ग्रीन सॅलडपेक्षा रंगीत सॅलडमध्ये रफेज-फायबरचं प्रमाण कमी असतं, पण त्यांच्यात रंगीत द्रव्य (अ‍ॅन्थोसायनीन, बिटा कॅरोटिन वगैरे) असतं. रंगीत सॅलडचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास शरीरातल्या पेशींचा अकाली नाश होत नाही. बिटा कॅरोटिनमुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते आणि आपल्या शरीरात त्याचं रूपांतर ‘व्हिटॅमिन ए’मध्ये होतं, की ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. गाजर, लाल-पांढरा मुळा, बीट, टोमॅटो, काकडी, स्वीट कॉर्न, रंगीत ढोबळी मिरची या रंगीत सॅलडमध्ये वेगवेगळया प्रमाणात रंगीत द्रव्यं असतात. ग्रीन सॅलडप्रमाणे रंगीत सॅलडमध्ये समाविष्ट असलेले सगळे प्रकार आपण ‘किचन गार्डन’मध्ये वाढवू शकतो. गाजर, मुळा, बीट या वनस्पतींच्या मुळांमध्ये अन्न साठवलं जातं आणि त्यांचा रंगीत सॅलड म्हणून आहारात समावेश केला जातो.
‘किचन गार्डन’मध्ये हे सॅलडचे प्रकार वाढवायचे असल्यास कुंडी एक फूट तरी खोल असली पाहिजे. रंगाचे रिकामे मोठे डबे, फुटकी बादली, मोठी पॉलिथीन बॅग (शक्यतो काळी), भाजी साठवण्याचे मोठे ट्रे यामध्ये सुद्धा हे प्रकार वाढवता येतात. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ‘कंटेनर्स’च्या तळाला आणि कडेला थोडी छिद्र पाडून घ्यावी. त्यात समप्रमाणात शक्यतो तांबडी माती (नसल्यास नेहमीची माती चालते), कुजलेलं शेणखत (अगदी बारीक केलेलं), कोकोपीट घालावे. अगदी बारीक वाळू असेल तर ती त्यात मिसळावी, म्हणजे पाणी घातल्यावर माती चिकट होणार नाही, ती सच्छिद्र राहली. कुंडीतल्या मातीत मोठी ढेकळं किंवा काटक्या, न कुजलेला पालापाचोळा नाही ना, याची खात्री करून घ्या, नाही तर गाजर, मुळा, बीट मातीत वाढत असताना अडथळा येऊ शकतो. काही वेळेस ते पूर्ण वाढणार नाहीत किंवा ते दुभंगून त्यांची विचित्र पद्धतीने वाढ होईल. कोकोपीट ऐवजी ‘परलाईट’ वापरले तरी चालते. गादी वाफ्यावर हे लावायचे झाल्यास वेगळी पद्धत वापरावी लागते. दोन गादी वाफ्यांच्यामध्ये जो उंचवटा असतो त्यात त्याचे बी पेरावे, म्हणून त्यांची मुळं वाढताना त्यांना योग्य खोलगट भाग मिळेल, त्यात त्यांची वाढ चांगली होईल. या उंचवटय़ावर तीन इंचांच्या अंतरावर साधारणपणे दोन पेरं खोल गोल करा. एका ठिकाणी दोन ते तीन बिया पेरा. बिया बारा तास अगोदर पाण्यात भिजवून मग पेरल्यास उगवण्याचा कालावधी कमी होतो. कुंडीत बी पेरायचे झाल्यास विरळ पेरा. एकाच ठिकाणी बी पडणार नाही याची काळजी घ्या. बी पेरल्यानंतर त्यावर मातीचा थर द्या. हलके पाणी घाला आणि एक दिवस त्यावर ओले वर्तमानपत्र अलगद घालून ठेवा.
