१८८० साली बांधलेली आणि साहित्यात अजरामर झालेली ‘बटाट्याची चाळ’ आज २०२६ च्या काळात रिडेव्हलपमेंटच्या उंबरठ्यावर उभी राहिली असती, तर आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी ती कशी पाहिली असती? २५ मजल्यांच्या नव्या कोऱ्या टॉवरच्या मोहात दीड शतकांचा शेजारधर्म कसा धुळीस मिळत चालला आहे, यावर अंतर्मुख करणारा चष्मा! ७९-अ ची घाईघाईत उरकलेली प्रक्रिया, रंगीत ब्रोशर्सची मोहिनी, बनावट टेंडर्स आणि कमिटीची अरेरावी या सगळ्यात सामान्यांची होणारी फसवणूक हा लेख उघडी पाडतो. इमारतीचा पुनर्विकास जरूर व्हावा; पण बेईमान कमिट्या आणि लबाड बिल्डरांच्या जाळ्यात अडकून हक्काचे घर अन् पिढ्यानपिढ्यांची नाती गमावली जाणार नाहीत, याचे भान देणारा हा प्रयत्न!

आमच्या मुंबईतील गिरगावात अठराशे ऐंशी साली विसावलेली ऐतिहासिक बटाट्याची चाळ! ही चाळ मूळचे क्रॉफर्ड मार्केटातील टोपल्यांचे अन् बटाट्याचे मोठे व्यापारी धुळा नामा बटाटे यांनी बांधली होती, अन् त्यांच्याच नावावरून या वास्तूला ‘बटाट्याची चाळ’ हे नाव पडले. ही केवळ विटा-मातीची इमारत नव्हती, तर पन्नास-साठ कुटुंबांच्या सुख-दुःखाचा आणि एकमेकांवरील अथांग प्रेमाचा एक जिवंत दस्तऐवज होती. रविवारी सकाळी प्रत्येक घरातून येणारा खमंग कांद्या-पोह्यांचा सुवास, सामायिक व्हरांड्यात भरणारी बायकांची झिरो-अवर संसद आणि गणेशोत्सवातील नाटकांच्या तालमीत रंगणारे हौशी नटसम्राट… यावर आमचा चाळ-धर्म वर्षानुवर्षे टिकून होता.

धुळोबांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बापू बटाटे हा चाळीचा कारभार पाहू लागला होता, तर महिन्याच्या एक तारखेला गळ्यात पिशवी अडकवून भाडे वसूल करण्याचे काम आद्य पुरभय्या देवकीनंदन तिवारी करायचे. तिवारी भैय्या व्हरांड्यात आले की भाड्याची पावती टकाटक लिहायचे आणि ‘सब ठीक बा ना?’ म्हणून प्रेमाने चौकशी करायचे. पण काळाच्या ओघात चाळ जीर्ण झाली, जिन्याला साडेसाती लागली आणि बापू बटाटे यांचेही लक्ष चाळीवरून उडाले.

अशातच चाळीत अचानक रिडेव्हलपमेंटचे भूत अवतरले! चाळ-मालक बापू बटाटे आणि सोसायटीच्या नव्या-कोऱ्या कमिटीची बंद दाराआड गुप्त भोजनाची सत्रे रंगू लागली. बापू बटाट्यांना आपली मोकळी जागा अन् घसघशीत परतावा हवा होता, तर कमिटीतल्या अभ्यासू कारभाऱ्यांना बिल्डरच्या कृपेची फळे चाखायची होती! दोघांचे सूत असे काही जुळले की बिल्डरच्या दारात बापू बटाटे आणि कमिटीचे पदाधिकारी गळ्यात गळे घालून उभे राहू लागले. तिथेच दुफळीची ठिणगी पडली! ज्या दिवशी नोटीस बोर्डावर रिडेव्हलपमेंटची पाटी लागली, त्या दिवसापासून चाळीतील प्रत्येक माणसाचा डोळा स्वतःच्या घरापेक्षा शेजारच्या घराच्या कार्पेट एरियावर जास्त खिळू लागला. माणसांची आपुलकी चौरस फुटात मोजली जाऊ लागली आणि बटाट्याच्या चाळीची प्रसन्न शांतता कायमची भंग पावली.

