विद्युत आग प्रतिबंधासाठी विद्युत मानकांचे पालन (Adhere to Electrical Standards for Preventing Fires) देशाच्या शासनासाठी जसे संविधान (Constitution) नियम व कायद्यांची चौकट प्रदान करते, त्याचप्रमाणे अभियांत्रिकी मानके (Engineering Standards) तांत्रिक कार्यासाठी आवश्यक नियम आणि पद्धती निश्चित करतात. अभियांत्रिकी मानके म्हणजे अधिकृत संस्थांनी तयार केलेले औपचारिक नियम व मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) असून ते तांत्रिक कामामध्ये एकसमानता, सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करतात.

ही मानके रचना (Design), उत्पादन (Manufacturing), तपासणी (Testing) आणि देखभाल (Maintenance) करताना कोणत्या पद्धती, मर्यादा आणि तपशील (Specifications) पाळावेत हे स्पष्ट करतात. त्यांचा मुख्य उद्देश सुसंगतता (Consistency) निर्माण करणे, जोखीम (Risk) कमी करणे आणि अपयश टाळणे हा आहे. प्रस्थापित मानकांचे पालन केल्याने कायदेशीर बाबींची आवश्यकता पूर्ण करतात आणि जबाबदारी (Accountability) सुनिश्चित होते. त्यामुळे अभियांत्रिकी मानके सुरक्षितता (Safety), कार्यक्षमता (Efficiency), विश्वासार्हता (Reliability) आणि व्यावसायिकता (Professionalism) वाढवतात.

विद्युत मानके (Electrical Standards) अनेकदा केवळ कागदोपत्री औपचारिकता (Paperwork) किंवा तपासणीसाठीची प्रक्रिया असे समजले जाते. परंतु प्रत्यक्षात ISI, NBC, NEC, CEA नियमावली आणि संबंधित IEC कोड यांसारखी मानके सतत अभ्यासली जातात, अनुभवावर आधारित सुधारित केली जातात आणि नवीन तांत्रिक प्रगतीनुसार अद्ययावत केली जातात. प्रत्येक नियमामागे पूर्वी घडलेल्या घटनांचा अनुभव आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक सुधारणा दडलेल्या असतात. त्यामुळे ही मानके मार्गदर्शक असतात.

अनेक वेळा विद्युत प्रणालीची रचना (Design), बसविणे (Installation), देखभाल (Maintenance) किंवा बदल (Modification) करताना प्रस्थापित मानकांचे पालन केले जात नाही. कमी क्षमतेच्या केबल्स (Undersized Cables), चुकीचे संरक्षण साधने (Protection Devices), चुकीचे संरक्षण समन्वय (Protection Coordination), अपुरी अंतरमर्यादा (Clearances), अयोग्य अर्थिंग (Earthing), चुकीचा केबल मार्ग (Cable Routing) आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य (Substandard Materials) यामुळे प्रणालीमध्ये आग होण्याचा धोका वाढतो.

मानकांचे पालन केल्यास विद्युत प्रणाली स्वाभाविकपणे अतितप्त होणे (Overheating), ठिणगी निर्माण होणे (Arcing) आणि इन्सुलेशन निकामी होणे (Insulation Failure) यांपासून सुरक्षित राहते. परंतु मानके दुर्लक्षित केल्यास धोका सुरुवातीपासूनच प्रणालीमध्ये निर्माण होतो.

अनेक प्रकल्पांमध्ये ISI चिन्हांकित नसलेल्या वायर व केबल्स वापरल्या जातात. काही उत्पादक पुनर्वापर केलेले तांबे किंवा ॲल्युमिनियम वापरतात. काही ठिकाणी इन्सुलेशनचा दर्जा (Insulation Quality) कमी असतो. बाजारात बनावट ब्रँडेड (Fake Branded) विद्युत साहित्य उपलब्ध असते, जे सुरक्षिततेच्या निकषांना पूर्ण करत नाही.

वायरिंगसाठी मानकांनुसार किमान वाहक आकार (Minimum Conductor Size) निश्चित केलेला आहे. तरीही १ चौ.मिमी. (1 sq mm) तांब्याची वायर अंतर्गत वायरिंगसाठी वापरली जाते जी मानकानुसार वापरू नये असे आहे. अनेकदा हीच वायर जड उपकरणांसाठी (Heavy Appliances) वापरली जाते. यामुळे अतितप्त (Overheating) आणि इन्सुलेशन निकामी होण्याचा धोका वाढतो.

