अग्निसुरक्षेचे तीन तेरा

मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या वर्षभरात लागोपाठ आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यात वित्तहानीबरोबरच जीवितहानीदेखील झाली

(संग्रहित छायाचित्र)

विश्वासराव सकपाळ

आगीची कारणे शोधून काढणे व ती कळल्यावर आग लागूच नये म्हणून कोणती  उपाययोजना करावी याचा वेध घेणारा प्रस्तुत लेख..

मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या  एस. एस. फोर्ट स्टीकिन या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. या घटनेला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिवर्षी १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिन’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. या सप्ताहाचे वैशिष्टय़ असे की, स्थानिक संस्थांचे अग्निशमन दल आणि विविध सामाजिक संस्था आग विझविण्याची विविध प्रात्यक्षिके, फायर ड्रिल, मॉक ड्रिल, व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शन व चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. परंतु खेदाची गोष्ट अशी की, आपल्याकडे आगीसारख्या दुर्घटना व त्यामुळे होणारी वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना खंबीरपणे राबविण्यासाठी कमालीची उदासीनता व निष्काळजीपणा दिसून येतो, तसेच रोजच्या व्यवहारातही अग्निसुरक्षेबाबत आढळणाऱ्या बेफिकिरीमुळे अग्निसंकटाचे आव्हान सर्वत्र कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षित जीवन जगण्याच्या हक्कालाच बाधा येत आहे.

मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या वर्षभरात लागोपाठ आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यात वित्तहानीबरोबरच जीवितहानीदेखील झाली. त्याचबरोबर झोपडपट्टीत लागलेल्या आगीच्या घटना या प्रामुख्याने स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन अनेकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेली आग ही ‘वन अबव्ह’ या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी हुक्का विक्री सुरू होती.

हुक्क्यासाठी दगडी कोळसा पेटविण्यासाठी निखारे करण्याची यंत्रणा हॉटेलच्या एका कोपऱ्यात  होती. कोळशाचे निखारे करण्याच्या प्रक्रियेत ठिणगी पडून आगीची घटना घडल्याचा अहवाल सादर करण्यात आला. या सर्व घटना रात्रीच्या वेळेस घडलेल्या आहेत हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

राज्यातील नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारे व रात्रीच्या वेळेत चालणारे असुरक्षित नवनवीन उद्योग व वाईट सवयी याकडे पालिका प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे आणि या अनास्थेमागे नक्की कारण काय आहे व याला जबाबदार असणाऱ्या संपूर्ण साखळीचा प्रशासनाने शोध घेतला पाहिजे. एवढय़ा घटना घडूनदेखील पालिका प्रशासन सुस्त आहे. आजही रात्रीच्या वेळेस तुम्ही जर शहराच्या विविध भागांतून फेरफटका मारलात तर तुम्हाला या भयावह परिस्थितीची कल्पना येईल.

*  रस्त्यावर ठिकठिकाणी गॅसच्या चुलीवर चायनीज पदार्थाची खुलेआम विक्री चालते. यासाठी मोठय़ा कढयांचा सर्रास वापर केला जातो.

*  पहाटे ५ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत उघडय़ा जागेत किंवा लाकडी टपरीवर स्टोव्ह अथवा गॅसच्या चुलीवर चहा तयार करण्याची व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असते.

*  रस्त्यावर बिर्याणी, चिकन, ऑम्लेट, भुर्जी-पाव व अन्य खाद्यपदार्थ तयार करण्याच्या गाडय़ा लागतात. तेथेही उघडय़ावरच स्टोव्ह अथवा गॅस-चुलीचा वापर करण्यात येतो.

*  काही ठिकाणी रस्त्यावरच किंवा लाकडी टपरीत चिकन / मटण तंदुरीसाठी कोळशाची भट्टी लावण्यात येते. तेथेही निखारे तयार करण्यासाठी दगडी कोळशाचा सर्रास वापर केला जातो.

*  रस्त्यावरच वडा-पाव, भजी, भाजी-पाव, सामोसे,  इत्यादी पदार्थ स्टोव्ह अथवा गॅसच्या चुलीवर तयार करण्याच्या गाडय़ा लागतात.

