आजच्या जागेच्या टंचाईच्या काळात ज्या घरांना बाल्कनी असते ती घरे भाग्यवान खरीच, पण काही घरांना तर चक्क स्वत:चे असे टेरेसदेखील असते. यातून जर हे टेरेस दिवाणखान्याला लागून असेल तर दुधात साखरच.

आजकाल इमारती इतक्या एकमेकींना लागून असतात की आपल्या खिडकीत उभे राहिले की थेट शेजारील इमारतीतील एखाद्या घराचेच दर्शन घ्यावे लागते. मग व्ह्यू वगैरे भानगडी तर विसरूनच जा. अशा वेळी स्वतंत्र टेरेस असल्यास आपला व्ह्यू आपणच तयार करू शकतो. आता टेरेस म्हटलं की ओघानेच सर्वप्रथम आपल्या नजरेसमोर येतं ते टेरेस गार्डन.

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
Gokhale Bridge
गोखले पुलाचे ढिसाळ नियोजन, निवृत्त अधिकाऱ्याला पालिकेच्या पायघड्या
nagpur, 62 Year Old , Patient, placed Ventilator on stretcher, Dies, Medical Hospital, Family, Not Informed, for Five Hours,
रुग्णाला स्ट्रेचरवर लावले व्हेंटिलेटर, रुग्ण पाच तासांपूर्वीच दगावला; तरीही डॉक्टरांनी…

टेरेस गार्डनही दोन प्रकारे होऊ शकतात. एक प्रत्यक्ष माती पसरून त्यावर झाडे वाढविणे किंवा लहान-मोठय़ा कुंडय़ांचा वापर करत बगीचा फुलविणे. यातला दुसरा प्रकार त्या मानाने सोपा, किफायतशीर आणि त्याचसोबत सुरक्षितदेखील. पहिल्या प्रकारे टेरेस गार्डन करायचे झाल्यास मात्र थोडे किचकट काम. सर्वप्रथम इमारत फार जुनी असल्यास तिचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले असावे आणि त्यातून इमारतीला फिटनेस  सर्टिफिकेटदेखील मिळणे आवश्यक. त्यानंतर विचार करावा लागतो अजून काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा. यात सर्वप्रथम क्रमांक लागतो तो वॉटर प्रूफिंगचा. कोणत्याही इमारतीचे टेरेस हे मूलत: वॉटर प्रूफिंग करूनच बनवले जाते, परंतु तरीही टेरेस गार्डन बनवताना मात्र आणखी काळजी घेऊन वॉटर प्रूफिंग करणे गरजेचे असते. यात संपूर्ण टेरेसवरील जुना ब्रिकबॅट कोबा तोडून मूळ स्लॅबपर्यंत पोहोचून तिथे वॉटर प्रूफिंग करून त्यावर पुन्हा नवा ब्रिकबॅट कोबा बनवून पुन्हा एकदा वॉटर प्रूफिंग करून, सरतेशेवटी त्यावर चायना चिप्ससारखे फ्लोरिंग बसवून मगच प्रत्यक्ष मातीचा थर देणे योग्य ठरते.

या टप्प्यावर आपल्याला गरज लागते ती एका हॉर्टीकल्चरिस्टची. आपल्या टेरेस गार्डनला कोणती माती योग्य, त्यावर कोणत्या प्रकारची झाडे आपण वाढवू शकतो या सर्व गोष्टींची शास्त्रशुद्ध माहिती असणाऱ्या हॉर्टीकल्चरिस्टचा सल्ला टेरेस गार्डन फुलवताना फार मोलाचा. टेरेसवर लावण्यासाठी कोणती झाडे योग्य-अयोग्य यावर अधिकाराने एक हॉर्टीकल्चरिस्टच बोलू शकतो. परंतु सर्वसाधारण माहिती तर आपल्यालाही असणे गरजेचे आहे. टेरेस गार्डनसाठी झाडे निवडताना ज्या झाडांची मुळे फार खोलवर जात नाहीत अशीच झाडे निवडावीत. आंबा, वड अशी वृक्ष प्रकारात मोडणारी झाडे मुळीच निवडू नयेत. कारण या झाडांची मुळे खोलवर जातात आणि त्यातूनही त्यांची भेदकता प्रचंड असल्याने टेरेसच्या स्लॅबच्या आत देखील ती घुसून इमारतीचे मोठे नुकसान करू शकतात.

