ओव्हरहिटिंग हे विद्युत आगीचे सर्वात धोकादायक आणि कमी समजले जाणारे कारण आहे. शॉर्ट सर्किटप्रमाणे ओव्हरहिटिंगमध्ये सहसा ठिणग्या, आवाज किंवा तात्काळ बिघाड दिसून येत नाही. इतकेच नव्हे तर ओव्हरलोडिंग नसतानाही ओव्हरहिटिंग होऊ शकते, त्यामुळे हे एक शांत, पण फसवे कारण ठरते
ओव्हरहिटिंग तेव्हा होते- जेव्हा विद्युत प्रणालीतील प्रतिकूल परिस्थितींमुळे विद्युत ऊर्जा अनावश्यकपणे उष्णतेमध्ये रूपांतरित होते. ही उष्णता हळूहळू साचत जाते आणि आजूबाजूच्या ज्वलनशील पदार्थांचे तापमान पेट घेण्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचते.
ओव्हरहिटिंगचे सर्वात सामान्य कारण म्हणजे सैल (loose) किंवा बिघाड झालेले कनेक्शन. प्रवाह मर्यादेत असला तरी सैल जॉइंटमुळे प्रतिकार (Resistance) वाढतो. वाढलेल्या प्रतिकारामुळे त्या ठिकाणी स्थानिक उष्णता निर्माण होते. कालांतराने ही उष्णता इन्सुलेशन खराब करते, धातूच्या पृष्ठभागावर ऑक्सिडेशन करते आणि कनेक्शन अधिक सैल करते-असे एक दुष्ट चक्र (Vicious Cycle) तयार होतो. शेवटी हा जॉइंट इतका तापतो की आजूबाजूचे ज्वलनशील पदार्थ पेट घेऊ शकतात.
इलेक्ट्रिकल पॅनेल्स आणि डिस्ट्रीब्यूशन बोर्ड हे ओव्हरहिटिंगसाठी अत्यंत संवेदनशील ठिकाणे आहेत. बसबारचे सैल जॉइंट, कमी क्षमतेचे वायर, चुकीची टर्मिनेशन, गंज, किंवा धूळ साचल्यामुळे पॅनेलच्या आत उष्णता वाढते. ट्रान्सफॉर्मर हेदेखील ओव्हरहिटिंगचे महत्त्वाचे स्रोत आहेत. खराब वेंटिलेशन, कूलिंग पाथ अडलेले असणे, ऑइलची गुणवत्ता कमी होणे, पूर्वीचा ओव्हरलोडिंगचा इतिहास किंवा अंतर्गत वाईट इन्सुलेशन यामुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान असामान्यपणे वाढू शकते. त्यामुळे जवळील वायर, इन्सुलेशन किंवा साठवलेले साहित्य पेट घेऊ शकते.
बॅटरीमध्येही ओव्हरहिटिंग होऊ शकते- विशेषतः ओव्हरचार्जिंग, अपुरी वेंटिलेशन, जुने सेल, सैल टर्मिनल्स किंवा अयोग्य चार्जर वापरल्यास. लिथियम-आयन बॅटऱ्या यासाठी विशेषतः संवेदनशील असतात. एकदा ओव्हरहिटिंग सुरू झाले की तीव्र उष्णता निर्माण होऊन आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. मोटर्स, पंप्स ही उपकरणेदेखील बेअरिंग फेल्युअर, मिसअलाइनमेंट, वेंटिलेशन अडथळे, व्होल्टेज असमतोल किंवा वाईट इन्सुलेशनच्या ओव्हरहिट होऊ शकतात
ओव्हरहिटिंगचे आणखी एक दुर्लक्षित कारण म्हणजे बाह्य उष्णता अडकणे. वायर घट्ट गुंडाळलेले असणे, एक्स्टेंशन कॉर्ड्स गुंडाळून ठेवणे, फर्निचरमागे झाकलेले पॅनेल्स किंवा बंद जागेत बसवलेली उपकरणे यामुळे उष्णता बाहेर पडू शकत नाही. अगदी सामान्य कार्यरत उष्णताही अशा परिस्थितीत धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते.
ओव्हरहिटिंगमुळे होणाऱ्या आगी बहुतेक वेळा उपकरणांच्या आत, पॅनेल्समध्ये किंवा लपलेल्या वायरिंगमध्ये सुरू होतात, त्यामुळे त्यांची लवकर ओळख होणे कठीण असते. सुरुवातीला कोणताही वास किंवा दृश्य चिन्ह दिसत नाही. धूर किंवा ज्वाळा दिसेपर्यंत आग आधीच पसरलेली असते.
जेव्हा ओव्हरहिटिंग दीर्घकाळ चालू राहते, तेव्हा वायर, इन्सुलेशन, टर्मिनल्स किंवा उपकरणांच्या पृष्ठभागाचे तापमान सुरक्षित मर्यादेपेक्षा वाढते. उच्च तापमानामुळे इन्सुलेशन खराब होते, कडक होते आणि तडे जातात. इन्सुलेशन कमजोर झाल्यावर त्याचे संरक्षणात्मक गुणधर्म कमी होतात व ते कार्बनाइज होते. कार्बनाइज झालेले इन्सुलेशन सेमीकंडक्टर (Semiconductor) बनते, ज्यामुळे लीकेज करंट वाहू लागतो. हा लीकेज करंट स्थानिक उष्णता आणखी वाढवतो आणि लहान ठिणग्या तयार होतात. त्याच वेळी प्लास्टिक कव्हर, केबल इन्सुलेशन, धूळ, कागद, लाकूड, कापड किंवा थर्मोकोल यांसारखे ज्वलनशील पदार्थ ही उष्णता शोषून घेतात. एकदा यापैकी कोणत्याही पदार्थाचे तापमान पेट घेण्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचले की आग लागते. ही प्रक्रिया हळूहळू व लपून घडत असल्यामुळे आग अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता भडकते.
ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी योग्य डिझाइन, योग्य टर्मिनेशन पद्धती, पुरेशी वेंटिलेशन, नियमित तपासणी, थर्मल स्कॅनिंग आणि उपकरणांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
पुढील लेखात आपण पूर्णपणे प्रत्यक्ष परिस्थितींवर लक्ष केंद्रित करू. सुरुवात करूया सर्वात सामान्य आणि धोकादायक सवयींपासून-पॉवर सॉकेट्स, एक्स्टेंशन कॉर्ड्स आणि मल्टी-प्लग्स-जे ठिणग्या, ओव्हरहिटिंग आणि आगीचे मोठे कारण ठरतात.
वीज शांत वाटते-पण उष्णता सतत बोलत असते.
वेळीच ऐकले तर जीव वाचू शकतात.
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)
ajitnkulkarni@yahoo.com