गाजराचे सर्व बी एकदम उगवून येत नाही. पहिल्या आठवडय़ात काही बी उगवेल. साधारणपणे दोन-अडीच आठवडय़ात बरेच बी उगवून येईल. बी पेरल्यानंतर अंदाजे २५ दिवसांनी किंवा रोपाला पानांच्या तीन ते चार जोडय़ा आल्यानंतर एकाच ठिकाणी अनेक रोपं आली असतील, तर त्यातले जोमाने वाढणारे रोप ठेवून बाकीची कात्रीने कापून टाका. उपटून काढू नका. कारण जोमाने वाढणाऱ्या रोपाच्या मुळाला धक्का लागेल, तिथली माती सुटून येईल. रोपाचं खोड वाकलं असेल ते रोप शक्यतो काढून टाका किंवा मातीचा आधार देऊन खोड ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर गाजर न वाढता नुसती पानं वाढत राहतील. बी पेरल्यानंतर दीड महिन्याने कुंडीतल्या मातीत थोडं सेंद्रिय खत घाला. गादी वाफ्याच्या उंचवटय़ावर गाजराचे बी पेरले असेल तर तिथे काळजीपूर्वक खत घाला. गादी वाफ्यात त्याच वेळेस ‘लेटय़ूस’ लावा, कारण ती एकमेकांना पूरक आहेत. ‘लेटय़ूस’ला गाजराच्या मानाने खत कमी लागते. गाजर जमिनीत वाढत राहते, वर खोडावर पानं वाढतात. पाणी घालताना किंवा अन्य काही कारणांनी गाजराचा रंगीत भाग थोडा जरी मातीच्या वर आला तर तो भाग हिरवा तर होतोच पण गाजराची चव कमी होते आणि त्यातले अ‍ॅन्थोसायनीन या रंगीत द्रव्याचे प्रमाण कमी होते आणि अशा गाजरांमध्ये पौष्टिकता कमी होते. गाजराच्या अनेक जाती आपल्याकडच्या हवामानात वाढतात, कुंडीत, वाफ्यांमध्येही लावता येतात. ‘अर्ली नॅन्तेज’ ही युरोपियन नारिंगी रंगाची जात आपल्याकडे कुंडीतही चांगले वाढते. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी ती जास्त चांगल्या प्रमाणात वाढते. घरातली कुंडी थंड पाण्यात ठेवावी, कुंडीच्या आजूबाजूला ओलावा राखला तर कुंडीतल्या गाजरालाही नारिंगी रंग येतो. कुंडीत फार पाणी साचू देऊ नका. अन्यथा गाजर मातीतच कुजेल. ‘नॅनतेज’चे गाजर मध्यम लांबीचे आणि टोकापर्यंत सारख्याच लांबीचे असते. सगळयात मधला भाग अगदी थोडा असल्यामुळे गाजराचा भाग वाया जात नाही. खाताना ‘नॅनतेज’ थोडेसे कोरडे लागते, पण चव चांगली आणि या जातीतले गाजर लवकर तयार होते. ‘चॅन्तनी’ या जातीचे गाजर गडद लालसर नारिंगी रंगाचे असल्यामुळे अतिशय आकर्षक दिसते. याशिवाय ‘कोअरलेस’, ‘इम्परेटर’ या जातीही कुंडीत/ वाफ्यात वाढू शकतात. ‘पूसा केसर’ या भारतीय संकरीत जातीत पानांची वाढ कमी, पण गाजराची वाढ चांगली होते. शिवाय मध्यभागातला कठीण भाग अतिशय कमी पण लाल रंगाचा असतो. ‘देशी लाँग ऑरेंज’, ‘काली देशी’, ‘पंजाब गाजर नं. २’, ‘कल्याणपूर पिली’ या जातीही लोकप्रिय आहेत. ‘शिन कुरोडा’ ही जात खास ‘कंटेनर’मध्ये वाढवण्यासाठी तयार केलेली आहे. ‘लाँग रेड’ या जातीतले गाजर एक फुटापर्यंत वाढू शकते. पण हे गाजर जास्त दिवस जमिनीतच राहिले तर ते कडू लागते. जांभळ्या रंगाच्या गाजराच्या जातीमध्ये पोषक द्रव्ये जास्त असतात. इतर गाजरांच्या जातींपेक्षा यात ‘अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स’चे आणि ‘अ‍ॅन्थोसायनीन’चे प्रमाण जास्त असल्यामुळे यात जास्त पोषणमूल्ये असतात. लाल, नारिंगी गाजरापेक्षा ही अनाकर्षक आहे. त्यामुळे सॅलडमध्ये याचा वापर फार कमी होतो. थंडीत गाजरं येण्यासाठी गाजराचे बी सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये कुंडीत किंवा छोटय़ा प्लॅस्टीक पिशवीत पेरा. नंतर मोठय़ा कुंडीत लावा. गाजराची रोपं नाजूक असल्यामुळे सहसा स्थलांतरित करीत नाहीत. गाजराला मुळा आणि बीटापेक्षा जास्त खत लागतं! कुंडी मोठी असेल तर एका वेळेस पाच ते सहा गाजरं चांगली वाढतात.
गाजरामध्ये अनेक पोषकद्रव्ये आहेत. त्यात ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असते. त्याशिवाय ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, तांबं, चुना, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस ही खनिजे असतात. लाल गाजरात ‘अ‍ॅन्थोसायनीन’ आणि नारिंगी गाजरात ‘बीटा कॅरोटीन’ हे रंगीत द्रव्य असल्यामुळे ‘रंगीत सॅलड’मध्ये गाजराचा समावेश केला आहे. आपल्या शरीरात ‘बीटा कॅरोटीन’चे रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वात होते. त्यामुळे दृष्टी सुधारते, डोळ्याचे किरकोळ विकारही कमी होतात. आपल्या चयापचय क्रियेत अनेक विषारी द्रव्य किंवा घटक तयार होतात, पण ते किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचा गुण गाजरात आहे. यात असलेल्या घटक द्रव्यांमुळे शरीरातल्या पेशींचा अकाली नाश होत नाही, त्यामुळे अनेक दिवस पेशी कार्यरत राहतात. गाजरामुळे पचनाचे विकारही कमी होतात. पाणी/ द्रव्य जास्त घेण्याची तीव्रता वाढते.