अशा प्रकारच्या गाडय़ा शहराच्या सर्व भागांत दिसून येतात. यात काहीच नवल नाही, परंतु अशा प्रकारच्या गाडय़ा पालिका प्रशासनाच्या मुख्यालयाबाहेरच तसेच जिल्हाधिकारी कार्यालये, न्यायालये, पोलीस मुख्यालयाबाहेरच बिनदिक्कतपणे दिवस-रात्र आपला व्यवसाय करताना दिसतात. परंतु एकाही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे तसेच अग्निशमन दलाचे व अतिक्रमण विभागाचे तिकडे लक्ष जात नाही हे अनाकलनीय आहे. राज्यातील शहरी भागात ज्या वेगाने इमारतींचे बांधकाम सुरू आहे हे लक्षात घेता याआधीच्या काळातील वित्तहानी व जीवितहानी बघता अग्निसुरक्षेचे महत्त्व अधिक प्रभावीपणे अधोरेखित होते. शहरातील बहुतांश इमारती अग्निसुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याला सहकारी गृहनिर्माण संस्था अपवाद नाहीत.

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अग्निसुरक्षेचे सर्व निकष व नियम यांचे पालन करणे आवश्यकआहे. त्याबाबतची अधिक माहिती खालीलप्रमाणे

* महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ कलम (३) अन्वये इमारतींचे मालक / भोगवटादार यांनी आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांच्या तरतुदींचे पालन करणे व उपाययोजनांची साधने बसविणे व ती सुस्थितीत व कार्यक्षम अवस्थेत ठेवण्याची जबाबदारी इमारतींच्या मालक / भोगवटादार यांची आहे. प्रत्येक मालक / भोगवटादार यांनी अग्निसुरक्षा व जीवसंरक्षक उपाययोजनांच्या साधनांचे परिरक्षण नोंदणीकृत अनुज्ञप्तीधारक अभिकरणांकडून करून घेऊन त्या कार्यक्षम अवस्थेत असल्यासंबंधी विहित नमुन्यातील ‘नमुना ब’ प्रमाणपत्र वर्षांतून दोन वेळा जानेवारी व जुलै महिन्यात प्रमुख अग्निशमन अधिकारी किंवा नामनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.

* अग्निसुरक्षा नियम आणि संबंधित पालिकांच्या बांधकामविषयक नियमाप्रमाणे प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेत पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असणे बंधनकारक आहे.

* दोन इमारतींमध्ये किमान ९ मीटर अंतर असावे. एखाद्या इमारतीत आग लागल्यास आगीचा बंब आग लागलेल्या ठिकाणी विनाविलंब पोहोचावा. हा परिसर सर्वकाळ मोकळा ठेवण्याची जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची आहे.

* सहकारी गृहनिर्माण संस्थेतील प्रत्येक सभासदाला अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. आगीसारख्या दुर्घटनेत त्याचा नक्कीच फायदा होईल.

* प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेत सहा महिन्यांतून एकदा मॉक फायर ड्रिल म्हणजेच लुटुपुटुची आग विझविणे किंवा प्रतिकात्मक आग विझविण्याचा सराव करण्यात यावा.

* संस्थेत आग लागल्यास वापरावयाच्या उद्वाहनावर ‘फायर लिफ्ट’ असे ठळकपणे लिहिणे बंधनकारक आहे. तसेच स्वतंत्र जिनाही असणे बंधनकारक आहे. तसेच उंच इमारतींच्या ठरावीक मजल्यावर रेस्क्यू बाल्कनी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे इमारतीला आग लागल्यास संस्थेतील सदस्यांना एकत्र जमणे व तेथून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे अग्निशमन दलाच्या जवानांना सहज शक्य होते. उंच इमारतीमधील उद्वाहनांसाठी पर्यायी विजेची सोय असणे बंधनकारक आहे. पालिका स्तरावर अग्निशमन परवाना नसलेल्या हुक्का पार्लर व लाउंज बारवर कारवाई करण्यात यावी. अनधिकृत हॉटेल्स, भटारखाने व रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या गाडय़ांना अनधिकृतपणे गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या गॅस वितरकावर कारवाई करण्यात यावी.

vish26rao@yahoo.co.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on should look at what measures should be taken to prevent fire

ताज्या बातम्या