चाळीत रिडेव्हलपमेंटचा विषय आला आणि आमचे सुप्रसिद्ध द्वारकानाथ गुप्ते एकदम सरन्यायाधीशाच्या अवतारात आले! गुप्ते म्हणाले, ‘‘अहो, बिल्डर आला की समजायचे चाळीचा धर्म बुडाला! हे बिल्डर लोक म्हणजे सिमेंटचे राक्षस असतात. आधी भाड्याचे चविष्ट गाजर दाखवणार आणि नंतर आपली चाळ तोडून आपल्याला रस्त्यावर आणणार!’’

इतक्यात चतुर रघूनाना सोमण यांनी तिथे एन्ट्री मारली. रघूनाना म्हणाले, ‘‘गुप्ते, अहो बिल्डर आपल्याला नवे घर देतोय. ५०० स्क्वेअर फूट मोफत मिळतात, मग काय वाईट आहे?’’

दुसरीकडे, आमचे कडक शिस्तीचे बाबा बर्वे आपल्या खोलीच्या दारात उभे राहून म्हणाले, ‘‘रघूनाना, मला ५०० नको, ५५० स्क्वेअर फूट हवेत! त्या ५० फुटांसाठी मी कमिटीच्या दारात धरणे धरेन, दहा मिनिटांचे नैष्ठिक मौन बाळगेन, पण एक इंच मागे हटणार नाही!’’

शेजारी उभे असलेले ‘न्यू गजकर्ण फार्मसी’वाले समेळ काका वैतागून म्हणाले, ‘‘बर्वे, ५० फुटांचे स्वप्न नंतर बघा! आधी त्या बिल्डरचा कागदपत्र-पुरावा तपासा! तो बिल्डर आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? त्याचा कॅश-फ्लो काय आहे? त्याची बँक गॅरंटी कुठे आहे? हे आधी कागदावर तपासा! नाहीतर नवी इमारत दूरच राहील, आणि तुमच्या ५० फुटांच्या भुतापायी माझा गल्ला रस्त्यावर येईल!’’

इतक्यात धावत आलेले कुशाभाऊ अक्षीकर (नाट्यभैरव) ओरडले, ‘‘अहो समेळ काका, तुम्ही जशी हॉटेलात गरम भजी, नरम उसळ अन् टेसदार टोमॅटो ऑम्लेटची नामावली सांगता, तशी बिल्डर आपल्याला गरम भाडे, मऊ कॉर्पस, कडक बँक गॅरंटी अन् गुळगुळीत इटालियन मार्बलचे गाजर दाखवतोय! आणि तो सोसायटीचा पीएमसी? अहो तो तर बिल्डरच्या तालावर पेटी वाजवणारा साथीदार निघाला! नाटकाचा पडदा पडल्यावर जसा नट वेष बदलून पळून जातो, तसा तो बिल्डर आपल्याला रस्त्यावर सोडणार नाही ना?’’

अण्णा पावश्यांनी (मुन्सिपालटीतील खर्डेघाशी करणारे ज्योतिषी) तर बिल्डरच्या नोटीसचीच थेट कुंडली मांडली. अण्णा चष्म्याच्या वरून पाहत म्हणाले, ‘‘बिल्डरच्या राशीवर सध्या राहू-केतूची पापी दृष्टी आहे, त्यामुळे तो बँक गॅरंटी देण्याच्या योगातच नाही!’’

पण ७९-अच्या या सरकारी लग्नकार्यात आमचे कमिटीवाले आणि पीएमसी वाले साक्षात नवरदेवाचे बाप अन् यजमान असल्यासारखे छाती फुगवून वावरत होते! अण्णा पावश्यांनी सिल्कचा कडक कुर्ता तर जनोबा रेग्यांनी रेशमी उपरणे पांघरून वरमायीची मिजास दाखवायला सुरुवात केली होती. निबंधक कार्यालयाचे प्राधिकृत अधिकारी म्हणजे साक्षात पौरोहित्य करणारे भटजीबुवा! भटजी जसे फटाफट मंगलाष्टकांचे श्लोक म्हणत अक्षता टाकतात, तसे हे अधिकारी ७९-अ च्या प्रक्रियेचे नियम घाईघाईत वाचून उरकत होते. मध्येच तो व्हिडिओ रेकॉर्डिंगवाला कॅमेरा प्रत्येकाच्या नाकासमोर नेऊन नको तिथे लुडबुड करत होता.

सोहळा ऐन रंगात आलेला असताना कोचरेकर गुरुजी आणि नाडकर्णींसारख्या काही सुजाण अल्पसंख्याक सदस्यांनी मोठ्याने ओरडून मंगलाष्टकातील ‘शुभमंगल’च्या पुढचा ‘सावधान’ हा शब्द उपस्थितांना आठवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला! पण कमिटीची अरेरावी अन् बिल्डरच्या रंगीत ब्रोशर्सची मोहिनी एवढी अगाध होती की, तो सावधानचा इशारा‘लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥’च्या अंतिम जयघोषात आणि टाळ्यांच्या गजराखाली पार दाबून टाकला गेला! शेवटी लक्ष्मी दर्शन कमिटीवाल्याना आदल्या रात्रीच झाले होते त्यामुळे सावधान शब्दावर समर्पयामी झाले.

सभा संपताच कमिटीने सर्व चाळकऱ्यांना गरमागरम सुवासिक मसालेभाताची पंगत आणि त्यावर बर्फ टाकून दिलेला गारगार मठ्ठा हाणायला दिला! त्या सुग्रास मसालेभाताच्या आणि थंडगार मठ्ठ्याच्या तृप्तीत बिचारे चाळकरी पेंगून डुलक्या घेऊ लागले. तोच संधी साधून उपनिबंधक अधिकारी, बिल्डर आणि त्याची टोळी चाळकऱ्यांची सहमती पत्रे (Consent Letters) अशी काही शिताफीने गोळा करून घेऊन पळाली, जशी लग्नानंतर नवऱ्या मुलीची पाठवणी करून वऱ्हाडी मंडळी निघून जावी! मंडप रिकामा झाला, भांडी आवराआवर झाली… मंडप जरी रिकामा झाला असला तरी बिचाऱ्या चाळकऱ्यांची मनं मात्र २५ मजली काचेच्या टॉवरच्या रम्य स्वप्नांनी गच्च भरून गेली होती!

लेजरकीपर सोकाजी त्रिलोकेकर आपल्या खास इंग्रजी मिश्रित मराठीत ओरडले, ‘‘साला बिल्डरने ब्रोशरमदी स्विमिंग पूल दाखवला, पण शेवटी आपल्या पदरात नळाचे दोन हंडे पाणीपण देणार नाही! इट इज अ कम्प्लीट ब्लफ साला!’’

खरी गंमत तर टेंडर प्रक्रियेत घडली! ७९-अ च्या नियमानुसार वृत्तपत्रात टेंडरच्या जाहिराती आल्या खऱ्या, पण चाळीला काय ठाऊक की ती सगळी बिल्डरचीच सेटिंग होती! बिल्डरने स्वतःच्याच चार वेगवेगळ्या नावांच्या कंपन्यांमार्फत बनावट टेंडर्स भरली; म्हणजे डाव्या खिशातून पैसे काढून उजव्या खिशात टाकताना मधे कमिटीने धरलेला रुमाल! आणि स्वतःचेच टेंडर अगदी शिताफीने पास करून घेतले. ना पीएमसीने बिल्डरचा कॅश-फ्लो तपासला, ना कमिटीने त्याची आर्थिक ताकद पाहिली.

