मंगल उमेश
अश्विन शुक्ल प्रतिपदेला घराघरांत सुरू झालेला नवरात्रोत्सवाचा आनंद चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत होत होत विजयादशमीपर्यंत येऊन पोहचतो. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा। सापडला तो साधा आजि मुहूर्त बरा। असं ज्या सणाविषयी म्हटलं जातं तो म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक…
घरातल्या वाईट विचारांचे सीमोल्लंघन करायला लावणारा, मनामनांत सद्भावनांचे दीप उजळवणारा, नाती जोपासणारा, घरात सुखसमृद्धी घेऊन येणारा पवित्र सण दसरा… हा पवित्र सुदिन गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या घरात उत्साहानं साजरा करतात. दसर्याच्या आधी नऊ दिवस घरामध्ये घटस्थापना झाल्यानं आदिमायेचा जागर सुरू असतो. घर सा्त्विवक, पवित्र वातावरणानं भारलेलं असतं. नऊ दिवस भक्तिमय वातावरणात न्हालेल्या घराला विजयादशमी दिवशी एक वेगळीच लकाकी येते. तनमनानं शुचिर्भूत झालेल्या घरात सुख, समृद्धी व सकारात्मकता यावी यासाठी दसर्याच्या दिवशी आंब्याची पानं, भाताच्या लोंब्या, झेंडूच्या फुलांचं तोरण दारावर बांधलं जातं. घरातल्या सणसुदीच्या उत्साही वातावरणात भर घालण्यासाठी शुभतेचं पतीक असणारी रांगोळी घराच्या प्रवेशद्वारात काढली जाते. काही लोक हौसेनं घराला रंगरंगोटी करून, नवीन फर्निचर किंवा शोभेच्या वस्तू आणून घराचं रुपडं सुंदर करण्याचा प्रयत्न करतात. हा शुभमुहूर्त साधून काही लोक नवीन घर खरेदी करतात, तर काही नवीन वाहन खरेदी करतात. घरात एखादं शुभकार्य करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक जण दसर्याचा सकारात्मक ऊर्जा देणारा शुभ दिवस ठरवतात.
घटस्थापनेला घरात बसवलेला घट व देवघरातले देव दसर्याच्या शुभ मुहूर्तावर उठवले जातात. घरच्या देवांची यथासांग पूजा करून पुरणपोळी, श्रीखंडपुरी, बासुंदीपुरी, खीर अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. घटस्थापनेच्या वेळी स्थंडिलावर पेरलेल्या धान्याचे उगवलेले कोंब घरच्या देवांना वाहून त्या धान्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.
पौराणिक कथेनुसार, विजयादशमी दिवशी दुर्गादेवीनं महिषासुर राक्षसाचा वध करून दुष्ट शक्तीवर विजय मिळवला होता, तर प्रभू रामचंद्रांनी रावणाचा याच दिवशी वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता. देवादिकांच्या विजयानं पावन झालेल्या या विजयादशमीप्रमाणे आपल्या घरातही अनेक विजयोत्सव साजरे व्हावेत, हा सकारात्मक विचार हा सण साजरा करण्यामागे प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळेच घरात शत्रूचा पराभव करणार्या व स्वसंरक्षणासाठी मदत करणार्या शस्त्रांची पूजा केली जाते. उपजीविकेसाठी मदत करणार्या व जीवनात यश मिळवून देणार्या आयुधांची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. शेतकरी, कामगार आपल्या लोखंडी अवजारांची पूजा करतात. व्यापारी त्यांच्या तराजू आणि खातेवहीची पूजा करतात. विद्यार्थी लेखणी व वह्यापुस्तकांची पूजा करतात, तर कलाकार मंडळी आपल्या वाद्यांची पूजा करतात. या दिवशी वाहनांचीही पूजा केली जाते.
आपल्या घरातलं अज्ञान दूर व्हावं व घर ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून निघावं, हा सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून ज्ञान, बुद्धी व सृजनशक्ती यांचं प्रतीक असलेल्या सरस्वतीदेवीचे पूजन या दिवशी मनोभावे केले जाते.
ऐतिहासिक काळात लोक दसर्याच्या शुभ मुहूर्तावर सीमोल्लंघन करून नवीन मोहिमेवर जात असत. मोहिमेत विजय मिळवून मिळालेली धनसंपत्ती ते घरी आणत. ही परंपरा लक्षात घेऊन ग्रामीण भागात आजही लोक सीमोल्लंघन करून आपट्याच्या किंवा शमीच्या झाडाची पूजा करतात. सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं घरी घेऊन येतात. काही गावांमध्ये आपट्याच्या पानांची यथासांग पूजा करतात व ती पानं सोनं म्हणून लुटून आपापल्या घरी घेऊन येतात. हे लुटलेलं सोनं पुरुष मंडळी जेव्हा घरी घेऊन येतात, त्यावेळी घरातली स्त्री त्याचं औक्षण करून ते घरात घेते. त्यानंतर ते सोनं घरातल्या आधी देवाला वाहिलं जातं. घरातल्या वडिलधार्यांना सोनं देऊन झाल्यावर आपल्या आसपासच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना दसर्याच्या शुभेच्छा देत सोनं वाटलं जातं. शहरांमधल्या घरांमध्येही लहानथोर मंडळी एकमेकांना शुभेच्छा देत सोनं वाटत असतात.
असा हा घरातल्या वाईट विचारांचे सीमोल्लंघन करायला लावणारा, मनामनात सद्भावनांचे दीप उजळवणारा, नाती जोपासणारा, घरात सुखसमृद्धी घेऊन येणारा पवित्र सण दसरा आहे. चला तर मग प्रत्येकाच्या घरात सुख, शांती व समृद्धी नांदावी या सकारात्मक शुभेच्छा देत म्हणू या, ‘‘सोनं घ्या, सोन्यासारखे राहा!
vasturang@expressindia.com
