भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणांना महत्त्व असले तरीही ‘दसरा’ या सणाचे महत्त्व खासच. खास अशासाठी एक की दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक सण, त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी ही अनंत काळ टिकून राहते आणि त्यासाठी कोणत्या विशिष्ट वेळेचा मुहूर्त पहावा लागत नाही. यासाठीच अनेकजण सोने खरेदीसाठीच नाही तर गृहप्रवेश, नव्या कार्यालयाचे उद्घाटन किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी या दिवसाची निवड करतात. पण या सणाच्या निमित्ताने प्रामुख्याने आढळणारी बाब म्हणजे या दिवशी नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन घराची चावी ताब्यात घेणे… या गोष्टी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. यामागची श्रद्धा अशी असते की, या दिवशी सीमोल्लंघन करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते.

कित्येकदा नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जातात. अशावेळी अनेकदा भाड्याच्या घरात किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहावे लागते. यावेळी राहण्यासाठी मनासारखे घर मिळाले तर काम करण्यासदेखील उत्साह असतो. अन्यथा घर किंवा खोलीत थोडीफार जरी अडचण असली, तरी कधी एकदा इथून बाहेर पडतो असे वाटायला लागते. पण या अडचणींमुळेच भविष्यात आपले घर कसे असावे, याची एक कल्पना मनात आकार घ्यायला लागते. तर कधी एखाद्या चांगल्या घरामुळे भविष्यातील माझे घर असेच असले पाहिजे, असेदेखील वाटते. एकदा का घर मनात आकारास आले की, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जो खटाटोप अथवा जी काही धडपड करावी लागते, त्यामुळे स्वत:च्या हक्काचं घर असणे, ही आयुष्यात किती मोलाची गोष्ट आहे हे समजते. आणि जेव्हा स्वत:च्या मनासारखं, हव्या असलेल्या ठिकाणी हे घर सापडले की ते ‘यादगार’ ठरावे म्हणून दसर्‍याचा मुहूर्त ठरविला जातो. कारण एका घरातून दुसर्‍या घरात तेही स्वत:च्या मालकीच्या घरात प्रवेश करणे म्हणजे खर्‍या अर्थाने सीमोल्लंघन करण्यासारखंच असतं.

अलिकडे ‘सीमोल्लंघना’ची ही लोकप्रिय होत असलेली मानसिकता लक्षात घेऊन विकासकदेखील या निमित्तानं तर्‍हेतर्‍हेच्या ऑफर्स देतात. जसे रजिस्ट्रेशन अथवा सटॅम्प डयुटीवर सवलत किंवा नवीन सोसायटीमधील जिमची मोफत मेंबरशिप… वगैरे. याचा फायदा असा होतो की, घरासाठी जास्तीजास्त खरेदीसाठी मिळतात.

मनासारखं घर हव्या त्या दिवशी मिळालं की, घराच्या सजावटीचादेखील बेत आखला जातो. अशावेळी घराचा कोपरान् कोपरा सजविला जातो. दारावर भरगच्च अशा झेंडूच्या फुलांची तोरणं सजविली जातात. दारासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. या सार्‍या गोष्टी घराला एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा देत असतात. कित्येकदा तर घराबरोबर नवीन गाडीचीदेखील खरेदी केली जाते. किंवा घरातील ‘गृहलक्ष्मी’साठी विशेष स्वरुपाची सोन्याची खरेदी केली जाते.

या सर्व गोष्टी करण्यामागे एकच विचार असतो, तो म्हणजे नवीन घर आणि दसर्‍याच्या निमित्ताने घरात येणारी सुख-समृद्धी ही अनंत काळ टिकणारी असते. अर्थात यामुळे खरेदीची उलाढाल होत असल्यामुळे प्रत्यक्ष बाजारातदेखील तेजी असते. अगदी मोठ्या घटकांपासून ते लहान-सहान घटकांपर्यंत तेजीचा उत्साही दिसतो. जसे हेच पाहा ना, घर घेतलं की ते सजविण्यासाठी विविध महागड्या वस्तूंचा वापर केला तरी कित्येकदा पारंपरिकता जपण्यासाठी मातीच्या कलात्मक वस्तूंनादेखील घरात स्थान दिलं जातं. किंवा जुन्या टिकाऊ लाकडांचा वापर करून घराला वाड्यासारखा ‘लुक’ दिला जातो. जेणेकरून घर म्हणजे फक्त आलिशान हॉटेलची रूम न वाटता, त्याचं घरपण जपण्याचा प्रयत्न केला जातो.

मग कधी आजी-आजोबांसाठी एखादा विशिष्ट कोपरा सजविला जातो, जिथे ते आरामखुर्चीवर बसून आरामात डोलण्याचा आनंद घेऊ शकतील किंवा छोट्या बच्चेकंपनीसाठी अशी एक भिंत दिली जाते की त्यावर ते आपल्या मनातील भाव-भावनांचे तरंग रेखाटू शकतील.

थोडक्यात काय, घर मग ते लहान असो वा मोठे, पण आपल्या मालकीचे असणे महत्त्वाचं असतं. मग अशा घरात निर्माण झालेला आनंदी क्षण ते इतर कोणत्या गोष्टींमुळे असो वा सणांमुळे, ते परस्परातील नात्यांची वीण सुदृढ ठेवायला नेहमीच मदत करतात. आणि तेच घराचं घरपण ठेवायला पुरेसं असतं. suchup@gmail.com