शं. रा. पेंडसे
कोकणात बंगला पाहायला मिळणे तसे दुर्मिळ आणि पन्नास-साठ वर्षांपूर्वी तर ते अशक्यच होतं. माजघर, ओटी, पडवी स्वयंपाक घर, देवघर अशा गोष्टींनी संपन्न अशा प्रशस्त घरात आमचं बालपण गेलेलं, तिथे बंगल्यात राहण्याचे भाग्य कसं मिळणार?

पण म्हणतात ना, कुणाचं भाग्य कसं उजळून येतं ते सांगता येत नाही. त्या काळात नवाबाच्या जंजिरा संस्थानाचे आम्ही प्रजाजन. जंजिरा-मुरुड ही संस्थानाची राजधानी. वडील वकिली करायचे, त्यामुळे आमच्या कुटुंबाचा मुक्काम मुरुडला. वकील मंडळींत वडिलांचं नाव होतं. दिवाणी, फौजदारी या दोन्ही शाखांत ते केसेस लढवीत. मी प्रथमच म्हटलं होतं की, कुणाचं भाग्य कसे उजळेल सांगता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व कालखंड होता तो. संस्थानांत मुन्सिफ ॲड पहिला वर्ग मॅजिस्ट्रेट ही जागा रिकामी झाली आणि त्या जागेवर नवाबसाहेबांनी (संस्थानाचे सर्वेसर्वा) वडिलांना बोलावून न्यायाधीशाचे पद देत असल्याचे सांगितले. वडिलांनी नवाबसाहेबांचे आभार मानले आणि एका दिवसानंतर निर्णय सांगतो, असे म्हणून लवून त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे कुर्निसात केला.

Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
Mumbai Demolition bungalow
मुंबई : १२४ वर्षे जुन्या बंगल्याचे पाडकाम, मंगळवारपासून कारवाईला सुरुवात
Gadchiroli district is worst affected by wildfires
जागतिक वनदिन विशेष: वणव्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची सर्वाधिक होरपळ 

वडिलांना प्रथम ज्येष्ठ बंधूंची अनुमती घ्यायची होती त्यामुळे एक दिवसाची मुदत त्यांनी घेतली होती. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीत ज्येष्ठाला फार मान असे. त्याप्रमाणे वडिलांनी ज्येष्ठ बंधूची अनुमती घेऊन मी हे पद स्वीकारतो असे त्यांना सांगितले, त्याप्रमाणे नेमणुकीचे पत्र आले. जंजिरा संस्थान हे त्याकाळात कुलाबा जिल्ह्यत होते. या संस्थानाचे चार तालुके होते, त्यापैकी तीन म्हणजे जंजिरा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळे हे कुलाबा जिल्ह्यत तर चौथा तालुका जाफराबाद हा काठेवाड म्हणजे आताच्या सौराष्ट्रमध्ये होता. याच जाफराबाद तालुक्यात वडिलांची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. सहाजिकच आमचं सर्व बिऱ्हाड जाफराबाद येथे नेणे आवश्यक होते. मुंबई सेंट्रल ते विरमगाव, विरमगाव ते ढसा, डिसा ते राजुला रोड आणि मग राजुला सिटी असा प्रवास करीत शेवटच्या स्टेशनात उतरलो, पण जाफराबाद हे रेल्वे स्टेशन नव्हते. तिथे जायला बैलगाडय़ा तयार होत्या. तेथून ( इ. स. १९४५) १५-२० मैलांचा प्रवास करून पहाटे केव्हा तरी जाफराबादला पोहोचलो. सकाळी उठून आमची राहण्याची जागा बघायला लागलो. आमचं विश्रामधाम एक किल्ल्यात होतं. त्या किल्ल्यात प्रत्येक ऑफिसरप्रमाणे जागा होत्या. मामलेदार आणि न्यायाधीश यांना वेगवेगळे प्रशस्त बंगले होते.

आमच्याकडे यायचं म्हणजे त्या किल्ल्याच्या गेटमधून सुरक्षा रक्षकाने ‘गेट’ उघडल्यावर साधारण कातळावरआमचा बंगला होता. थोडा उंचावर म्हणा ना! बंगल्यात येण्याकरिता आडव्या असलेल्या पायऱ्या चढून मग व्हिजिटर्स रूम येई. कुणाही अभ्यागताला तिथे बसवून साहेबांना ‘इंटिमेशन’ द्यावे लागे. तेथून आत आलो. एक मध्यम असा हॉल होता. एका गोल टेबलभोवती चार खुच्र्या होत्या. मोठय़ा खुर्चीत न्यायाधीश बसत. त्यांची कामाची चर्चा चाले. हॉलमधून आत गेले की दोन दोन बेडरूम्स होत्या. मच्छरदाण्या लावलेल्या गुबगुबीत गाद्या असलेल्या कॉट होत्या. त्यामुळे एक चिंचोळा डायिनग हॉल होता. सकाळचा चहा या टेबलावर होई. नेहमीच्या सवयीने आई चहा-साखरेचे डबे शोधायला गेली तेव्हा पिवळसर झब्बा व शुभ्र धोती नेसलेला माणूस पुढे आला.आईला म्हणाला, ‘बेन, तुमचे स्वयंपाकघर मी सांभाळणार. सकाळचा चहा, दुपारचे जेवण, मधल्यावेळी नाश्ता व रात्रीचे जेवण बधु बधु हुं संभाळीश.’ अर्ध गुजराती आणि अर्ध हिंदीत तो संभाषण करायचा. तेवढय़ात चहा घ्यायला बाबासाहेब आले. बाबांनी सर्व व्यवस्था सांगितली. सकाळी सात ते रात्री १० वाजेपर्यंत हा गुजराती महाराज स्वयंपाक घर सांभाळील. आई बाबांना म्हणाली, ‘मग मी करायचं काय?’ बाबा म्हणाले, ‘तू फक्त हुकुम द्यायचा. भांडंसुद्धा विसळायचं नाही.’

