ऊ न, वारा, पाऊस यांचे तडाखे सोसत, आपल्याला आसरा पुरवणाऱ्या इमारतीची काळाच्या ओघात झीज होत असते. अर्थातच, यामुळे तिची ताकद कमी होत असते. त्यातच भरीस भर म्हणून तिच्या ताकदीचा विचार न करता त्यात राहणारी माणसं आपल्या हौसेनुसार काही वेळा हवे तसे बदल करतात. या सगळ्या कारणांनी वय वाढता वाढता इमारतीची ताकद मात्र कमी होत असते. वेळोवेळी माणसं जशी ताकद भरून काढण्यासाठी टॉनिक घेतात, स्वत:वर उपचार करून घेतात, तशाच प्रकारे काही ठरावीक काळानंतर इमारतीवरही तिच्या दुरुस्तीच्या माध्यमातून उपचार केले गेले पाहिजेत.
इमारतीच्या दुरुस्तीआधी इमारतीची रचना कशी असते, ते आधी जाणून घेणं गरजेचं आहे. इमारतीची रचना प्रामुख्याने दोन प्रकारची असते. त्यापकी एक प्रकार म्हणजे ‘लोडबेअिरग स्ट्रक्चर्स’ आणि दुसरा प्रकार म्हणजे ‘फ्रेम्ड स्ट्रक्चर्स’. ‘लोडबेअिरग स्ट्रक्चर्स’ या प्रकारात प्रत्येक मजल्याच्या छपराचं म्हणजेच स्लॅबचं वजन हे त्याखाली असलेल्या घराच्या बाह्य भिंतींवर येतं. पूर्वीच्या काळची घरं ही याच प्रकारची असत. सध्याच्या काळातही बठी किंवा दुमजली घरं जिथे आहेत, अशा ठिकाणी त्यांची रचना ही बऱ्याचदा याच प्रकारची असते. या घरांच्या भिंती खूपच जाडजूड म्हणजे सुमारे दीड फूट जाडी ws04असलेल्या असतात. (छायाचित्र (१) पाहा) या भिंती त्यांचं स्वत:चं आणि त्यांनी तोलून धरलेल्या स्लॅबचं वजन हे त्यांच्या खाली असलेल्या इमारतीच्या पायावर देतात. इमारतीचा पाया हा त्याच्यावर येणारं हे वजन त्याच्याखाली असलेल्या टणक जमिनीवर अथवा खडकावर देऊन त्यावर रेलून उभा असतो.
‘फ्रेम्ड स्ट्रक्चर’मध्ये बीम आणि कॉलम असतात. बऱ्याचदा या दोन्ही भागांना काहीजण बीम असंच म्हणतात. परंतु प्रत्यक्षात खांबांना म्हणजेच उभ्या भागांना ‘कॉलम’ म्हणतात, तर तुळयांना म्हणजेच आडव्या भागांना ‘बीम’ म्हणतात. या प्रकारच्या रचनेत मजल्याच्या स्लॅबचं वजन हे आडव्या बीमवर येत असतं आणि ही बीम्स त्यांना तोलून धरणाऱ्या कॉलमवर हे सर्व वजन टाकत असतात. कॉलमकडून मग हे वजन इमारतीच्या पायावर आणि पायाकडून मग जमिनीवर अथवा ws06खडकावर हे वजन टाकलं जातं. (छायाचित्र (२) पाहा) कुठल्याही इमारतीखाली असणाऱ्या जमिनीची किंवा खडकाची वजन पेलण्याची एक क्षमता असते आणि ती अमर्याद नसते, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे इमारतीच्या पायाची ताकद न वाढवता किंवा नव्यानं वेगळा पाया न घालता इमारतीवर नवीन मजले कधीही चढवू नयेत. कारण तसं केलं तर इमारत कोसळण्याचीही भीती असू शकते.
घराचं नूतनीकरण करत असताना अनेकदा वन रूम किचनला वन बेडरूम किचनमध्ये किंवा वन बीएचके हा टू बीएचकेमध्ये परिवर्तीत करण्यासाठी किंवा सौंदर्यीकरणासाठी किंवा जागा मोठी करण्यासाठी खोल्यांच्या भिंतींमध्ये बदल केले जातात. काही वेळा आपण भिंती काढून टाकतो. जर आपल्या इमारतीची रचना लोडबेअिरग प्रकारची असेल, तर त्या प्रकारात स्लॅबचं वजन थेट भिंतीवर येत असल्यामुळे असे बदल करणं धोक्याचं असतं. परंतु जर फ्रेम्ड स्ट्रक्चर्स या प्रकारात आपली इमारत येत असेल, तर बीम-कॉलमच्या चौकटीत एखादा पडदा लावावा, त्याप्रमाणे तुलनेने पातळ भिंती या चौकटीत उभारलेल्या असतात. त्यांच्यावर इमारतीचा भार नसतो. त्यामुळे असे बदल करता येऊ शकतात. मात्र, ते तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावेत. त्याप्रमाणेच भिंत तोडताना बीम-कॉलमला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक असतं. कधीकधी इमारतींचं वय जास्त असेल, तर अशी काळजी घेऊनही भिंत तोडताना होणाऱ्या कंपनांमुळे बीम-कॉलमला तडे जाऊ शकतात. याव्यतिरिक्त असे बदल करताना इतरही अनेक तांत्रिक मुद्दे लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ सिव्हिल इंजिनीअरला आपलं घर दाखवलं, तर सर्व मुद्दे लक्षात घेऊन तो योग्य तो सल्ला देईल. किंवा बदल करताना कोणते पर्यायी उपाय योजता येतील, याविषयी आपल्याला योग्य ती माहिती त्याच्याकडून मिळू शकेल. इमारतीची रचना जाणून न घेता केवळ अधिक जागेची गरज म्हणून जर असे बदल केलेत, तर आपण केवळ स्वत:लाच नाही, तर इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनाही धोक्याच्या उंबरठय़ावर लोटतो आहोत, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या बोरिवली इथल्या ‘लक्ष्मीछाया’ या इमारतीचं उदाहरण याबाबतीत आपल्या डोळ्यांमध्ये अगदी झणझणीत अंजन घालतं. तळ मजल्यावर असलेल्या एका दुकानात मध्येच कॉलम येतो, म्हणून तो काढून टाकल्यामुळे ती इमारतच खाली आली. कारण आपण आपल्या पायांवर उभे असताना, जर कोणी पायावरच घाव घातला, तर आपण उभे राहू शकू का? कधीकधी एखादा अडथळा हाच आपल्या समस्येवरचा उपाय असू शकतो. त्याप्रमाणे दोन खोल्या एकत्र केल्यावर जर मध्येच असा कॉलम येत असेल, तर त्या मध्येच येणाऱ्या कॉलमच्या तळाशी जमिनीलगत एखादं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सुंदर कमळ करून घेता येईल. त्यामुळे त्या कमळातून तो कॉलम वर येत असल्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो. तसंच या कॉलमवर बाहेरच्या बाजूने कोरीव नक्षीकाम केलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं किंवा लाकडी आवरण लावता येईल. त्यामुळे त्या नक्षीदार कॉलमची शोभा वाढून त्या मध्येच येणाऱ्या कॉलमच्या अडथळ्याचं रूपांतर खोलीतलं मुख्य आकर्षण म्हणूनही करता येऊ शकतं.
शेवटी घराचं सौंदर्य जपताना इमारतीच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही, याची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे घराचं नूतनीकरण किंवा सौंदर्यीकरण करताना इमारतीच्या रचनेचा प्रकार लक्षात घ्यायला विसरू नका.   

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता