चिऊचं घर : नव्या घराचा विचार

नवं घर घेणं हे आपल्यापकी अनेकांसाठी अप्रूपच असतं. नव्या तंत्रज्ञानामुळे हे अप्रूप वाढणार आहे. विटांपासून घरबांधणीपर्यंत, रंगांपासून ते सफाईपर्यंत अनेक बदल या क्षेत्रात होताहेत. त्यातल्या काही बदलांचा हा आढावा..

नवं घर घेणं हे आपल्यापकी अनेकांसाठी अप्रूपच असतं. नव्या तंत्रज्ञानामुळे हे अप्रूप वाढणार आहे. विटांपासून घरबांधणीपर्यंत, रंगांपासून ते सफाईपर्यंत अनेक बदल या क्षेत्रात होताहेत. त्यातल्या काही बदलांचा हा आढावा..
घ राचा विचार करताना आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो. फारतर येणाऱ्या प-पाहुण्यांचा, त्यांच्या सोयीसुविधांचा विचार करतो. मात्र गेले वर्षभर आपल्या घराची नाळ सभोवतालाशी किती जोडलेली आहे हे वाचतो आहोत. त्यामुळेच नवं घर घेताना किंवा आपल्या जुन्याच घरात काही नवे बदल करून घेताना आपण नव्याची कास धरली तर आपलं घर किती वेगळं होईल, याचा विचार करायची वेळ आली आहे.
परंपरा ते आधुनिकता
‘‘या घरातली वीट अन् वीट आम्ही कष्टाने बांधली आहे हो!’’ असे उद्गार आपल्या कानावर अनेकदा पडतात. आजही वीट हा घरबांधणीचा अविभाज्य भाग आहे, मात्र ही वीटच गेली काही वर्षे मागे पडत चालली आहे किंवा त्यात आमूलाग्र बदल होताहेत. साधारणपणे, वीट म्हणजे मातीची, उत्तम भाजलेली, ठोकळेवजा आकृती आपल्या डोळ्यांपुढे येते. या विटा बनवणाऱ्या अनेक वीटभट्टय़ा आपण गावांतून, शहरांच्या आजूबाजूला पाहत आलेलो आहोत. मात्र, लवकरच या विटांची सद्दी कमी होते आहे. या पारंपरिक विटा अनेक गावांतून कौटुंबिक व्यवसायाच्या माध्यमातून बनवल्या जातात. कच्चा माल म्हणून आसपासची पृष्ठीय मृदा (top soil) वापरली जाते, साहजिकच यामुळे आजूबाजूच्या जमिनीचा कस कमी होतो. विटा भाजण्याकरता जेव्हा कोळशाची भट्टी लावली जाते त्या वेळी वायुप्रदूषणात भर पडते ती वेगळीच.
मातीच्या या विटांना अनेक पर्याय समोर आले आहेत. एक अतिशय नावीन्यपूर्ण पर्याय म्हणजे मातीऐवजी प्रामुख्याने उडती राख (fly-ash) कच्चा माल म्हणून वापरून विटा तयार करणे. कोळशावर आधारित औष्णिक विद्युत निर्मिती प्रक्रियेमध्ये मोठय़ा प्रमाणात राख तयार होते, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण होते. साधारण १९९५नंतर या औष्णिक विद्युत-संयंत्रांतून मिळणारी राख विटा बनवण्यासाठी वापरण्याचं तंत्रज्ञान भारतात विकसित झालं. आपल्या देशात या तंत्रज्ञानाची नितांत आवश्यकता होती; आजही आहे. कोळशाची मुबलक उपलब्धता असल्याने, विजेच्या वाढत्या मागणीवर तोडगा म्हणून आपल्या देशातली अधिकाधिक वीज कोळसा आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पांमधूनच तयार होते आहे.
