घराचा स्वप्नवत योग!

मुंबई-ठाण्यात घर घ्यायचं या नुसत्या कल्पनेनेही आज पोटात गोळा येतो.

विजय महाजन
मुंबई-ठाण्यात घर घ्यायचं या नुसत्या कल्पनेनेही आज पोटात गोळा येतो. पण ५५-६०वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा म्हणजे मी इंटर सायन्सला असताना घराचा एक स्वप्नवत योग आमच्या आयुष्यात आला. त्याची ही अचंबित करणारी कहाणी!

ठाण्यातील स्टेशन रोडवरचं महाजन कुटुंबाचं सामाईक घर सोडल्यापासून, म्हणजे माझ्या इयत्ता दुसरीपासून ते इंटपर्यंत आम्ही (आई-वडील, बहीण व मी) राम मारुती क्रॉस रोडवरील ‘पितृस्मृती’ नामक चाळीत जेमतेम दोनशे स्केअर फुटांच्या एका खोलीत राहत होतो. वडिलांची बेताची मिळकत आणि ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ ही वृत्ती, त्यामुळे तेव्हा मोठय़ा घराची स्वप्नंदेखील आमच्यापासून लांब होती. पण तो योग आमच्या नशिबात होता हेच खरं! नाहीतर एका लहान खोलीच्या बदल्यात दोन मोठय़ा खोल्या, त्याही एक पैसाही वर न देता ही लॉटरी लागणं कसं शक्य होतं? अर्थात दोन्ही जागा भाडय़ाच्या! तेव्हा ऐपत असणारी माणसं चाळी बांधत आणि ही हिंमत नसलेली त्यात भाडय़ाने राहत.

हा व्यवहार असा जुळून आला.. माझी मुलुंडची विमल मावशी म्हणजे त्याकाळचं चालतं बोलतं गुगल! सगळ्या माहितीचा विशेषत: उपवर वर-वधू आणि खरेदी- विक्रीसाठी उपलब्ध जागा याविषयक भरपूर खजिना तिच्यापाशी असे. एकदा मी मुरुडहून म्हणजे आजोळहून आणलेल्या भेटी तिला द्यायला गेलो असताना तिने पहिला प्रश्न केला, ‘‘तुम्हाला एका खोलीतून दोन खोल्यांत जायचं आहे?’’

‘‘इच्छा आहे, पण कसं जमणार?’’ – मी

‘‘एक मार्ग आहे..’’ मावशीचे हे शब्द ऐकताच मी कान टवकारले. ती म्हणाली, ‘‘देसाई नावाचे माझे एक परिचित आहेत. मुलुंड पूर्वेलाच राहतात. त्यांनी आपल्या मुलींसाठी आत्ताच ठाण्याच्या एम. एच. हायस्कूलमध्ये प्रवेश  घेतलाय. आता जून लागलाय म्हणजे लवकरच शाळाही सुरू होतील. पण मुलींना ठाण्याला ट्रेनने एकटय़ाने पाठवणं त्यांच्या जीवावर आलंय. म्हणून ते आणीबाणीच्या स्तरावर ठाण्यातील जागेच्या शोधात आहेत..’’ तिने पुढे सुचवलं की, ‘तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. दोघांच्या मालकांनी मान्य केलं तर परस्परांच्या जागेची देवाणघेवाण होऊ शकते.’’

