‘वास्तुरंग’ (६ जून) मधील ‘डिफॉल्ट डिम्ड कन्व्हेअन्स सर्वोत्तम पर्याय’ हा सुधीर दाणी यांचा लेख वाचला. काही व्यावहारिक अडचणींमुळे डिफॉल्ट डिम्ड कन्व्हेअन्स अशी तरतूद करता येणे शक्य होणार नाही असे vr06मत व्यक्त करावेसे वाटते. दाणी यांनी आपल्या लेखात कन्व्हेअन्स (खरेदीखत)च्या अभावी त्रासलेल्या हजारो सदनिकाधारकांची आणि गृहनिर्माण संस्थांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या संदर्भात कन्व्हेअन्स आणि डिम्ड कन्व्हेअन्स म्हणजे नक्की काय? आणि त्याची आवश्यकता का आहे? हे समजून घेणे जरुरीचे आहे. कन्व्हेअन्समुळे इमारत ज्या जमिनीवर बांधलेली आहे त्या जमिनीचा मालकीहक्क हितसंबंध (टायटल) संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या नावे होतो. भविष्य काळाच्या दृष्टीने गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीचा मालकीहक्क असणे अतिशय आवश्यक आहे. एखाद्या स्थावर मिळकतीचा मालकीहक्क बाय डिफॉल्ट दुसऱ्याच्या नावे केला जाऊ शकत नाही. एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे स्थावर मिळकतीचा मालकीहक्क बदलला जाण्याकरिता नोंदणीकृत दस्तऐवज होणे जरुरीचे असते. कन्व्हेअन्स  किंवा डिम्ड कन्व्हेअन्सदेखील सोसायटीच्या नावे नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारेच होत असते. कन्व्हेअन्सची तरतूद महाराष्ट्र सदनिका मालकीहक्क कायदा १९६३ (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अ‍ॅक्ट) यामध्ये आहे. विकासकांकडून होणारे गैरव्यवहार आणि विकासकांची मनमानी या गोष्टींना आळा बसावा आणि सदनिका खरेदीदारांना संरक्षण मिळावे हा या कायद्याचा मुख्यत: हेतू आहे. विकासकाने मिळकत विकसित करून त्या ठिकाणी बांधलेल्या इमारतींमधील रहिवाशांची गृहनिर्माण संस्था (सोसायटी) स्थापन करून देणे विकासकावर बंधनकारक असते. गृहनिर्माण संस्था (सोसायटी) स्थापन केल्यानंतर संस्थेच्या नावे इमारत व त्या खालील जमिनीचा मालकीहक्क हितसंबंध कन्व्हेअन्स डिम्डद्वारे हस्तांतरित करून देण्याची तरतूद महाराष्ट्र सदनिका मालकीहक्क कायद्याच्या कलम ११ मध्ये सुरुवातीपासूनच आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने विकासकांकडून कन्व्हेअन्स डीम्डची नोंदणी करून दिली गेली नसल्याने हजारो सोसायटय़ांच्या नावे कन्व्हेअन्स होऊ न शकल्याने या कायद्याच्या कलम ११ मध्ये दुरुस्ती करून डिम्ड कन्व्हेअन्सच्या तरतुदींचा अंतर्भाव करणे शासनाला भाग पडले. डिम्ड कन्व्हेअन्सची नोंदणी करून घेण्याकरिता सोसायटय़ांना जी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्या संबंधीची माहिती वास्तुरंगमधल्या अनेक लेखांमधून याआधी देण्यात आलेली आहे. विकासक अथवा जमिनीचे मूळ मालक यांच्या सहकार्याशिवाय किंवा संमत्तीशिवाय नोंदविण्यात येणाऱ्या खरेदीखताला ‘डिम्ड कन्व्हेअन्स’ असे संबोधले जाते. राज्याच्या गृहनिर्माण खात्याकडून डिम्ड कन्व्हेअन्सबाबत २७ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीनुसार सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती, सक्षम अधिकाऱ्यांनी डिम्ड कन्व्हेअन्सच्या प्रस्तावावर प्रस्ताव आल्यापासून ६ महिन्यांच्या आत निर्णय देणे, सक्षम अधिकाऱ्यांच्या निर्णयावर अपिलाची तरतूद नसणे, एखाद्या सोसायटीद्वारे डिम्ड कन्व्हेअन्सचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विकासक व जमीन मालक यांना नोटिसा बजावून त्यांची बाजू मांडण्याची संधी देणे, नैसर्गिक न्यायतत्त्वांचा अवलंब करणे अशा अनेक तरतुदी यामध्ये आहेत.
थोडक्यात, एखाद्या सोसायटीच्या नावे इमारत व त्याखालील जमिनीचा मालकीहक्क हितसंबंध हस्तांतरित होण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज असणेच जरुरीचे आणि आवश्यक असते.
– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