विद्युत निर्मिती क्षेत्रातील एका प्रदूषक घटकापासून बनवलेली एक उपयुक्त वस्तू म्हणून या विटांकडे पाहता येईलच, त्या शिवाय या विटांची काही खास वैशिष्टय़ सांगता येतील. मातीच्या पारंपरिक विटांपेक्षा यांचं वजन कमी असूनही त्या अधिक टिकाऊ आणि मजबूत असतात. साहजिकच बांधकाम; उदाहरणार्थ घर, इमारत यांचं वजन कमी राहूनही ते मजबूत राहतं. वाहतुकीदरम्यान किंवा बांधकामावेळी हाताळताना तुटून-फुटून नुकसान होण्याचं प्रमाणही या विटांच्या मजबुतीमुळे कमी होतं. राखेपासून बनवलेल्या या विटांची बांधणी अनेकविध आकारात करणं शक्य असल्याने, ठोकळेबाज बनवण्याऐवजी एकमेकांत गुंततील (inter-locking) अशा प्रकारच्या आकाराचा वापर करून बांधकाम अधिक टिकाऊ करता येणं शक्य होतं. या विटांच्या मजबुतीमुळेच घरबांधणीव्यतिरिक्त अनेक कामांकरता त्यांचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, रस्तेबांधणी किंवा पादचारी माíगकांच्या बांधणीकरता. राखेपासून विटांची निर्मिती करण्याकरता भारत सरकार, अनेक स्वयंसेवी संस्था आणि वर्ल्ड बँकेसारख्या अनेक संस्था प्रोत्साहन देत आहेत. आíथक निधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळेच भारतात या विटांची निर्मिती वाढत असली तरी ती उडत्या राखेच्या प्रमाणात अगदीच कमी आहे. डिसेंबर २०१२मध्ये प्रकाशित वर्ल्ड बँकेच्या एका लेखानुसार, साल २०००मध्ये अदमासे १०० प्रकल्पांच्या तुलनेत २०१२मध्ये तब्बल १६,०००प्रकल्प राखेपासून विटांची निर्मिती करत असले तरी त्यांनी वापरलेली फक्त राख २० दशलक्ष टनांपेक्षा थोडी अधिक, म्हणजे एकूण १७० दशलक्ष टनांच्या तुलनेत अत्यल्प आहे. एक ग्राहक म्हणून आपण या विटा आपल्या घरांच्या बांधणीकरता वापरू शकतोच, त्याचप्रमाणे अनेक प्रकारांनी बांधकाम व्यावसायिकांवर दबाव टाकून आपण या विटांच्या वापराप्रती आपली पसंती त्यांना कळवू शकतो.
नव्या वाटा
बी.जी. शिर्के यांनी तब्बल तीन दशकांपूर्वी भारतात प्रचलित केलेली आणि आता सर्वदूर रूढ झालेली नवीन बांधकाम पद्धत म्हणजे प्री-कास्ट. आजही अनेक इमारती जागेवरच बांधल्या जातात. पायापासून पार छतापर्यंत सारंच बांधकाम जागेवरच होतं. प्री-कास्ट पद्धतीमध्ये प्रथमच इमारतीचे विविध भाग, बांधकामाच्या जागेपासून दूर कारखान्यात तयार करून बांधकामात वापरण्याचं तंत्र सुरू झालं. उदाहरणच द्यायचं झालं तर, इमारतींच्या िभती बनवण्याकरता विटांची जुळणी करा, त्यावर प्लॅस्टर करा, त्यानंतर त्यांना हवा तसा फिनििशग टच द्या इत्यादी सगळं मागे पडून िभतींसाठीचे मोठे सिमेंट-काँक्रीटचे पॅनलच एकमेकांना जोडून बसवत हव्या त्या आकाराची िभत बनवण्याची सोय झाली. हे सुटे भाग कारखान्यात अचूकतेने बनवलेले असल्याने, िभतीतून जाणाऱ्या पाण्याच्या, विद्युत तारांच्या सोयीसाठी त्यात जागा ठेवली जाते. ही पॅनल्स अचूक मोजमापानुसार बनवली गेल्याने िभतीच्या काटकोनात जुळणाऱ्या कोपऱ्यांमध्ये, पृष्ठभागाच्या समतलपणात अधिक अचूकता येते. एकसंध असल्याने ओल येण्याची समस्या या बांधकामांमध्ये कमी असते.

हे झालं फक्त उदाहरण. आजच्या युगात इमारतीच्या अचूक रेखाचित्राच्या आधारे बिनचूक सुटे भाग तयार करून कमीत कमी वेळात नियोजित जागेवर इमारत उभी करणं प्री-कास्ट तंत्रामुळे शक्य झालं आहे. इमारतीचे सर्व मुख्य सुटे भाग कारखान्याच्या नियंत्रित वातावरणात तयार करून बांधकामाच्या जागेवर फक्त जुळणी करायची असल्याने, बांधकामाच्या दर्जावर अधिक काटेकोर नियंत्रण ठेवता येतं. बांधकामाचा वेळ वाचतो. शिवाय, बांधकामामुळे होणाऱ्या सार्वत्रिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. प्री-कास्ट तंत्राचं आपल्याला सुपरिचित उदाहरण म्हणजे राज्यभरात होणाऱ्या अनेक उड्डाणपुलांच्या बांधकामात वापरले जाणारे अजस्र सुटे भाग. बांधकामाच्या जागेवर खांब तयार करून, त्यावर तयार तुळया आणून बसवल्या जातात आणि पुलाचं काम पारंपरिक बांधकामापेक्षा जलदगती पूर्ण होतं, हे आपण पाहिलंच आहे.
