डॉ. मनोज अणावकर
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा असतात की त्या जगण्यासाठी आवश्यक असतात, पण याच गोष्टी काही वेळा जीवघेण्या ठरू शकतात. जसं सूर्यप्रकाश जगण्यासाठी आवश्यक आहे. पण उष्माघाताने उन्हाळय़ात काही जणांना जीव गमवावा लागतो. तसंच पाणीसुद्धा जगण्याकरता आवश्यक आहे. त्याला आपण ‘जीवन’ असंही म्हणतो. पण याच पाण्याचं प्रमाण शरीरात किंवा हृदयात जास्त झालं की ते धोकादायक ठरू शकतं. इमारतींच्या बाबतीतही असंच आहे. कॉक्रीट किंवा प्लॅस्टर तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते. पण हेच पाणी जेव्हा इमारतीतल्या भेगांमधून वाहू लागतं, तेव्हा पाण्याच्या पाझरामुळे किंवा गळतीमुळे जीव नकोसा होतो. त्यामुळेच अनेकांना पावसाळा आला की, प्रामुख्याने चिंता सतावते, खरं तर भयस्वप्नच पडतं, ते घरात होणाऱ्या गळतीचं! आणि ते अगदी स्वाभाविकच आहे. कधी कधी तर संतत धार लागली असेल तर बादल्या लावून ठेवाव्या लागतात. कारण गळती काय किंवा पाझर काय त्यामुळे घरात वावरणं, रहाणं तर कठीण होऊन बसतंच, पण घरातल्या फर्निचरचीही दुर्दशा होते आणि शेजाऱ्यांबरोबर किंवा सोसायटीतल्या अन्य सदस्यांबरोबर या गळतीमुळे होणाऱ्या वादविवादांमधून मन:शांती हरपते ती वेगळीच!
पण गळती किंवा पाझर होण्याची जी कारणं आहेत, त्यानुसार या गळती किंवा पाझर होण्याचे प्रकार असतात. आणि त्याच्या इमारतीतल्या जागाही कधी कधी निश्चितपणे नेहमी आढळणाऱ्या असतात. तसंच, त्यावरचे उपायही या कारणांवर अवलंबून असतात. पाण्याचा पाझर आणि गळती यात फरक आहे. अनेकदा आपल्याला भिंतीवर किंवा छताच्या खालच्या बाजूने ओल आलेली दिसते, तर कधीकधी पांढऱ्या किंवा काळय़ा रंगाची बुरशी दिसते किंवा इमारतीच्या बाहेरच्या बाजूला झाडाची पालवी फुटलेली दिसते. तिथे कुठेतरी आतून पाण्याचा पाझर असतो. त्यामुळे अशी बुरशी किंवा हिरवळ वाढू लागते. याप्रकारात पाणी सातत्याने गळत नसतं, तर केवळ ओल दिसून येते. पाण्याची संततधार लागते, तेव्हा ती पाण्याची गळती असते. पाझरणं किंवा गळती असणं हे कधी कधी केवळ पावसाळय़ात होतं, तर कधी बारमाही असतं. सर्वसाधारणपणे गळती सुरू झाली की, आपल्या वरच्या किंवा शेजारीच राहत असलेल्या सदनिकाधारकाला जबाबदार धरलं जातं. पण इमारतीत आणि विशेषत: जुन्या इमारतींमध्ये विटांची आणि काँक्रिटची घनता कमी झाल्यामुळे सच्छिद्रता वाढते. त्यामुळे अशा सच्छिद्र भिंतींमधून आणि छतामधून पाझर किंवा गळती सुरू होतात. कधी कधी तर इमारत जुनी असूनही जेव्हा नूतनाकरणाची फार मोठय़ा प्रमाणावर कामं केली जातात, भिंतींमध्ये तोडफोड करून फेरफार केले जातात, तेव्हा इमारतीच्या जुन्या सच्छिद्र भिंती आणि छतामध्ये तडे गेल्यामुळे त्यातून होणाऱ्या पाण्याच्या पाझराला किंवा गळतीला इतर कोणी नाही, तर आपणच जबाबदार असतो. बऱ्याचवेळा बाथरूममध्ये एका कोपऱ्यात पाणी वाहून जाण्याकरता असणाऱ्या जाळीखाली जो न्हाणीट्रॅप असतो, त्या ट्रॅप आणि बाथरूमच्या फ्लोअिरगमधला सांधा लिंपण्यासाठी भरलेल्या सीमेंटचे पापुद्रे पडून भेगा पडतात, त्यातून ९० टक्केवेळा गळती होत असते.
तेवढा सांधा नव्याने पुन्हा सीमेंटने भरला की, गळती थांबते. पण हे माहीत नसल्यामुळे अनेकदा उगाचच संपूर्ण बाथरूम फोडून कन्सिल्ड पाइप नव्याने घालायची मागणी ज्याच्या घरी गळती आहे, त्याच्याकडून केली जाते. त्यामुळे पाझर किंवा गळतीचं नेमकं कारण शोधून मग त्यावर उपाय केला तरच गळती थांबते, अन्यथा कितीही खर्चिक उपाय करून किंवा कितीही महागाचं वॉटरप्रुफिंग कंपाऊड वापरूनसुद्धा गळती थांबणार नाही आणि गळती शोधायचं काम हे ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीनेच करावं लागतं. याव्यतिरिक्त करायचे काही उपाय खाली दिले आहेत-
बाहेरच्या भिंतींवर कुठेही पालवी दिसली, तर ती काढून टाकून तिथे असणाऱ्या भेगांमध्ये सीमेंट भरून घ्यावं. ॲसिड टाकू नये. कारण आतल्या सळय़ा गंजतात. पाइप जुने झाले असतील, तर ते बदलून घ्यावेत. तसंच, ते भिंतीला चिकटून बसवू नयेत, तर त्यांना क्लिपा मारून ते भिंतीपासून काही अंतर सोडून बसवावेत, म्हणजे पाइपमधून भिंतीत पाणी पाझरणार नाही.
खिडकीच्या वर असणारा आडवा सज्जा आणि त्यावरची उभी भिंत यांच्यात काटकोन तयार होऊ न देता, त्याला गोलाकार द्यावा, म्हणजे पावसाचं पाणी गळून जायला मदत होते.
पाण्याच्या तसंच सांडपाण्याच्या सर्व पाइपांमधून गळती होत नसल्याची खात्री करून घ्यावी. वातानुकुलित यंत्रातून पाणी सोडणारे पाइप लांब ठेवून त्यातलं पाणी थेट जमिनीवर पडेल, स्लॅबवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा ते सज्जा आणि भिंतीच्या सांध्यातून मुरून गळतीला आमंत्रण देऊ शकते.
६०-७० वर्ष जुन्या इमारतींमध्ये नूतनीकरणाच्यावेळी भिंतींमध्ये कोणतेही बदल अथवा तोडफोड, अथवा फॉल्स सिलिंग करू नये. कारण यामुळे जुने तडे आणि भेगा अधिक रूंदावतात, तर नवीन तडे आणि भेगा तयार होतात. मग त्यातून गळती सुरू होते.
हे आणि असे उपाय केलेत, तर गळतीवर नियंत्रण ठेवता येतं, इमारतीचं आयुष्य आणि ताकद लवकर कमी होत नाही, गळतीमुळे आपली ढळणारी मन:शांतीही नाहीशी होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमारतीच्या दुरुस्तीवर गळतीमुळे होणारा खर्च आणि घरातल्या फर्निचरचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.
(सिव्हिल इंजिनिअर आणि इंटिरिअर डिझाईनर)
anaokarm@yahoo.co.in