scorecardresearch

घर स्वप्नातलं : गच्चीतली गळती आणि उपाय

आपण गेल्या भागात इमारतीत गळती होण्याची कारणं आणि ती रोखण्याकरता कोणती काळजी घेतली पाहिजे,

घर स्वप्नातलं : गच्चीतली गळती आणि उपाय
प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. मनोज अणावकर
आपण गेल्या भागात इमारतीत गळती होण्याची कारणं आणि ती रोखण्याकरता कोणती काळजी घेतली पाहिजे, तसंच प्राथमिक उपायांविषयी जाणून घेतलं. या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयाबद्दल म्हणजेच ‘इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर गच्चीतून होणाऱ्या गळती’विषयी जाणून घेण्याबरोबरच ही गळती रोखण्याकरता कोणते उपाय असतात, याविषयी माहिती घेणार आहोत.

अनेकदा नवीन जागा विकत घेताना ‘टॉप फ्लोअर’ विकत घेण्याकडे अनेकांचा कल असतो. बिल्डरही ‘फ्लोअर राइझ’ लावून जसजसे मजले वाढत जातात, तसे जागेचे भाव अधिक आकारतात. अर्थातच, सर्वात वरच्या मजल्यावर अधिक भाव देऊन जागा विकत घेतली जाते. पण जर गच्चीच्या स्लॅबच्या काँक्रीटचा दर्जा योग्य नसेल किंवा त्यात काँक्रीट सुकत असताना पडणारे ‘श्रिंकेज क्रॅक’ म्हणजे बारीक भेगा पडल्या असतील किंवा सर्वात वरच्या मजल्याच्या स्लॅबवर घातले जाणारे उष्णतारोधक आणि वॉटरप्रूफिंगचे असे जे दोन थर असतात, त्या थरांमध्ये तडे गेले असतील, तर त्यातून बऱ्याचदा गळती सुरू होते. त्यामुळे नवीन इमारतींच्याही वरच्या मजल्यावर गळती होऊ शकते. गच्ची रोज दुपारी आणि विशेषत: उन्हाळय़ातल्या दुपारी तर खूपच तापते. त्यामुळे गच्चीवर टाइलच्या तुकडय़ा-तुकडय़ांपासून तयार केलेलं ‘चायना मोझॉइक’चं फ्लोअिरग तापून प्रसरण पावतं. रात्री जेव्हा तापमान खाली उतरतं, तेव्हा ते आकुंचन पावतं. या सततच्या प्रसरण-आकुंचन पावण्यामुळे गच्चीच्या फ्लोअिरगवर ताण येऊन इमारतीचं वय जसजसं वाढत जातं, तसतशा त्यात आधी खूप बारीक आणि अरुंद भेगा आणि हळूहळू त्या रुंदावत जाऊन रुंद तडे तयार होतात. यामधून मग पाण्याची गळती सुरू होते. त्यामुळे त्यावर ठरावीक कालांतराने उपचार करावे लागतात. नाहीतर जास्तीचे पैसे मोजून हा गळतीचा त्रास ‘टॉप फ्लोअर’वर राहणारे विकत घेतात आणि ‘टॉप आणि हवेशीरपणा नको, पण गळती आवरा’ अशी स्थिती होते.

आता यावर उपाय काय, तर ज्याप्रमाणे रुग्णाचं वय आणि शरीराची एकूण स्थिती बघून डॉक्टर उपचार ठरवतात, त्याप्रमाणे इमारतीचं वय आणि एकूण ‘स्ट्रक्चरल कंडिशन’ बघून उपाय कोणते करायचे याविषयी निर्णय घ्यावे लागतात. इमारतीचं वय खूप जास्त नसेल आणि गच्चीच्या फ्लोअिरगमध्ये किंवा वर उल्लेखलेल्या फ्लोअिरगखालच्या दोन थरांमध्ये जर फार मोठय़ा प्रमाणावर भेगा किंवा तडे गेले नसतील, तर काही गळतीविरोधी रसायनं लावून गळती रोखता येते.

