scorecardresearch

निवारा : आजच्या काळातील शाश्वत बांधकाम शैली

शाश्वत बांधकाम हे कोणते साहित्य वापरून केले किंवा कोणते तंत्रज्ञान वापरून केले यावर अवलंबून नसून त्यात अनेक स्तर असतात.

निवारा : आजच्या काळातील शाश्वत बांधकाम शैली
(संग्रहित छायाचित्र)

विनिता कौर चिरागिया

शहर आणि गाव ही मानवी सामाजिक रचनेची दोन महत्त्वाची अंगे असून, आर्थिक आणि जीवनावश्यक स्रोतांसाठी ती परस्परावलंबी आहेत. आज तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शहर आणि गावातील अंतर कमी होत असताना शहरी महत्त्वाकांक्षेची स्वप्ने गावाला पडू लागली आहेत. शहरातील सुखसुविधांकडे गावकरी आकर्षति होत आहेत. याउलट शहरातील गुतागुंतीच्या चाकोरीमधून दोन घटका वेळ काढून शहरी माणूस आंतरिक शांततेसाठी गावाकडे जातो आहे. प्रत्येक जागेचे स्वत:चे फायदे-तोटे आहेत आणि स्वत:ची शश्वतता आहे. या शाश्वततेकडे निष्पक्षपणे पाहून यातील नैसर्गिक, वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक शाश्वततेला आपण समजून घ्यायला हवे.

शाश्वत बांधकाम हे कोणते साहित्य वापरून केले किंवा कोणते तंत्रज्ञान वापरून केले यावर अवलंबून नसून त्यात अनेक स्तर असतात. औद्योगिक बांधकाम साहित्य हे जरी आर्थिक शाश्वततेसाठी अत्यावश्यक असले, तरी बांधकाम नैसर्गिक आणि सामाजिकदृष्टय़ा प्रासंगिक आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. गावाकडे घरे बांधण्यासाठी माती, विटा, बांबू, कौले, लाकूड असे साहित्य काही किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध होते. परंतु शहरात अतिघनतेच्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी आणि आर्थिक तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या वेळेच्या गणिताप्रमाणे हे साहित्य औद्योगिक साहित्याशी स्पर्धा करू शकत नाही. हेच औद्योगिक बांधकाम साहित्य निसर्गचक्रात भाग घेत नसल्याने, त्याचा जबादारीने वापर करणे हे आपले कर्तव्य आहे.

बऱ्याचदा शहरात घरांची रचना वैयक्तिक अपेक्षेनुसार करणे हे अतिखर्चीक किंवा जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे आहे त्या रचनेमध्ये आंतरिक सजावट करून आपण आपल्या वैयक्तिक अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आंतरिक सजावट ही मुख्यत्वेकरून घराचे सौंदर्य आणि सुखसुविधा यावर केंद्रित असते. मोठय़ा खिडक्या आणि काचेची तावदाने घराचे तापमान वाढवतात. औद्योगिक बांधकाम साहित्य हवामानाशी अनुकूलन साधत नसल्याने बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवर आपण या अडचणींवर मात करू शकतो. घरात बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये झाडांची लागवड केल्याने शुद्ध आणि थंड हवा आपण घरात घेऊ शकतो. घराची आंतरिक सजावट करताना भिंतीचे रंग हा महत्त्वाचा मुद्दा असतो. पण या रंगातील रसायने आपल्या आरोग्याला हानीकारक असतात. यावर बरेच नैसर्गिक पर्याय उपलब्ध होत आहेत. घरामध्ये नैसर्गिक हवा खेळती ठेवण्यावर आपण भर द्यायला हवा. आज बऱ्याच वसाहतींमध्ये टेरेस गार्डिनगला परवानगी मिळत नाही (मातीमुळे इमारतीचे एलीवेशन खराब होते). परंतु इमारतीचे छप्पर थंड ठेवण्याचा आणि फळे व भाज्यांचे उत्पादन घेण्याचा यापेक्षा सुंदर उपाय तो कोणता? आज कचरा व्यवस्थापन ही शहरातील जटिल समस्या आहे. कित्येक वसाहती आज एकत्र येऊन कचरा व्यवस्थापन आणि विनिमय करत आहेत. स्वत:च्याच वसाहतीत ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करून झाडांची लागवड केल्याने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील तापमान कमी करू शकतो. झाडे प्रदूषण नियंत्रित करतात तसेच आपले मानसिक आरोग्यसुद्धा उत्तम ठेवतात. यामुळे मुंबईच्या आजूबाजूचे कचऱ्याचे डोंगर कमी होऊ शकतात. वसाहतीतील ध्वनिप्रदूषणसुद्धा नियंत्रित होते. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील ही शाश्वतता नव्हे का?