चाळीतील साधे-भोळे काशीनाथ नाडकर्णी आणि कोचिंग क्लास चालवणारे कोचरेकर गुरुजी जेव्हा कमिटीच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा नाडकर्णींनी विचारले, ‘‘अण्णा, तो विकास करार, फिजिबिलिटी रिपोर्ट आणि बँक गॅरंटीचे कागद जरा आम्हाला वाचू द्या.’’

जनोबा रेगे चष्म्याच्या वरून पाहत गुरगुरले, ‘‘नाडकर्णी, अहो, तो बिल्डर साक्षात देवमाणूस आहे! आम्ही कमिटीने सर्व अभ्यास केलाय… तुम्ही गपगुमान सह्या ठोका!’’

कोचरेकर गुरुजी खणखणीत आवाजात म्हणाले, ‘‘जनोबा, आम्ही चार-पाच जण प्रश्न विचारतोय म्हणून तुम्ही आम्हाला ‘अल्पसंख्याक’ समजून दुर्लक्ष करू नका! जर उद्या मालक आणि बिल्डरचे संगनमत उघडे पडले नि प्रकल्प अर्धवट राहिला तर हीच चार-पाच अल्पसंख्याक माणसे तुम्हाला न्यायालयाच्या पायरीवर खेचतील!’’

अण्णा पावशे टेबलवर जोरात हात मारून ओरडले, ‘‘हक्क नंतर मागा! आधी कमिटीवर विश्वास ठेवा. यापेक्षा जास्त एक कागदही मिळणार नाही!’’
कागदपत्रे लपवून ठेवण्याची ही अरेरावी, बनावट टेंडरिंग आणि संशयास्पद संगनमत संपूर्ण चाळीच्या मनात अविश्वासाची प्रचंड मोठी भिंत उभी करून गेले. विश्वासाचा धागा एका फटक्यात धुळीस मिळाला.

रवीवारी विशेष बैठकीत मधू गुप्ते (द्वारकानाथ गुप्तांचा मुलगा) उभा राहिला. मधू मोठ्याने म्हणाला, ‘‘अहो कमिटीच्या शहाण्या लोकांनो… मी या बिल्डरची बॅलन्स शीट तपासली आहे. याच्या खिशात स्वतःचे पाच रुपये नाहीत आणि तो १०० कोटींच्या प्रकल्पाच्या गप्पा मारतोय! त्या बनावट ४ टेंडर्सचे पितळ उघडे पडले आहे! जरा त्या बाजूच्या ‘शांती निवास’ इमारतीकडे मान वळवून बघा!’’

बैठकीत एकदम स्मशानशांतता पसरली. मधू पुढे म्हणाला, ‘‘त्या ‘शांती निवास’च्या बिल्डरनेही पाच वर्षांपूर्वी असंच ५०० स्क्वेअर फूट आणि भाड्याचे गाजर दाखवून इमारत पाडली. सुरुवातीचे दोन वर्षे भाडे दिले आणि नंतर पोबारा करून पळून गेला! आज ‘शांती निवास’चे साठ मराठी कुटुंब वेगवेगळ्या भाड्याच्या घरात उघड्यावर ताटकळत आहेत. काहींचे भाडे थकल्याने हाकलून दिले, तर काही म्हातारे-कोतारे नवीन घर न पाहताच या जगातून निघून गेले!’’

इतक्यात एच. मंगेशराव उठले आणि बेसुऱ्या आवाजात तान घेत गुणगुणू लागले, ‘‘अहो, या बेईमान कमिटीचा नि चाळ-मालकाचा सूरच चुकलेला आहे! जोपर्यंत बँक गॅरंटीची तान बसत नाही, तोपर्यंत बिल्डरच्या कराराचा ताल धरणे म्हणजे स्वतःचा गळा घोटण्यासारखे आहे!’’