बाजारात मिळणाऱ्या अनेक कंपन्यांची खास गच्चीतून होणारी गळती रोखण्यासाठी असलेली आणि रंगाप्रमाणे ब्रशने लावता येण्याजोगी गळतीविरोधी रसायनं लावून गळतीवर नियंत्रण मिळवता येतं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती ही की, ही रसायनं केवळ गच्चीच्या फ्लोअिरगवर न लावता, गच्चीच्या पॅराफिट वॉल, म्हणजे कठडय़ाच्या भिंतीला आतून, बाहेरून आणि कठडय़ाच्या ज्या आडव्या भागावर आपण हात ठेवून उभे राहतो, त्या भागावरही फ्लोरिंगबरोबरच लावणं आवश्यक आहे. कारण पाणी यापैकी कुठूनही मुरू शकतं. जर फ्लोअिरग किंवा त्याखालच्या थरांमधल्या भेगा किंवा तडय़ांचं प्रमाण जास्त असेल, तर ते बुजवण्यासाठी ‘इंजेक्शन ग्राऊटिंग’ करावं लागतं. यामध्ये काही ठरावीक अंतरावर फ्लोअिरगवर भोकं पाडून प्लास्टिकच्या छोटय़ा, कमी लांबीच्या नळय़ा या भोकांमध्ये घातल्या जातात. नंतर सिमेंट आणि पाण्याचं मिश्रण एका ठरावीक प्रमाणात मिसळून कधीकधी त्यात गळतीविरोधी रसायनंही मिसळली जातात. हे मिश्रण इंजेक्शनद्वारे ठरावीक दाबाखाली वर सांगितलेल्या नळय़ांमधून स्लॅबमध्ये आणि त्याखालच्या थरांमधल्या भेगा आणि तडय़ांमध्ये भरले जाते. ठरावीक काळानंतर जेव्हा हे मिश्रण सुकून दगडाप्रमाणे घट्ट होते, तेव्हा या भेगा अथवा तडे सांधले जातात आणि मग त्यातून होणारी गळती थांबते. पण ही पद्धत खूप जुन्या किंवा जर्जर इमारतींमध्ये वापरणं धोक्याचं ठरू शकतं, कारण अशा इमारतींमध्ये वाढत्या वयाबरोबर कमी झालेल्या काँक्रीटच्या घनतेमुळे त्याची ताकद कमी झालेली असल्यानं जेव्हा दाबाखाली हे मिश्रण भरलं जातं, तेव्हा हा दाब सहन करायची ताकद नसल्यानं उलट भेगा किंवा तडे अधिकच रुंदावण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी तात्पुरता असला, तरी वर सांगितलेला रसायनं ब्रशने लावायचा उपायच अधिक योग्य ठरू शकतो.

इमारतीचं वय जास्त नसेल, पण भेगा आणि तडय़ाचं प्रमाण जास्त असेल आणि दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची कमतरता नसेल, तर अधिक दीर्घ काळ टिकणारा आणि अधिक खात्रीचा उपाय म्हणजे स्लॅबच्या वरचे आधी सांगितलेले दोन्ही थर काढून ते नव्याने घालायचे. त्यामुळे गळती बंद व्हायला नक्कीच मदत होते. बऱ्याचवेळा गळती थांबवण्याकरता गच्चीवर पत्रे घालायचा उपाय केला जातो. पण हा गळती थांबवायचा योग्य उपाय नव्हे, कारण यात केवळ गच्चीवर पडणारे पाणी हे वरच्यावर गोळा करून बाहेर काढले जाते. पण काही नगरपालिका अथवा महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारच्या बंदिस्त बांधकामांना अनधिकृत समजले जाते आणि या उपायात गच्चीची स्लॅब आणि त्याखालच्या थरांमधल्या भेगा आणि तडे हे कोणत्याही उपायाविना तसेच राहतात. अजून एक सर्रासपणे केला जाणारा चुकीचा उपाय म्हणजे भेगांमध्ये डांबर भरले जाते. हे डांबर दिवसा तापून प्रसरण पावते आणि ज्या भेगांमध्ये ते भरले आहे, त्या अधिकच रुंदावतात. रात्री डांबर आकुंचन पावते, पण रुंदावलेल्या भेगा मात्र तशाच राहतात आणि पावसाळय़ात गळती अधिकच वाढते. त्यामुळे भेगा भरण्यासाठी डांबराचा वापर कधीही करू नये. त्याऐवजी डांबरी कापडाचे तागे येतात, ते गच्चीच्या कठडय़ावर आतून-बाहेरून आणि फ्लोअिरगवर चिकटवून कमी वेळेत, कमी खर्चात गळतीवर तात्पुरता उपाय करता येतो. हे सर्व गच्चीतून होणारी गळती थांबवण्याचे उपाय आहेत.

इमारतीत होणारी गळती ही गच्चीतून असो किंवा इतरत्र कुठून असो, पण गळती ही वेळीच थांबवली गेली पाहिजे. कारण पाणी जेव्हा स्लॅब, बीम, कॉलम यांसारख्या भागांमधून झिरपतं, तेव्हा केवळ जिथे गळती होते आहे, त्या बादर्शनी भागातच इमारतीचं नुकसान होत नाही, तर ते संरचनात्मक भागांमधून जेव्हा पाझरतं, तेव्हा या भागांमधल्या लोखंडी सळय़ा गंजायला सुरुवात होते आणि तिथेच इमारतीची कधीही भरून न येणारी झीज आणि हानी व्हायलाही सुरुवात होते. त्यामुळे इमारतीचं आयुष्य झपाटय़ाने कमी होऊ लागतं.
(सिव्हिल इंजिनिअर आणि इंटिरिअर डिझायनर)
anaokarm@yahoo.co.in

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dream home roof leaks and solutions buildings top floor floor rise amy