आज मुंबई-पुण्यासारख्या शहरांत आकाराला येत असलेल्या अनेक री-डेव्हलपमेंट प्रकल्पांत या तंत्राच्या घरबांधणीचा आग्रह आपण धरू शकतो, जेणेकरून काम अधिक अचूक, दर्जेदार आणि कमीत कमी वेळात होऊ शकतं. जुनी इमारत पाडत असतानाच, योग्य नियोजनामुळे आपल्या नव्या इमारतीच्या सुटय़ा भागांची निर्मिती शक्य होऊ शकते, आणि जुन्या-नव्या घरातला वेळ खूपच कमी होऊ शकतो.
जादूची काडी
सध्या नॅनो-टेक्नॉलॉजी हा अनेक क्षेत्रांत परवलीचा शब्द झाला आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अगदी आपल्या घरापर्यंत याचा वावर सुरू झाला आहे. छोटय़ा, सूक्ष्म आकारातल्या काही वस्तू घडवणं हे जसं एक अंग, तसंच एखाद्या पदार्थावर अणू-संयुग स्तरावर काही बदल करून त्यापासून नवे गुणधर्म असलेला पदार्थ विकसित करणं हे नॅनो-टेक्नॉलॉजीचं दुसरं अंग म्हणता येईल. या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनामध्ये, निसर्गाच्या विविध प्रक्रिया आणि पदार्थाचं अनुकरण हा फार महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, असा विचार करा की आपल्या घराच्या काचेच्या खिडक्या वर्षभर धुळीचा प्रतिरोध करत राहिल्या तर? किंवा पावसाळ्यात त्या आपोआप साफ झाल्या तर? हे सहज शक्य आहे. जसं कमळाच्या, अळूच्या पानावर पाणी ठरत नाही, त्याचप्रमाणे काचेवर काही विशिष्ट पदार्थाचा थर दिला किंवा काचेच्या निर्मितीप्रक्रियेतच काही फेरफार करून तिला धूळ-पाणी प्रतिरोधी करता येऊ शकतं.
भारतात अनेक उत्पादक या प्रकारची उत्पादनं बनवत आहेत. ‘‘सध्या आमची उत्पादनं विविध उपकरणं, वस्तू यांवर फवारता येण्याजोगी आहेत. ती अतिशय सुरक्षित, अहानिकारक आहेत.’’ नीलिमा नॅनो-टेक्नॉलॉजी या नुकत्याच सुरुवात झालेल्या कंपनीचा संस्थापक, नीरव कोठारी हा स्वत: या विषयातला उच्च-पदवीधर आहे. ‘‘एकदा फवारल्यानंतर ती वस्तू आमच्या उत्पादनामुळे धूळ आणि पाणी प्रतिरोधक होते. वापरानुसार साधारण ५-७ र्वष पाहावं लागत नाही. उदाहरणार्थ, नुकत्याच रंगवलेल्या िभतीवर फवारा मारल्यास िभतीचा पृष्ठभाग पाणी, धूळ आणि डागरोधी होईल. समजा या िभतीवर आमटी, सॉस किंवा नेल-पेंट सांडलाच तर तो पृष्ठभागाला न चिकटता सरळ वाहत खाली येईल. त्याचप्रमाणे घरांच्या काचेच्या खिडक्यांवर हा फवारा मारल्यास त्या स्वच्छ राहण्यास मदत होईल.’’ नीरव पुढे एक गंमतशीर उदाहरण देतो, ‘‘समजा तुम्ही तुमच्या घरातल्या कापडाच्या पडद्यांवर हा फवारा मारलात, तर किमान ४-५ र्वष तुम्हाला पडदा धुवायची चिंता नको. त्यावर धूळ, पाणी किंवा कशाचे डाग पडणारच नाहीत. महिन्यातून एकदा नुसतं झटकलं तरी पडदा पुन्हा नव्यासारखा राहील.’’