शहरांमध्ये येणारे पाणीसुद्धा शहराबाहेरून येते आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावांवर त्याचा ताण पडतो. कित्येक गावे दुष्काळाशी झगडत असताना आपल्याला परिश्रमाशिवाय पाणी मिळत असल्याने आपण त्याबाबत सजग नसतो. आपल्या वसाहतीत पर्जन्यपाणी साठवण्यासाठी सुविधा असणे आणि नसल्यास त्यासाठी पाठपुरावा करणे हे जल शाश्वततेकडे आपले पहिले पाऊल. ग्राहकाला हवे ते पुरवणे हे बाजार व्यवस्थापानाचे पहिले आर्थिक उद्दिष्ट असते. मग हुशार ग्राहक म्हणून आपण अशी उद्दिष्टे नको का ठेवायला? शाश्वत जीवनशैली आपल्या वृत्तीत असावी लागते. यासाठी सरकार प्रयत्न करेल किंवा पर्यावरणतज्ज्ञ यावर तोडगा काढतील, असा संकुचित विचार आपण बाजूला ठेवायला हवा.

भारतात शहरे स्मार्ट बनवताना पाश्चिमात्य वास्तुशैलीचे अंधानुकरण हा खूप मोठा प्रश्न आहे. आज मुंबईसारख्या उष्ण व दमट हवामानात सूर्याभिमुख इमारतीत काचेची तावदाने लावण्याची एक वेगळीच परंपरा आली आहे. थंड प्रदेशातील इमारतीत काचेची तावदाने उष्णता रोखून ठेवतात परंतु आपल्या हवामानाला त्याचा उलट परिणाम होतो. यामुळे वातानुकूलन आणि ऊर्जेचा खर्च प्रचंड वाढतो. या इमारतीमध्ये नैसर्गिक खेळती हवा नसल्याने त्याचा वैयक्तिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. एका बाजूला दुष्काळ आणि जागतिक तापमानवाढीसारखे भयंकर विषय असताना दुसऱ्या बाजूला अशा इमारती बांधून आपण नाहक ऊर्जेची नासाडी करत आहोत. अशा इमारतींची दिखाऊ प्रतिष्ठा जेव्हा विकसनशील गावांकडे जाते तेव्हा गावेसुद्धा याचे विश्लेषण न करता अशा बांधकामाला सहमती देतात. या अर्धवट ज्ञानाची अनेक उदाहरणे आज आपल्याला शहरांमध्ये आणि गावांमध्ये दिसत आहेत. या सर्वावर वैयक्तिक पातळीबरोबर सामाजिक आणि राजकीय पातळीवरसुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. आज कित्येक संस्था अशा शाश्वत बांधकामासाठी कार्यरत आहेत. सरकारी योजना आखताना पर्यावरणाला पाया मानून योजनांची आखणी व्हायला हवी. यासाठी सुजाण नागरिक म्हणून आपण विविध पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

गाव असो की शहर, बांधकामाची शाश्वतता पडताळून त्याचे उद्देश, गरज आणि संदर्भ लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक याबाबत जागरूक आहे अशा लोकांच्या संपर्कात येऊन या विषयाची खोली, गोडी आणि गांभीर्य

समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने वाटचाल करणे ही जबाबदारी. विकास आणि शाश्वतता यातील परस्पर संबंध लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर विषय अधिक सोपा होईल.

साधारण २० वर्षांपूर्वी हिंदीच्या पुस्तकात एक कविता होती-

बहुत दिनों से सोच रहा था,

थोडमी धरती पाऊॅं

उस धरती में बागबगीचा,

जो हो सके लगाऊॅं ..

लेकिन एक इंच धरती भी

कहीं नहीं मिल पाई

एक पेंडम् भी नहीं, कहे जो

मुझको अपना भाई

अशी परिस्थिती येण्याअगोदरच आपण शाश्वततेला गांभीर्याने घ्यायला नको का?

अनुवाद- प्रतीक हेमंत धानमेर

vinita@designjatra.org

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2019 at 01:55 IST

संबंधित बातम्या