scorecardresearch

Premium

निवारा : परवडणाऱ्या घराचे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र

गतीच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या देशात असे चित्र का? आपल्याला परवडणारी घरे बांधण्याची गरज का पडली?

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

प्रतीक हेमंत धानमेर

काही वर्षांपूर्वी मेळघाटात केवळ सहा हजार रुपयात घर बांधलेल्या एका आदिवासी बांधवाला भेटण्याचा योग आला. चिखल, गवत, बांबू आणि काही प्रमाणात लाकूड वापरून त्याने बऱ्यापैकी मोठे आणि सुंदर घर बांधले होते. त्या घराच्या बांधकाम खर्चाचा आकडा ऐकून माझ्यातला वास्तुशिल्पी चक्रावून गेला होता. सहाशे साडे-सहाशे चौ. फुटांचे घर केवळ सहा हजारांत? हे कमी खर्चातील घर बांधण्याची कला त्याला कोणत्या अर्थतज्ज्ञाने शिकवली?

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

लोकसंख्या झपाटय़ाने वाढतेय, पण राहणीमानाचा दर्जा उंचावण्याची मोठी जबाबदारी सरकारवर आहे. नागरिकांना योग्य आणि परवडणारी घरे पुरवणे हा मोठा यक्षप्रश्न विकसनशील भारतासमोर उभा आहे. या प्रश्नाला तोंड देण्याचे सरकारी, खासगी आणि वैयक्तिक असे सर्व प्रयत्न करून झाले आहेत, किंबहुना चालू आहेत; पण यात यशाचा टक्का अगदीच कमी, जवळजवळ नाहीच. प्रगतीच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या देशात असे चित्र का? आपल्याला परवडणारी घरे बांधण्याची गरज का पडली?

परवडणाऱ्या घराची उथळ व्याख्या करायची झाली तर- कुटुंबाच्या किंवा व्यक्तीच्या एकूण मासिक मिळकती पैकी ३०-४०% रक्कम गृहकर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी देऊ शकत असेल, तर सदर घर हे त्या कुटुंबासाठी किंवा व्यक्तीसाठी परवडणारे घर ठरते. ही व्याख्या खोलात जाऊन अभ्यासली तर संपूर्णत: अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या किंवा जिथे सर्व व्यवहार पशाने होतात अशा शहरी व्यक्तीला ती लागू होते. ग्रामीण भागात परिस्थिती नेमकी उलट असते. आपण व्यावसायिक क्षेत्रातील सर्वच व्यावसायिक किंवा तज्ज्ञ कोणत्याही रचनेचा अथवा संस्थांचा विचार करताना एक महत्त्वाचा घटक विसरतो, तो म्हणजे ‘समाज.’ केवळ आणि केवळ समाज या घटकामुळेच मेळघाटातील तो आदिवासी बांधव केवळ सहा हजार रुपयांत घर बांधू शकला? या सामाजिक रचना कशा काम करतात? समाज हा नैसर्गिक स्रोतांचा आणि संसाधनांचा योग्य नियोजन आणि विनियोग करणारा महत्त्वाचा घटक आहे. अशा समाजात वैयक्तिक घर बांधणेसुद्धा सामाजिक क्रिया आहे. गावात घर बांधताना त्या घराच्या बांधकामात संपूर्ण गाव सहभागी होतो. परिणामी मजुरीचा खर्च शून्य होऊन जातो. गावातील कुशल कारागिरास (लाकूड मेस्त्री किंवा वीट मेस्त्री) संध्याकाळी कोंबडीचे जेवण किंवा दारू देऊन मान दिला जातो. घरातील सर्व व्यक्ती बांधकामात सहभागी असतात. तसेच एकमेकांना घर बांधण्यासाठी मदत केल्याचा सर्व तपशील लोकांच्या डोक्यात पक्का असतो. त्यामुळे कोणतेही घर बांधत असताना एकमेकांना केलेल्या मदतीचे श्रम इथे पशासारखेच वापरले जाते. समाज एकमेकांवर अवलंबून असल्याने तो एकमेकांशी बांधला जातो. घरासाठीचे सर्व साहित्य आजूबाजूच्या परिसरातून मिळवले जाते. माती शेतातून किंवा डोंगराच्या पायथ्याकडून आणली जाते. झाडे वैयक्तिक फॉरेस्ट प्लॉटमधून आणली जातात. ही झाडे कापून झाल्यावर पुढील पिढीसाठी त्यांची लागवड पुन्हा केली जाते. बांबू, गवत आजूबाजूलाच विनामूल्य मिळून जाते. जुन्या घरातून मिळवलेल्या बांधकाम साहित्याचा कल्पकतेने पुनर्वापर केला जातो. या सर्वात समाज सक्रिय असतो आणि याच प्रक्रियेमुळे समाज सुदृढ आणि सक्षम होत जातो. परिणामी घराचा खर्च जवळजवळ नगण्य होतो. शहरात हाच सामाजिक घटक कमकुवत असल्याने त्यात आर्थिक खर्च वाढतो.

