scorecardresearch

चूल माझी सखी

कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी िशपल्या किंवा खुबडय़ा वापरायचे.

कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी िशपल्या किंवा खुबडय़ा वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोटय़ा काडय़ा लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
उरणमध्ये नागावातील मांडळाआळीत आमचे घर. लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीही वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती. नंतर आजीने गवंडय़ाकडून सळ्या घालून सिमेंटची चूल करून घेतली. मी थंडीत रोज उठल्या बरोबर चुलीजवळ जाऊन शेकायला बसायचे. चाळा म्हणून मधूनमधून लाकडे ढकलणे, पात्या, कागद जाळणे असा खोडकरपणा चुलीबरोबर करायचे. असे करताना बरेचदा निखाऱ्याचा चटका बसे किंवा पाती किंवा कागद जळत हातावर येत असे.
सकाळी आजीची देवपूजा झाली की आजी चुलीतील निखारे धुपांगणात घेऊन त्यावर धूप घालून ते देवाला दाखवायची, मग ते पूर्ण घरात फिरवून घराभोवतीही फिरवायची. फार प्रसन्न वाटायचं तेव्हा. दसरा आला की या चुलीला गेरू किंवा शेणाने सारवले जायचे. दसऱ्याच्या दिवशी आई-आजी चुलीची पूजा करायच्या. मी कधी आजारी वगरे असले की आजी दृष्ट काढून चुलीत टाकायची. आजी सकाळी चहा घ्यायला चुलीजवळच बसायची. कपातील थोडा चहा ती नवेद्य म्हणून चुलीत टाकायची. मला फार गंमत वाटायची ते पाहून. काही दिवसांनी मीही तिचे अनुकरण करू लागले. अगदी लहान होते तेव्हाचे आठवते, की याच चुलीची राख आई-आजी भांडी घासण्यासाठी घ्यायच्या. नंतर शायनेटची पावडर आली, मग राख बंद झाली.
पूर्वी गावात ज्यांची गुरे असत ते शेणी थापून जाळण्यासाठी इंधन म्हणून विकायचे. शेणी म्हणजे शेणाच्या गोल थापून केलेल्या सुकवलेल्या जाड चकत्या. आमची वाडी असल्याने आम्हाला कधी लाकडांचा तोटा नव्हताच. उलट आमच्या वाडीतूनच आजूबाजूचे लोक चुलीसाठी लाकडे घेऊन जायचे. कुणाकडे लग्नकार्य असले की आधीच वडिलांना सांगून ठेवायचे. माझ्या वडिलांना सगळे अण्णा म्हणतात. अण्णा अमुक महिन्यात लाकडे लागतील. मग एखादे सुकलेले झाड किंवा झाडांची डुखण (मोठय़ा झाडाच्या वाढलेल्या फांद्या) लग्नघराच्या नावे होत. वडील एकही पसा त्यांच्याकडून घेत नसत. तेव्हा तशी लाकडांना किंमतही नव्हती. माझ्या आईने प्राथमिक शिक्षिकेची नोकरी केली. ती दुपारी शाळेतून आली की लाकडे गोळा करण्यासाठी वाडीत जात. मीही तिच्याबरोबर जात असे. माझ्या हातात मावतील तितक्या काडय़ा, छोटी लाकडे मी आईबरोबर गोळा करून आणत असे.
मला आठवते, आजी चुलीवर रुचकर पदार्थ बनवायची. हे पदार्थ गॅसऐवजी चुलीवरच रुचकर लागायचे. त्यात असायचे भानवल्या. भानवल्या बनवण्यासाठी खास बिडाचा खडबडीत तवा असायचा. यात आंबोळ्या, घावनसुद्धा छान व्हायचे. उकडीचे पदार्थ जसे शेंगा, करांदे, कोनफळे अशा पदार्थाना चुलीवर शिजवल्याने विशिष्ट चव येते.
तांदूळ गिरणीतून दळून आणला की त्याचा कोंडा निघे. त्या कोंडय़ाचे आजी पेले बनवायची. हे कडवट गोड लागायचे. हे करताना पाहायला मला गंमत वाटायची. हे एका मोठय़ा टोपात पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून त्यात छोटय़ा छोटय़ा पेल्यांत या कोंडय़ाचे गूळ घातलेले मिश्रण आजी भरायची आणी ते वाफवायची. या कृतीमुळेच कदाचित याचे नाव पेलेच आहे. चुलीवरची भाकरीही मस्त खरपूस पापुद्रा आलेली असे. या भाकरीबरोबर खायला त्याच चुलीच्या निखाऱ्यावर आई-आजी वाकटय़ा, बोंबील, बांगडा भाजून द्यायची. बांगडा भाजला म्हणजे अख्ख्या गावाला वास जायचा. या चुलीत भाजलेल्या बांगडय़ाचा वास इतर कुठल्या घरातून आला तरी मला लगेच भूक लागायची. त्या काळी मटण महिन्यातून एखाद् दिवशी असायचे आणि ते चुलीवरच केले जायचे. चुलीवरच्या मटणाची चवच काही न्यारी असते.
तसेच आम्ही कधी कधी चुलीत एखादा बटाटा, रताळं, करांदा, कोनफळ, बाठय़ाची कोय भाजायचो. यांची ती करपट मिश्रित रुचकर चव अप्रतिम लागायची. चिंचेच्या मोसमात दिवसभरासाठी चाळा म्हणून चिंचोके भाजायचे. भाताची कापणी झाली, शेतातून भारे वाहून नेले की शेतात जायचे आणि शिल्लक राहिलेल्या कुठे कुठे पडलेल्या तांदळाच्या कणश्या (कणसे) गोळा करायच्या आणि त्या आणून चुलीत निखाऱ्यावर टाकायच्या, मग त्याच्या फाट फाट लाह्या होत. या लाह्या खाणेही एक छंदच असायचा. थोडी मोठी झाले म्हणजे ५ वी ६ वीत असेल तेव्हा मग घरातल्यांचे चुलीचे काम झाले की आमच्या पडवीतच खऱ्या चुलीवर भातुकली खेळायचे. मग या चुलीवर कधी मुगाची भाजी, कधी अंडय़ाचे कालवण, भात, अंडे तळणे असे प्रकार करू लागले. हे प्रकार मी घरातल्यांनाही खायला द्यायचे आणि ते माझी वाहवा करायचे.
माझी चुलत भावंडे दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी यायची. अशा वेळी आम्ही पार्टी करायचो. पार्टी म्हणजे आम्ही स्वत: वाडीत एखाद्या झाडाखाली चूल मांडून जेवण किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवायचो. ही चूल बनवण्यासाठी आम्ही तीन विटा घ्यायचो. जास्त करून बटाटय़ाची भाजी, भात किंवा अंडय़ाचे कालवण असायचे, कारण हेच करायला सोपे असायचे. पण अंडय़ाचे कालवण बऱ्याचदा पचपचीत व्हायचे. हे जेवण आम्ही चुलीजवळच केळीच्या पानात जेवायचो. वाटय़ा वगरे नसायच्या त्यामुळे कालवण पानातून ओघळायचे. ते पचपचीत कालवण वर गरम-गरम भाताबरोबर खाताना मौज वाटायची, शिवाय आपण केल्याचा एक वेगळाच आनंद असायचा. एकदा तर कोजागरीनिमित्त बटाटेवडेही केले होते.
लग्न ठरल्यावर आपल्याला चुलीचा सहवास मिळणार नाही असे वाटले. कारण लग्न ठरलेल्या घरी चुलीला जागाच नव्हती. पण सासऱ्यांनी आधीच जवळ वाडी घेऊन ठेवली होती व तिथे घराचे काम चालू केले होते. लग्न झाल्यावर साधारण दीड वर्षांतच आम्ही नवीन वाडीत राहायला गेलो. मला चुलीची अत्यंत आवड असल्याने व घराच्या मागील बाजूस भरपूर जागा असल्याने मी तिथे तीन विटा मांडून चूल पेटवली. बहुतेक रविवारी मी त्यावर मटण शिजवू लागले. चूल पेटविल्याने सासूबाई माझ्यावर खूश झाल्या कारण त्यांना चूल आवडते आणि नोकरी करूनही मी हा छंद जोपासते याचे घरात सगळ्यांनाच कौतुक वाटते.
हळूहळू आम्ही मागे पडवी बांधली. एक दिवस मी मिस्टरांबरोबर जाऊन एका कुंभारवाडय़ातून मातीची चूल, तवी (कालवण करण्यासाठीचे मातीचे भांडे) खापरी (भाकरी करण्याचा मातीचा तवा) घेऊन आले व पडवीत ठेवले. संध्याकाळी कामावरून आले की मी चूल पेटवायचे. रोज नाही पण काही सणांच्या, व्रतांच्या दिवशी आम्ही धुपांगणात धूप जाळून घरभर फिरवतो. त्यामुळे मला प्रसन्नता अनुभवायला मिळते.
संध्याकाळी चूल लावली की माझा पुतण्या शेकण्यासाठी माझ्या बाजूला बसून अभ्यास करायचा. चुलीच्या निखाऱ्यावर तोही वाकटय़ा, बोंबील भाजू लागला. साधारण वर्षांनंतर मातीची चूल पाण्याने खराब झाली तेव्हा वाईट वाटले. मग मी परत विटाच मांडल्या.
आम्ही वरचेवर रविवारी मटण/चिकन चुलीवरील तवीत शिजवून झाडाखाली पारावर एकत्र जेवायला बसतो. त्यामुळे मला पूर्वीचे जास्त काही हरवल्यासारखे वाटत नाही. कधी कधी मी भातही या तवीत शिजवते. मातीच्या भांडय़ातील पदार्थाना वेगळीच रुची असते. धुराचा व दाहकतेचा थोडा त्रास होतो, पण त्यापेक्षा मला त्यातून आनंद जास्त मिळतो.

मराठीतील सर्व लेख ( Vastu-lekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chool the cooking stove

ताज्या बातम्या