मंगेशरावांच्या या रोखठोक टोमण्यावर जनोबा रेगे अन् कमिटी गप्पगार झाली. ज्या सभासदांनी अंधपणाने ‘हो’ ला ‘हो’ मिळवला होता, त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला.

सामायिक व्हरांड्यात बाबलीबाई पावशीण-काकूंना म्हणाल्या, ‘‘काकू, त्या बिल्डरने भाड्याचा चेक दिला नाही किंवा तो पळून गेला, तर माझ्या गहाण ठेवलेल्या सोन्याच्या पाटल्या सोडवायच्या कशा?’’ पावशीण-काकू टोमणा मारत म्हणाल्या, ‘‘अहो बाबलीबाई, कमिटीने आणि चाळ-मालकाने स्वतःचे खिसे भरून सोय करून ठेवली आहे! आपल्या पाटल्या गहाण पडल्या काय आणि घर तोडून रस्त्यावर आलो काय, त्यांना काय त्याचे?’’

दुसरीकडे तरूण प्रेमी युगुल- मधू गुप्ते आणि रतन समेळ अंधाऱ्या जिन्याखाली उभे होते. रतन चिंता घेऊन हळूच म्हणाली, ‘‘मधू, उद्या ही चाळ पाडली गेली अन् आपण दूरच्या उपनगरांत गेलो, तर आपली भेट कशी होणार? हे रिडेव्हलपमेंट केवळ भिंतीच नाही, तर आपली नातीही तोडणार का?’’
मधूने तिचा हात हातात घेतला. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. चाळीतील व्हॉट्सॲप ग्रुप आता रणांगण बनला होता. बागेत चालायला जाणारे वृद्ध नागरिक आता दोन गटांत विभागले गेले होते. भजनी मंडळात टाळांच्या तालापेक्षा ‘बिल्डरने कमिटीला किती कट मारला?’ या संशयाचा आवाजच मोठा घुमत होता.

त्या रात्री बटाट्याच्या चाळीत कोणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही. द्वारकानाथ गुप्तांनी आपल्या खोलीची खिडकी उघडली. समोर उभी असलेली जुनी, गळकी पण उबदार चाळ अंधारात शांत विसावली होती.

शेवटी काय हो… ‘बटाट्याची चाळ’ म्हणजे केवळ चौरस फूट आणि कार्पेट एरिया नव्हे; तर दीड शतके जपलेला मराठी माणसाचा श्वास होता! सकाळी नळावर कळशा आपटत उडणारी गंमतशीर भांडणं, दुपारी व्हरांड्यात घुमणाऱ्या संगीताच्या ताना, गणपती-दिवाळीतील तो उथळणारा उत्साह आणि संकट आलं की शेजारच्या घरात धावून जाणारी काळीज-काळजी… हीच तर या चाळीची खरी दौलत होती!

सिमेंटचे २५ मजली टॉवर नक्कीच उभे राहतील, पण सामायिक व्हरांड्यातला तो निस्वार्थी ओलावा अन् लहानपणापासून जपलेली नाती कुठल्याही ब्रोशरमध्ये विकत मिळणार नाहीत. विकास जरूर व्हावा; पण बेईमान कमिटीची अरेरावी आणि लबाड बिल्डरचे बनावट दावे ओळखूनच सुजाणपणे पुढचे पाऊल टाकायला हवे.

उद्या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ही जुनी वास्तू तोडली तरी चालेल, पण तिच्या पोटात जपलेल्या या माणुसकीच्या, विश्वासाच्या आणि आपलेपणाच्या गाठोड्यासहच नव्या इमारतीत जायचे असेल तरच जाऊया! नव्या काचेच्या टॉवरमध्ये जाऊन जर हा नात्यांचा ओलावाच वाळणार असेल अन् आपलीच माणसं दुरावणार असतील… तर ‘‘गड्या, आपली बटाट्याची चाळच बरी…!’’

djunnarkar92@gmail.com