अचानकपणे समोर आलेल्या या संधीच्या नुसत्या कल्पनेनेच मी हरखून गेलो आणि लगोलग ती जागा पाहूनही आलो. मुलुंड स्टेशनच्या पूर्वेला फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरील ‘प्राची’ नावाची ती टुमदार चाळ मला फार आवडली. शिवाय हा मनसुबा सत्यात उतरण्यासाठी तिथे एक आशेचा किरणही सापडला. मला कळलं की या ‘प्राची’ बिल्डिंगमध्ये  वरच्या मजल्यावर स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे राहतात. ते तर माझ्या वडिलांचे मित्र होते. दोघेही सेवापंथी. त्यांची मैत्री संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकत्रितपणे तुरुंगवास भोगताना अधिक दृढ झालेली! मुख्य गोष्ट म्हणजे दत्ताजी ताम्हाणे हे ‘प्राची’ चे मालक अण्णा ताम्हाणे यांचे सख्खे भाऊ आणि हे दोन्ही भाऊ तिथे एकत्रच राहत होते. याचा अर्थ आशेला जागा होती. प्राथमिक अंदाज घेऊन मी घरी परतलो आणि आल्याआल्या सर्व हकीगत आईच्या कानावर घातली. तोवर वडीलही परतले. त्यांच्या उत्कंठतेची पातळी एवढी वाढली की जेवण झाल्यावर त्याच रात्री ती दोघं मुलुंडला देसाईंच्या घरी जाऊन थडकली. प्राचीमधील पाचशे स्क्वेअर फूट एरियाची ती दोन खोल्यांची जागा म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग होता. मुख्य म्हणजे दोन खोल्यांच्या बदल्यात एक खोली हा व्यवहार देसाईंना मान्य होता, कारण त्यांना येनकेनप्रकारेण तातडीने ठाण्यात यायचं होतं. अर्थात त्यांच्या भाडय़ात चाळीस रुपयांची बचत होणार होती आणि आम्हाला तेवढे पैसे जास्त द्यावे लागणार होते. ते आम्हाला मान्य होतं. खरा प्रश्न दोन्हीकडच्या मालकांचा म्हणजे  त्यांच्या (पैशांच्या) मागणीचा होता. पण पहिली पायरी चढून झाली हा दिलासाही कमी नव्हता.

अण्णा ताम्हाणे म्हणजे एक भला माणूस. हसत हसत म्हणाले, ‘‘तुम दोनो राजी, तो क्या करेगा काजी.. आमचं जे भाडं आहे ते वेळेवर मिळावं हीच अट.’’

‘‘डिपॉझिटचं काय?’’ वडिलांचा भीत भीत प्रश्न.

‘‘अहो देसाईंचे पाचशे रुपये आमच्याकडे आहेतच की! ते तुमच्या नावावर वळवतो. तेवढी नगद रक्कम तुम्ही त्यांना द्या की झालं!’’ अण्णा ताम्हाणे यांनी चुटकीसरशी प्रश्न सोडवला.

आमचे मालक दादा घाणेकर यांची ठाण्यात बरीच दुकानं आणि चाळी होत्या. सहयोग मंदिरासमोर आजही ज्या गोलाकार टपऱ्या दिसतात (जिथून अळूवडय़ा, चकल्या, बटाटेवडे अशा तळणाचा खमंग वास येत असतो) त्या दादांच्याच मालकीच्या! आपला धाकटा भाऊ आबा घाणेकर याच्यासह दादांनी ठाण्यातील प्रसिद्ध हनुमान व्यायामशाळा उभारली. तिथल्या आखाडय़ात ते मुलांना कुस्ती शिकवत. दादा शाहीरही होते. गावोगाव जाऊन ते शिवरायांचे पोवाडे म्हणत आणि त्यातून येणारं उत्पन्न त्यावेळच्या कोणत्याशा शिवप्रकल्पाला देत. परंतु आमच्या या व्यवहारासाठी दादा राजी होणं हे आंब्याच्या झाडाला  पेरू लागण्याइतकं कठीण होतं.

पण या वेळी दैव आमच्या बाजूने होतं.अण्णा ताम्हाणेंना भेटून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी वडील दादांना भेटायला घाटकोपरला त्यांच्या घरी गेले. दादा घरी नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं. खरं तर ते घरातच असावेत, कारण वडील दोन तास तिथे चिकटून बसल्यावर ते नाईलाजाने आतून बाहेर आले. या चिकाटीचा परिणाम म्हणा किंवा आमची पुण्याई फळाला आली म्हणा.. त्यांचा पवित्रा सौम्य होता. त्यातच वडिलांबरोबर आलेल्या घरइच्छुक देसाईंची आणि त्यांची गावाकडची ओळख निघाली आणि हा सह्यद्री द्रवला. आमचा ठराव त्यांनी सहजपणे मान्य केला.

‘‘तुम्हा दोघांना पटलंय ना, मग करून टाकतो देसाईंच्या नावावर तुमचं डिपॉझिट वळतं..’’ आकाशातून पुष्पवृष्टी व्हावी तसे त्यांचे हे शब्द कानावर पडताच वडील आनंदाने नाचायचे तेवढे बाकी होते. अशाप्रकारे १४ जून १९६४ या दिवशी आम्ही जागा पाहिली आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जूनला त्यावर आमचं नाव लिहिलं गेलं, तेही पैशांच्या देवघेवीशिवाय!