मुळात घराला टेरेस आहे म्हणून प्रत्येक वेळी टेरेस गार्डनच केलं पाहिजे. हा मात्र काही नियम नाही. उत्तम फ्लोरिंग, सुटसुटीत फर्निचर, एखादी छान वॉटर बॉडी आणि साथीला मस्त बार्बेक्यू किंवा बार असेल तरी आपले टेरेस परिपूर्ण होऊ शकते. नेहमीच पार्टी मूड असणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारचे टेरेस उपयुक्त.

टेरेससाठी बैठकीची व्यवस्था करताना दोन प्रकारे ती होऊ शकते. एक तर हलक्या वजनाचे सुटसुटीत फर्निचर वापरून, म्हणजे जेव्हा टेरेस मोकळी हवी असेल तेव्हा पटकन ते एका कोपऱ्यात रचून ठेवता आले पाहिजे. यात अगदी झोपाळ्याचादेखील समावेश होतो. हलक्या वजनाचे आणि फोल्डेबल झोपाळेही बाजारात मिळतातच. दुसऱ्या प्रकारात थेट बांधकाम करूनही छान दगडी किंवा टाइल्सने सजवलेली सोफ्याच्या आकारातील बैठकही आपण बनवून घेऊ शकतो. पावसाळा सोडून इतर वेळी यावर छान गाद्या, लोड कुशन्स ठेवल्या की झाले आपले सोफे तयार. अशा प्रकारच्या टेरेसला एका कोपऱ्यात बार्बेक्यू किंवा बार असेल तर टेरेसचे सौंदर्य द्विगुणित व्हायला हातभारच लागेल. पूर्वी अशा प्रकारचे बार्बेक्यू बांधून काढावे लागत, अर्थात! तुम्ही जर तेवढे शौकीन असाल तर आजही ते करूच शकता, परंतु हल्ली बाजारात नवनवीन तऱ्हेचे आणि अगदी कमी जागेत मावतील असे तयार बार्बेक्यूदेखील मिळतात.

टेरेसवर एखादे कारंजे किंवा कृत्रिम धबधब्याच्या स्वरूपात वॉटर बॉडीदेखील असेल तर अशा टेरेसची काय मिजास. शक्यतो टेरेसवर पाऊल ठेवल्या ठेवल्या दर्शनी भागात अशा वॉटर बॉडीची व्यवस्था असावी जेणेकरून मन उल्हसित होईल. वॉटर बॉडी हीच आपल्या टेरेसचे मुख्य आकर्षण असल्यास टेरेसवर इतर ठिकाणीही निळ्या व हिरव्या रंगांचा वापर थोडा अधिक करावा. एरवी राखाडी, बदामी रंगांच्या भिंती, वर बैठकीवर रात्रीच्या कार्यक्रमासाठी थोडय़ा भडक रंगाच्या कुशन्स, तक्के तर दिवसासाठी पांढऱ्या रंगाचा वापरही उठून दिसतो.

आपल्या भारतीय हवामानात कडक उन्हामुळे टेरेस प्रचंड तापते, शिवाय दिवसा टेरेस वापरणेही अशक्य होते. याकरिता टेरेसवर मोठय़ा छत्रांची सोय करायला विसरू नये. याखेरीज उन्हापासून संरक्षणाचा दुसरा उत्तम आणि सुंदर पर्याय म्हणजे ऑनिंग. ऑनिंग हे एक टेंपररी छत असून त्यात हवे तेव्हा उघडझाप करण्याची सोय असते, शिवाय छत्र्यांप्रमाणे बंद केल्यावर उचलूनही ठेवावे लागत नाही.

आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टेरसचा खाजगीपणा आणि सुरक्षितता जपणे. यासाठी टेरेसच्या कुंपणाकडे लक्ष देणे फार गरजेचे. टेरेचे कुंपण हे शक्यतो उंच असावे म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाही आपल्यामुळे त्रास होत नाही त्याचबरोबर आपलेही खासगीपण जपले जाते.

आणखी एक महत्त्वाचं सांगणं असं की टेरेस डिझाइन करताना आपल्या टेरेसचे आकारमान लक्षात घेऊन तिथे गार्डन बनवायचं की नुसतीच बैठक करायची का दोन्ही करायचं याचा विचार करावा. विनाकारण हव्यासापोटी सर्वच गोष्टी एका ठिकाणी कोंबण्याचे टाळावे, कारण शेवटी टेरेसचे सौंदर्य आणि उपयुक्तता दोन्ही वाढवणे महत्त्वाचे, नाही तर फक्त भाऊगर्दीच.

तर छान निगा राखा आपल्या टेरेसची, कारण फार थोडय़ा भाग्यवंतांच्या नशिबी येतात अशी घरे.

– गौरी प्रधान

ginteriors01@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)