शहरात घराच्या बांधकाम खर्चापेक्षाही जमिनीची किंमत प्रचंड जास्त असते. त्यास अनेक आर्थिक आणि राजकीय घटक कारणीभूत असतात. गावाप्रमाणे देवाणघेवाणीवर शहरात कोणतीच संस्था चालत नाही. परिणामी प्रत्येक स्तरावर फायदा घेऊन काम करणाऱ्या घटकांमुळे घरांची किंमत वाढत जाते. शहरात घरे बांधताना समाज हा घटक कार्यान्वित नसल्याने, बांधकाम हे कुशल आणि अकुशल बांधकाम मजुरांकडून आर्थिक मोबदला देऊन केले जाते. आर्थिक मोबदला मिळत असल्याने सदर मजूर बांधकामाशी भावनिक दृष्टय़ा जोडला जात नाही. यामुळे बांधकाम गुणवत्तेशी त्याचा काडीचाही संबंध नसतो. स्थानिक नैसर्गिक संसाधने या प्रक्रियेत भाग घेत नसल्याने सर्व साहित्य हे कारखान्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून मागवले जाते. सदर घरे औद्योगिक साहित्याने बांधल्यामुळे घरात ऊर्जेची गरज वाढते. पाण्यासारखा मूलभूत स्रोत घरापर्यंत आणण्यासाठीसुद्धा ऊर्जेचा प्रचंड वापर होतो. परिणामी खर्च मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच जातो. शहरात घर बांधणे ही केवळ गरज नाही तर व्यापारसुद्धा आहे. म्हणूनच आधी घरे बांधून ती विकली जातात. या व्यापारात अधिकाधिक नफा मिळवण्याच्या वृत्तीमुळे परवडणारी घरे शहरात बांधणेही एक अंधश्रद्धा बनून राहिली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनेक बँका आणि सहकारी संस्था आकर्षक व्याजदरातील कर्जाच्या योजना घेऊन येताना दिसतात. पण परवडणाऱ्या घरांचे वास्तव या योजनांच्या मागे लपूनच राहते आणि हा यक्षप्रश्न काही केल्या सुटण्याचे नाव घेत नाही.

ग्रामीण भागातील घरांच्या बांधकामात जरी नैसर्गिक स्रोत, संसाधने आणि समाजासारख्या अनेक संस्था कार्यान्वित असल्या तरी ही क्रिया प्रचंड सोपी आहे. या सर्व प्रक्रियांचे ज्ञान लॉरी बेकर, दीदी कॉन्ट्रॅक्टर यांसारख्या वास्तुशिल्पींना समजले आणि याच सामाजिक रचनांचा वापर करून त्यांनी उत्तम परवडणारी घरे बनवली. लॉरी बेकर यांना तर भारतातील ‘परवडणाऱ्या घरांचे जनक’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परवडणारी घरे बांधताना यांनी ऊर्जेचा आणि बांधकाम संसाधनांचा संवेदनशील आणि जाणीवपूर्वक वापर यावर जास्त भर दिला आणि म्हणूनच ही घरे समाजाला परवडू लागली. स्वत:चा नफा वाढवण्यासाठी संसाधनांचा भरमसाट वापर करणाऱ्या व्यावसायिकांना या रचनेचे अध्यात्म कधी समजेल तरी का? या सामाजिक अर्थशास्त्राची खोली समजून घेणे आज भारतातील प्रत्येक व्यावसायिकाला गरजेचे आहे. हे अर्थशास्त्र टक्केवारी, नफा, तोटा, व्याज, कर्ज यापलीकडे जाऊन विश्वासावर आधारलेले आहे. त्यातून एक समाज निर्माण होतो आणि तो समाज शाश्वत विकासाकडे वाटचाल करतो. हा विकास कदाचित आकडय़ांत मोजता येणे शक्य नसेल, पण त्याची शाश्वत निसर्गाप्रमाणेच अढळ असते. म्हणून परवडणारी घरे बांधता बांधता जर समाज आणि नैसर्गिक संसाधने बांधण्याची क्रिया आपण चालू केली तर कदाचित ‘परवडणारी घरे’ही संकल्पना अंधश्रद्धा न राहता वास्तवात उतरेल आणि हा यक्षप्रश्न लीलया सुटेलही.

pratik@designjatra.org

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Economics and sociology of affordable housing

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×