एव्हाना शाळा सुरू झाल्याने सामान इकडून तिकडे हलवण्यासाठी दोन्ही बिऱ्हाडांची धावपळ सुरू झाली. या अदलाबदलीसाठी १९ जून हा दिवस ठरला. ट्रकचा व्यवसाय करणारे वडिलांचे एक मित्र हिंगेकाका यांच्यामुळे तीही सोय झाली.

आमच्या त्या टीचभर खोलीत सामान ते काय असणार? तरीही मोरीच्या वर गच्च भरलेला माळा रिकामा करायचं काम माझ्याकडे आलं. हा माळा आवरताना मला एक खजिना सापडला. तो मौल्यवान ऐवज म्हणजे वडिलांनी बारा-तेरा वर्षांपूर्वी लिहिलेली जमाखर्चाची डायरी! १९५१ ते ५४ या तीन-चार वर्षांच्या काळातील त्या हिशेबवहीने मला लहानपणी पडलेले अनेक प्रश्न.. ‘आपल्या घरी भाजी का नसते..’, ‘मधल्या वेळी शेंगदाणे हा एकच खाऊ का..’ इ. सोडवले.

एव्हाना मी जाणता झालो होतो. डायरीतील पानं वाचताना आई-वडिलांनी तुटपुंज्या मिळकतीत महिन्याची दोन टोकं कशी जुळवली असतील या कल्पनेने मला रडूच आलं. त्यात नमूद केल्याप्रमाणे १९५१ साली त्यांचा पगार होता ११५ रुपये! त्यातील १५ रुपये ऑफिसमधून परस्पर कापले जायचे. बहुधा फंडासाठी असावेत. १० रुपये पतपेढीत जात. शिल्लक की हप्ता कोण जाणे! उरलेल्या ९० रुपयात चार जणांचा महिन्याचा संसार!  त्या हिशेबवहीची पानं उलटताना आठवलं की पैसे वाचविण्यासाठी सख्खं नातं सोडून इतर कोणाच्याही लग्नात आई-वडील आम्हाला (मी व बहीण) नेत नसत. त्याकाळी बहुतेक सर्व लग्न गिरगावात! ठाण्याहून तिथे जायला ट्रेन व बस मिळून आम्हा दोघांचा दोन रुपये खर्च  यायचा. हा खर्च वाचला तर ते वाचवलेले २ रुपये चांगला आहेर देण्याच्या कामी येत. कोणतीही गोष्ट दुसऱ्यांना देताना आमची गरिबी कधीही आड आली नाही. चौघांना लग्नाचं गोडधोडाचं जेवण फुकट मिळणार हा विचारही कधी आई-वडिलांच्या मनात आला नाही. वडिलांची ती रोजनिशी गरज नसेल तर स्वत:साठी वायफळ खर्च करायचा नाही हा संस्कार सहजपणे उमटवून गेली.

वडिलांच्या रोजनिशीत आईच्या मिळकतीचीही नोंद होती. आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी ती पापड लाटायला जाई. शंभर पापडांचे आठ आणे या दराने ती रोज तीनशे ते चारशे पापड लाटून दीड-दोन रुपये मिळवी. तसंच घरच्या शिवणाबरोबर ती आजूबाजूच्या बायकांची पोलकीही शिवून देत असे. तिच्या कष्टांच्या कमाईतून आमची सुट्टीतील मुरुड- रेवदंडा ट्रिप होत असे. खरं तर तिचं माहेर तालेवार! ती स्वत:ही गणित व इंग्रजी हे विषय घेऊन त्याकाळची मॅट्रिक! पण माहेरच्या श्रीमंतीचा तिने कधी उच्चारही केला नाही की कधी आपल्या शिक्षणाचा टेंभा मिरवला नाही. महाजनांच्या घरात ती दुधातील साखरेसारखी विरघळली. त्या दुधाची गोडी तिच्यामुळेच होती. आचार्य अत्रे म्हणतात ते किती खरं आहे नाही.. ‘आई असेपर्यंत तिची किंमत कळत नाही, पण ती गेल्यावर मात्र कशाचीच किंमत राहत नाही!’