गाजर जमिनीतून न काढता तसंच वाढत ठेवलं तर जमिनीच्या वर फुलं, फळं येतात. फळातल्या बियांपासून तेल काढतात. तेलाला मातकट, नवीन लाकडासारखा वास येतो. या तेलापासून ‘मॉइश्चरायझर’ करतात. त्यामुळे कातडीला मऊपणा येतो, तजेलाही येतो, शिवाय केसांना लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते. गाजर शिजवताना किंवा त्याचा हलवा करताना त्याबरोबर थोडे ‘फॅट’ मिसळले (उदाहरणार्थ खवा) तर गाजरातले बीटा-कॅरोटीन शरीरात लवकर एकजीव होते. जांभळ्या गाजरापासून बिस्कीट्स तयार करतात किंवा गाजराचा कीस एकजीव करून तो लोण्यात मिसळून तो ब्रेडला लावून सॅन्डवीच करतात. एकूणच गाजर आरोग्यदायी असलं तरी खाण्याचा अतिरेक करू नये, कारण त्याने त्वचा पिवळसर दिसते.
‘मुळा’ गाजरापेक्षा लवकर वाढतो. तांबडा आणि पांढरा मुळा अशा दोन जाती विशेष लोकप्रिय आहेत. गोल, लहान आणि लांबट अशा दोन तांबडय़ा मुळ्याच्या जाती आहेत. लांबट तांबडय़ा मुळ्याला ‘रॅडीश फ्रेंच ब्रेकफास्ट’ असंही नाव आहे. कारण त्याचा उपयोग न्याहारीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. या दोन्हींसाठी सहा इंच खोल ‘कंटेनर’ चालतो. बी फार खोलवर पेरू नका. गाजराचं बी पेरण्यासाठी जे मातीचं मिक्स्चर वापरलं तसंच मुळ्यासाठी तयार करा. एका आठवडय़ातच बी उगवून येते. एका ठिकाणी दोन रोपं आली असतील तर एकच ठेवा. ‘पांढरा’ मुळ्यासाठी मात्र एक फूट खोल ‘कंटेनर’ घ्यावा लागतो, कारण तो जास्त खोल जातो. याचंही बी लवकर उगवून येतं, त्यामुळेच गादी वाफ्यात इतर भाज्यांचं बी नक्की कुठे पेरलं आहे हे कळण्यासाठी त्याच्याजवळ मुळ्याचं बी पेरतात. फक्त मुळ्याचंच बी पेरायचं असेल तर त्या शेजारी किंवा एका आड एक मुळा आणि लेटय़ूसचं बी पेरा. कारण वाढीसाठी ते एकमेकांना पूरक आहेत. लेटय़ूस ऐवजी काकडी, वाटाणा किंवा नेस्ट्रॅशियम या फुलझाडाचे बी लावा. पण मुळ्याशेजारी बटाटा कधीच लावू नका. कोणत्याच झाडाची वाढ नीट होणार नाही. पांढऱ्या मुळ्याचं बी थोडं उशिरा उगवतं पण तीन आठवडय़ातच कुंडी पानांनी भरून जाते. बी पेरल्यानंतर एका आठवडय़ाने व्हर्मी कंपोस्ट घाला आणि एकवीस दिवसांनी पातळ केलेलं शेणखत घाला. जास्त घालू नका. झाडाला अपाय होण्याची शक्यता असते. एका महिन्यात लाल मुळा तयार होतो. जास्त दिवस मातीत राहिल्यास तो आतून पोकळ होतो. कारण त्यात स्टार्चचे प्रमाण वाढत जाते. पांढरा मुळा मात्र बी पेरण्यापासून ४० दिवसांत तयार होतो. सगळी झाडं तोडू नका, काही तशीच ठेवा, त्याला पांढरी नाजूक फुलं येतील आणि काही दिवसांनी त्याला ‘डिंगऱ्या’ (फळं) येतील. याचीही भाजी करता येते, ती पोट साफ ठेवते, मुळव्याधही बरी करते. काही डिंगऱ्या झाडावर तशाच ठेवा. या वाळल्या की त्यातलं बी काढून पुढील वर्षीसाठी ठेवा. ‘पूसा रेशमी’ (सप्टेंबरमध्ये लागवड करतात), ‘पूसा देशी’ (ऑगस्ट), ‘जॅपनीज व्हाइट’ (ऑक्टोबर), ‘व्हाइट आयसिकल’ (नोव्हेंबर), ‘पूसा हिमानी’ (डिसेंबर), ‘पूजा चेतकी’ (मार्च ते ऑगस्ट) या पांढऱ्या मुळ्याच्या जाती आपल्याकडे चांगल्या येतात. ‘रॅटव्हेल रॅडीश’ ही जात लांब, पातळ डिंगऱ्यांसाठी प्रसिद्ध  आहे.
मुळ्यापेक्षा मुळ्याची पानं जास्त पौष्टिक आहेत. त्यात खनिजं आणि ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहेत. मुळ्यात चुना, फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजं व काही प्रमाणात ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व आहेत. मुळा सारक आहे. अस्थमा, सायनस असणाऱ्यांनी मुळा अवश्य खायला पाहिजे.

best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती