वास्तू प्रतिसाद

सुधारणांची हवी तशी प्रसिद्धी झालेली नसल्यामुळे, बऱ्याच गृहनिर्माण संस्था व त्यांच्या सदस्यांपर्यंत त्यांची माहिती अजून पोहोचलेली नाही.

सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अक्रियाशील सदस्य १९ जून २०२१च्या ‘वास्तुरंग’मध्ये विश्वासराव सकपाळ यांच्या ‘अक्रियाशील सभासद : मतदान मुभा, ३१ मार्च २०२२ पर्यंत अक्रियाशील सभासद मतदानास पात्र’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भाने खुलासा करणे आवश्यक आहे.  ९ मार्च, २०१९ पासून लागू झालेल्या सुधारित महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये मूळ कायद्याच्या क्रियाशील व अक्रियाशील सदस्यांबाबतच्या सर्व तरतुदी सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू होत नाहीत. या सुधारणांची हवी तशी प्रसिद्धी झालेली नसल्यामुळे, बऱ्याच गृहनिर्माण संस्था व त्यांच्या सदस्यांपर्यंत त्यांची माहिती अजून पोहोचलेली नाही. या सुधारित कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी एक नवीन विभाग अंतर्भूत करण्यात आला आहे व त्यातील कलम १५४-ब(२) प्रमाणे मूळ कायद्याची जी शंभराहून अधिक कलमे व उपकलमे सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू होणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये क्रियाशील व अक्रियाशील सदस्याबाबतच्या सर्व तरतुदींचा, म्हणजे कलम २(१९-अ१), कलम २६, कलम २७ यांचा समावेश आहे. परिणामी सभासदांचे ‘क्रियाशील’ व ‘अक्रियाशील’ असे वर्गीकरण करणे व त्याअनुषंगाने मूळ कायद्यात असलेल्या इतर तरतुदी सहकारी गृहनिर्माण संस्थांना, मार्च २०१९ म्हणजे कोविड साथरोगाला सुरुवात होण्याच्या सुमारे वर्षभर आधीपासूनच लागू नाहीत. मूळ कायद्यामधील या सुधारित तरतुदींमुळे उपविधींमधील क्रियाशील व अक्रियाशील सदस्यांबाबतच्या सर्व तरतुदी आपोआप रद्दबातल होतात याची सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी नोंद घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ, मार्च २०१९ पासून गृहनिर्माण संस्थांचे सर्व सभासद संस्थेच्या सर्व सभांमध्ये सहभाग घेण्यास व त्यामधील कोणत्याही ठरावावर व निवडणुकीसाठी मतदान करण्यास कायद्याने पात्र आहेत. म्हणूनच  सकपाळ यांनी अक्रियाशील सभासदांविषयी उपस्थित केलेले मुद्दे व त्याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णय सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांना लागू असतील. त्यामुळे अक्रियाशील सभासदांना मतदानास पात्र असण्यासाठीची ३१ मार्च २०२२ पर्यंतची मर्यादा सहकारी गृहनिर्माण संस्था व त्यांच्या सभासदांसाठी नाही.

श्रीश कामत

wkamat.shrish@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cooperative housing society inactive members ssh

ताज्या बातम्या