स्वयंपाकघराला लागून दोन खोल्यांचं एक आऊट हाऊस हेतं. तिथं नोकराणी आणि तिचा नवरा राहत असत. भांडी घासणं बाई करणार तर कपडे तिचा नवरा धुणार- दोघंही आमच्या सेवेत असणार. आईने त्यांना फक्त सकाळी दोन तास व रात्री दोन तास ही कामे करण्याकरिता ठेवले. त्यांना बरे झाले. बाकीचा वेळ घरी काढीत. आई बाबांना म्हणाली, ‘दोन खोल्या स्वयंपाक घर असे नोकरांचे आऊटहाऊस सबंध दिवस ही दोघं काय भांडी घासणार कपडे धुणार. उगाच ती दोघं कशाला हवीत संबंध दिवस? तो महाराज स्वयंपाकी एकटा आहे तेवढा पुरे आहे. वडिलांना ते पटले ती दोघं दोन-दोन तास येऊ लागली.

कोटार्मधले तीन पट्टेवालेसुद्धा सकाळी आठ ते दहा बंगल्यावर हजेरी लावीत असत. हेड पट्टेवाला बंगल्याची व्यवस्था बघून जाई तर दोन नंबराचा भाजी आणण्याचे काम करी. तीन नंबरचा पट्टेवाला मुलांची पाटी-दप्तरे व्यवस्थित तयार करून ठेवी.हे तिघेही साडेबाराला कोर्टात हजर राहत, कारण कोर्टाचे कामकाज साडेबाराला सुरू होई. हेडपट्टेवाला मात्र १२ वाजताच परत बंगल्यावर येई. वडील पांढरी पॅन्ट, कोट, हॅट, टाय, पायांत मोजे व बूट घालून तयार असत. आमच्या बंगल्यापासून कोर्ट पाच मिनिटांवर होतं. त्या काळात कुठलंही वाहन नव्हतं म्हणून वडील चालत कोर्टात जात. पुढे ड्रेस केलेले पट्टेवाले जाण्याचा रस्ता मोकळा करीत आणि न्यायाधीश महाराजांना कोर्टात घेऊन जात असे. संध्याकाळी कोर्ट संपल्यावर अशाच तऱ्हेने परत बंगल्यावर आणून सोडीत. ज्या बंगल्यात आम्ही राहत होतो तो परिसर पुरातन किल्ला होता आणि किल्लेदार आणि त्याचा लवाजमा तेथे राहत होता.

पुढे जाफराबाद जंजिरा संस्थानचा भाग झाल्यावर मामलेदार, न्यायाधीश, कस्टम ऑफीसर, फौजदार असे ऑफिसर तेथे आले. या किल्ल्यात फार पूर्वीपासून एक पीराचा दर्गा होता. हा जागृत पीर होता आणि त्या पीराचे धार्मिक विधी सरकारी खर्चात होत असत. एक मशाली त्याकरिता ठेवलेला होता. सायंकाळी तेल वात करून तो मशाल पेटवून पीराची यथासांग पूजा करून मामलेदार आणि न्यायाधीश यांच्या बंगल्यावर जाई. तेथे जे कुणी असेल त्याला डाव्या हातात मशाल घेऊन उजव्या हाताने तीन वेळा वाकून कुर्निसात करीत असे. असं सांगतात की ही प्रथा अनेक वर्षे सुरू होती. संस्थान विलीनीकरणानंतर ती बंद झाली.

जाफराबादच्या या बंगल्यात आमचं वास्तव्य जवळजवळ तीन र्वष होतं. तो पारतंत्र्याचा काळ होता, तरीसुद्धा नवाबसाहेबांची कारकीर्द अनेक दृष्टीने लक्षात राहण्यासारखी होती. इथे आम्ही फक्त दगड-वीटांच्या बंगल्यात राहत नव्हतो, तर इथल्या सर्व माणसांशी आम्ही प्रेमबंधाने बांधले गेलो होतो. स्वयंपाक घराचा ताबा घेतलोला नंदाभाई, भांडीकपडे धुणारी रज्जो-तुकाराम ही जोडी, कोर्टातला हेडपट्टेवाला भिका, भजी आणणारा छगन, तर त्या काळातल्या आमच्या पाटी-दप्तरे व्यवस्थित ठेवणारा भगवान ही माणसे त्या बंगल्यापेक्षाही जास्त आठवणीत राहिली आहेत. ओटी, पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाक घर यांनी आठवणीत राहिलेलं श्रीवर्धनचं घर जाफराबाद या आमच्या बंगल्यातील वास्तव्यात तिथं नातेसंबंध जोडलेल्या मंडळींनी आजतागायत त्या बंगल्यालाही आमच्या आठवणीत ठेवलं आहे. जाफराबादचा बंगला असं नाव काढलं की बहीण प्रमिलाला आठवतो भाजी आणणारा छगन तर, आईला आठवतो नंदा महाराज या सर्वानी त्या बंगल्याची आठवा अजूनही स्मृतीत ठेवलेली आहे.
shankarpendse@yahoo.in