उदा. मच्छर). या सगळ्याचा परिणाम शेवटी होतो तो या घरात राहणाऱ्या माणसावरच. शहरी माणूस सौंदर्यदृष्टीपायी इमारतीला काचेची तावदाने लावतो. यामुळे इमारत आतून प्रचंड तापते. हे तापमान नियंत्रित करायला संपूर्ण इमारत वातानुकूलित केली जाते. या वातानुकूलित पद्धतीमुळे खुल्या हवेचा एका अंशालासुद्धा मुकलेल्या या बहुमजली इमारतींना आता विज्ञान ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’ असे म्हणत आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृतीच्या या देणगीला ‘विकास’ म्हणून आपल्या आरोग्याला पूरक अशा पारंपरिक घरांना ‘मागासलेले’ ठरवतो. इतकेच नाही तर निसर्गाला बरोबर घेऊन जाणारी, आपली पुरातन भारतीय संस्कृतीसुद्धा आत्ता याच विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना दिसते.

आदिवासी संस्कृतीइतके जीवसृष्टीला अनुसरून चालणे आज कदाचित शहरी माणसाला इच्छा असूनही करणे शक्य नसेल. पण गरज असते ती निसर्गाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची. विलुप्त होणाऱ्या चिऊताईला आपल्या घरात आसरा देण्याची. तिच्या चिवचिवाटाने मन आणि घर भरून येण्याचे. किंवा स्वत:च्या गच्चीवर आपल्याच घराच्या नाशिवंत ओल्या कचऱ्यापासून उगवलेल्या भाजीच्या आस्वादाचे वर्णन करायला कदाचित हा लेख कमी पडेल!

shardul@designjatra.org

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2019 at 01:43 IST

संबंधित बातम्या