आठवणीतले कपाट
‘वास्तुरंग’ (५ मे ) च्या अंकातील शुभदा कुलकर्णी यांचे ‘तो फिरकीचा तांब्या’ हे पत्र वाचले. माणसाच्या भावना त्याने वापरलेल्या वस्तूत किती गुंतलेल्या असतात याचे हे उदाहरण आहे. हे पत्र वाचून मला माझ्या आईच्या आवडत्या जाळीच्या लाकडी कपाटाची आठवण झाली. आईच्या सासुबाईंच्या जमान्यातले ते दूधदुभत्याचे कपाट आईने हयातभर वापरले. फक्त रंग सोडला तर ते उत्तम स्थितीत होते. पण आम्ही मुंबईतले जुने घर बदलून उच्चभ्रू वस्तीत राहायला जाणार होतो. तिथल्या आधुनिक फ्लॅटमध्ये हे जुनाट जाळीचे कपाट आता शोभणार नाही असे बहुतेकांचे म्हणजे आम्हा भाऊ-बहिणींचे म्हणणे होते. वडिलांनाही कपाट हवेसे वाटत असेल, पण त्यांनी यावर काही भाष्य केलं नाही. नंतर सर्वानुमते म्हणजे आई सोडून ते कपाट आमच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या बाईला देण्याचे ठरले. आईची इच्छा नव्हती. पण सगळ्यांपुढे तिला बोलता येईना. सर्व सामानाची बांधाबांध झाल्यावर शेवटच्या दिवशी ते कपाट बाईच्या डोक्यावर चढवले. ती बाई घरातून निघाल्यापासून गल्लीच्या तोंडाशी जाऊन दिसेनाशी होईपर्यंत आई त्या कपाटाकडे पाहात होती. तिच्या मनातले दु:ख त्या वेळी मला जाणवले. पण वेळ निघून गेली होती. माझ्या लग्नानंतर जेव्हा माझे सासू-सासरे गावचे बस्तान हलवून माझ्याकडे राहायला आले, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे जुन्या काळातले जाळीचे लाकडी कपाटही आले. त्या वेळी अनेकांकडे अशी जाळीची कपाटे असत. ते कपाट पाहून मला माझ्या आईची खूप आठवण आली. तिचा निराश चेहरा आठवला आणि मी ठरवले, काहीही झाले तरी हे जाळीचे कपाट कुणाला द्यायचेही नाही आणि मोडीतही काढायचे नाही. माझ्या स्वयंपाकघरात इतर आधुनिक वस्तूंसह हे जाळीचे कपाटही दिमाखात विराजमान झाले आहे. अजूनही आमच्याकडे येणाऱ्यांपैकी काही जण म्हणतात की, ‘हे कपाट जुन्या स्टाईलचे आहे, देऊन टाका मोडीत.’ पण मी मात्र त्याचा वापर काही वस्तू ठेवण्यासाठी तसेच थंडीच्या दिवसांत दूधदुभते ठेवण्यासाठी करते. मी आहे तोवर ते कपाट तिथेच राहील. कारण त्यात माझ्या आईची आठवण गुंतलेली आहे.
– विजया अडबे, नाशिक.

पवित्र मंदिर
‘विश्वंभरे बोलविले’ या वसंत नरहर फेणे लिखित कादंबरीवरील मीना गुर्जर यांनी लिहिलेला लेख वाचला. हा लेख कादंबरी वाचनाचा पुनप्र्रत्यय देणारा आहे. हा लेख म्हणजे या कादंबरीचे अगदी सुरेख रसग्रहण आहे.
– उमा अमकर

उत्तम लेख
‘वास्तुरंग’मधील ‘शब्दमहाल’ या लेखमालेतील वसंत नरहर फेणे यांच्या ‘विश्वंभरे बोलविले’ या पुस्तकावरील ‘पवित्र मंदिर’ हा लेख वाचला. लेख खूप आवडला. लेखिकेने या लेखमालेतून एक सुंदर आणि उत्तम पुस्तक तसेच वसंत नरहर फेणे यांच्यासारखा चांगला लेखक वाचकांसमोर आणला आहे. या लेखाबद्दल लेखिकेचे अभार!
– जयंत पिटके

वाचनानंद मिळाला
‘वास्तुरंग’मधील ‘शब्दमहाल’ या लेखमालेतील वसंत नरहर फेणे यांच्या ‘विश्वंभरे बोलविले’ या पुस्तकावरील ‘पवित्र मंदिर’ हा लेख खूप आवडला. मी फेणे यांचा चाहता आहे. मी माझे पुस्तकही त्यांना अर्पण केले आहे. त्यांच्या कादंबरीवरील लेख वाचून आनंद झाला.
– उदय कुलकर्णी