वडिलांची ती डायरी मला काही क्षणात मोठं करून गेली. मी मिटल्या ओठांनी माळ्यावरून खाली उतरलो आणि सामानाची बांधाबांध करू लागलो. सामानाच्या ट्रकबरोबर आई-वडील व बहीण असे तिघं आणि सामान उतरवायची व्यवस्था करायला मी ट्रेनने पुढे असा शिफ्टिंगचा शेवटचा अध्याय सुरू झाला. या प्रवासातही एक किस्सा घडलाच! मुलुंड ठाण्याच्या सीमारेषेवर आमचा ट्रक ऑक्ट्रॉयच्या  मागणीसाठी अडवला. घरगुती सामानाच्या ने-आणीवर ऑक्ट्रॉय लागत नाही हा ब्रिटिशांच्या काळापासूनचा नियम वडिलांना ठाऊक होता. मात्र त्यासाठी जे सर्टिफिकेट द्यावं लागतं ते आमच्याकडे नव्हतं. तरीपण ‘मी शेंगा खाल्या नाहीत त्यामुळे मी सालं उचलणार नाही..’ हा लोकमान्य टिळकी बाणा अंगात असल्याने प्रकरण मिटविण्यासाठी एक पैसाही देण्याची वडिलांची तयारी नव्हती. परीणाम काय.. तर तासभर उलटून गेला तरी आमचा ट्रक तिथेच उभा! शेवटी कंटाळून त्या लोकांनीच पुढे जायला परवानगी दिली आणि आईचा जीव भांडय़ात पडला. आमच्या या वादविवादाचा फायदा देसाईंनाही झाला. त्यांच्या सामानाची वरातही नेमकी त्याच वेळी चेक नाक्यावर आली. त्यांनीही ‘जो न्याय महाजनाना तोच आम्हाला’ हा मुद्दा लावून धरला आणि ऑक्ट्राय न भरता आपली सहीसलामत सुटका करून घेतली.

अशा प्रकारे ध्यानीमनी नसताना एका आठवडय़ाभरात आमच्या आयुष्यात हे मोठं स्थित्यंतर घडलं.

‘प्राची’मधली जागा आमच्यासाठी लकी ठरली. तिथून केवळ पाच वर्षांत आम्ही मुलुंडमध्येच पण स्वत:च्या जागेत गेलो. आम्ही ही जागा सोडतोय हे जेव्हा माझ्या मित्राला-वशाला (वसंत जोशी) कळलं तेव्हा त्याने मला एक गळ घातली. त्यावेळी त्याच्या कुटुंबाला जागेची अत्यंत नड होती. पण प्रश्न पैशांचा होता. त्याचे वडील जास्तीत जास्त दोन हजार रुपये पागडी (तोवर डिपॉझिटची जागा पागडीने घेतली होती) देऊ शकत होते, तेही इकडे तिकडे हात पसरून! खरं तर तोपर्यंत जागांच्या किमती चांगल्याच वाढल्या होत्या. ‘प्राची’सारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेला दहा हजार रुपये पागडी मिळणं सहज शक्य होतं. पण या बाबतीत मी अनभिज्ञ होतो. वशाने मोकळ्या मनाने सर्व परिस्थिती सांगताच मी त्याला धीर देत म्हणालो की, ‘तू अजिबात काळजी करू नकोस. मी सांगेन वडिलांना.. ते टाकतील माझ्यासाठी शब्द!’

हे मी कोणत्या भरवशावर म्हणालो कोणास ठाऊक! घरी आल्यावर वडिलांना सर्व सांगितलं   तेव्हा ते एकच वाक्य बोलले, ‘अरे तू सांगतोयस ती रक्कम फारच कमी आहे, पण बघू या मालक काय म्हणतात ते!’ त्यानंतर केवळ माझ्या शब्दांसाठी ते मालकांकडे, अण्णा ताम्हाणे यांच्याकडे गेले आणि काय आश्चर्य .. वशाचं नशीब बलवत्तर म्हणा किंबहुना त्यापेक्षाही जास्त माझ्या पापभीरू वडिलांनी (कधी नव्हे तो) शब्द टाकला म्हणून म्हणा त्या देवमाणसाने जोशी मंडळींना फक्त दोन हजार रुपये पागडीत ती मोक्याची जागा दिली. या घरव्यवहाराने शिकवलेला ‘शब्दांची व माणसांची किंमत कशी राखायची असते’ हा धडा मी पुढे आयुष्यभर विसरलो नाही.

शब्दांकन- संपदा वागळे

waglesampada@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dreamy yoga at home mumbai thane home ssh