गाडीवर फवारल्यास त्याच्या काचेवर पाणी जमणार नाही. अगदी पावसाळ्यातही वायपरचा कमीत कमी वापर करून गाडी चालवता येईल. गाडीच्या रंगाचं नुकसान कमी होईल, त्याला गंज वगरे लागणार नाही. घरातल्या सोफ्यावर, बिछान्यावर वगरे फवारलं तर त्यावर सांडलेलं पाणी, काही चिकट खाद्यपदार्थ नुकसान करू शकणार नाहीत. अगदी साधी गोष्ट म्हणजे स्वयंपाकाच्या ओटय़ावर हा फवारा मारला तर रोज स्वयंपाकानंतर ओटा साफ करणं किती सोयीस्कर होईल? शिवाय, स्वच्छता राहिल्याने रोग पसरवणाऱ्या बुरशीसारख्या समस्या आपल्या घरापासून दूर राहतील.
रंगांची दुनिया
घराला, त्यातल्या आपल्या खोलीला खास आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल, राहणीमानाला साजेसा रंग देण्याचा मोह आपल्या साऱ्यांनाच होतो. अशा वेळी आमच्यासारख्या पर्यावरणप्रेमी लोकांची फारच कुचंबणा होते. हिरवा रंग देऊन स्वस्थ बसण्यापलीकडे आमच्याकडे फारसे पर्याय नसायचे. आता मात्र भारतातही अनेक नामवंत कंपन्या रासायनिक तेलांऐवजी पाण्याचा बेस वापरून रंग तयार करूलागल्या आहेत. अंतर्गत िभती रंगवण्याकरता एशिअन पेण्ट्स कंपनीच्या रोयाल, तर नेरोलॅक कंपनीच्या इम्प्रेशन्स इको क्लीन श्रेणीतल्या रंगांचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. या रंगांना पारंपरिक रंगांपेक्षा वास कमी येतो, कारण रासायनिक रंगांपेक्षा या रंगांमधून कमी प्रमाणात रासायनिक द्रव्यांचं उत्सर्जन होत असल्याने आरोग्यासाठीदेखील हे रंग उजवे ठरतात. शिवाय, पाणी-आधारित या रंगांच्या वापरानंतर ब्रश, डबे किंवा रंगांचे फरशीवर पडलेले डाग स्वच्छ करण्याकरता साध्या पाण्याचा वापर करता येतो; पारंपरिक रंगांप्रमाणे स्पिरीटचा वापर करावा लागत नाही. हे रंग अधिक चांगले पसरत असल्याने रंगांची मात्रा कमी लागते, रंग िभतीवर लावल्यावरही साध्या ओल्या फडक्याने पुसल्यावर नव्यासारखे स्वच्छ होत असल्याने अनेक वर्षे टिकतात.
मात्र, सर्वात सुयोग्य उपाय म्हणजे संपूर्ण नसíगक द्रव्यांपासून बनवलेले रंग घरांसाठी वापरणे. पाश्चात्त्य देशांमधून या रंगांविषयी जसजशी जागृती वाढते आहे तसतसा त्यांचा खपही वाढतो आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोकमाचा आमसुली, झेंडूचा भगवा, पळसाचा लाल-भगवा, हळदीसारखा पिवळाजर्द, कोकणच्या मातीचा विटकरी-लाल आणि आंब्याच्या डहाळीचा हिरवा रंग आपल्याला िभतींवर देता आला तर किती छान वाटेल? अगदी यासारख्याच नसíगक स्रोतांपासून हे रंग मिळवून त्यावर अधिक प्रक्रिया करून नसíगक रंगांची निर्मिती होते. भारतात अजूनही अशा प्रकारे रंगांची निर्मिती होत नसली तरी नजीकच्या भविष्यात ती होईल याची खात्री वाटते.
सावध निवड
या सगळ्याच पर्यायांचा विचार पर्यावरण-अनुकूल म्हणून करता येईल, मात्र त्यांची निवड काटेकोरपणे, अनेक पर्याय तपासून मगच व्हायला हवी. चिऊचं घर बांधायचं, ते पर्यावरणाकरता अनुकूल बनवायचं तर आपल्याला सतत जागरूक राहायला हवं. आपल्या असण्याने निसर्गावर परिणाम व्हायचाच, तो कमी घातक आणि अधिक विधायक असेल यासाठी नेहमी सजग राहायचं तर अशा नव्या पर्यायांची ओळख करून घेऊन, प्रसंगी त्यांचा अंगीकार करायला हवा. नव्या तंत्रज्ञानावर नजर ठेवायला हवी आणि त्यातलं योग्य ते तंत्रज्ञान आपल्या पसंतीची मोहर उठवून प्रचलितदेखील करायला हवं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Buying new house

ताज्या बातम्या