जुन्या वायरिंगचे इन्सुलेशन कालांतराने कमजोर होते, तरीही त्याचा नियमबाह्य वापर चालू ठेवला जातो. यामुळे लिकेज प्रवाह (Leakage Current), शॉर्ट सर्किट (Short Circuit) होण्याची शक्यता वाढते आणि आग लागू शकते. मानकांनुसार योग्य पद्धतीने जोड (Joint) करणे आवश्यक असते, तरीही वायर्स एक मेकास पीळ देऊन जोडणे (Twisted Joints), एका टर्मिनलमध्ये अनेक वायर बसवणे किंवा लग्स (Lugs) योग्य टॉर्कने घट्ट न करणे अशा चुका आढळतात. तांबे व ॲल्युमिनियम वाहक योग्य कनेक्टरशिवाय जोडले जातात, ज्यामुळे स्थानिक उष्णता (Localized Heating) निर्माण होते व आगीस कारण मिळते.

ट्रिपिंगला निरुपयोगी ठरवून ते टाळण्यासाठी संरक्षण साधने (Protection Devices) कधी कधी काढून टाकणे, जास्त रेटिंगचे फ्युज वापरणे किंवा इंटरलॉक्स (Interlocks) निष्क्रिय करणे अशा नियमबाह्य पद्धती वापरल्या जातात, ज्यामुळे सुरक्षितता धोक्यात येते. मानकांनुसार अर्थिंग करणे आवश्यक असले तरी अनेक ठिकाणी उपकरणांना अर्थिंग वायर जोडलेली नसते. किंवा अर्थ पिट्स (Earth Pits) बरोबर योग्य आहेत की नाही हे तपासले जात नाहीत. हे धोकादायक आहे. उच्चदाब वाहिन्यांमध्ये (High Voltage Lines) मानकांनुसार आवश्यक सुरक्षित अंतर राखले जात नाही. अनेक ठिकाणी विजेपासून संरक्षण करणारी प्रणाली (Lightning Protection System) बसवलेली नसते.

पूर्वी PVC इन्सुलेशन वायरसाठी वापरले जात होते, परंतु आधुनिक मानकांनुसार आग प्रतीबंधक कमी धूर कमी हॅलोजन (Flame Retardant Low Smoke Halogen) आणि कमी धूर शून्य हॅलोजन (Low Smoke Zero Halogen) इन्सुलेशन वायरसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. विशेषतः निवासी इमारती, रुग्णालये, व्यापारी संकुले आणि आपत्कालीन मार्गांमध्ये वापरण्यास सांगितले आहे. तरीही पारंपरिक PVC इन्सुलेशन वायरसाठी वापरले जाते. मानकांनुसार अर्थ लिकेज संरक्षण (Earth Leakage Protection) आवश्यक असते, परंतु अनेक ठिकाणी ते बसवलेले नसते किंवा योग्यरित्या कार्यरत नसते.

इमारतींमध्ये, घरात किंवा कुठल्याही उद्योगधंद्यात कालांतराने बदल होतात, भार (Load) वाढतो, नवीन उपकरणे बसवली जातात. अशा वेळेस नियमानुसार, मानकांनुसार सुरक्षित प्रणालीसाठी पुन्हा तपासणी करावयास पाहिजे. परंतु कित्येकवेळा रचना चित्रे (Drawings) अद्ययावत केली जात नाहीत, संरक्षण साधने (Protection Devices), संरक्षण सेटिंग्स (Protection Settings) तपासल्या जात नाहीत, केबल किंवा आतील वायरच्या क्षमतेची पडताळणी होत नाही. या कारणांमुळे विद्युत प्रणाली असुरक्षित होते.

मानके किंवा ठरवून दिलेले नियम किंवा कायदे सामूहिक अनुभवाचे सुरक्षित पद्धतींमध्ये रूपांतर करतात. मानके प्रगतीस अडथळा नसून जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि आर्थिक तोटा टाळण्यासाठी आवश्यक संरक्षण आहेत. मानकांचे पालन न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रुटी त्वरित दिसत नाहीत. काही दिवसांनी अशी नियमबाह्य कामे अतितप्त होणे, इन्सुलेशन हानी आणि ठिणगी यांमुळे कालांतराने विद्युतआगीत रूपांतर होते. मानकांचे पालन हे केवळ तपासणीसाठी नसून संपूर्ण आयुष्यभर सुरक्षित राहणारी प्रणाली उभारण्यासाठी आवश्यक आहे.

(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)

ajitnkulkarni@yahoo.com